शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (23:56 IST)

ऑनलाईन स्कॅममध्ये गेलेले पैसे दोन दिवसात कसे मिळतात? वाचा

पार्ट टाईम जॉब' असं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो आणि या भूलथापांना बळी पडतो. असंच कोईम्बतूरमधील एका महिलेला प्रचंड कमाईचं आमिष दाखवून 15 लाखांचा गंडा घालण्यात आलाय. सायबर गुन्हेगारांच्या कचाट्यात अडकल्याने तिचं एवढं मोठं नुकसान झालं आहे.
 
सायबर गुन्हेगारांपासून कसा बचाव करायचा?
सुविता (नाव बदललेलं आहे) या कोईम्बतूर मध्ये राहतात. त्यांचं पदवी पर्यंतचं शिक्षण झालं आहे. तीन आठवड्यांपूर्वी सुविताच्या टेलिग्रामवर आराध्या नामक एका महिलेचा मेसेज आला. तिने 'मेक माय ट्रीप' मध्ये पार्ट टाईम नोकरी असल्याचं सांगितलं. यासाठी हॉटेल्सची जाहिरात करावी लागणार असून रिव्ह्यू द्यायचे काम आहे असं सांगितलं. तिने दररोज हे काम केल्यास तिला 900-4,000 रुपये मिळतील असंही सांगितलं.
 
पार्ट टाईम नोकरी असून चांगलं उत्पन्न मिळवण्याच्या आशेने सुविताने मॅसेज मध्ये नमूद केलेल्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी केली.
 
त्यानंतर पुन्हा टेलिग्रामवरून सुविताला संपर्क केला. आराध्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीने हॉटेलचा रिव्ह्यू कसा घ्यायचा आणि कामं कशी पूर्ण करायची यासंबंधी सूचना दिल्या. सुवितानेही सूचनांचं पालन केलं. तिने पार्ट टाईम नोकरीसाठी 11,000 गुंतवले होते, फसवणूक करणाऱ्या टोळीने पगार म्हणून सुविताला 20,274 रुपये दिले. पैसे परत आल्याने सुविताला कामाची खात्री पटली आणि तिने आणखीन 17,324 रुपये गुंतवले. यावेळी कामातून तिला 40, 456 रुपये मिळाले.
 
अशा प्रकारे, सुविताला विश्वास पटला की हे लोक खरंच काम देत आहेत.
 
'डिलक्स टास्क - उच्च उत्पन्न'!
 
जेव्हा या टोळीने तिला जास्त कमिशन मिळवून देणारं 'डिलक्स टास्क' कर असं सांगितल्यावर सुवितानेही त्याला होकार दिला. तिने 6 बँक खात्यांमध्ये 15.74 लाख रुपये पाठवले.
 
सुरुवातीला पैसे देणाऱ्या टोळीने अचानक कमिशन देणं बंद केलं त्यामुळे सुविताला धक्का बसला. सुविताने पहिल्यांदा ओळख झालेल्या आराध्याच्या नंबरवर संपर्क साधला असता तो बंद लागला.
 
आपली फसवणूक झाल्याचं कळताच व्यथित होऊन सुविताने कोईम्बतूर सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि फसवणूक करणाऱ्या टोळीचा शोध सुरू केला.
 
ज्याप्रमाणे सुविताची घोटाळेबाजांनी फसवणूक केली, त्याचप्रमाणे दिवसाला देशातील एक व्यक्ती सायबर स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकतो आणि पैसा आणि जीव गमावतो.
 
अशा घटना घडतात तेव्हा काय करायला हवं? सायबर क्राईम घोटाळ्यांद्वारे लोकांची कशी फसवणूक केली जाते?
 
'पार्ट टाईम कामाच्या नावाखाली गुन्हे'
कोईम्बतूरमधील सुविताच्या प्रकरणाबद्दल आणि विविध प्रकारच्या फसवणुकीबद्दल बीबीसी तामिळशी बोलताना कोईम्बतूरचे सायबर क्राइम पोलीस निरीक्षक अरुण सांगतात की, "कोईम्बतूरमध्ये सुविता बरोबर जे घडलं ते टास्क-आधारित सायबर क्राईम होतं. पार्ट टाईम कामाच्या नावाखाली अशी फसवणूक होते."
 
"सुरुवातीला टेलिग्रामवर संपर्क साधतात. त्यानंतर हॉटेल आणि शैक्षणिक संस्थांना रिव्ह्यू करायचं काम आहे असं सांगतात. सुरुवातीला लोकांना 2,000 - 4,000 रुपये दिले जातील असं सांगून नंतर डिलक्स टास्क देतात."
 
"टेलिग्रामच्या ग्रुपवर सामील झालेल्या लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी ही टोळी इतर पैसे भरलेल्या लोकांचे स्क्रीनशॉट शेअर करते आणि पैसे कसे दुप्पट झाले याची माहिती देते. त्यानंतर ग्रुपमध्ये सामील झालेल्या लोकांनी पैसे भरले तर काही दिवसांत पैसे दुप्पट करून देतो असा आत्मविश्वास निर्माण केला जातो. यामुळे लोक अतिरिक्त पैसे गुंतवतात. एकदा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली की मग ही टोळी फसवणूक करून पसार होते."
 
"फसवणूक करणाऱ्या टोळ्या विश्वासार्हता निर्माण करतात त्यामुळे लोक लाखो रुपये गुंतवून बळी पडतात. आयटी कंपनीचे कर्मचारी आणि सुशिक्षित पदवीधरही अशा घोटाळ्यांना बळी पडतात. आताच्या काळात दुप्पट पैसे कोण देईल? कोणाचाही सल्ला न घेता सुशिक्षित लोक याला बळी पडतात हे दुःखद आहे."
 
पण अशा फसवणुकीत गमावलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात का? यावर पोलीस निरीक्षक अरुण म्हणतात की सायबर गुन्ह्यांमध्ये लोकांनी गमावलेले पैसे परत मिळवणे हे एक कठीण काम आहे.
 
ते पुढे म्हणाले, "सायबर क्राईम फसवणूक करणाऱ्या टोळ्या 1 तासात 5 लाख रुपये 1,200 बँक खात्यांमध्ये वितरित करतात आणि फसवणुकीत मिळालेले पैसे वापरतात."
 
फसवणूक करणारे अज्ञात लोकांचा वापर करून त्यांच्या नावावर बँक खाती उघडतात आणि त्यांच्या माहितीशिवाय खाती चालू ठेवतात. विशेषतः उत्तरेकडील राज्यांमध्ये या कामासाठी काही टोळ्या आहेत.
 
त्यांच्या टार्गेटवर गरीब लोक असतात. त्यांना 1,000 ते 5,000 रुपये देऊन त्यांच्या नावावर बँक खाते उघडतात. सरकारी मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांच्या नावाने बँक खाती उघडणाऱ्या सायबर गुन्ह्य़ातील गुन्हेगारांना आम्ही अलीकडेच अटक केली आहे.
 
एका खात्यातून अनेक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले जात असल्याने, त्या सर्वांचा शोध घेणं, ती खाती गोठवणं, पैसे वसूल करणं हे सर्वात मोठं आव्हान आहे.
 
"त्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये पैसे वसूल होण्यास विलंब होतो आणि पूर्ण रक्कम वसूल होऊ शकत नाही. शिवाय कितीही जनजागृती केली तरी गुन्हेगारी वाढते आहे. लोक सावध असतील तरच या घोटाळ्यातून सुटू शकतात."
 
2 दिवसात गमावलेले पैसे परत मिळू शकतात
 
बीबीसी तमिळशी बोलताना सायबर क्राईम तज्ञ विनोद अरुमुगम म्हणाले, "दिवसेंदिवस कामावर आधारित सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. पार्ट टाईम जॉब, भेटवस्तू आणि ऑनलाईन उत्पादनं विकण्याच्या नावाखाली हे गुन्हे केले जातात."
 
जर आपण एखाद्याला पैसे पाठवले किंवा फसवणूकीला बळी पडलो, तर आपल्या बँक खात्यातून फसवणूक करणार्‍याकडे लगेच पैसे जातात.
 
पण पैशांचा व्यवहार होण्यासाठी दोन दिवस म्हणजे 48 तास लागतात. जर फसवणूक झालेल्या व्यक्तीने बँकेला ताबडतोब तक्रार केल्यास, बँक व्यवहार रद्द करेल आणि पैसे वसूल करण्याची कारवाई करेल.
 
सायबर फसवणुकीमुळे लोकांचे पैसे गमवावे लागल्यास त्यांनी ताबडतोब जवळचं पोलीस स्टेशन, जिल्हा सायबर गुन्हे कार्यालय किंवा 1930 वर तक्रार करावी. जितक्या लवकर तुम्ही तक्रार कराल तितक्या लवकर पैसे वसूल करता येतील.
 
ते सांगतात, "पैसे गमावल्यानंतर, पैसे परत येण्याची वाट पाहणे आणि खूप उशीर झाल्यावर तक्रार करणे ही एक अतिशय कठीण प्रक्रिया होते."
 
रिफंडमध्ये काय अडचणी येतात?
बीबीसी तमिळशी बोलताना ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचे माजी सरचिटणीस थॉमस फ्रँको म्हणाले, "सायबर गुन्ह्यांना बळी पडलेल्या लोकांनी व्यवहार झाल्यावर 48 तासांच्या आत संबंधित बँकेला कळवावे. अशी माहिती दिल्यास बँक व्यवहार रद्द करू शकते आणि ग्राहकाचे गेलेले पैसे परत मिळवून देऊ शकते. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशानुसार, ग्राहकांनी 48 तासांच्या आत माहिती दिल्यास, बँक ग्राहकांना पैसे परत करेल."
 
तसेच, थॉमस फ्रँको सांगतात की, बँकांना पैसे वसूल करण्यात आणि ग्राहकांना परत करण्यात समस्या येत आहेत.
 
ते सांगतात, "ज्या लोकांनी पैसे गमावले आहेत त्यांनी 48 तासांच्या आत बँकेला माहिती दिली, तरी बहुतेक बँका पैसे वसूल करत नाहीत आणि ग्राहकांना देत नाहीत. रिफंडमध्ये विविध प्रशासकीय समस्या असल्याने बँका ग्राहकांना सबब सांगून मोकळ्या होतात."
 
"बँकांमध्ये रोख व्यवहारांशी संबंधित विमा असूनही, बँका ग्राहकांना पैसे देत नाहीत. माझ्या माहितीनुसार, तिरुनेलवेली भागातील एका स्वातंत्र्यसैनिकाचे सायबर फसवणूकीत 50 हजार रुपये गेले होते. आज 3 वर्ष झाले तरी ते पैसे परत मिळालेले नाहीत."
 
थॉमस फ्रँको सांगतात की, "आम्ही एक वर्षापूर्वी सेंट्रल रिझर्व्ह बँकेला अशा प्रकरणांची माहिती दिली होती. शिवाय बँका आदेशानुसार ग्राहकांना पैसे परत करत नाहीत अशी तक्रार देखील केली होत. मात्र रिझर्व्ह बँकेने अद्याप त्या तक्रारीला प्रतिसाद दिलेला नाही. आणि कोणतीही कारवाई केली नाही."




































Published By- Priya Dixit