बुधवार, 27 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (14:14 IST)

आता 'या' सगळ्या कामांसाठी पुरावा म्हणून फक्त जन्म दाखलाच लागणार

birth
देशभरात 1 ऑक्टोबरपासून जन्म-मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा- 2023 लागू होणार आहे.यामुळे जन्म प्रमाणपत्र या एकमेव दस्तावेजाचा वेगवेगळ्या कामांसाठी पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे.कोणकोणत्या कामांसाठी जन्म प्रमाणपत्र हा एकमेव पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार, ते आधी पाहूया.
 
शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी.
मतदार यादी तयार करण्यासाठी.
आधार क्रमांक नोंदणीसाठी.
विवाह नोंदणीसाठी.
सरकारी नोकरीच्या नियुक्तीसाठी आणि केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या इतर कारणांसाठी.
 
कायद्याचा उद्देश काय?
जन्म-मृत्यूच्या अशाप्रकारच्या डिजिटल नोंदणीद्वारे सरकारी सेवांची कार्यक्षमता वाढवणं आणि त्यात पारदर्शकता आणणं, हाही या कायद्यामागचा उद्देश आहे.
 
केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे.
 
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी गेल्या महिन्यात पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात जन्म-मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक- 2023 मंजूर केलं होतं.
 
राज्यसभेनं 7 ऑगस्ट रोजी आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर केलं, तर लोकसभेनं 1 ऑगस्ट रोजी ते मंजूर केलं.
 
1 ऑक्टोबर 2023 पासून या कायद्याची देशभरात अंमलबजावणी सुरू होणार आहे.
 
जन्म दाखला कसा काढायचा?
जन्म नोंदणी प्रमाणपत्र तुम्ही घरबसल्या ऑनलाईन काढू शकता. आपले सरकार पोर्टलवर त्यासाठी अर्ज केला की पुढच्या 5 दिवसांत तुम्हाला जन्म दाखला मिळायला हवा, असं या पोर्टलवर नमूद केलं आहे.
 
आता जन्म दाखला काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया समजून घेऊया.
 
जन्म दाखला काढण्यासाठी आपले सरकारच्या वेबसाईटवर जायचं आहे.
इथल्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग या रकान्यात जन्म नोंद दाखला हा पहिलाच पर्याय आहे. त्यावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर यासाठी कोणती कागदत्रे लागतात, त्याची माहिती स्क्रीनवर दिसेल.
पुढे लागू करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
 
जन्म दाखला काढण्यासाठी मग या पोर्टलवर नोंदणी करायची आहे.
मग ग्रामविकास विभागातील सेवांमध्ये जाऊन जन्म नोंद दाखला यावर क्लिक करायचं आहे.
जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, अर्जदाराचं पूर्ण नाव, जन्मतारीख टाकायची आहे.
त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल आणि स्क्रीनवर तुम्हाला अर्ज क्रमांक दाखवला जाईल.
पुढे यासाठी लागणारी फी भरायची आहे. त्यानंतर तुमचा अर्ज पूर्णत: सबमिट होईल.
 
सरकारी नियमांनुसार, तुम्हाला 5 दिवसांत जन्म दाखला मिळायला हवा. तो तुम्ही आपले सरकार पोर्टलवर जाऊन डाऊनलोड करू शकता.
 
जन्म दाखला वेळेत मिळावा यासाठी तुम्ही अर्ज सबमिट केला की लगेच तुमच्या गावाच्या ग्रामसेवकाला अर्ज क्रमांक पाठवून ठेवू शकता. त्यांनी हा अर्ज मंजूर केला की, तुम्हाला जन्म दाखला ठरावीक कालमर्यादेत मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
 
Published By- Priya Dixit