बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (23:00 IST)

पंतप्रधान विश्वकर्मा योजना : एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, जाणून घ्या या नव्या योजनेबद्दल

vishwakarma yojana
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित करताना पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांसाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली. पण या योजनेअंतर्गत निधी कसा आणि कोणाला मिळणार?
 
15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी 13-15 हजार कोटी रुपयांसह 'विश्वकर्मा योजना' सुरू केली जाणार आहे. या योजनेद्वारे येत्या काळात पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना सरकार मदत करेल.
 
दरम्यान या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 ऑगस्ट रोजी मंजुरी दिली असून योजनेसाठी 13,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 
ही योजना 2023-2024 ते 2027-2028 या पाच वर्षांसाठी असेल.
 
या योजनेचा उद्देश काय आहे?
या योजनेसंबंधी असं म्हटलं जातंय की, गुरु-शिष्य परंपरेला चालना देणे आणि कारागिरांच्या कौटुंबिक-आधारित पारंपारिक व्यवसायाला बळ मिळेल हा यामागचा उद्देश आहे.
 
शिवाय कारागिरांची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता सुधारणे. तसेच या कारागिरांना देशांतर्गत आणि जागतिक विक्री साखळीशी जोडणे ही या योजनेची इतर उद्दिष्टे आहेत.
 
या योजनेअंतर्गत लोकांना काय मिळणार?
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागीर आणि हस्तकला कामगारांना विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळेल.
 
तसेच, पहिल्या टप्प्यात 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये 5% व्याजासह मिळतील.
 
कोणते व्यवसायिक लाभ मिळू शकतात?
संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील कारागीरांना या योजनेत सामावून घेतले जाईल.
 
सुरुवातीला खालील अठरा पारंपरिक व्यवसायांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 
सुतार
सोनार
कुंभार
शिल्पकार/मूर्तिकार
चांभार
गवंडी
विणकर/चटई/झाडू बनविणारे, दोऱ्या वळणारे /बेलदार
पारंपारिक खेळणी बनविणारे
नाभिक
हार-तुरे तयार करणारे
धोबी
शिंपी
मासेमारीचे जाळे बनवणारा
होड्या बांधणारे
चिलखत तयार करणारा
लोहार
कुलूप तयार करणारे
कुऱ्हाड आणि इतर लोखंडी हत्यार बनविणारे
प्रमाणपत्र, कर्ज याशिवाय या योजनेत आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत?
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेविषयी आणखीन माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, या योजनेअंतर्गत कारागिरांना प्रशिक्षण दिले जाई.
 
ही प्रशिक्षणे मूलभूत प्रशिक्षण आणि प्रगत प्रशिक्षण अशा दोन स्वरूपात दिली जातील.
 
प्रशिक्षणार्थींना दररोज 500 रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाईल. तसेच, औद्योगिक उपकरणे खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये आर्थिक मदत दिली जाईल.
 
या योजनेअंतर्गत पहिल्या वर्षी पाच लाख कुटुंबांना लाभ मिळणार असून पाच वर्षांत एकूण 30 लाख कुटुंब या योजनेचा लाभ घेतील.
 
ही योजना कधीपासून लागू होईल, अर्ज कसा करायचा, यासाठी संकेतस्थळ आहे का?
यंदा विश्वकर्मा जयंती 17 सप्टेंबर रोजी आहे. तेव्हापासून या योजनेला सुरुवात होईल.
 
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तसेच या योजनेचे संकेतस्थळ याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.