रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. सावरकर
Written By वेबदुनिया|

वटवृक्ष

- डॉ. सौ. उषा गडकरी

त्या महामानावानं मागं ठेवलेल्या
लखलखीत प्रकाशरेषेवरून
किती काळ चालत आहे
अगदी नकळत, परंतु ‍अलगद, विनासायास

कोणतेच खाचखळगे, काटेकुटे वाटेत नाहीत
किंवा काट्यांचीच फुलं होत राहावीत घरघडीला
अशी किमया
जणू त्याने आधीच योजून ठेवलेली

म्हणूनच त्याच्या किमयागिरीचं न आश्चर्य, न कौतुक
निसर्गनियमांना जसं आपण धरतो गृहित
तसं हे अप्रूपही गृहितच धरलं गेलं आतापर्यंत
दाद द्यायचंच राहून गेलं
त्याच्या इच्छाशक्तीला आतापर्यंत

त्या महामानवाचं सहज जगणं अंगवळणी पडलं आमच्या
समस्यांच्या समुद्राला पालांडून जाण्याचं
त्यांच असामान्य धैर्य
नवलाईचं नाही वाटलं आम्हाला

त्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या इन्द्रधनुषी
अविष्काराचं मोल कधीच जाणवलं नाही आम्हाला
एखाद्याच साध्यासुध्या बोलातून
उभ्या जीवनांच शहाणपण दर्शविण्याचं
त्यांच अफाट सामर्थ्य
कधीच जोखता आलं नाही आम्हाला

प्रचंड वटवृक्षाच्या एखाद्या पारंबीचं
वृक्षात रूपांतर व्हावं
आणि मग त्या वृक्षाला
स्वयंभू, स्वायत्त असल्याचा भास होऊन
मूळ स्त्रोताचा सहज विसर पडावा
तसंच काहीसं घडत होतं, घडलं होतं

पण अचानक आपल्या मूळ
जीवनरसाचा शोध लागावा
आणि त्या अमृतधारेच्या
सतत प्रवाहात चिंब भिजावं

तसं हे आजचं स्मरण
थेट मूळ स्त्रोतापर्यंत
घेऊन जातंय
आणि हृदय
कृतार्थेतेची, कृतज्ञतेची
पावती देतंय.