मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. सावरकर
Written By
Last Updated : शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (10:57 IST)

काय ताकद आहे हो, सावरकरांनी बायकोचा घेतलेला निरोप...

Vinayak Damodar Savarkar
तीस वर्षांचा नवरा तुरूंगाच्या पलीकडे उभा आहे, जो पुढल्याच जन्मी बहुतेक भेटणार. आणि दाराच्या अलीकडे ही सव्वीस वर्षांची मुलगी उभी आहे, जिचा मुलगा ही आता ह्या सगळ्या गडबडीत वारला. ह्या दोघांनी एकत्र येऊन काय बोलावं..सावरकरांनी एकच सांगितलं,
 
"माई, काटक्या एकत्र करायच्या आणि घरटं बांधायचं, त्या घरट्यात पोराबाळांची वीण वाढवायची ह्याला जर संसार म्हणायचा असेल तर हा संसार.. कावळे, चिमण्या सगळेच करतात. आपल्या घरट्या पुरता संसार कोणालाही करता येतो, 'आम्हांला देशाचा संसार करता आला यात धन्यता माना'. आणि जगामध्ये काहीतरी पेरल्याशिवाय काही उगवत नाहीच, वर ज्वारीचं कणीसच्या कणीस उभं रहावं, असं जर वाटतं असेल तर एका कणसाच्या दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. तो शेतात, मातीत मिळतो तेव्हा पुढचं धान्य येतं; मग हिंदुस्थानात पुढची चांगली घर निर्माण होण्यासाठी आपलं घर पेरायला नको का! कुठल्या तरी घरानं मातीत गेल्याशिवाय पुढचं चांगलं कसं उगवणार.
 
माई, कल्पना करा.. की आपण आपल्या हातानं आपली चूल बोळकी फोडून टाकली. आपल्या घराला आग लावली, तर हे पेरल्यामुळेच उद्या स्वतंत्र झालेल्या भारताच्या प्रत्येक घरातून आपल्याला सोन्याचा धूर बघायला मिळणार आहे. मग सगळ्यांच्या घरातून सोन्याचा धूर यावा, म्हणून आपण आपल्या घराचा धूर नको का करायला! वाईट वाटून घेऊ नका, एकाच जन्मात मी तुम्हाला एतका त्रास दिला की हाच पती जन्मोंजन्मी मिळावा असं तुम्ही म्हणावं तरी कसं.
 
पुन्हा ह्या जन्मी शक्य झालं तर भेटू, नाहीतर इथेच निरोप."
असं म्हटल्यानंतर ती सव्वीस वर्षांची - पंचवीस वर्षांची पोरगी अशी पटकन खाली बसत त्या तुरुंगाच्या जाळीतून हात आत घालते सावरकरांच्या पायाला हात लावते. ती धूळ आपल्या मस्तकी लावते, सावरकरांनी एकच विचारलं माई काय करता.. त्या पंचवीस वर्षाच्या पोरीनं सुद्धा सांगितलं, "हे पाय बघून ठेवते पुढल्या जन्मी चुकायला नकोत म्हणून. आपल्या घराचे संसार करणारे खूप पाहिले, पण एवढा मोठा देशाचा संसार करणारा पुरुषोत्तम देवाने मला माझा नवरा म्हणून दिला, मला नाही वाईट वाटत त्याच.. मला नाही वाईट वाटत. तुम्ही जर सत्यवान असाल तर मी सावित्री आहे, माझ्या तपश़्चर्येनं यमापासून तुम्हाला मी परत आणिन याची शक्यता बाळगा. स्वतःच्या जीवाला जपा, आम्ही या ठिकाणी तुमची वाट पाहत राहू."
 
काय ताकद आहे हो, निरोप देण्यात काय ताकद आहे.