रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By

ज्ञानयोगी बाबासाहेब

दलित समाजात जन्मलेले व स्वकर्तृत्वाने संपूर्ण भारतीय समाजाला आदर्श ठरलेले ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदू समाजाला एक आव्हान होते. त्यांना भारत देश अप्रिय नव्हता, इथला धर्म अप्रिय नव्हता तर त्या धर्माने, जातिव्यवस्थेने केलेले समर्थन, संवर्धन त्यांना अमान्य होते.
 
बाबासाहेबांच्या कुटुंबाला लक्ष्मी प्रसन्न नव्हती तर सरस्वतीची आराधना करणारे कबीरपंथी व पुस्तकप्रेमी वडील होते. वडिलांच्या प्रयत्नाने व प्रेरणेने ते पुस्तकामध्ये रस घेऊ लागले आणि अभ्यासाच्या जोरावर, विद्येच्या जोरावर यश संपादन करू लागले. संपादित केलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला सामर्थ्य व दिशा देण्यासाठी केला आणि महागड्या चवदार तळ्यातील पाणी प्राशन करून सामाजिक क्रांतीची मुर्हुतमेढ रोवली.
डॉ. आंबेडकरांची ज्ञानलालसा इतकी तीव्र होती की, त्यासाठी ते व्यक्तिगत, शारीरिक, मानसिक गरजांकडे दुर्लक्ष करायचे. इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमासाठी सामान्यपणे आठ वर्षे लागायची तो अभ्याक्रम त्यांनी अवघ्या दोन वर्षे तीन महिन्यातच पूर्ण केला. पण त्यासाठी त्यांना दिवसाकाठी 21 तास अभ्यास करावा लागला. रात्रीचा दिवस करावा लागला. वेळोवेळी उपाशीपोटी राहावे लागले. अशी त्यागीवृत्ती, अशी ज्ञानभक्ती आज किती जणात, किती प्रमाणात आढळेल हा मोठा प्रश्न आहे.
 
विद्येच्या जोरावर त्यांनी अनेक पदव्याही ग्रहण केल्या. राजयोग सोडून त्यांनी ज्ञानयोग, कर्मयोग अंगीकारला. आपल्या व्यक्तिगत ज्ञानसंपदेने त्यांनी समाजाचे प्रबोधन केले. त्यासाठी त्यांनी अनेक आव्हाने स्वीकारली. जीवनातील प्रत्येक क्षण एक नवीन अनुभूती देत असतो, असे क्षण टिपण्यासाठी जीवनामागून जीवन लाभले तरी ते कमी वाटेल, असे त्यांचे मत होते.
 
विद्या, स्वाभिमान व शील ही दैवते मानणार्‍या आंबेडकरांचे म्हणणे होते की केवळ विद्या असून चालत नाही तर तिचा सदुपयोग करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. विद्या ही दुधारी तलवार आहे. तिचा उपयोग आपण इष्ट कार्यांसाठी करायला हवा. त्यांच्या मते विद्येशिवाय मानवाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. विद्या ही सर्वांना अवगत झाली पाहिजे. ती महासागरासारखी आहे. डॉ. आंबेडकरांजवळ 25 हजार पुस्तकांचा संग्रह होता.
 
अशा या ज्ञानी माणसाला तरीही आपल्या विचारशीलतेचा, विद्वत्तेचा, व्यासंगाचा कधीच अभिमान, गर्व वाटला नाही. आपल्या वैचारिक जडणधडणीमध्ये विद्या, स्वाभिमान व शील यांना अग्रस्थान देणार्‍या बाबासाहेबांना ही त्रिसूत्री समाजाच्या भौतिक व नैतिक उन्नतीला उपयुक्त असल्याने तिचे अनुकरण आवश्यक निश्चित आहे, असं वाटायचं.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जे काही झाले ते स्वकष्टाने. त्यांनी जे काही मिळवले ते स्वप्रयत्नाने. समाजातील आपले महत्त्व व मोठेपण ते ओळखून होते. लोकांनी आपल्याला देव बनवू नये, असे ते कळकळीने सांगायचे. त्यांना स्वत:लाच व्यक्तिपूजा, मूर्तिपूजा मान्य नव्हती.
 
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा असणार्‍या आणि संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या या महामानवाची जेवढी स्तुतिसुमने गावीत तेवढी कमीच आहेत. अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 साली अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला.
 
- पूजा स्वामी