शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

IRCTCचा IPO: भारतीय रेल्वेच्या तिकिट बुकिंग कंपनीच्या शेअर्सविषयी जाणून घ्या

भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकिंग ते खानपान आणि इतर विविध सेवा पुरवणाऱ्या IRCTC कंपनीचे शेअर्स आज प्रथम बाजारात विक्रीसाठी उपल्ब्ध होत आहेत. 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या काळात IRCTCचा IPO बाजारात येणार आहे.
 
'इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड' म्हणजेच IRCTC ही कंपनी भारतीय रेल्वेला अधिकृतपणे अन्न-बाटलीबंद पाणी पुरवते, ऑनलाईन तिकीट विक्रीची सेवा देते तसंच भारतीय रेल्वेच्या इतर सेवांचं एक केंद्र आहे.
 
आर्थिक वर्ष 2019-2020साठीच्या सरकारच्या निर्गुंतवणूक कार्यक्रमानुसार हे समभाग (शेअर्स) विकले जाणार आहेत. कंपनीचे कर्मचारी, किरकोळ गुंतवणूकदार यांना अंतिम मूल्यापेक्षा सवलतीच्या दरात हे शेअर्स देण्यात येतील.
 
IPOबद्दल
या IPO द्वारे 2 कोटी 1 लाख 60 हजार शेअर्सची विक्री करण्यात येईल. कंपनीच्या एकूण शेअर्सपैकी हा 12.50% हिस्सा आहे. या प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू (Face Value) आहे रु. 10. फेस व्हॅल्यू म्हणजे एखाद्या कंपनीच्या शेअरची मूळ किंमत जिची नोंदणी सर्टिफिकेटवर असते.
 
विक्रीसाठीच्या या एकूण शेअर्सपैकी 1 लाख 60 हजार इक्विटी शेअर्स हे पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.
 
कंपनी किरकोळ गुंतवणूकदार आणि गुंतवणुकीसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 'ऑफर प्राईस' वर 10 रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. ऑफर प्राईस म्हणजे IPO दरम्यान ज्या किंमतीला शेअर्स देण्यात येतात, ते मूल्य.
 
IRCTCच्या या IPO दरम्यान किमान 40 शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल. आणि त्यानंतर मग 40च्या पटीमधल्या संख्येत शेअर्ससाठी अर्ज करता येईल. रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त 16 लॉट्स (40X16) साठी अर्ज करता येईल.
 
या IPOसाठी शेअर्ससाठी रु. 315-320चा प्राईस बँड ठरवण्यात आला आहे. म्हणजेच या शेअर्ससाठी अर्ज करणाऱ्यांनी रु. 315 ते 320 च्या दरम्यानच्या मूल्यामध्ये आपल्यातर्फे अर्ज करायचा आहे.
 
या समभाग विक्रीद्वारे 640 कोटी रुपयांचं भांडवलं उभं करण्याचं उद्दिष्टं आहे. समभाग विक्रीतून मिळणारे हे पैसे IRCTCला मिळणार नाहीत तर हे पैसे समभाग विक्री करणाऱ्या भारत सरकारच्या खात्यात जमा होतील.
 
9 ऑक्टोबरला या शेअर्सची अलॉटमेंट करण्यात येण्याची शक्यता आहे. म्हणजे कोणाकोणाला हे शेअर्स मिळाले, हे जाहीर करण्यात येईल.
 
IRCTC बद्दल
 
IRCTC ही पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अधिपत्याखाली ही कंपनी येते. देशभरातल्या रेल्वेगाड्यांमध्ये आणि स्टेशन्सवर खानपान सेवा देण्याचे अधिकार अधिकृतपणे फक्त या कंपनीला देण्यात आले आहेत. 'रेल नीर' या ब्रँडने IRCTCचं बाटलीबंद पाणी विकलं जातं.
 
शिवाय ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंगची सेवाही हीच कंपनी पुरवते. irctc.co.in या वेबसाईटवरून वरून ऑनलाईन रेल्वे बुकिंग करता येतं. 'Rail Connect' या अॅप द्वारेही बुकिंग सेवा उपलब्ध आहेत.
 
याशिवाय ही कंपनी पॅकेज डील्स, बजेट हॉटेल बुकिंग्स, लाऊंज सेवाही देते.