बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (12:49 IST)

'आईसाठी योग्य वर हवा' - प. बंगालमधल्या तरुणाची फेसबुक पोस्ट व्हायरल

प्रभाकर एम.
"मला माझ्या विधवा आईसाठी योग्य वर हवा आहे. नोकरीमुळे मी दिवसातला बराच वेळ घराबाहेरच असतो. अशावेळी माझी आई घरी एकटीच असते. एकाकी आयुष्य जगण्यापेक्षा प्रत्येकाला चांगलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, असं मला वाटतं."
 
पश्चिम बंगालमधल्या हुगली जिल्ह्यातलं चंदननगर हे एक छोटं शहर आहे. कोलकत्यापासून 30 किमी अंतरावर असलेलं चंदननगर पूर्वी फ्रेंच वसाहत होती. नंतर हा भाग भारताला मिळाला. हे शहर जगदात्री पूजा आणि बल्ब कारागिरांसाठी प्रसिद्ध आहे.
 
मात्र, एका तरुणाच्या फेसबुक पोस्टमुळेसुद्धा सध्या चंदननगर चर्चेत आहे. या तरुणाचं नाव आहे गौरव अधिकारी.
 
याच महिन्यात आस्था नावाच्या एका तरुणीनेदेखील आपल्या आईसाठी 50 वर्षांचा वर हवा आहे, असं ट्वीट केलं होतं. ते ट्वीटही बरंच व्हायरल झालं होतं. आपण आपल्या आईसाठी एक वेल सेटल्ड, शाकाहारी आणि मद्यपान न करणाऱ्या स्थळाच्या शोधात असल्याचं तिने लिहिलं होतं.
 
पाच वर्षांपूर्वी गौरवच्या वडिलांचं निधन झालं. तेव्हापासून त्यांची 45 वर्षांची आई घरी एकटीच राहते. मात्र, गौरवने ही पोस्ट का टाकली असावी?
 
गौरव सांगतात, "2014 साली वडिलांच्या निधनानंतर आई एकटी पडली. मी माझ्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. मी नोकरीसाठी सकाळी सात वाजताच घराबाहेर पडतो. रात्री घरी यायला खूप उशीर होतो. दिवसभर आई घरी एकटीच असते. मला वाटलं प्रत्येकालाच जोडीदार किंवा मित्राची गरज असते."
 
ही पोस्ट लिहिण्यापूर्वी आईशी चर्चा केली का, यावर गौरव म्हणाले, "मी आईशी याविषयी बोललो होतो. आई माझ्या लग्नाचा विचार करत आहे. पण, मलाही तिचा विचार करायचा आहे. तिचा एकुलता एक मुलगा म्हणून मला असं वाटतं की तिचं पुढचं आयुष्यही आनंदी असावं."
गौरवची फेसबुक पोस्ट
गौरव आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात, "माझ्या आईचं नाव डोला अधिकारी आहे. पाच वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. नोकरीमुळे मी बराचसा वेळ घराबाहेरच असतो. त्यामुळे घरी आई एकटी पडते. माझ्या आईला पुस्तक वाचन आणि गाणी ऐकण्याची आवड आहे. पण, मी माझ्या आईसाठी जोडीदार शोधतो आहे. पुस्तकं आणि गाणी जोडीदाराची जागा कधीच घेऊ शकत नाही, असं मला वाटतं. एकाकी आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं आयुष्य जगणं गरजेचं आहे.
 
"येणाऱ्या काळात मी आणखी व्यग्र होईल. लग्न होईल, कुटुंब असेल. पण, माझी आई? आम्हाला धन-दौलत, जमीन-जुमला किंवा संपत्तीचा मोह नाही. मात्र, भावी वर आत्मनिर्भर असायला हवा. त्याने माझ्या आईचा उत्तम सांभाळ केला पाहिजे. आईच्या आनंदातच माझा आनंद आहे. अनेकजण माझी खिल्ली उडवू शकतात. काहींना मला वेड लागलं आहे, असंही वाटेल. ते माझ्यावर हसतीलही. मात्र, त्यामुळे माझा निर्णय बदलणार नाही. मला माझ्या आईला एक नवं आयुष्य द्यायचं आहे. तिला एक जोडीदार आणि मित्र मिळावा, अशी माझी इच्छा आहे."
 
या पोस्टवर उमटलेल्या प्रतिक्रिया विषयी गौरव सांगतात, "या पोस्टनंतर अनेकांना मला फोन करून लग्नाची इच्छा व्यक्त केली. यात डॉक्टर, मरीन इंजीनिअर ते शिक्षकांचा समावेश आहे. यातल्या योग्य जोडीदाराची निवड करून आईचं दुसरं लग्न लावून देणं, हेच सध्या माझा मुख्य उद्दिष्ट आहे."
 
मात्र, या पोस्टवरून तुम्हाला टीका, टोमणे, टर उडवणं, याचा सामना करावा लागला का, हे विचारल्यावर गौरव सांगतात, "पाठीमागे तर लोक बोलतातच. मात्र, अजून समोरून कुणी काहीच बोललेलं नाही. मी केवळ प्रसिद्धीसाठी ही पोस्ट टाकलेली नाही. माझ्यासारखे अनेक तरुण मुलं-मुली आपल्या आई-वडिलांचा विचार करत असतील. मात्र, समाजाच्या भीतीमुळे त्यांचं धाडस होत नाही."
 
आपल्यामुळे इतरही अनेक जण पुढे येतील, अशी आशा गौरवला आहे.
 
गौरव ज्या बऊबाजार भागात राहतात तिथलेच शुभमय दत्त म्हणतात, "हे एक चांगलं पाऊल आहे. अनेक जण लहान वयातच पती किंवा पत्नीच्या निधनाने एकटे पडतात. उदरनिर्वाहाच्या धावपळीत त्यांची मुलंही आई-वडिलांकडे पाहिजे तेवढं लक्ष देऊ शकत नाहीत. अशात आयुष्याच्या दुसऱ्या इनिंगचा विचार वाईट नाही."
 
मानविक वेलफेअर सोसायटी या सामाजिक संघटनेचे सदस्य सोमेन भट्टाचार्य म्हणतात, "हे स्तुत्य पाऊल आहे. लोकं काही ना काही तर बोलतीलच. मात्र, आपल्या आईच्या भविष्याविषयी तिच्या मुलाला असलेली ही काळजी समाजाच्या बदलत्या मानसिकतेचं द्योतक आहे."
परंपरा नवीन नाही
पश्चिम बंगालमध्ये विधवा विवाहाची परंपरा नवी नाही. समाज सुधारक ईश्वर चंद्र विद्यासागर यांनी सर्वप्रथम विधवा पुनर्विवाहाविषयी आवाज उठवला होता. यावर्षी त्यांची 200वी जयंती साजरी होत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच 16 जुलै 1856 रोजी देशात विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली होती.
 
स्वतः विद्यासागर यांनी आपल्या मुलाचं एका विधवेशी लग्न लावून दिलं होतं. या कायद्याआधी हिंदू धर्मातल्या उच्चवर्णीय विधवांना पुनर्विवाहाची परवानगी नव्हती.
 
या प्रयत्नात विद्यासागर यांना समाजाचा रोष ओढावून घ्यावा लागला. इतकंच नाही तर पश्चिम बंगालमधल्या याच हुगळीमध्ये जन्म झालेल्या राजा राममोहन रॉय यांनीदेखील विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न केले होते.
 
महाराष्ट्रातही विधवा पुनर्विवाह, सतीप्रथा बंदी, बालविवाह बंदी यासाठी महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, जगन्नाथ शंकर शेट, महादेव गोविंद रानडे, गो. ग. आगरकर अशा अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले आहेत.
 
मात्र, विधवा पुनर्विवाहाची सुरुवात जिथून झाली त्या पश्चिम बंगालमध्ये हळुहळू विधवा पुनर्विवाह कमी होऊ लागले. वाराणसी ते वृंदावनपर्यंत अनेक आश्रमांमध्ये पश्चिम बंगालमधल्या विधवांची वाढती संख्या याचा पुरावा आहेत.
 
राष्ट्रीय महिला आयोगाने काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात एक अहवाल सादर केला होता. कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळात पश्चिम बंगालमध्ये विधवांची परिस्थिती देशात सर्वाधिक वाईट असल्याचं या अहवालात म्हटलं होतं. त्याच काळात पश्चिम बंगालमधून अनेक विधवा महिलांनी वृंदावन आणि वाराणासीमधल्या आश्रमांमध्ये जायला सुरुवात केली होती.
 
नॉटिंघम विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या इंद्रनील दासगुप्ता यांच्यासोबत विधवा पुनर्विवाह कायदा, 1856 अपयशी ठरण्याविषयी संशोधन करणारे कोलकाता स्थित भारतीय सांख्यिकी संस्थेचे दिगंत मुखर्जी म्हणतात, "ईश्वर चंद्र विद्यासागर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या सामाजिक चळवळीच्या दबावामुळे तत्कालीन ब्रिटीश सरकारने हा कायदा मंजूर केला होता. मात्र, पुढे समाजात त्याचा फारसा प्रभाव दिसला नाही. विधवांना समाजात अस्पृश्यच मानलं गेलं."
 
ते म्हणतात सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीत विधवांची परिस्थिती अधिक वाईट झाली आहे. याच कारणामुळे वाराणसी आणि वृंदावनातल्या विधवा आश्रमांमध्ये पश्चिम बंगालमधल्या विधवांची संख्या वर्षागणिक वाढत आहे.