शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019 (14:42 IST)

शरद पवार यांचं मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबाबत सूचक वक्तव्य

मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबाबत कुणाची मागणी असेल, तर त्याचा विचार नक्की करावा लागेल, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
 
शरद पवार शुक्रवारी विदर्भ दौऱ्यावर होते. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी दुष्काळामुळे संत्रा शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं सांगितलं.
 
यावेळी सध्याच्या राजकीय स्थितीवर पवार यांना प्रश्न विचारण्यात आले. तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्यूला काय असेल, असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता त्यांनी सूचक उत्तर दिलं.
 
"सध्या चर्चा सुरु आहे. ती प्राथमिक स्वरुपात आहे. मुख्यमंत्रिपदासाठी कुणाची मागणी असेल, तर त्याचा विचार नक्की करावा लागेल," असं पवार म्हणाले.
 
आमचे कार्ड आम्ही आताच खुले करणार नाही. कोणत्या वेळी कुठलं कार्ड वापरायचं याचा त्यावेळी विचार करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
 
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सहा महिनेसुद्धा टिकणार नाही, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस यांना मी बऱ्याच काळापासून ओळखतो. पण त्यांना ज्योतिषशास्त्र पण येतं, हे माहीत नव्हतं, अशा शब्दात त्यांच्यावर पवार यांनी टोला लगावला.
राऊत यांची फडणवीसांवर टीका
आगामी पंचवीस वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा आहे, पण 'मी पुन्हा येईन' असं आम्ही सारखं सारखं म्हणत नाही, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला.
 
शुक्रवारी (15 नोव्हेंबर) सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, "विकास, पायाभूत सुविधा यांच्याबाबतीत महाराष्ट्र पूर्वीपासूनच आघाडीवर राहीला आहे. सध्या दुष्काळ आणि इतर प्रश्न डोळ्यांसमोर आहेत. आमच्या सोबत आलेल्या पक्षांना राज्य चालवायचा अनुभव आहे. त्यांच्यासोबत मिळून राज्य चालवणार."
 
ते पुढे म्हणाले, "आम्हाला महाराष्ट्रातच राहायचं आहे. आम्ही इथंच राहणार. इथून पुढे शिवसेना राज्याच्या सत्तेत कायमच असेल. आगामी सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच बनणार, कुणीही लाख प्रयत्न केले तरी शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनेल. फॉर्म्यूल्याची चिंता आम्ही करत नाही."
 
राज्याचा पाया रचण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांचं मोठं योगदान, काँग्रेसच्या नेत्यांचं स्वातंत्र्यसंग्रामात मोठा सहभाग राहिला आहे, असं म्हणत त्यांनी काँग्रेस नेतृत्वाचं कौतुक केलं.
 
"ज्यांच्याकडे आकडा आहे, तेच राज्यात सरकार बनवतील. किमान समान कार्यक्रमात राज्याच्या हिताचाच विचार केला जातो. पुलोदच्या वेळी शरद पवार काँग्रेस नेते होते. त्यांच्या मंत्रिमंडळात भाजप-जनसंघाचे नेते होते. त्याप्रमाणे हे सरकार बनेल, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी 20 वर्षांपासून काम करत आहेत. शरद पवार पूर्वीपासूनच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतात. हे दोन्ही नेते आता एकत्र आले आहेत," असं राऊत म्हणाले.
राऊतांवर आशिष शेलारांचा पलटवार
संजय राऊत गेले काही दिवस रोज सकाळी पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांनी गुरुवारच्या पत्रकार परिषदेत अमित शाह यांच्यावर आरोप केले होते. शब्द पाळला नसल्यामुळे बंद खोलीतील चर्चा बाहेर आहे. ती बंद खोली बाळासाहेबांची खोली होती. ते आमच्यासाठी मंदीराप्रमाणे असल्याचं राऊत म्हणाले होते.
 
"जसं वय वाढतं तसं व्यक्ती परिपक्व बोलायला लागतो असा समाजामध्ये समज आहे. समाजाचा हा समज संजय राऊतांनी जिवंत ठेवावा, वय वाढल्यानुसार त्यांची परिपक्वता वाढावी अशी शुभेच्छा मी त्यांना वाढदिवासानिमित्त देतो," असं आशिष शेलार म्हणाले.
 
शेलार पुढे म्हणाले, "गुरुवारच्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी दाखवलेला आदर स्वार्थी आहे की निःस्वार्थी हे महाराष्ट्राला माहीत आहे. अमित शहा यांनी दिलेली मुलाखत ही कुणाला खोटं पाडण्यासाठी नाही तर महाराष्ट्राला सत्य समजवण्यासाठीचं ते कर्तव्य होतं. अमित शहा यांना समजून घेण्यासाठी राऊत यांना बरेच जन्म घ्यावे लागतील."
 
"मंदिराची शपथ घेऊन राजकीय स्वार्थापोटी असत्य पसरवणं महाराष्ट्राला मान्य नाही. अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांची भूमिका सत्य आहे. सत्य सांगण्याची भूमिका माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपचा कार्यकर्ता एकसुरात करतो. सत्य सांगितल्यामुळे त्यांची काहींची अडचण होत असेल तर त्यावर आमचा पर्याय नाही. अमित शाह यांनी सत्य सांगण्याचं कर्तव्य केलं," असं शेलार म्हणाले.
 
"ठाकरे आणि मोदी यांच्यामध्ये विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न अदृश्य कुणीतरी करतोय का, असा प्रश्न राऊत गुरुवारी उपस्थित केला होता. हा प्रश्न राऊत उपस्थित करत असले तरी ठाकरे आणि मोदी यांच्यात विसंवाद निर्माण करण्याचं दृश्य स्वरूप महाराष्ट्र रोज सकाळी दूरचित्रवाणीवर वगनाट्याच्या रुपात पाहतो. पूर्वी अन्य पक्षाचे नेते मातोश्रीचा सन्मान ठेवून बाळासाहेब ठाकरेंचा आदर ठेवून मातोश्रीवर चर्चा करण्यासाठी जायचे. पण आज सत्तालालसेपोटी सगळे मातोश्रीमधून बाहेर पडून फाईव्ह स्टार हॉटेलची वारी करत आहेत. पूर्वी अगदी राज ठाकरेंना बोलण्यासाठीही कुणी मातोश्रीमधून बाहेर पडत नव्हतं पण आज राज ठाकरे सोडा, माणिकराव ठाकरेंना भेटायला सुद्धा लोक जात आहेत, हे महाराष्ट्र पाहत आहे," असं शेलार शेवटी म्हणाले.