'मला पत्नी मिळवून द्या', शरद पवारांना तरुणाचे पत्र
एका ३४ वर्षीय तरुणाने थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे लग्नासाठी मदतीची याचना केली आहे. अकोल्याच्या ग्रामीण भागातील हा शेतकरी तरुण आर्थिक हलाखीमुळे वय वाढूनही विवाहबद्ध होऊ शकलेला नाही. त्याने पवार साहेबांना पत्र लिहिताना 'मला जीवनसाथी मिळवून द्या, तुमचे ऋण मी कधीच विसरणार नाही' अशी आर्जवपूर्ण विनंती केली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर धडाक्यात व्हायरल होत असून, सर्वत्रच चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे.
नेमकं काय आहे पत्रात?
अकोल्यातील एका शेतकरी संवाद कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी पवारांना निवेदनं दिली. त्या निवेदनांमध्ये या तरुणाचे भावनिक पत्र होते. त्याने आपल्या पत्रात म्हटले आहे की "माझे वय आता ३४ वर्षांचे झाले आहे. दिवसेंदिवस वय वाढत असल्याने भविष्यात माझे लग्न होणार नाही आणि मला एकटेच राहावे लागेल. "तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला एक साथीदार पत्नी आपल्यामार्फत मिळवून द्यावी. जेणेकरून मी चांगल्या प्रकारे संसार चालवू शकेन व पुढील आयुष्य आनंदाने जगू शकेन."
त्याने पुढे म्हटले की, "मला कोणत्याही समाजातील मुलगी मिळाल्यास मी लग्न करण्यास तयार आहे. इतकेच नाही तर मी घरजावई होण्यासही तयार आहे. मुलीच्या घरी जाऊन मी चांगले काम करेन आणि संसार नीट चालवेन, याची मी हमी देतो." माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. मला जीवनदान द्यावे. मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही, असे साकडे त्याने घातले आहे.
या पत्रामुळे ग्रामीण भागातील अविवाहित तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे गंभीर सामाजिक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरी भागाकडे वाढलेला मुलींचा कल आणि वाढलेले निकष यामुळे शेतकरी व ग्रामीण तरुणांची लग्नाची समस्या किती विदारक बनली आहे, हे या पत्रातून दिसून येते.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी या पत्राची दखल घेत पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्या तरुणाला मदत करावी, असे निर्देश दिले आहेत. या तरुणाचे पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पवार गटाची प्रतिक्रिया: पत्र मिळाल्यानंतर शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत ते जयंत पाटील यांना वाचायला सांगितले, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले. पवार साहेबांच्या सूचनेनुसार आता या तरुणाच्या लग्नासाठी मदत केली जाणार आहे.
अनिल देशमुख म्हणाले, "अकोल्यात एका तरुणाने पवार साहेबांना हे पत्र दिले. दुसऱ्या दिवशी पक्षाची बैठक होती, त्या वेळी पवार साहेबांनी जयंत पाटील यांना पत्र वाचायला सांगितले. त्यानंतर या तरुणाच्या विवाहासाठी प्रयत्न करा, असे आदेश दिले. त्याप्रमाणे आता आमचे नेते विदर्भात या मुलासाठी योग्य स्थळ शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.
"या घटनेने राजकीय नेत्यांच्या सामाजिक दृष्टिकोनाची चर्चा पुन्हा एकदा पेटली असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लग्नासारख्या मूलभूत गरजांमध्येही मदतीची अपेक्षा कशी वाढली आहे, याकडे लक्ष वेधले जात आहे.