शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 4 सप्टेंबर 2019 (10:12 IST)

राज्यात साखर टंचाईचे सावट

कोल्हापूर-सांगली-सातारा भागात आलेल्या महापुरामुळे सुमारे 100 लाख टन ऊस वाया गेला असून त्यामुळे साखरेच्या उत्पादनातही 12 ते 13 लाख टनांची घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यावर साखर-टंचाईचे दाट सावट आहे.  
 
गेल्या वर्षी राज्यात 11.65 लाख हेक्टर क्षेत्रावर 952 लाख मेट्रिक टन ऊस झाला. त्यातून 107 लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या साखरेचा प्रश्न निर्माण झाला. साखर मोठय़ा प्रमाणात पडून राहिल्याने साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे पैसे थकले. त्यामुळे राज्यातील साखर उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेले 20 लाख शेतकरी अडचणीत आले.
 
देशातही जवळपास हीच परिस्थिती असल्याने केंद्र सरकारने शिल्लक साखरेच्या प्रश्नात दिलासा देण्यासाठी निर्यात अनुदान जाहीर केले. त्यामुळे मुळात काही प्रमाणात शिल्लक साखरेचे प्रमाण घटणार आहे. त्यात या पूरसंकटाची भर पडली आहे.