सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 24 ऑगस्ट 2019 (10:47 IST)

कोल्हापूरः 'धान्य-कपडे नको आता घरं बांधायला हवी आर्थिक मदत'

स्वाती पाटील-राजगोळकर
कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक गावांना मोठा फटका बसला. शेतजमिनी, जनावरं, घरं पुराच्या पाण्यात बुडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. या परिस्थितीत राज्यभरातून मदतीचे अनेक हात पुढे आले.
 
लोकांनी केलेली मदत स्वीकारताना काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडले. करवीर तालुक्यातील आरे गावात योग्य नियोजनामुळे पूरग्रस्तांना सर्व प्रकारच्या मदतीचे वाटप झाले. पण आता आरे ग्रामस्थांनी आर्थिक मदतीसाठी आवाहन केले आहे.
 
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आरे हे गाव जवळपास तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या गावाची ओळख सधन आणि समृद्ध अशी आहे. पण पुराच्या वेढ्यात अडकलेलं हे गाव 100 टक्के पूरग्रस्त आहे. अशा वेळी इतर गावांप्रमाणे या गावातही मदतीसाठी अनेक हात सरसावले. आरे ग्रामस्थांनी लोकांकडून आलेली ही मदत प्रत्येक गरजूंपर्यंत पोहचवली.
 
राज्यभरातून धान्य, तेल, ब्लॅंकेट, बेडशीट, भांडी, टूथब्रश, शालेय साहित्य, पाणी अशा स्वरूपात ही मदत आली होती.
आरे ग्रामस्थांनी मदत वाटप समन्वय समितीच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला मदतीचे समप्रमाणात वाटप केले. त्यामुळं इथं सगळ्यांना पुरेसे साहित्य मिळाल्याने ग्रामस्थांनी एकमताने आता अशा स्वरूपाची मदत थांबवण्याचा निर्णय घेतला. तसा फलक देखील गावात उभारण्यात आला आहे.
 
धान्य किंवा वस्तूऐवजी आता आर्थिक मदत करण्याचे आवाहन आरे ग्रामस्थांनी केले आहे त्यासाठी या फलकावर अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
 
याबाबत आरे ग्रामस्थांनी हा निर्णय का घेतला हे आम्ही जाणून घेतले. आरे गावचे बाजीराव वरुटे यांनी सांगितले की आमच्या गावात धान्य, तेल, पाणी अशा स्वरूपाची मदत मिळाली आहे.
 
पुरग्रस्तांसाठी लागणारी मदत योग्य प्रमाणात वाटप झाल्याने आम्ही ही मदत थांबवण्याचा निर्णय घेतला त्याऐवजी ज्या गावांमध्ये अजूनही मदत मिळाली नाही अशा गरजूंना ही मदत मिळाली पाहिजे ही आमची भावना आहे. त्यामुळं आता आर्थिक मदत गरजेची आहे. त्यासाठी हे आवाहन करण्यात आले
 
तर पी. डी. पाटील म्हणाले, पुरेसे धान्य आणि इतर पदार्थ आम्हाला मदत स्वरूपात मिळाले आहे आणखी मदत घेऊन ती वाया घालवण्यापेक्षा ती मदत इतर गरजू पूरग्रस्त गावांना मिळावी यासाठी ग्रामपंचायतीच्या बैठकीत सर्वपक्षीय लोकांनी मिळून ही मदत थांबवण्याचा निर्णय घेतला. पण गावात जवळपास 35 घरांची पडझड झाली आहे. काहींना निवाऱ्याची सोय नाही. त्यामुळं आर्थिक स्वरूपात येणारी मदत प्राधान्य क्रम ठरवून अशा गरजूंना देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार रक्कम वाटप करण्यात येईल.
 
"कोल्हापूरमध्ये तर प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. सुपीक जमीन वाहून गेलीय, त्यामुळे चार-पाच वर्षे मागे गेलेत. व्यापारी तर म्हणतात की, आम्ही दहा वर्षे मागे गेलोय. या सगळ्यांना पुन्हा आधार द्यायचा म्हणजे आर्थिक गरज आहेच." असं संजय रेंदाळकर म्हणाले.
 
संजय रेंदाळकर हे राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य आहेत. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून कोल्हापूर शहर, गडहिंग्लज, इचलकरंजी, मिरज, हेरवाड अशा पाच ठिकाणी पुनर्वसनासाठी काम सुरू केलंय.
 
विनोद तावडे-संभाजीराजे वादावर कोल्हापूरकरांचं काय म्हणणं आहे?
नुकताच विनोद तावडे आणि संभाजी राजे छत्रपती यांच्यात मदत मिळवण्यावरून वाद पेटला आहे यावर बोलताना पाटील म्हणाले ही मोठी लोकं आहेत त्यांच्या राजकारणावर आम्ही भाष्य करणार नाही.
 
तावडेंनी मदत गोळा करणं हे जनतेसाठी केलं असल्याने तावडे यांची भूमिका योग्य आहे. तर संभाजी राजे यांचं म्हणणं देखील योग्य आहे तावडेंनी मदतीचे प्रदर्शन करायला नको होते.
 
जर मदत करायची होती तर ती थेट अकाऊंट मध्ये जमा करायला हवी होती. असं राजेंना वाटलं तर ते योग्यच आहे. असंही पाटील म्हणाले.
 
मंत्री विनोद तावडे आणि खासदार संभाजीराजे यांच्यातील वादावर बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय रेंदाळकर म्हणाले, "विनोद तावडे यांच्यासारख्या मंत्रिपदाच्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं मदत गोळा करायला नको होती. मात्र, खासदार संभाजीराजेंनीही तावडेंना इतक्या टोकाचे शब्द वापरायला नको होते. कारण आर्थिक मदत हवीच."
तर आरे गावचे उपसरपंच अमर वरुटे म्हणाले आमच्या गावावर ओढावलेल्या संकटामुळे गावची परिस्थिती बिकट आहे. आता कोणत्याही राजकारणावर भाष्य करू शकत नाही. पण पूरपरिस्थितीमधून सावरण्यासाठी गावात एकोपा आला. गावातील अनेक विरोधी लोक एकमेकांसोबत मदत कार्यात उभे राहिले हीच आताच्या घडीला मोठी गोष्ट आहे. त्यामुळं राजकारणावर भाष्य करणं योग्य नाही.
 
कोल्हापुरातील अब्दुललाट गावातील सामाजिक कार्यकर्ते कुलभूषण बिरनाळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "पुरामुळे प्रचंड नुकसान झालंय. अनेकांची घरं उद्ध्वस्त झालीत. त्यामुळे ही घरं बांधण्यासाठी आणि त्यातील लहान-मोठ्या गोष्टींसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहेच."
 
कुलभूषण बिरनाळे यांच्या पुढाकारातून कोल्हापूर-सांगली भागात 100 घरांच्या उभारणीचे प्रयत्न सुरू आहेत.
 
आर्थिक मदतीची गरज आहेच. मात्र, त्या आर्थिक मदतीचा विनिमय करण्यासाठीही नीट यंत्रणा असायला हवी, असं कुलभूषण बिरनाले म्हणाले.