मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (13:41 IST)

‘उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय सर्वांना मान्य’ शिवसेना आमदारांचा बैठकीत निर्णय

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.
 
"उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल तसंच लोकसभेच्या वेळेला जे ठरलं होतं ते भाजपनं द्याव," असं मातोश्रीवर झालेल्या आमदारांचा बैठकीनंतर शिवसेना आमदार शंभूराजे देसाई यांनी पत्रकारांना सांगितलं आहे.
 
या बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार रंगशारदामध्ये जाणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. तसंच भाजपनं अडिच वर्षांचं मुख्यमंत्रिपद दिलं नाही तर शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्षांसाठी होईल, असंही सत्तार म्हणाले आहेत.
 
या बैठकीबाबत शिवसेनेकडून प्रचंड सतर्कता बाळगण्यात आली होती. आमदारांना आतमध्ये मोबाईल फोनही घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. शिवसेना आपल्या आमदारांना ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये ठेवण्याचीही शक्यता आहे.
 
दुसरीकडे, गुरूवारी (7 नोव्हेंबर) दुपारी दोन वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. भेटीनंतर दुपारी अडीच वाजता ते पत्रकार परिषद घेतील.
 
राज्याच्या विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपच्या गोटात लगबग पाहायला मिळत आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. कराडमध्ये ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊ शकतात. तसंच नागपूरमध्ये नितीन गडकरी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला गेले आहेत. या बैठकांमध्ये काय खलबतं होतील, यावर बरंचसं पुढचं राजकारण अवलंबून असेल.
 
नागपूरमध्ये पोहोचल्यावर पत्रकारांशी बोलताना नितीन गडकरी यांनी लवकरच राज्यात सरकार स्थापन होईल असं सांगितलं आहे. तसंच मी राज्यात परतणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
 
 
स्थिर सरकारसाठी भाजप प्रयत्नशील- मुनगंटीवार
"राज्याला स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीनं भाजप पावलं उचलत आहे. सत्ता स्थापनेचा दावा करायचा की नाही यासंबंधीचा निर्णय आम्ही राज्यपालांशी चर्चा करून घेऊ," अशी भूमिका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली.
 
"सेनेशी काही पातळीवर चर्चा सुरू आहे. पण आमची इच्छा ही शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचीच आहे," असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं.
 
देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिक आहेत असं उध्दव ठाकरे म्हणतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या रूपात शिवसेनेचाच मुख्यमंत्री येईल, असंही मुनगंटीवारांनी म्हटलं. आज आम्ही राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी नाही तर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी चाललो असल्याचं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं.
 
दरम्यान, मातोश्रीवर सेनेच्या आमदारांची बैठक सुरू असून आपले आमदार फुटू नयेत, अशी काळजी सेनेकडून घेतली जात आहे. त्याबद्दल बोलताना मुनगंटीवारांनी म्हटलं, "सेनेचे आमदार इतके मजबूत आहेत, की त्यांना कोणी फोडणार नाही. आमची भूमिका ही विरोधी पक्षात बसण्याची आहे, हे काँग्रेस काय राष्ट्रवादीनंही अनेकदा स्पष्ट केलं आहे."
 
शिवसेना ठामच
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळीसुद्धा मुख्यमंत्री शिवसेनेचाच बनणार असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला.
 
"भाजपला सरकार स्थापनेचा दावा करायचा असेल तर त्यांनी तो खुशाल करावा. ज्यांच्याकडे बहुमत असेल त्यांनी ते दाखवावं," असं राऊत यांनी यावेळी बोलताना म्हटलं.
 
"येत्या काळात शिवसेनेची भूमिका काय असेल, शिवसेना काय करणार आहे, हे गुरुवारी उद्धव ठाकरे आमदारांना सांगणार आहेत. शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क साधण्याची हिंमत कुणामध्येच नाही," असंही राऊत यांनी म्हटलं.
 
निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपद आणि समान सत्तावाटपाबाबत ठरलेलं समीकरण वापरावं, असं सांगून आक्रमक भूमिका घेतली होती. पण दुसरीकडे महायुतीचंच सरकार स्थापन होईल आणि भाजपचाच मुख्यमंत्री बनेल, असं भाजप सातत्याने सांगत आहे.
 
आजच्या 'सामना' वृत्तपत्रातील अग्रलेखातूनही भाजपवर टीका करण्यात आली.