Dharma Sangrah

मनसुख हिरेन कोण होते, कसा झाला त्यांचा मृत्यू?

Updated: शुक्रवार, 5 मार्च 2021 (17:48 IST)
ठाण्याच्या पोलीस परिमंडळ-1चे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
बीबीसीशी बोलताना पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे म्हणाले, "मनसुख हिरेन यांचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. सद्यस्थितीत काहीच माहिती देता येणार नाही. आम्ही सर्व शक्यता तपासून पाहात आहोत."
 
मनसुख हिरेन हे कालपासून बेपत्ता होते. त्याबद्दलची तक्रार आज सकाळी दाखल करण्यात आली होती. हिरेन यांचा मृतदेह आज (5 मार्च) सकाळी साडेदहाच्या सुमारास सापडला. याबाबतचं प्रसिद्धीपत्रक लवकरच सर्वांना दिलं जाईल, असंही ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
 
एनआयए चौकशी करा - फडणवीस
आज (5 मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण मांडलं होतं.
 
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटीननी भरलेली गाडी काही दिवसांपूर्वी आढळली होती. या प्रकरणाशी पोलीस अधिकारी सचिन वझे यांचे काही संबंध आहेत की हा फक्त योगायोग आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला नेमका आजच विचारला होता.
 
ते म्हणाले, "26 तारखेला जिलेटीनने भरलेली गाडी अंबानींच्या घराजवळ सापडली. त्यांची सुरक्षा महत्वाची आहे. ठाण्याच्या एका व्यक्तीची ती स्कॉर्पिओ कार होती. 'अगली बार पुरी फॅमिली को उडाएंगे.. ऐसीही गाडीसे आएंगे' असं पत्र सापडलं. 'जैश-उल-हिंद' ने जबाबदारी स्वीकारली असं पोलिसांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांनीही चालवलं. पण दुसर्‍या दिवशी 'जैश-उल-हिंद' ने ही चुकीची बातमी असल्याबाबत पत्रक काढलं."
 
"काही दिवसांपासून तक्रारदार आणि एका नंबरवर संवाद झालाय. ज्यांच्याशी संवाद झाला तो नंबर सचिन वझेंचा आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा सर्वांत आधी सचिन वझे तिथं पोहोचले. ते ही ठाण्यात राहतात. तो तक्रारदारही ठाण्यात राहतो. धमकीचं पत्रही वझेंना सापडलं. हा योगायोग आहे की आणखी काही? हा तपास एनआयएकडे देण्यात यावा," अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
 
या प्रकरणात गाडी चोरीची तक्रार दाखल करणाऱ्या मनसुख हिरेन यांना सुरक्षा पुरवण्याची गरज आहे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली होती.
 
याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा पत्रकार परिषदही घेतली. स्फोटकं प्रकरण NIA कडे द्यावं, या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
 
या प्रकरणात अनेक योगायोग आहे. कॉल रेकॉर्ड पाहिल्यास जून-जुलै 2020 दरम्यान याच गाडी मालकाशी सचिन वझे यांचा संवाद झाल्याचा पाहायला मिळतो. यात अनेक संशय निर्माण झाले आहेत. यात काहीतरी गौडबंगाल आहे. या केसमधल्या इतक्या महत्वाच्या साक्षीदाराचा असा मृतदेह मिळणं संशयास्पद आहे. ही केस एनआयएकडे सूपूर्त करण्यात यावी, ही मागणी लावून धरणार असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments