शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 एप्रिल 2023 (13:40 IST)

आराध्या बच्चनशी संबंधित व्हीडिओवरून यूट्यूबला कोर्टाने म्हटलं...

हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांची 11 वर्षीय नात आराध्या बच्चन हिने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, दिल्ली हायकोर्टानं यूट्यूबवर टीका केलीय.
 
आराध्यानं याचिकेत म्हटलं होतं की, ‘एका यूट्यूब चॅनेलनं माझ्या आयुष्याशी आणि आरोग्याशी संबंधित खोट्या बातम्या प्रकाशित केल्या आहेत. त्यामुळे या वृत्तांकनावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी.’
 
दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी आराध्याच्या याचिकेतल्या मागणीशी सहमत होत म्हटलं की, लोकांना चुकीच्या माहितीपर्यंत पोहोचवण्यास यूट्यूबही दोषी आहे.
 
आराध्या बच्चन हिच्याकडे भारतीय माध्यमांचं विशेष लक्ष असतं. आराध्या अमिताभ बच्चन यांची नात आहे. ती अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आहे.
 
आराध्या हल्ली अनेकदा चित्रपट महोत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसते.
 
ऐश्वर्या राय-बच्चन ही माजी ‘मिस वर्ल्ड’ आहे. भारतासह जगभरात ऐश्वर्या राय-बच्चन लोकप्रिय आहे.
 
दोन वर्षांपूर्वीच अभिषेक बच्चन यांनी माध्यमांना सांगितलं होतं की, “माझ्या मुलीबाबतच्या (आराध्या) नकारात्मक टिप्पण्या सहन करणार नाही. मी जरी सार्वजनिक क्षेत्रात असलो, तरी त्यात माझ्या मुलीला खेचलेलं मला आवडणार नाही.”
 
आराध्याबाबतचा व्हीडिओ तातडीनं यूट्यूबवरून काढून टाकावा, असा आदेश दिल्ली हायकोर्टानं यूट्यूब आणि यूट्यूब चॅनेल ऑपरेटरना देत समन्स बजावले आहेत.
 
“लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणं कायद्यानं पूर्णपणे चूक आहे आणि असह्य करणारं आहे,” असंही दिल्ली हायकोर्ट म्हणाले.
 
भारतामध्ये अनेक यूट्यूब चॅनेल आहेत, जे सेलिब्रेटींवरील बातम्यांवर भर देतात. अनेकदा तर हे चॅनेल सेलिब्रेटींबाबत वादग्रस्त व्हीडिओ अपलोड करतात. अफवा, निराधार चर्चांना बातम्या म्हणून प्रसारित करतात.
 
अनेक भारतीय सेलिब्रिटी त्यांच्या गोपनीयतेवर आक्रमण केल्याबद्दल आणि त्यांच्या मुलांचे पापाराझींद्वारे सतत फोटो काढल्याबद्दल चिंता व्यक्त करत असतात.