शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (20:17 IST)

मल्लिका शेरावत आता सिनेमात काम करत नाही, कारण...

एक काळ होता, अगदी काही वर्षांपूर्वींचा, जेव्हा मल्लिका शेरावत बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रीं मध्ये गणली जायची. आता ती सिनेमांमध्ये फारशी दिसत नाहीत. मात्र, आता रजत कपूर यांच्या सिनेमातून मल्लिका पुनरागमन करतेय. मल्लिकाशी खास बातचित केली आणि तिच्या करिअरबाबत जाणून घेतलं. यावेळी मल्लिकानं अनेक दावेही केले. मल्लिकानं सांगितलं की, मी 'तडजोड' करायला तयार नसल्यानं माझ्या हातून काही सिनेमे गेले.
 
कुटुंबाबद्दल सांगताना मल्लिका म्हणाली की, मी सिनेमात काम करावं, असं माझ्या कुटुंबीयांना वाटत नव्हतं. परिणामी माझा मार्ग मीच निवडला आणि त्यासाठी मेहनत घेतली.
 
"मी अशा कुटुंबातून येते, जिथे सिनेमात करण्याबाबत विचारही केला जाऊ शकत नाही. पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे परिधान करणं किंवा संध्याकाळनंतर घरातून बाहेर पडणं या गोष्टींना अजिबात परवानगी नव्हती," असं मल्लिका सांगते.
 
ती पुढे म्हणाली की, "हरियाणातील एका परंपरा मानणाऱ्या कुटुंबातून मी आलीय. माझे आई-वडील रुढी मानणाऱ्या विचारांचे होते. त्यांना पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे मी परिधान केलेले आवडत नसे. मला आठवतही नाही की, माझ्या कुठल्या मैत्रिणीसोबत मी नाईटआऊटसाठी बाहेर गेलीय. रात्रीचं जेवणं बाहेर करण्यासही परवानगी नव्हती. काळोख होण्याच्या आधीच घरी येण्यास सांगितलं जात असे."
 
'माझे वडील विचारही करू शकत नाहीत, अशी माझी स्वप्नं आहेत'
अभिनेत्री होण्याचं मल्लिकाचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. मात्र, तिच्या घरच्यांना याबद्दल आक्षेप होता.
 
मल्लिका सांगते की, "माझे वडील विचारही करू शकत नव्हते की, कुणा मुलीचं असं स्वप्न असू शकतं. त्यांच्या दृष्टीने मुली घर सांभाळणारी असावी आणि पत्नी असावी."
 
मल्लिका म्हणते की, "माझ्या घरच्यांनी मला कधीच पाठिंबा दिला नाही. मात्र, आता या गोष्टीचं मला फारसं वाईटही वाटत नाही."
 
"मी प्रचंड भेदभाव पाहिलाय. हरियाणात मला असं वाटायचं की, पुरुषांना सर्व प्रकारचे अधिकार आहेत. ते काहीही परिधान करू शकतात, कुठेही जाऊ शकतात, कितीही पैसे खर्च करू शकतात. कुटुंबीयांनाही याचं काह फरक पडत नाही. मी चूक असू शकेन, पण अनुभवाच्या आधारावर बोलतेय," असं मल्लिका सांगते.
 
ती पुढे म्हणते की, "माझी आजी माझ्या तोंडावर बोलायची की, तू मुलगी आहे, तुला काय वाटतं ते महत्त्वाचं नाहीय. हा मुलगा आहे आणि तो कुटुंबाचं नाव पुढे नेईल. मला कधी कधी ते खरंही वाटायचं. पण माझ्या आईनेही आजीला कधी म्हटलं नाही की, असं मल्लिकाला बोलू नका."
 
'पदार्पणासाठी मला जास्त संघर्ष करावा लागला नाही'
मल्लिका सांगते की, तिने जेव्हा 'बंडखोरी' करत घर सोडलं होतं, तेव्हा मनात एक गोष्ट पक्की होती की, बॉलिवूडमध्ये जाऊन आपलं स्थान निर्माण करायचं.
 
सुरुवातीला बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यास फारशा मोठ्या अडचणी आल्या नाहीत.
 
"पहिलीच जाहिरात बच्चनसाहेबांसोबत केली होती. दुसरी जाहिरात शाहरूख खानसोबत केली. या दोन्ही जाहिरातींमुळे इतकी प्रसिद्धी मिळाली की, भट्टसाहेबांच्या 'मर्डर' सिनेमात काम मिळालं," असं मल्लिका सांगते.
 
मर्डर सिनेमा 2004 साली प्रदर्शित झाला. या सिनेमात अभिनेता इम्रान हाश्मीसोबत मल्लिकानं काम केलं होतं.
 
'तडजोड नाही'
मल्लिका शेरावतच्या दाव्यानुसार, अनेकदा तिच्या चांगल्या भूमिका हिरावून घेतल्या गेल्या, कारण तिने 'तडजोड' करायला नकार दिला.
 
मल्लिका सांगते, "माझं खूप नुकसान झालं. हिरोला आपल्या गर्लफ्रेंडला त्याच्या सिनेमात घ्यायचं असतं. अनेक रोल हातून निसटले, कारण मी हिरोसोबत तडजोड करायला नकार दिला. मला आठवतंय की, माझ्याकडे 65 स्क्रिप्ट पडल्या होत्या आणि त्यातील एकही रोल मला मिळाला नाही, कारण हिरोला आक्षेप होता."
 
'गुरू' सिनेमातली भूमिका कापल्याबाबत मल्लिका म्हणते की, या सिनेमात तिची भूमिका चांगल्या सहकलाकाराची होती. मात्र, ती भूमिका एडिट करण्यात आली आणि एक गाणंच सिनेमात ठेवलं गेलं. 2007 साली आलेल्या अभिषेक बच्चनच्या 'गुरू' सिनेमातील 'मैया मैया' गाणं मात्र प्रचंड लोकप्रिय झालं होतं. या गाण्यात मल्लिका शेरावत दिसली होती.
 
'..तर बॉलिवूडमध्ये टिकणं कठीण आहे'
मल्लिका शेरावतने बॉलवूडमध्ये जितकं काम केलंय, त्यावरून ती समाधानी असल्याचं सांगते. मात्र, त्याचवेळी ती हाही दावा करते की, "मी कुठल्या प्रसिद्ध कुटुंबातून बॉलिवूडमध्ये आली नव्हती किंवा माझा कुणी गॉडफादर नव्हता. त्यामुळे या इंडस्ट्रीत टिकून राहणं आव्हानात्मक होतं."
 
ओटीटी प्लॅटफॉर्म्सना मल्लिका गेमचेंजर म्हणते.
 
मल्लिकाच्या मते, "सोशल मीडिया आणि ओटीटीच्या पूर्वी बॉलिवूडमध्ये जर तुम्ही प्रसिद्ध कुटुंबाच्या नात्यातले नसाल, किंवा तुमचा कुणी फिल्मी बॉयफ्रेंड नसेल, कुणी गॉडफादर नसेल, तर टिकून राहणं अवघड होतं. माझ्याबाबत हे झालं होतं, मात्र मी कधीच हिरोसोबत तडजोड केली नाही. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर वाटतं की, मी योग्य काम केलं."
 
'हॉलिवूडमध्ये कामासाठी गेले नाही'
मल्लिका शेरावतनं मधल्या काळात हॉलिवूडच्या दिशेनंही पावलं टाकली होती. यावर ती म्हणते की, हॉलिवूडचं कल्चर जाणून घेण्यासाटी तिथे गेली होती, कुठल्या कामासाठी तिकडे गेली नव्हती.
 
"मी हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी गेली नव्हती. नवीन संस्कृती आणि नवीन आयुष्य पाहण्यासाठी तिकडे गेली होती. मात्र, तिथं जर कुणाला माझ्यासोबत काम करायचं होतं, तर ते माझ्यासाठी चांगलंच होतं. ब्रूनो मार्शने त्याच्या व्हीडिओमध्ये मला कास्ट केलं, जॅकी चॅनसोबत एक सिनेमा केला. मी कामासाठी गेलीच नव्हती. मी भारतातही काम शोधत नाहीत. काही चांगलं काम आलं तर ठीक, अन्यथा इतर काही करेन," असंही मल्लिका म्हणते.