आमिर खानचा लाल सिंह चढ्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन हे दोन चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होत आहेत. पण प्रदर्शनाच्या आधीच या दोन्ही चित्रपटांवरून वादही सुरू झालाय.
या दोन्ही चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड गेले काही दिवस सोशल मीडियावर पहायला मिळाला. अनेकांनी तर केवळ या दोन चित्रपटांवरच नाही, तर बॉलिवूडवरच बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू केली.
सोशल मीडियावरचे ट्रेंडस पाहिले तर बॉलिवूड आणि प्रेक्षकांचे परस्परसंबंध पूर्वीसारखे राहिले नाहीयेत, हे जाणवतं. अर्थात, तज्ज्ञांच्या मते 'बॉयकॉट अमुक तमुक'च्या ट्रेंडमुळे हिंदी चित्रपटसृष्टीचं नेमकं किती नुकसान होऊ शकतं, हे सांगणं अवघड आहे.
कोरोनाच्या संकटामुळे अनेक महिने चित्रपटगृहं बंद होती, अनेक चित्रपटांचं प्रदर्शनही लांबणीवर पडलेलं. त्यामुळे बॉलिवूडला प्रचंड नुकसान सोसावं लागलं. थिएटर्स सुरू झाल्यानंतरही अनेक बिग बजेट चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप होत गेले.
एकीकडे बॉलिवूड हिट सिनेमा देण्यासाठी धडपडत असतानाच काही साउथ इंडियन चित्रपटांनी मात्र हिंदी पट्ट्यातही प्रचंड यश मिळवलं. दाक्षिणात्य सिनेमांचं हे वर्चस्व बॉलिवूडसाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असा अंदाजही काही तज्ज्ञांनी व्यक्त केला.
लाल सिंह चढ्ढा, रक्षाबंधन ट्रोल का?
आता बॉलिवूडच्या आशा आणि प्रचंड पैसा हा लाल सिंह चढ्ढा आणि रक्षाबंधन या दोन चित्रपटांवर लागला आहे. लाल सिंह चढ्ढा हा अभिनेता टॉम हँक्सच्या 'फॉरेस्ट गम्प'चा अधिकृत रिमेक आहे. रक्षाबंधनमध्ये अक्षय कुमारने चार बहिणींची जबाबदारी घेणाऱ्या भावाची भूमिका पार पाडली आहे.
सोशल मीडियावर उजव्या विचारसरणीचे लोक आमिर आणि अक्षयच्या काही जुन्या वक्तव्यांचा आधार घेत त्यांच्यावर निशाणा साधत आहेत, त्यांना 'भारत विरोधी', 'हिंदू विरोधी' म्हणत आहेत.
मे 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर अल्पसंख्याकांवर वाढलेल्या कथित हल्ल्यांबद्दल तसंच देशातील धार्मिक असहिष्णुतेबद्दल बोलताना आमिर खानने म्हटलं होतं की, गेल्या 6-8 महिन्यांपासून भारतात 'असुरक्षितता' आणि 'भीती'चं वातावरण वाढत असल्याचं जाणवतंय.
आमिरने त्यावेळी आपली पत्नी किरण राव हिने या वातावरणात देश सोडून जाऊया असं म्हटल्याचंही सांगितलं होतं.
आपल्या या विधानानंतर आमिर खान हिंदुत्ववाद्यांच्या निशाण्यावर आला होता. अर्थात, आपली ती विधानं संदर्भ सोडून स्वतंत्रपणे दाखवल्याचा आक्षेप आमिरने घेतला होता. आपलं देशावर प्रेम असल्याचंही त्यानं म्हटलं होतं.
या आठवड्यात आमिर खानने म्हटलं की, मला भारत आवडत नाही या गोष्टीवर लोक विश्वास ठेवतात, याचं मला वाईट वाटतं.
माध्यमांशी बोलताना आमिरने म्हटलं, "मी सगळ्यांना सांगतो की, असं काहीच नाहीये. त्यामुळे माझ्या चित्रपटांवर बहिष्कार टाकू नका."
दुसरीकडे अक्षय कुमारच्या रक्षाबंधनला विरोध का होतोय, हे सांगणं कठीण आहे. अक्षय कुमार हिंदू राष्ट्रवाद्यांना आवडणाऱ्या काही विषयांवर हिंदी चित्रपट बनविणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
पण सोशल मीडियावरील अनेक पोस्टमध्ये हिंदू राष्ट्रवादी हे 'रक्षाबंधन'च्या कथालेखकांपैकी एक असलेल्या कनिका ढिल्लन यांच्याविरुद्ध आक्रमक झाले आहेत. कनिका ढिल्लन या सोशल मीडियावर सातत्याने कथित गोरक्षक तसंच 'मॉब लिंचिंग'वर टीका करताना दिसतात.
अर्थात, अनेकांनी अक्षय कुमारच्या जुन्या विधानांचा संदर्भ देऊन 'रक्षाबंधन'वर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं आहे. मंदिरांमध्ये दूध वाया घालवण्यावर मागे अक्षय कुमारने टीका केली होती. त्याला काही लोक उजाळा देत आहेत.
2012 मध्ये अक्षय कुमारचा ओह माय गॉड हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यात अनेक धार्मिक कर्मकांडांवर टीका केली गेली होती. याचीही आठवण काही लोक करून देत आहेत.
प्रेक्षकांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण
चित्रपट समीक्षक उदय भाटिया सांगतात, "गेल्या काही काळात सोशल मीडियावर चित्रपटांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्याचं प्रमाण वाढलंय. मात्र अशी आवाहनं स्वाभाविक नसतात आणि उजव्या विचारांचा अजेंडा रेटणारी असतात."
एखाद्या चित्रपटामुळे किंवा त्यातील कलाकारांमुळे लोकांच्या भावना दुखावल्या यांसारखी कारणं देत बॉयकॉट करण्याचं आवाहन केलं जातं, असं भाटिया म्हणतात.
या वर्षातल्या मोठ्या हिटपैकी एक असलेल्या 'द कश्मीर फ़ाइल्स' चित्रपटात काश्मिर खोऱ्यातून पलायन करायला भाग पडलेल्या काश्मिरी पंडितांचा मुद्दा मांडला आहे. या चित्रपटामुळे प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक ध्रुवीकरण झालेलं पाहायला मिळालं.
सौम्या राजेंद्रन यांनी एप्रिलमध्ये एक लेख लिहिला होता, "बॉलिवूडमध्ये राष्ट्रवाद, हिंदू अभिमान, ऐतिहासिक हिंदू आयकॉन, भूतकाळात हिंदूंवर झालेले अत्याचार तसंच सध्याच्या लष्करी मोहिमा हेच विषय लोकप्रिय झाले आहेत."
गेल्या काही वर्षांमध्ये भाजपचं उजव्या हिंदू विचारसरणीचं समर्थन आणि विरोध अशा दोन फळ्यांमध्ये देशातील मनोरंजन उद्योग पूर्णपणे विभागलेला दिसून येत आहे.
सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि बॉलिवूड
बॉलिवूडमधील अनेक कलाकार नुकसान होईल या भीतीने राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका ठामपणे मांडताना दिसत नाहीत. जे लोक वादग्रस्त विषयांना हात घालतात त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग आणि काहीवेळा तर कायदेशीर कारवाईला सामोर जावं लागतं.
जून 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना नेपोटिझमच्या आरोपांना सामोरं जावं लागलं. काही जणांनी ही वस्तुस्थिती स्वीकारताना म्हटलं की, हे केवळ मनोरंजन क्षेत्रातच होत नाही तर इतरही क्षेत्रांत पाहायला मिळतं.
सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर वारंवार होणाऱ्या टीकेची चर्चा करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' कार्यक्रमाच्या नुकत्याच सुरू झालेल्या सीझनमध्येही पाहायला मिळाली.
या कार्यक्रमाचा होस्ट आणि निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने एका एपिसोडमध्ये म्हटलं होतं की, इंडस्ट्री म्हणून आपल्याला बदनाम करण्यात आलं. दोन वर्षं आपल्याला जणू काळ कोठडीतच डांबून ठेवलं होतं.
कदाचित त्यामुळेच फिल्म इंडस्ट्रीतले लोक आता आपल्या प्रतिमेबद्दल अधिक सावध झाले आहेत. अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अशा 'बॉयकॉट'च्या आवाहनाचा व्यावसायिकदृष्ट्या फार परिणाम होणार नाही.
उदय भाटिया म्हणतात, "चित्रपटसृष्टीतल्या लोकांबद्दल खरंखुरं मत फार कमी वेळा दिसून येतं. अक्षय कुमार सध्याच्या घडीचा सर्वांत लोकप्रिय स्टार आहे, तरीही त्याच्या चित्रपटावरही बहिष्कार टाकण्याची मागणी ट्रेंड होताना दिसली."
ट्रेड अॅनालिस्ट करण आदर्श सांगतात की, दंगल आणि पद्मावतसारख्या चित्रपटांना यश मिळालं असलं तरी त्यांनाही प्रचंड विरोध सहन करावा लागला होता.
ते सांगतात, "प्रत्येक जण आता सतर्क झाला आहे. अर्थात, सोशल मीडिया ट्रोलिंगचा एखाद्या चित्रपटावर परिणाम होतोय की नाही हे चित्रपट रिलीज झाल्यानंतर स्पष्ट होतं. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेनंतरच हे कळतं."
तरण आदर्श सांगतात, की नकारात्मक अभिप्रायांमुळे चित्रपट चर्चेत येतो आणि लोकही अधिक तीव्रतेने व्यक्त व्हायला लागतात. जर चित्रपट प्रेक्षकांना आवडला तर त्यांना अडवता येऊ शकत नाही.
अर्थात, ऑनलाइन स्पेस प्रचंड दूषित झाल्यामुळे सोशल मीडियासोबत बॉलिवूडचे संबंध सुधारतील की नाही याबाबत अनिश्चितता आहे.