झुंड’ चित्रपटातील “या” अभिनेत्याला अटक
अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या झुंड या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या प्रियांशू क्षत्रिय याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नागपूर शहर पोलिसांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली आहे.
अधिक माहितीनुसार, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केल्या प्रकरणी झुंड चित्रपटामधील अभिनेता प्रियांशू क्षत्रिय याला अटक करण्यात आली आहे. 18 वर्षीय प्रियांशू क्षत्रिय याला नागपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रियांशूने झुंड चित्रपटात बाबू ही व्यक्तिरेखा साकारली होती. नागपूरमधील मनकापूर भागातील रहिवासी असलेल्या ६४ वर्षीय प्रदीप मोंडावे यांनी याबाबत तक्रार दिली होती. मोंडावे कुटुंबाच्या नागपुरातील राहत्या घरामधून सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याचा आरोप प्रियांशूवर करण्यात आला आहे.
पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला पकडले होते. त्याने या गुन्ह्यामध्ये प्रियांशू क्षत्रियचा सहभाग असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर गुरुवारी पोलिसांनी प्रियांशूला अटक केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रियांशू क्षत्रिय याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नागपुरमधील गड्डीगोदाम परिसरामध्ये एका कबुतराच्या पेटीमधून चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमामध्ये हा परिसर दिसला आहे. प्रियांशूला यापूर्वी रेल्वे प्रवाशांचे मोबाईल फोन चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
समीक्षकांनी गौरवलेल्या झुंड हा हिंदी भाषेतील चित्रपट विजय बारसे या माजी क्रीडा शिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना गुन्हेगारी आणि व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी फुटबॉलशी परिचय करुन दिला आहे. झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन, छाया कदम, किशोर कदम, आकाश ठोसर, रिंकु राजगुरू, सोमनाथ अवघडे, प्रियांशु क्षत्रिय, अंकुश गेदाम, रजिया काजी आणि इतरांच्या भूमिका आहेत.
Edited By- Ratnadeep Ranshoor