शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By

UPSC च्या मुलाखतीसाठी जाताना या 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

career
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी तर्फे नागरी सेवा परीक्षेचा अंतिम टप्पा आता जवळ आला आहे. येत्या 30 जानेवारीपासून मुलाखतींना सुरुवात होणार आहे.
 
प्रत्येक टप्प्यासारखाच हा टप्पा अतिशय महत्त्वाचा असतो. या मुलाखतीला व्यक्तिमत्व चाचणी म्हणजे Personality टेस्ट असं नाव दिलं गेलं आहे. नावाताच या टप्प्याचं सार सामावलं आहे. मुलाखतीचा टप्पा पार पडून गुणवत्ता यादीत येण्यासाठी महत्त्वाच्या टीप्स या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ या.
 
  मुलाखतीचं स्वरूप आणि पूर्वतयारी
मुलाखतीत उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत हे पुढील शब्दात युपीएससीने स्पष्ट केलं आहे.
 
“उमेदवाराची मुलाखत बोर्डाकडून घेतली जाईल आणि त्यांच्यासमोर उमेदवारांच्या करिअरच्या नोंदी असतील. त्यांना महत्त्वाच्या बाबींवर प्रश्न विचारले जातील. मुलाखतीत उमेदवाराची लोकसेवेसाठी व्यक्तिगतरित्या सक्षमता तपासणं हा आहे. चाचणीतून उमेदवाराची बौद्धिक कणखरता तपासण्यात येईल.
 
बौद्धिक दर्जाच नाही तर सामाजिक कल सुद्धा तपासला जाईल. त्याचबरोबर बौद्धिक जागरुकता, आकलनशक्तीची क्षमता, स्पष्ट व तार्किक मांडणी, समतोल न्यायबुद्धी, आवडीनिवडीचे वैविध्य आणि खोली, सामाजिक समरसता आणि नेतृत्व, बौद्धिक आणि नैतिक कार्यक्षमता या गुणांचा अभ्यास करण्यात येईल.”
 
युपीएससी मुख्य परीक्षा 1750 मार्कांची असते. तर मुलाखत 275 गुणांची असते. याचा अर्थ 2025 गुणापैकी 13 टक्के इतका मुलाखतीचा भारांक आहे. त्यामुळे मुलाखतीचे महत्त्व 13 टक्क्याच्या पुढे जाणार नाही याची काळजी घेतली आहे.
 
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक भूषण देशमुख यांच्या मते फॉर्म भरताना पदांचा जो पसंतीक्रम नमूद केला असेल त्याची व्यवस्थित माहिती घेणं हा मुलाखतीच्या पूर्वतयारीचाच भाग आहे.
 
त्यात पदाचे अधिकार कोणते याची इत्यंभूत माहिती असायला हवी, पदाचे कार्य, रचना, विभागीय रचना, पदाचं महत्त्व, प्रसिद्ध अधिकारी यांची माहिती असावी. ही तयारी नसेल त्या पदाबाबत गांभीर्य नाही, असं समजण्यात येतं.
मुलाखतीचा अभ्यास कसा करावा?
हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. आयएएस अधिकारी ओंकार पवार सध्या मसुरीत प्रशिक्षण घेत आहेत. त्यांनी तीनदा युपीएससची मुलाखत दिली आहे.
 
ते म्हणतात, “तुमचं नाव, तुमचं गाव याची इत्यंभूत माहिती असावी. नावाचा काही विशेष अर्थ असेल तर त्याची माहिती असावी. मेन्सचा फॉर्म भरताना शैक्षणिक पात्रता, छंद यांच्याविषयी माहिती देत असतो.
 
त्याबद्दल सविस्तर माहिती असायला हवी. मुख्य परीक्षेत जो वैकल्पिक विषय आहे त्याचा योग्य अभ्यास करायला हवा. तसंच मुख्य परीक्षा ते मुलाखत या दरम्यानच्या घडामोडींवर नीट लक्ष ठेवण्याची गरज असते. त्यासाठी रोज वर्तमानपत्र वाचायला हवं.
 
स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ भूषण देशमुख म्हणतात, “काही उमेदवारांना असे वाटते की मुलाखतीची तयारी करायची फारशी काही गरज नाही. कारण 'मी आहे हा असा आहे', आता यात काय बदलणार? काही प्रमाणात हे खरेच आहे. दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण व्यक्तिमत्वाचा कायापालट काही होऊ शकत नाही. पण आपण कसे आहोत हे तर स्वतःलाच नीट कळले तर पाहिजे.
 
मी कशाप्रकारचा माणूस आहे, माझ्या आवडी-निवडी काय आहेत, माझी मते कुठल्या प्रकारची आहे (डावी, उजवी की मध्यम) हे स्वतःला पुरेसे स्पष्ट असायला हवे. त्यापलीकडे जाऊन माझी मूल्यव्यवस्था काय आहे, माझी सामाजिक बांधिलकी किती बळकट आहे हे आधीच समजून घ्यायला हवे. थोडक्यात स्वतःच्या व्यक्तिमत्वाची चौकट व त्याचवेळी स्वतःच्या मर्यादा यांची जाणीव असली पाहिजे.”
 
मुख्य परिक्षा झाल्यावर लगेच मुलाखतीच्या तयारीला लागले पाहिजे. कारण मुलाखत जरी अर्धा तासच चालते तरी तो अर्धा तास तुमचे व्यक्तिमत्व पूर्ण स्कॅन करतो. मुलाखत घेणारी पाच डोकी वेगवेगळ्या कोनातून उमेदवाराचे मोजमाप घेतात. (कधीकधी 'मापं'ही काढतात) तयारी करूनही मुलाखत कशी होईल हे मुलाखत देऊन बाहेर आल्याशिवाय सांगता येत नाही. तयारी न करता गेलात तर मग काय होईल हे वेगळे सांगायला नको," असं ते पुढे म्हणाले.
 
प्रत्यक्ष मुलाखत सुरू असताना
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डी.पी.अग्रवाल यांनी एका भाषणात मुलाखतीच्या काही टीप्स दिल्या. ते म्हणतात, “नागरी सेवा परीक्षा ही मुळातच गुंतागुंतीची आहे. कारण तिथे भारतातल्या प्रत्येक समाजातून, वर्गातून, संस्कृतीतून उमेदवार येत असतात. प्रत्येकाची जडणघडण वेगळी असते. त्यामुळे ही परीक्षा गुंतागुतीची असते.
 
तुम्ही लोक सरकारचा भाग होणार आहात. त्यामुळे मुलाखतीत वापरली जाणारी भाषा ही औपचारिक असावी. मोबाईल वापराताना जे स्लँग्स वापरतात. त्याचा वापर अजिबात करू नये. ती एक महत्त्वाची चर्चा आहे. तिथे तुम्ही जसं बोलता तसंच सरकारचा भाग म्हणून लोकांशी बोलणार आहात हे लक्षात ठेवा.”

“युपीएससी ही अतिशय निरपेक्ष संस्था आहे. तिथे तुम्ही स्त्री आहात की पुरुष, आरक्षित वर्गाचे आहात की अनारक्षित, असा कोणताही भेद तिथे केला जात नाही. तिथे तुम्हाला तुमच्या धर्माविषयी पालकाविषयी किंवा कोणत्याही पद्धतीने बोर्डावर एक विशिष्ट प्रभाव पडेल असं बोललं जात नाही. त्यामुळे तुम्हीही तो पाडण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या कोणाशी ओळखी आहेत, मी पॅनलच्या सदस्यांना ओळखतो अशा कोणत्याही ओळखी सांगू नका. त्याचा काहीही फायदा होत नाही.” अग्रवाल सांगतात.
 
प्रत्यक्ष मुलाखत चालू असताना पॅनेल फार खोलात जाणार नाही असं गृहित धरू नये. याविषयी एका प्रसंगाचा वर्णन करताना भूषण देशमुख म्हणतात, “ मुंबईचा एक उमेदवार यू. पी. एस. सी. च्या मुलाखतीला गेला. त्याने मुंबईच्या समस्या, वैशिष्टये यावर बऱ्यापैकी तयारी केली होती. पण तो मुंबईचे उपनगर कुर्ल्याचा असल्याने त्यांनी कुर्ल्याची चर्चा सुरु केली. कुर्ला येथील टेकडी, अतिक्रमणे इत्यादी. तो गडबडला. दिल्लीत येऊन कुर्ल्यावर चर्चा होईल असे त्याला वाटलेच नव्हते. तेव्हा तुमचा जन्म व राहण्याचे ठिकाण यांचा सखोल अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही.”
 
मुलाखत सुरू असताना मी कसा ग्रामीण भागातून आलो, मला कशा अडचणी आल्या याचा पाढा वाचू नये असा सल्ला डी.पी. अग्रवाल देतात. तुम्ही खूप संघर्ष केला, काहीतरी चांगलं केलं म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात हे पुरेसं सिद्ध झालं आहे. त्यामुळे मुलाखत ही चर्चा आहे. तिथे मांडलेल्या विषयांवर स्वत:चा एक नीट विचार किंवा मत योग्य पद्धतीने मांडावं इतकाच या मुलाखतीचा उद्देश असतो आणि तितकंच अपेक्षित असतं.
 
विविध विषयावर मते असल्याशिवाय अधिकाऱ्यांना निर्णय घेणे शक्य नाही. ती मते चांगली की वाईट, बरोबर की चुकीची हा पुढचा भाग झाला. मते असणे महत्वाचे असते. ती बदलता येतात किंवा सुधारून घेता येतात. इतर  उमेदवारांशी चर्चा करून किंवा थोडे खोलात वाचन करून काही  महत्त्वाच्या समकालीन विषयांवर मतनिर्मिती व मतनिश्चिती करता येईल असा सल्ला भूषण देशमुख देतात.
 
पॅनल महत्त्वाचं असतं का?
काही उमेदवार पॅनलचा खूप अभ्यास करून जातात. निकाल लागला आणि निवड झाली की कोणतं पॅनल होतं हा प्रश्न हमखास विचारला जातो. पण पॅनल खरंच महत्त्वाचं असतं का या प्रश्नाच्या उत्तरादाखल भूषण देशमुख म्हणतात,
 
“काही उमेदवार पॅनलचा सखोल अभ्यास करून जातात. तसा अभ्यास करवून घेणारे कोर्सेस (?) देखील चालवले जातात. प्रश्न हा उभा राहतो की पॅनलला किती गृहीत धरावे व त्याचा कितपत फायदा होतो?
 
याची एक बाजू अशी आहे की आयोगाचे सदस्य कोण आहेत (त्यांचा अनुभव व फोटो) हे डोळ्याखालून गेले असेल तर नक्कीच फायदा होतो. आपण काहीएक योग्य अंदाज बांधू शकतो. उदा. समजा चेअरमनचे करियर परराष्ट्र सेवेत गेले असेल तर प्रश्नांना परराष्ट्र संबंधांचे कंगोरे असणार याचा आधीच अंदाज बांधता येतो. फोटो डोळ्याखालून गेला असेल तर पॅनल अगदीच अनोळखी वाटत नाही.”
 
“चेअरमनचे आयुष्य परराष्ट्र संबंध या विषयात गेले असेल तरी तो व इतर सदस्य पूर्ण मुलाखत विज्ञानावर घेऊ शकतात. ज्या वरच्या स्तरावर त्यांनी काम केले असते त्या स्तरावर त्यांचा अनेक देश, राज्ये व विषय यांच्याशी संबंध आलेला असतो.
 
तेव्हा त्यांच्या मर्यादांबद्दल अंदाज त्यानुसारच प्रतिक्रिया देणे महागात पडू शकते. त्याशिवाय एखादे पॅनल 'खडूस' आहे व दुसरे एखादे 'सढळ हाताचे' आहे अशा प्रकारचे पूर्वग्रहही टाळले पाहिजेत.
 
प्रत्यक्ष अनुभव पूर्णपणे उलटा येऊ शकतो. तेव्हा आपण आपली तयारी चांगली करून मुलाखतीला सामोरे जाणे हे धोरण कधीही श्रेयस्कर. मग पॅनल कोणतेही असो. पॅनलची ओळख काढण्याचा प्रयत्न करणे किंवा प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी ओळख दाखवणारे सूचक बोलणे अशा गोष्टी उमेदवाराची प्रतिमा पॅनलच्या नजरेत मलीन करू शकतात. तेव्हा त्यावर वेळ घालवू नये,” ते सांगतात.
 
आयएएस अधिकारी ओंकार पवार यांच्या मते पॅनल फारसं महत्त्वाचं नाही. ओंकार पवार यांनी तीनदा यशस्वी मुलाखती दिल्या आहेत. अमुकतमुक पॅनल खडूस आहे, ते चांगले मार्क देत नाही अशी ज्यांच्याबद्दल वदंता होती त्यांनीच मला चांगले मार्क दिले असं ते सांगतात. त्यामुळे पॅनलची माहिती काढून आत्मविश्वास कमी करू नये असा सल्ला ते देतात.
 
मुलाखतीच्या आदल्या दिवशी आणि त्या दिवशी
मुलाखतीच्या तीन ते चार दिवस आधी मॉक इंटरव्यू पूर्णपणे थांबवण्याचा सल्ला ओंकार पवार देतात. त्याचप्रमाणे मुलाखतीच्या आदल्या दिवशी अतिशय शांत रहावे. नीट झोप घ्यावी. तारवटवटलेले डोळे घेऊन पॅनल समोर बसू नये. मुलाखतीच्या दिवशी त्या दिवशीचा पेपर वाचून जावं.
 
मुलाखतीचा ताण साहजिकच उमेदवारांवर येतो. काहींच्या बाबतीत तो उघडपणे दिसतो. कधी घाम येतो, शब्द फुटत नाहीत किंवा चक्क रडायला येतं. काही उमेदवारांचा तणाव सुक्ष्मपणे कार्यरत असतो. काही लोकांना पाय हलवण्याची सवय असते. या सगळ्याचा परिणाम मुलाखतीवर होतो. तणाव वाजवी प्रमाणात आवश्यकच आहे. तरी तो योग्य पद्धतीने हाताळता यायला हवा.
 
नागरी सेवेची मुलाखत हा महत्त्वाचा टप्पा आहे. तो विविधांगी आहे. त्यात अनेक घटक अंतर्भूत असतात. मुलाखतीत वाशिलेबाजी असते, पॅनल भेदभाव करतं, अशा अनेक दंतकथा चालू असतात. त्यावर विश्वास ठेवू नये. हे सगळे विचार पॅनलला दिसतात आणि मग तेही योग्य गुण देऊन न्याय करतात. मुलाखत ही संकट नसून संधी आहे. त्याचा पूरेपूर वापर करावा.
 
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डीपी अग्रवाल म्हणतात त्याप्रमाणे मुलाखत अर्ध्या तासाची असते. तिथे काहीही झालं तरी बसावंच लागतं. त्यामुळे या अर्ध्या तासाचं सोनं करणं जास्त श्रेयस्कर ठरतं.
 
Published By - Priya Dixit