शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (08:31 IST)

राज्यात मंगळवारी ४ हजार १९६ नवीन करोनाबाधित

राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही, अद्यापही दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत व करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे.तर, दुसऱ्या बाजूला करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. तर, राज्यात रोज दिवसभरात करोनातून बरे झालेल्यांची समोर येणारी संख्या ही नवीन करोनाबाधितांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येते आहे. राज्य सरकारकडून निर्बंध जरी शिथिल करण्यात आले असले, तरी देखील मुख्यमंत्र्यांनी रूग्ण संख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाउनचा इशारा देखील दिलेला आहे. शिवाय, तिसऱ्या लाटेचा धोका देखील तज्ज्ञांकडून वर्तवला गेलेला आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे सातत्याने आवाहन केले जात आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी  ४ हजार १९६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ४ हजार ६८८ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर,१०४ करोनाबाधित रूग्णांचा  राज्यात मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.
 
राज्यात आजपर्यंत एकूण ६२,७२,८०० करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०३ टक्के एवढे झाले आहे.आता राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,६४,८७६ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३७३१३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३९,७६,८८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,६४,८७६(११.९८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात २,९१,७०१ व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत. तर २ हजार १२१ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत.राज्यात  एकूण ५१,२३८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.