सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (11:04 IST)

ग्लेन मॅक्सवेलवर जेव्हा बाद होण्याच्या नव्या पद्धती शोधतो अशी टीका झाली होती...

Glenn Maxwell
ओंकार डंके
अद्भुत अविश्वसनीय आणि जादूगार. ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलच्या आजवरच्या कारकिर्दीचं वर्णन करण्यासाठी हे तीन शब्द पुरेसे आहेत.
 
वन-डे क्रिकेटच्या इतिहासात सलामीला न येता द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज असा पराक्रम ग्लेन मॅक्सवेलनं केलाय. विशेष म्हणजे त्यानं थेट सहाव्या क्रमांकावर येऊन द्विशतक ठोकलंय.
 
‘एकदिवसीय क्रिकेटमधील मी पाहिलेली सर्वोत्तम खेळी’ असं या मॅक्सवेलच्या या द्विशतकी खेळीचं वर्णन साक्षात सचिन तेंडुलकरनं केलंय. हे अद्भूत आहे.
 
आपल्या टीमची बिकट परिस्थिती, धक्कादायक पराभवानं दारावर दिलेली चाहूल, मुंबईतील उष्णतेचा त्रास, पायात आलेले गोळे, मैदानातील कोसळणं, स्ट्रेचरनं बाहेर न्यावं लागतं की काय अशी परिस्थिती... या सर्व अडचणींवर मात करत मॅक्सवेल उभा राहिला. हे सर्व अविश्वसनीय होतं.
 
तो फक्त उभा राहिला नाही तर त्यानं अनेक वेळा बॉल बाहेर भिरकावला. मोठे फटके मारण्यासाठी फुटवर्कचा चांगला वापर केला पाहिजे, हा क्रिकेटमधला प्राथमिक नियम मॅक्सवेलनं द्विशतकी खेळीच्या दरम्यान मॅक्सवेलनं अनेकदा मोडला. हे नियम मोडण्यासाठी तुम्हाला फक्त मारधोड करणारा फलंदाज नाही तर जादूगार असण्याची गरज आहे.
 
मॅक्सवेलच्या खेळाचा पॅटर्न
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळी करण्याची आपली क्षमता आहे. हे ग्लेन मॅक्सवेलनं यापूर्वी देखील अनेकदा दाखवून दिलंय.
 
मैदानातील परिस्थिती कशीही असो, समोरचा बॉलर कोणताही असो पहिलाच बॉल रिव्हर्स स्विप खेळत त्यावर चौकार किंवा षटकार लगावण्याची गुणवत्ता मॅक्सवेलमध्ये आहे.
 
कोणत्याही ऑस्ट्रेलियन प्रमुख फलंदाजाप्रमाणे जलदगती गोलंदाजी सहज खेळणं त्याला जमतं. त्याचबरोबर स्पिनर्सना सहज खेळण्याची, भारतीय उपखंडातील पिचवर वारंवार यशस्वी होण्याची कला त्याच्या फलंदाजीत आहे. 
 
 मॅक्सवेलची सवय
अफगाणिस्ताननं दिलेल्या 292 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था 7 बाद 91 अशी होती. त्या परिस्थितीमध्येही संथ खेळ करत कोषात न जाता मॅक्सवेलनं 128 बॉलमध्ये नाबाद 201 धावा काढल्या.
 
या प्रकारची वेगवान आणि मोठी खेळी करण्याची मॅक्सवेलची सवय आहे. त्यानं हे यापूर्वीही अनेकदा केलंय.
 
वेगवान रेकॉर्ड
मॅक्सवेलनं वयाच्या 22 व्या वर्षी ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक झळकावतं निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं.
 
ऑस्ट्रेलियाकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणाऱ्या तीन फलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे.
 
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या यादीत डेव्हिड वॉर्नरसह मॅक्सवेल पहिल्या क्रमांकावर आहे.
 
वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रमही मॅक्सवेलनं नुकताच केलाय.
 
उपयुक्त ऑल राऊंडर
ग्लेन मॅक्सवेलच्या आक्रमक फलंदाजीच्या झगमगाटात त्याची ऑफ स्पिनर म्हणून असलेली गुणवत्ता अनेकदा लक्षात येत नाही.
 
पाकिस्तान विरुद्धच्या टी20 सामन्यात शेवटच्या ओव्हर्समध्ये 2 धावा वाचवण्याची किमया मॅक्सवेलनं केली होती.
 
2015 साली विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघात नियमितपणे खेळणारा मॅक्सवेल हा एकमेव फिरकी गोलंदाज होता.
 
2023 साली भारतामध्ये होत असलेल्या विश्वचषकातही तो ऑस्ट्रेलियन टीममधील दुसऱ्या क्रमांकाचा फिरकी गोलंदाज आहे. अनेकदा जमलेली जोडी फोडण्याचं काम मॅक्सवेलनं केलं आहे.
 
ब्रेक घेण्याचं धाडस
क्रिकेट कारकिर्दीमध्ये सध्या शिखरावर असलेल्या मॅक्सवेलनं उतारही तितकाच अनुभवलाय. आक्रमक खेळाच्या नादात तो बेजबाबदार फटके मारत बाद होतो. बाद होण्याच्या नव्या पद्धती शोधतो अशी टीका त्याच्यावर अनेकदा झालीय.
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेट, आयपीएलसारखी टी20 लीग यामुळे वेगवेगळ्या भागात सतत करावा लागणारा प्रवास हा क्रिकेटपटूंना थकवणारा असतो. त्यातच फॉर्म हरपला तर त्यांच्यापुढील आव्हान आणखी कठीण होते.
 
मॅक्सवेलसाठी 2019 हे वर्ष चांगलंच त्रासदायक गेलं. त्याचा फॉर्म हरपला होता. त्याच वर्षी मॅक्सवेलनं ‘मानसिक आरोग्य नीट नाही’ असं कारण देत काही काळ क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
 
मॅक्सवेलची तत्कालीन गर्लफ्रेंड आणि आता पत्नी असलेली विनी रमननं या अडचणीच्या कालखंडात त्याला मदत केली.
 
‘मला ब्रेकची गरज आहे, हे विनीनंच सर्वात प्रथम ओळखलं होतं,’ असं मॅक्सवेलनं ब्रेकहून परतल्यानंतर या विषयावर बोलताना सांगितलं होतं.
 
मॅक्सवेलनं स्वत:ची मानसिक अवस्था लपवली नाही. त्यानं मोकळेपणानं समस्या जगजाहीर केली, याबाबत ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचे तत्कालीन कोच जस्टीन लँगरनंही त्याचं कौतुक केलं होतं.
 
कपिल, रिचर्ड्स आणि मॅक्सवेल
फलंदाजीच्या पारंपारिक पद्धतीला आव्हान देत, आपल्या नैसर्गिक आक्रमक शैलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी होता येतं, हे वीरेंद्र सेहवागनं एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात दाखवून दिलं.
 
रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर यांनी सेहवागच्याच खेळाचा पॅटर्न अधिक समृद्ध केला.
 
सेहवाग, रोहित, वॉर्नर यांच्यासारखा मॅक्सवेल सलामीवीर नाही. त्याची टीममधील जबाबदारी संपूर्ण वेगळी आहे.
 
मॅक्सवेलच्या खेळाचं महत्त्व हे त्याच्या आकडेवारीत मोजायचं नसतं. तर त्याच्या इम्पॅक्टमध्ये समजून घ्यायचं असतं. एका अर्थानं मॅक्सवेलची तुलना ही कपिल देव किंवा व्हिव्ह रिचर्ड्स या महान क्रिकेटपटूंच्या फलंदाजीशी करता येईल.
 
1983 साली 4 बाद 9 अशी बिकट परिस्थिती असताना मैदानात उतरलेल्या कपिल देव यांनी नंतरच्या 257 धावांपैकी 175 म्हणजेच 68 टक्के धावा केल्या होत्या.
 
1984 मध्ये रिचर्ड्स यांनी 2 बाद 11 या धावसंख्येवर मैदानात पाऊल टाकलं. त्यानंतर पुढील 266 पैकी 189 म्हणजेच 71 टक्के धावा केल्या.
 
कपिल देव आणि रिचर्ड्स यांच्या त्या खेळीचा इम्पॅक्ट आज चार दशकांनंतरही कायम आहे.
 
2023 साली 4 बाद 49 असा स्कोअर असताना मैदानात आलेल्या मॅक्सवेलनं पुढील 244 पैकी 201 धावा केल्या आहेत. मॅक्सवेलच्या धावांची टक्केवारी आहे 82.4
 
कपिल आणि रिचर्ड्स यांच्या ऐतिहासिक खेळीचा इम्पॅक्ट 4 दशकांनंतही कायम आहे. सध्याच्या वेगानं बदलत चाललेल्या स्पर्धात्मक क्रिकेटच्या कालखंडात मॅक्सवेलच्या द्विशतकाचा इम्पॅक्ट आणखी 100 वर्ष तरी नक्कीच टिकणार आहे.