Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दासबोध दशक चौदावा - अखंडध्यान

Updated: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (16:54 IST)
 
 
समास नववा : शाश्वत निरूपण ॥ श्रीराम ॥ पिंडाचें पाहिलें कौतुक । शोधिला आत्मानात्मा विवेक । पिंड अनात्मा आत्मा येक । सकळ कर्ता ॥ १ ॥ आत्म्यास अनन्यता बोलिली । ते विवेकें प्रत्यया आली । आतां पाहिजे समजली । ब्रह्मांडरचना ॥ २ ॥ आत्मानात्माविवेक पिंडी । सारासारविचार ब्रह्मांडी। विवरविवरों हे गोडी । घेतली पाहिजे ॥ ३ ॥ पिंड कार्य ब्रह्मांड कारण । याचें करावें विवरण । हेंचि पुढें निरूपण । बोलिलें असे ॥ ४ ॥ असार म्हणिजे नासिवंत । सार म्हणिजे तें शाश्वत । जयास होईल कल्पांत । तें सार नव्हे ॥ ५ ॥ पृथ्वी जळापासून जाली । पुढें ते जळीं मिळाली । जळाची उत्पत्ति वाढली । तेजापासुनी ॥ ६ ॥ ते जळ तेजें शोषिलें । महत्तेजें आटोन गेलें । पुढें तेजचि उरलें । सावकाश ॥ ७ ॥ तेज जालें वायोपासुनी । वायो झडपी तयालागुनी । तेज जाउनी दाटणी । वायोचीच जाली ॥ ८ ॥ वायो गगनापासुनी जाला । मागुतां तेथेंचि विराला । ऐसा हा कल्पांत बोलिला । वेदांतशास्त्रीं ॥ ९ ॥ गुणमाया मूळमाया । परब्रह्मीं पावती लया । तें परब्रह्म विवराया । विवेक पाहिजे ॥ १० ॥ सर्व उपाधींचा सेवट । तेथें नाहीं दृश्य खटपट । निर्गुण ब्रह्म घनदाट । सकळां ठाईं ॥ ११ ॥ उदंड कल्पांत जाला । तरी नाश नाहीं तयाला । मायात्यागें शाश्वताला । वोळखावें ॥ १२ ॥ देव अंतरात्मा सगुण । सगुणें पाविजे निर्गुण । निर्गुणज्ञानें विज्ञान । होत असे ॥ १३ ॥ कल्पनेतीत जें निर्मळ । तेथें नाहीं मायामळ । मिथ्यत्वें दृश्य सकळ । होत जातें ॥ १४ ॥ जें होते आणि सवेंचि जातें । तें तें प्रत्ययास येतें । जेथें होणें जाणें नाहीं तें । विवेकें वोळखावे ॥ १५ ॥ येक ज्ञान येक अज्ञान । येक जाणावें विपरीत ज्ञान । हे त्रिपुटी होये क्षीण । तेंचि विज्ञान ॥ १६ ॥ वेदांत सिधांत धादांत । याची पाहावी प्रचित । निर्विकार सदोदित । जेथें तेथें ॥ १७ ॥ तें ज्ञानदृष्टीनें पाहावें । पाहोन अनन्य राहावें मुख्य आत्मनिवेदन जाणावें । याचें नांव ॥ १८ ॥ दृश्यास दिसते दृश्य । मनास भासतो भास । दृश्यभासातीत अविनाश । परब्रह्म तें ॥ १९ ॥ पाहों जातां दुरीच्या दुरी । परब्रह्म सबाहेअंतरीं । अंतचि नाहीं अनंत सरी । कोणास द्यावी ॥ २० ॥ चंचळ तें स्थिरावेना । निश्चळ तें कदापी चळेना । आभाळ येतें जातें गगना । चळण नाहीं ॥ २१ ॥ जें विकारें वाढें मोडे । तेथें शाश्वतता कैंची घडे । कल्पांत होताच विघडे । सकळ कांहीं ॥ २२ ॥ जे अंतरींच भ्रमलें । मायासंभ्रमें संभ्रमलें । तयास हें कैसें उकले । आव्हाट चक्र ॥ २३ ॥ भिडेनें वेव्हार निवडेना । भिडेनें सिधांत कळेना । भिडेनें देव आकळेना । आंतर्यामीं ॥ २४ ॥ वैद्याची प्रचित येईना । आणी भीडहि उलंघेना । तरी मग रोगी वांचेना । ऐसें जाणावें ॥ २५ ॥
 
जेणें राजा वोळखिला । तो राव म्हणेना भलत्याला । जेणें देव वोळखिला । तो देवरूपी ॥ २६ ॥ जयास माईकाची भीड । तें काये बोलेल द्वाड । विचार पाहातां उघड । सकळ कांहीं ॥ २७ ॥ भीड मायेऐलिकडे । परब्रह्म तें पैलीकडे । पैलीकडे ऐलीकडे । सदोदित ॥ २८ ॥ लटिक्याची भीड धरणें । भ्रमें भलतेंचि करणें । ऐसी नव्हेंतीलक्षणें । विवेकाचीं ॥ २९ ॥ खोटें आवघेंचि सांडावें । खरें प्रत्ययें वोळखावें । मायात्यागें समजावें । परब्रह्म ॥ ३० ॥ तें मायेचें जें लक्षण । तेंचि पुढें निरूपण । सुचितपणें विवरण । केलें पाहिजे ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शाश्वतनिरूपणनाम समास नववा ॥
 
 
समास दहावा : मायानिरूपण ॥ श्रीराम ॥ माया दिसे परी नासे । वस्तु न दिसे परी न नासे । माया सत्य वाटे परी मिथ्या असे । निरंतर ॥ १ ॥ करंटा पडोनि उताणा । करी नानापरी कल्पना । परी तें कांहींच घडेना । तैसी माया ॥ २ ॥ द्रव्यदारेचें स्वप्नवैभव । नाना विळासें हावभाव । क्षणीक वाटे परी भाव । तैसी माया ॥ ३ ॥ गगनीं गंधर्वनगरें । दिसताती नाना प्रकारें । नाना रूपें नाना विकारें । तैसी माया ॥ ४ ॥ लक्षुमी रायेविनोदाची । बोलतां वाटे साची । मिथ्या प्रचित तेथीची । तैसी माया ॥ ५ ॥ दसर्याचे सुवर्णाचे लाटे । लोक म्हणती परी ते कांटे । परी सर्वत्र राहाटे । तैसी माया ॥ ६ ॥ मेल्याचा मोहोछाव करणें । सतीचें वैभव वाढविणें । मसणीं जाउनी रुदन करणें । तैसी माया ॥ ७ ॥ राखेसी म्हणती लक्षुमी । दुसरी भरदोरी लक्षुमी । तिसरी नाममात्र लक्षुमी । तैसी माया ॥ ८ ॥ मुळीं बाळविधवा नारी । तिचें नांव जन्मसावित्री । कुबेर हिंडे घरोघरी । तैसी माया ॥ ९ ॥ दशावतारांतील कृष्णा । उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा । नदी नामें पीयुष्णा । तैसी माया ॥ १० ॥ बहुरूपांतील रामदेवराव । ग्रामस्तांपुढे दाखवी हावभाव । कां माहांराज म्हणोनि लाघव । तैसी माया ॥ ११ ॥ देव्हारां असे अन्नपूर्णा । आणी गृहीं अन्नचि मिळेना । नामें सरस्वती सिकेना । शुभावळु ॥ १२ ॥ सुण्यास व्याघ्र नाम ठेविलें । पुत्रास इंद्रनामें पाचारिलें । कुरूप परी आळविलें । सुंदरा ऐसें ॥ १३ ॥ मूर्ख नामें सकळकळा । राशभी नामें कोकिळा । नातरी डोळसेचा डोळा । फुटला जैसा ॥ १४ ॥ मातांगीचें नाम तुळसी । चर्मिकीचें नाम कासी । बोलती अतिशूद्रिणीसी । भागीरथी ऐसें ॥ १५ ॥ साउली आणी अंधकार । येक होतां तेथीचा विचार । उगाचि दिसे भासमात्र । तैसी माया ॥ १६ ॥ श्रवण बोटें संधी करतळ । रविरश्में दिसती इंगळ । रम्य आरक्तकल्होळ । तैसी माया ॥ १७ ॥ भगवें वस्त्र देखतां मनाला । वाटे अग्नचि लागला । विवंचितां प्रत्ये आला । तैसी माया ॥ १८ ॥ जळीं चरणकरांगुळें । आखुड लांबें जिरकोळें । विपरीत काणें दिसती जळें । तैसी माया ॥ १९ ॥ भोवंडीनें पृथ्वी कलथली । कामिणीनें पिवळी जाली । सन्यपातस्थां अनुभवली । तैसी माया ॥ २० ॥ कोणीयेक पदार्थविकार । उगाचि दिसे भासमात्र । अनन्याचा अन्य प्रकार । तैसी माया ॥ २१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मायानिरूपणनाम समास दहावा ॥
 
॥ दशक चौदावा समाप्त ॥

सर्व पहा

''श्री कृष्णा अष्टकम'' : मनाला शांतता देणारे Krishna Ashtakam

श्री वेंकटेश अष्टकम : सर्व संकटांतून मुक्ती देणारे प्रभावी स्तोत्र!

देवीसमोर दिवा लावताना ९०% लोक करतात ही चूक

Shravan 2026 श्रावण सुरू होण्यापूर्वी घरात करा हे ५ शुभ बदल

कुण्डलिनी स्तोत्र | Kundalini Stotra आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रभावी आणि पवित्र स्तोत्र

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments