Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दासबोध दशक पंधरावा - आत्मदशक

Updated: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (16:57 IST)
 
 
समास नववा : पिंडोत्पत्तिनिरूपण ॥ श्रीराम ॥ चौंखाणीचे प्राणी असती । अवघे उदकेंचि वाढती । ऐसे होतीआणी जाती । असंख्यात ॥ १ ॥ तत्वांचें शरीर जालें । अंतरात्म्यासगट वळलें । त्यांचें मूळ जों शोधिलें । तों उदकरूप ॥ २ ॥ शरत्काळींचीं शरीरें । पीळपीळों झिरपती नीरें । उभये रेतें येकत्रें । मिसळती रक्तीं ॥ ३ ॥ अन्नरस देहरस । रक्तरेतें बांधे मूस । रसद्वयें सावकास । वाढों लागे ॥ ४ ॥ वाढतां वाढतां वाढलें । कोमळाचें कठीण जालें। पुढें उदक पैसावलें । नाना अवेवीं ॥ ५॥ संपूर्ण होतां बाहेरी पडे । भूमीस पडतां मग तें रडे । अवघ्याचें अवघेंच घडे । ऐसें आहे ॥ ६ ॥ कुडी वाढे कुबुद्धि वाढे । मूळापासून अवघें घडे । अवघेंचि मोडे आणि वाढे । देखतदेखतां ॥ ७ ॥ पुढें अवघियांचें शरीर । दिवसेंदिवस जालें थोर । सुचों लागला विचार । कांहीं कांहीं ॥ ८ ॥ फळामधें बीज आलें । तेणें न्यायें तेथें जालें । ऐकतां देखतां उमजलें । सकळ कांहीं ॥ ९ ॥ बीजें उदकें अंकुरती । उदक नस्तां उडोन जाती । येके ठाईं उदक माती । होतां बरें ॥ १० ॥ दोहिंमधें असतां बीज । भिजोन अंकुर सहज । वाढतां वाढतां पुढें रीझ । उदंड आहे ॥ ११ ॥ इकडे मुळ्या धावा घेती । तिकडे अग्रें हेलावती । मुळें अग्र द्विधा होती । बीजापासून ॥ १२ ॥ मुळ्या चालिल्या पाताळीं । अग्रें धावतीं अंतराळीं । नाना पत्रीं पुष्पीं फळीं । लगडलीं झाडें ॥ १३ ॥ फळावडिल सुमनें । सुमनांवडिल पानें । पानांवडिल अनुसंधानें । काष्ठें आघवीं ॥ १४ ॥ काष्ठांवडिल मुळ्या बारिक। मुळ्यां वडिल तें उदक । उदक आळोन कौतुक । भूमंडळाचें ॥ १५ ॥ याची ऐसी आहे प्रचिती । तेव्हां सकळां वडिल जगती । जगतीवडिल मूर्ती। आपोनारायायेणाची ॥१६ ॥ तयावडिल अग्निदेव । अग्निवडिल वायेदेव । वायेदेवावडिल स्वभाव । अंतरात्म्यांचा ॥ १७ ॥ सकळांवडिल अंतरात्मा। त्यासि नेणे तो दुरात्मा । दुरात्मा म्हणिजे दुरी आत्मा । अंतरला तया ॥ १८ ॥ जवळी असोन चुकलें। प्रत्ययास नाहीं सोकलें । उगेंचि आलें आणी गेलें । देवाचकरितां ॥ १९ ॥ म्हणौन सकळांवडिल देव । त्यासी होतां अनन्यभाव । मग हे प्रकृतीचा स्वभाव । पालटों लागे ॥ २० ॥ करी आपुला व्यासंग। कदापि नव्हे ध्यानभंग । बोलणें चालणें वेंग । पडोंच नेदी ॥ २१ ॥ जें वडिलीं निर्माण केलें । तें पाहिजे पाहिलें । काये काये वडिलीं केलें । कीती पाहावें ॥ २२ ॥ तो वडिल जेथें चेतला । तोचि भाग्यपुरुष जाल । अल्प चेतनें तयाला । अल्पभाग्य ॥ २३ ॥ तया नारायेणाला मनीं । अखंड आठवावें ध्यानीं । मग ते लक्ष्मी तयापासूनी । जाईल कोठें ॥ २४ ॥ नारायेण असे विश्वीं । त्याची पूजा करीत जावी । याकारणें तोषवावी । कोणीतरी काया ॥ २५ ॥ उपासना शोधून पाहिली । तों ते विश्वपाळिती जाली । न कळे लीळा परीक्षिली । न वचे कोणा ॥ २६ ॥ देवाची लीळा देवेंविण । आणीक दुसरा पाहे कोण । पाहणें तितुकें आपण । देवचि असे ॥ २७ ॥ उपासना सकळां ठाईं । आत्माराम कोठें नाहीं । याकारणें ठाइं ठाइं । रामे आटोपिलें॥ २८ ॥ ऐसी माझी उपासना । आणितां नये अनुमाना । नेऊन घाली निरंजना । पैलिकडे ॥ २९ ॥ देवाकरितां कर्में चालती । देवाकरितां उपासक होती । देवाकरितां ज्ञानी असती । कितियेक ॥ ३० ॥ नाना शास्त्रें नाना मतें । देवचि बोलिला समस्तें । नेमकांनेमक वेस्तावेस्तें । कर्मानुसार ॥ ३१ ॥ देवास अवघें लागे करावें । त्यांत घेऊं ये तितुकें घ्यावें । अधिकारासारिखें चालावें । म्हणिजे बरें ॥ ३२ ॥ आवाहन विसर्जन । ऐसेंचि बोलिलें विधान । पूर्वपक्ष जाला येथून । सिद्धांत पुढें ॥ ३३ ॥ वेदांत सिद्धांत धादांत । प्रचित प्रमाण नेमस्त । पंचिकर्ण सांडून हित । वाक्यार्थपाहावा ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पिंडोत्पत्तिनिरूपणणनाम समास नववा ॥
 
 
समास दहावा : सिद्धांतनिरूपण ॥ श्रीराम ॥ गगनीं अवघेंचि होत जातें । गगनाऐसें तगेना तें । निश्चळीं चंचळ नाना तें । येणेंचि न्यायें ॥ १ ॥ अंधार दाटला बळें। वाटे गगन जालें काळें । रविकिर्णें तें पिवळें । सवेंचि वाटे ॥ २ ॥ उदंड हिंव जेव्हां पडिले । गमे गगन थंड जालें। उष्ण झळेनें वाळलें। ऐसें वाटे ॥ ३ ॥ ऐसें जें कांहीं वाटलें । तें तें जालें आणि गेलें । आकाशासारिखें तगलें । हें तों घडेना ॥ ४ ॥ उत्तम जाणिवेचा जिनस । समजोन पाहे सावकास । निराभास तें आकाश । भास मिथ्या ॥ ५ ॥ उदक पसरे वायो पसरे । आत्मा अत्यंतचि पसरे । तत्वें तत्व अवघेंचि पसरे । अंतर्यामीं ॥ ६ ॥ चळतें आणि चळेना तें । अंतरीं अवघेंच कळतें । विवरणेंचि निवळतें । प्राणिमात्रासी ॥ ७ ॥ विवरतां विवरतां शेवटीं । निवृत्तिपदीं अखंड भेटी । जालियानें तुटी । होणार नाहीं ॥ ८ ॥ जेथें ज्ञानाचें होतें विज्ञान । आणि मनाचें होतें उन्मन । तत्वनिर्शनीं अनन्य। विवेकें होतें ॥ ९ ॥ वडिलांस शोधून पाहिलें । तों चंचळाचें निश्चळ जालें । देवभक्तपण गेलें । तये ठाइं ॥ १० ॥ ठाव म्हणतां पदार्थ नाहीं। पदार्थमात्र मुळीं नाहीं । जैसें तैसें बोलों कांहीं । कळावया ॥ ११ ॥ अज्ञानशक्ति निरसली। ज्ञानशक्ति मावळली । वृत्तिशून्यें कैसी जाली । स्थिती पाहा ॥ १२ ॥ मुख्य शक्तिपात तो ऐसा । नाहीं चंचळाचा वळसा । निवांतीं निवांत कैसा । निर्विकारी ॥ १३ ॥ चंचळाचीं विकार बालटें । तें चंचळचि जेथें आटे । चंचळ निश्चळ घनवटे । हें तों घडेना ॥ १४ ॥ माहावाक्याचा विचारु । तेथें संन्याशास अधिकारु। दैवीकृपेची जो नरु । तोहि विवरोन पाहे ॥ १५ ॥ संन्यासी म्हणिजे शडन्यासी । विचारवंत सर्व संन्यासी । आपली करणी आपणासी । निश्चयेंसीं ॥ १६ ॥ जगदीश वोळल्यावरी । तेथें कोण अनुमान करी । आतां असो हें विचारी। विचर जाणती ॥ १७ ॥ जे जे विचारी समजले । ते ते निःसंग होऊन गेले । देहाभिमानी जे उरले। ते देहाभिमान रक्षिती ॥ १८ ॥ लक्षीं बैसले अलक्ष । उडोन गेला पूर्वपक्ष । हेतुरूपें अंतरसाक्ष । तोहि मावळला ॥ १९ ॥ आकाश आणि पाताळ । दोनी नामें अंतराळ । काढितां दृश्याचें चडळ । अखंड जालें ॥ २० ॥ तें तों अखंडचि आहे । मन उपाधी लक्षून पाहे। उपाधिनिरासें साहे । शब्द कैसा ॥ २१ ॥ शब्दपर कल्पनेपर । मन बुद्धि अगोचर । विचारें पाहावा विचार। अंतर्यामीं ॥ २२ ॥ पाहातां पाहातां कळों येतें । कळलें तितुकें वेर्थ जातें । अवघड कैसें बोलावें तें । कोण्या प्रकारें ॥ २३ ॥ वाक्यार्थवाच्यांश शोधिला। अलक्षीं लक्ष्यांश बुडाला । पुढें समजोन बोला । कोणीतरी ॥ २४ ॥ शाश्वतास शोधीत गेला । तेणें ज्ञानी साच जाला । विकार सांडून मिळाला । निर्विकारीं ॥ २५ ॥ दुःस्वप्न उदंड देखिलें । जागें होतां लटिकें जालें । पुन्हां जरी आठवलें । तरी तें मिथ्या ॥ २६ ॥ प्रारब्धयोगें देह असे । असे अथवा नासे । विचार अंतरीं बैसे । चळेना ऐसा ॥ २७ ॥ बीज अग्नीनें भाजलें । त्याचें वाढणें खुंटलें । ज्ञात्यास तैसे जालें । वासनाबीज ॥ २८ ॥ विचारें निश्चळ जाली बुद्धि । बुद्धिपासीं कार्यसिद्धि । पाहातां वडिलांची बुद्धि । निश्चळीं गेलीं ॥ २९ ॥ निश्चळास ध्यातो तो निश्चळ । चंचळास ध्यातो तो चंचळ । भूतास ध्यातो तो केवळ । भूत होये ॥ ३० ॥ जो पावला सेवटवरी । तयास हें कांहींच न करी । अंतरिनिष्ठा बाजीगरी । तैसी माया ॥ ३१ ॥ मिथ्या ऐसें कळों आलें । विचारानें सदृढ जालें । अवघें भयेंचि उडालें । अकस्मात ॥ ३२ ॥ उपासनेचें उत्तिर्ण व्हावें । भक्तजनें वाढवावें । अंतरीं विवेकें उमजावें । सकळ कांहीं ॥ ३३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिद्धांतनिरूपणनाम समास दहावा ॥ ॥ दशक पंधरावा समाप्त ॥

सर्व पहा

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

''जगातील एकमेव १२ मुखी शिवलिंग'' असलेल्या या मंदिरात पांडव आपली शस्त्रे लपवत असत

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Vishnu puja on thursday गुरुवारी विष्णूंच्या या उपायांमुळे नाहीसे होतील कष्ट

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments