Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दासबोध दशक विसावा - पूर्णदशक

Updated: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (17:45 IST)
 
 
समास नववा : स्य्य्क्ष्‌मनिरूपण
 
॥ श्रीराम ॥ मृतिकापूजन करावें । आणी सवेंचि विसर्जावें । हें मानेना स्वभावें । अंतःकर्णासी ॥ १ ॥ देव पूजावा आणी टाकावा । हें प्रशस्त न वटे जीवा । याचा विचार पाहावा । अंतर्यामीं ॥ २ ॥ देव करिजे ऐसा नाहीं । देव टाकिजे ऐसा नाहीं । म्हणोनि याचा कांहीं । विचार पाहावा ॥ ३ ॥ देव नाना शरीरें धरितो । धरुनी मागुती सोडितो । तरी तो देव कैसा आहे तो । विवेकें वोळखावा ॥ ४ ॥ नाना साधनें निरूपणें । देव शोधायाकारणें । सकळ आपुले अंतःकर्णें । समजलें पाहिजे ॥ ५ ॥ ब्रह्मज्ञाचा उपाये । समजल्याविण देतां नये । पदार्थ आहे मा घे जाये । ऐसें म्हणावें ॥ ६ ॥ सगट लोकांचे अंतरींचा भाव । मज प्रतक्ष भेटवावा देव । परंतु विवेकाचा उपाव । वेगळाचि आहे ॥ ७ ॥ विचार पाहातां तगेना । त्यास देव ऐसें म्हणावेना । परंतु जन राहेना । काये करावें ॥ ८ ॥ थोर लोक मरोनि जाती । त्यांच्या सुरता करुनी पाहाती । तैसीच आहे हेहि गती । उपासनेची ॥ ९ ॥ थोर व्यापार ठाकेना जनीं । म्हणोनि केली रखतवानी । राजसंपदा तयाचेनी । प्राप्त कैची ॥ १० ॥ म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव । अज्ञानें तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११ ॥ अज्ञासी ज्ञान न माने । ज्ञात्यास अनुमान न माने । म्हणोनि सिद्धांचिये खुणें । पावलें पाहिजे ॥ १२ ॥ माया सांडून मुळास जावें । तरीच समाधान पावावें । ऐसें न होतां भरंगळावें । भलतीकडे ॥ १३ ॥ माया उलंघायाकारणें । देवासी नाना उपाय करणें । अध्यात्मश्रवणपंथेंचि जाणें । प्रत्ययानें ॥ १४ ॥ ऐसें न करितां लोकिकीं । अवघीच होते चुकामुकी । स्थिति खरी आणि लटकी । ऐसी वोळखावी ॥ १५ ॥ खोट्याचे वाटे जाऊं नये । खोट्याची संगती धरूं नये । खोटें संग्रहीं करूं नये । कांहींयेक ॥ १६ ॥ खोटें तें खोटेंचि खोटें । खर्यासी तगेनात बालटें । मन अधोमुख उफराटें । केलें पाहिजे ॥ १७ ॥ अध्यात्मश्रवण करीत जावें । म्हणिजे सकळ कांहीं फावे । नाना प्रकारीचे गोवे । तुटोनी जाती ॥ १८ ॥ सूत गुंतलें तें उकलावें । तैसे मन उगवावें । मानत मानत घालावें । मुळाकडे ॥ १९ ॥ सकळ कांहीं कालवलें । त्या सकळाचें सकळ जालें । शरीरीं विभागले । सकळ कांहीं ॥ २० ॥ काये तें येथेंचि पाहावें । कैसें तें येथेंचि शोधावें । सूक्ष्माचीं चौदा नांवें । येथेंचि समजावी ॥ २१ ॥ निर्गुण निर्विकारी येक । तें सर्वां ठाईं व्यापक । देह्यामधें तें निष्कळंक । आहे कीं नाहीं ॥ २२ ॥ मूळमाया संकल्परूप । तें अंतःकर्णाचें स्वरूप । जड चेतवी चैतन्यरूप । तें हि शरीरीं आहे ॥ २३ ॥ समानगुण गुणसाम्य । सूक्ष्म विचार तो अगम्य । सूक्ष्म साधु जाणते प्रणम्य । तया समस्तांसी ॥ २४ ॥ द्विधा भासतें शरीर । वामांग दक्षिणांग विचार । तोंचि अर्धनारीनटेश्वर । पिंडीं वोळखावा ॥ २५ ॥ तोचि प्रकृतिपुरुष जाणिजे । शिवशक्ती वोळखिजे । शडगुणईश्वर बोलिजे । तया कर्दमासी ॥ २६ ॥ तयासीच म्हणिजे महत्तत्त्व । जेथें त्रिगुणाचें गूढत्व । अर्धमात्रा शुद्धसत्व । गुणक्षोभिणा ॥ २७ ॥ त्रिगुणें चालतें शरीर । प्रतक्ष दिसतो विचार । मुळींच्या कर्दमाचें शरीर । ऐसें जाणावें ॥ २८ ॥ मन माया आणि जीव । हाहि दिसतो स्वभाव । चौदा नामांचा अभिप्राव । पिंडीं पाहावा ॥ २९ ॥ पिंड पडतां अवघेंचि जातें । परंतु परब्रह्म राहातें । शाश्वत समजोन मग तें । दृढ धरावें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मनिरूपणनाम समास नववा ॥
 
 
समास दहावा : विमलब्रह्मनिरूपण
 
॥ श्रीराम ॥ धरूं जातां धरितां न ये । टाकूं जातां टाकितां न ये । जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ॥ १ ॥ जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख होतें । सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्या। ॥ २ ॥ बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें । आकाश चहुंकडे पाहिलें । तरी सन्मुखचि आहे ॥ ३ ॥ जिकडेतिकडे प्राणी पळोन जातें । तिकडे आकाशचि भोवतें । बळें आकाशाबाहेर । कैसें जावें ॥ ४ ॥ जिकडेतिकडे प्राणी पाहे । तिकडे तें सन्मुखचि आहे । समस्तांचें मस्तकीं राहे । माध्यानीं मार्तंड जैसा ॥ ५ ॥ परी तो आहे येकदेसी । दृष्टांत न घडे वस्तुसी । कांहीं येक चमत्कारासी । देउनी पाहिलें ॥ ६ ॥ नाना तीर्थें नाना देसीं । कष्टत जावें पाहाव्यासी । तैसें न लगे परब्रह्मासी । बैसलें ठाईं ॥ ७ ॥ प्राणी बैसोनीच राहातां । अथवा बहुत पळोन जातां । परब्रह्म तें तत्वतां । समागमें ॥ ८ ॥ पक्षी अंतराळीं गेलां । भोवतें आकाशचि तयाला । तैसे ब्रह्म प्राणीयाला । व्यापून आहे ॥ ९ ॥ परब्रह्म पोकळ घनदाट । ब्रह्म सेवटाचा सेवट । ज्यासी त्यासी ब्रह्म नीट । सर्वकाळ ॥ १० ॥ दृश्या सबाहे अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं । आरे त्या विमळाची सरी । कोणास द्यावी ॥ ११ ॥ वैकुंठकैळासस्वर्गलोकीं । इंद्रलोकीं चौदा लोकीं । पन्नगादिकपाताळलोकीं । तेथेंचि आहे ॥ १२ ॥ कासीपासून रामेश्वर । आवघें दाटलें अपार । परता परता पारावार । त्यास नाहीं ॥ १३ ॥ परब्रह्म तें येकलें । येकदांचि सकळांसी व्यापिले । सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठाईं ॥ १४ ॥ परब्रह्म पाउसें भिजेना । अथवा चिखलानें भरेना । पुरामधें परी वाहेना । पुरासमागमें ॥ १५ ॥ येकसरें सन्मुक विमुख । वाम सव्य दोहिंकडे येक । आर्धऊर्ध प्राणी सकळीक । व्यापून आहे ॥ १६ ॥ आकाशाचा डोहो भरला । कदापी नाहीं उचंबळला । असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे ॥ १७ ॥ येकजिनसि गगन उदास । जेथें नाहीं दृश्यभास । भासेंविण निराभास । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥ संतसाधुमहानुभावां । देवदानवमानवां । ब्रह्म सकळांसी विसांवा । विश्रांतिठाव ॥ १९ ॥ कोणेकडे सेवटा जावें । कोणेकडे काये पाहावें । असंभाव्य तें नेमावें । काये म्हणोनी ॥ २० ॥ स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं येकासारिखें नव्हे । ज्ञानदृष्टीविण नव्हे समधान ॥ २१ ॥ पिंडब्रह्मांडनिरास । मग तें ब्रह्म निराभास । येथून तेथवरी अवकास । भकासरूप ॥ २२ ॥ ब्रह्म व्यापक हें तो खरें । दृश्य आहे तों हें उत्तरें । व्यापेंविण कोण्या प्रकारें । व्यापक म्हणावें ॥ २३ ॥ ब्रह्मासी शब्दचि लागेना । कल्पना कल्पूं शकेना । कल्पनेतीत निरंजना । विवेकें वोळखावें ॥ २४ ॥ शुद्ध सार श्रवण । शुद्ध प्रत्ययाचें मनन । विज्ञानी पावतां उन्मन । सहजचि होतें ॥ २५ ॥ जालें साधनाचें फळ । संसार जाला सफळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं बिंबलें ॥ २६ ॥ हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा । साध्य होतां साधनाचा । ठाव नाहीं ॥ २७ ॥ स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें । सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये ॥ २८ ॥ ऐसें हें विवेकें जाणावें । प्रत्ययें खुणेंसी बाणावें । जन्ममृत्याच्या नांवें । सुन्याकार ॥ २९ ॥ भक्तांचेनि साभिमानें । कृपा केली दाशरथीनें । समर्थकृपेचीं वचनें । तो हा दासबोध ॥ ३० ॥ वीस दशक दासबोध । श्रवणद्वारें घेतां शोध । मनकर्त्यास विशद । परमार्थ होतो ॥ ३१ ॥ वीस दशक दोनीसें समास । साधकें पाहावें सावकास । विवरतं विशेषाविशेष । कळों लागे ॥ ३२ ॥ ग्रंथाचें करावेंस्तवन । स्तवनाचें काये प्रयोजन । येथें प्रत्ययास कारण । प्रत्ययो पाहावा ॥ ३३ ॥ देहे तंव पांचा भूतांचा । कर्ता आत्मा तेथींचा । आणी कवित्वप्रकार मनुशाचा । काशावरुनी ॥ ३४ ॥ सकळ करणें जगदीशाचें । आणी कवित्वचि काय मानुशाचें । ऐशा अप्रमाण बोलण्याचें काये घावें ॥ ३५ ॥ सकळ देह्याचा झाडा केला । तत्वसमुदाव उडाला । तेथें कोण्या पदार्थाला । आपुलें म्हणावें ॥ ३६ ॥ ऐसीं हें विचाराचीं कामें । उगेंच भ्रमों नये भ्रमें । जगदेश्वरें अनुक्रमें । सकळ केलें ॥ ३७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विमळब्रह्मनिरूपणनाम समास दहावा ॥ ॥ दशक विसावा समाप्त ॥

सर्व पहा

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

''जगातील एकमेव १२ मुखी शिवलिंग'' असलेल्या या मंदिरात पांडव आपली शस्त्रे लपवत असत

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Vishnu puja on thursday गुरुवारी विष्णूंच्या या उपायांमुळे नाहीसे होतील कष्ट

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख