रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दासनवमी
Written By

दासबोध दशक सोळावा - सप्ततिन्वयाचा

Dasbodh Dashak 16 Marathi
दशक सोळावा : सप्ततिन्वय समास पहिला : वाल्मीकि स्तवननिरूपण
 
॥ श्रीरामसमर्थ ॥ धन्य धन्य तो वाल्मीक । ऋषीमाजी पुण्यश्लोक । जयाचेन हा त्रिलोक्य । पावनजाला ॥ १ ॥ भविष्य आणी शतकोटी । हें तों नाहीं देखिलें दृष्टीं । धांडोळितां सकळ सृष्टि । श्रुत नव्हे ॥ २ ॥ भविष्याचें येक वचन । कदाचित जालें प्रमाण । तरी आश्चिर्य मानिती जन । भूमंडळीचे ॥ ३ ॥ नसतां रघुनाथावतार । नाहीं पाहिला शास्त्राधार । रामकथेचा विस्तार । विस्तारिला जेणें ॥ ४ ॥ ऐसा जयाचा वाग्विळास । ऐकोनी संतोषला महेश । मग विभागिलें त्रयलोक्यास । शतकोटी रामायेण ॥ ५ ॥ ज्याचें कवित्व शंकरें पाहिलें । इतरां न वचे अनुमानलें । रामौपासकांसी जालें । परम समाधान ॥ ६ ॥ ऋषी होते थोर थोर । बहुतीं केला कवित्वविचार । परी वाल्मीकासारिखा कवेश्वर । न भूतो न भविष्यति ॥ ७ ॥ पूर्वीं केली दृष्ट कर्में । परी पावन जाला रामनामें । नाम जपतां दृढ नेमें । पुण्यें सीमा सांडिली ॥ ८ ॥ उफराटे नाम म्हणतां वाचें । पर्वत फुटले पापाचे । ध्वज उभारले पुण्याचे । ब्रह्मांडावरुते ॥ ९ ॥ वाल्मीकें जेथें तप केलें । तें वन पुण्यपावन जालें । शुष्क काष्ठीं अंकुर फुटले । तपोबळें जयाच्या ॥ १० ॥ पूर्वी होता वाल्हाकोळी । जीवघातकी भूमंडळीं । तोचि वंदिजे सकळीं । विबुधीं आणि ऋषेश्वरीं ॥ ११ ॥ उपरती आणि अनुताप । तेथें कैंचें उरेल पाप । देह्यांततपें पुण्यरूप । दुसरा जन्म जाला ॥ १२ ॥ अनुतापें आसन घातलें । देह्यांचें वारुळ जालें । तेंचि नाम पुढें पडिलें । वाल्मीक ऐसें ॥ १३ ॥ वारुळास वाल्मीक बोलिजे । म्हणोनि वाल्मीक नाम साजे । जयाच्या तीव्र तपें झिजे । हृदय तापसाचें ॥ १४ ॥ जो तापसांमाजीं श्रेष्ठ । जो कवेश्वरांमधें वरिष्ठ । जयाचें बोलणें पष्ट । निश्चयाचें ॥ १५ ॥ जो निष्ठावंतांचें मंडण । रघुनाथभक्तांचें भूषण । ज्याची धारणा असाधारण । साधकां सदृढ करी ॥ १६ ॥ धन्य वाल्मीक ऋषेश्वर । समर्थाचा कवेश्वर । तयासी माझा नमस्कार । साष्टांगभावें ॥ १७ ॥ वाल्मीक ऋषी बोलिला नसता । तरी आम्हांसी कैंची रामकथा । म्हणोनियां समर्था । काय म्हणोनी वर्णावें ॥ १८ ॥ रघुनथकीर्ति प्रगट केली । तेणें तयची महिमा वाढली । भक्त मंडळी सुखी जाली । श्रवणमात्रें ॥ १९ ॥ आपुला काळ सार्थक केला । रघुनाथकीर्तिमधें बुडाला । भूमंडळीं उधरिला । बहुत लोक ॥ २० ॥ रघुनाथ भक्त थोर थोर । महिमा जयांचा अपार । त्या समस्तांचा किंकर । रामदास म्हणे ॥ २१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वाल्मीकस्तवननिरूपणनाम समास पहिला ॥
 
 
समास दुसरा : सूर्यस्तवननिरूपण
 
॥ श्रीरामसमर्थ ॥ धन्य धन्य हा सूर्यवौंश । सकळ वौंशामधें विशेष । मार्तंडमंडळाचा प्रकाश । फांकला भूमंडळीं ॥ १ ॥ सोमाआंगीं आहे लांछन । पक्षा येका होय क्षीण । रविकिर्ण फांकता आपण । कळाहीन होये ॥ २ ॥ याकारणें सूर्यापुढें । दुसरी साम्यता न घडे । जयाच्या प्रकाशें उजेडे । प्राणीमात्रासी ॥ ३ ॥ नाना धर्म नाना कर्में । उत्तमें मध्यमें अधमें । सुगमें दुर्गमें नित्य नेमें । सृष्टीमधें चालती ॥ ४ ॥ वेदशास्त्रें आणी पुराणें । मंत्र यंत्र नाना साधनें । संध्या स्नान पूजाविधानें । सूर्येंविण बापुडीं ॥ ५ ॥ नाना योग ना मतें । पाहों जातां असंख्यातें । जाती आपुलाल्या पंथें । सूर्यौदय जालियां ॥ ६ ॥ प्रपंचिक अथवा परमार्थिक । कार्य करणें कोणीयेक । दिवसेंविण निरार्थक । सार्थक नव्हे ॥ ७ ॥ सूर्याचें अधिष्ठान डोळे । डोळे नसतां सर्व आंधळे । याकारणें कांहींच न चले । सूर्येंविण ॥ ८ ॥ म्हणाल अंध कवित्वें करिती । तरी हेहि सुर्याचीच गती । थंड जालियां आपुली मती । मग मतिप्रकाश कैंचा ॥ ९ ॥ उष्ण प्रकाश तो सूर्याचा । शीत प्रकाश तो चंद्राचा । उष्णत्व नस्तां देह्याचा । घात होये ॥ १० ॥ याकारणें सूर्येंविण । सहसा न चले कारण । श्रोते तुम्ही विचक्षण । शोधून पाहा ॥ ११ ॥ हरिहरांच्या अवतरमूर्ती । शिवशक्तीच्या अनंत वेक्ती । यापूर्वीं होता गभस्ती । आतां हि आहे ॥ १२ ॥ जितुके संसारासि आले । तितुके सूर्याखालें वर्तले । अंती देहे त्यागून गेले । प्रभाकरादेखतां ॥ १३ ॥ चंद्र ऐलीकडे जाला । क्षीरसागरीं मधून काढिला । चौदा रत्नांमधें आला । बंधु लक्षुमीचा ॥ १४ ॥ विश्वचक्षु हा भास्कर । ऐसें जाणती लाहानथोर । याकारणें दिवाकर । श्रेष्ठांहून श्रेष्ठ ॥ १५ ॥ अपार नभमार्ग क्रमणें । ऐसेंचि प्रत्यहीं येणें जाणें । या लोकोपकाराकारणें । आज्ञा समर्थाची ॥ १६ ॥ दिवस नस्तां अंधकार । सर्वांसी नकळे सारासार । दिवसेंविण तश्कर । कां दिवाभीत पक्षी ॥ १७ ॥ सूर्यापुढें आणिक दुसरें । कोण आणावें सामोरें । तेजोरासी निर्धारें । उपमेरहित ॥ १८ ॥ ऐसा हा सविता सकळांचा । पूर्वज होय रघुनाथाचा । अगाध महिमा मानवी वाचा । काये म्हणोनि वर्णावी ॥ १९ ॥ रघुनाथवौंश पूर्वापर । येकाहूनि येक थोर । मज मतिमंदास हा विचार । काये कळे ॥ २० ॥ रघुनाथाचा समुदाव । तेथें गुंतला अंतर्भाव । म्हणोनी वर्णितां महत्व । वाग्दुर्बळ मी ॥ २१ ॥ सकळ दोषाचा परिहार । करितां सूर्यास नमस्कार । स्फूर्ति वाढे निरंतर । सूर्यदर्शन घेतां ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूर्यस्तवननिरूपणनाम समास दुसरा ॥
 
 
समास तिसरा : पृथ्वीस्तवननिरूपण
 
॥ श्रीरामसमर्थ ॥ धन्य धन्य हे वसुमती । इचा महिमा सांगों किती । प्राणीमात्र तितुके राहाती । तिच्या आधारें ॥ १ ॥ अंतरिक्ष राहाती जीव । तोहि पृथ्वीचा स्वभाव । देहे जड नस्तां जीव । कैसे तगती ॥ २ ॥ जाळिती पोळिती कुदळिती । नांगरिती उकरिती खाणती । मळ मूत्र तिजवरी करिती । आणी वमन ॥ ३ ॥ नासकें कुजकें जर्जर । पृथ्वीविण कैंची थार । देह्यांतकाळीं शरीर । तिजवरी पडे ॥ ४ ॥ बरें वाईट सकळ कांहीं । पृथ्वीविण थार नाहीं । नाना धातु द्रव्य तें हि । भूमीचे पोटीं ॥ ५ ॥ येकास येक संव्हारिती । प्राणी भूमीवरी असती । भूमी सांडून जाती । कोणीकडे ॥ ६ ॥ गड कोठ पुरें पट्टणें । नाना देश कळती अटणें । देव दानव मानव राहाणें । पृथ्वीवरी ॥ ७ ॥ नाना रत्नें हिरे परीस । नाना धातु द्रव्यांश । गुप्त प्रगट कराव्यास । पृथ्वीविण नाहीं ॥ ८ ॥ मेरुमांदार हिमाचळ । नाना अष्टकुळाचळ । नाना पक्षी मछ व्याळ । भूमंडळीं ॥ ९ ॥ नाना समुद्रापैलीकडे । भोंवतें आवर्णोदका कडें । असंभाव्य तुटले कडे । भूमंडळाचे ॥ १० ॥ त्यामधें गुप्त विवरें । लाहानथोरें अपारें । तेथें निबिड अंधकारें । वस्ती कीजे ॥ ११ ॥ आवर्णोदक तें अपार । त्याचा कोण जाणे पार । उदंड दाटले जळचर । असंभाव्य मोठे ॥ १२ ॥ त्या जीवनास आधार पवन । निबिड दाट आणी घन । फुटों शकेना जीवन । कोणेकडे ॥ १३ ॥ त्या प्रभंजनासी आधार । कठिणपणें अहंकार । ऐसा त्या भूगोळाचा पार । कोण जाणे ॥ १४॥ नाना पदार्थांच्या खाणी । धातुरत्नांच्या दाटणी । कल्पतरु चिंतामणी । अमृतकुंडें ॥ १५ ॥ नाना दीपें नाना खंडें । वसती उद्वसें उदंडें । तेथें नाना जीवनाचीं बंडें । वेगळालीं ॥ १६ ॥ मेरुभोंवते कडे कापले । असंभाव्य कडोसें पडिलें । निबिड तरु लागले । नाना जिनसी ॥ १७ ॥ त्यासन्निध लोकालोक । जेथें सूर्याचें फिरे चाक । चंद्रादि द्रोणाद्रि मैनाक । माहां गिरी ॥ १८ ॥ नाना देशीं पाषाणभेद । नाना जिनसी मृत्तिकाभेद । नाना विभूति छंद बंद । नाना खाणी ॥ १९ ॥ बहुरत्न हे वसुंदरा । ऐसा पदार्थ कैचा दुसरा । अफट पडिलें सैरावैरा । जिकडे तिकडे ॥ २० ॥ अवघी पृथ्वी फिरोन पाहे । ऐसा प्राणी कोण आहे । दुजी तुळणा न साहे । धरणीविषीं ॥२१ ॥ नाना वल्ली नाना पिकें । देसोदेसी अनेकें । पाहों जातां सारिख्या सारिखें । येक हि नाहीं ॥ २२ ॥ स्वर्ग मृत्यु आणिपाताळें । अपूर्व रचिलीं तीन ताळें। पाताळलोकीं माहां व्याळें । वस्ती कीजे ॥ २३ ॥ नान वल्ली बीजांची खाणी । ते हे विशाळ धरणी । अभिनव कर्त्याची करणी । होऊन गेली ॥ २४ ॥ गड कोठ नाना नगरें । पुरें पट्टणें मनोहरें । सकळां ठाईं जगदेश्वरें । वस्ती कीजे ॥ २५ ॥ माहां बळी होऊन गेले । पृथ्वीवरी चौताळले । सामर्थ्यें निराळे राहिले । हें तों घडेना ॥ २६ ॥ असंभाव्य हे जगती। जीव कितीयेक जाती । नाना अवतारपंगती । भूमंडळावरी ॥ २७ ॥ सध्यां रोकडे प्रमाण । कांहीं करावा नलगे अनुमान । नाना प्रकारीचें जीवन । पृथ्वीचेनि आधारें ॥ २८ ॥ कित्तेक भूमी माझी म्हणती । सेवटीं आपणचि मरोन जाती । कित्तेक काळ होतां जगती । जैसी तैसी ॥ २९ ॥ ऐसा पृथ्वीचा महिमा । दुसरी काये द्यावी उपमा । ब्रह्मादिकापासुनी आम्हां । आश्रयोचि आहे ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पृथ्वीस्तवननिरूपणनाम समास तिसरा ॥
 
 
समास चौथा : आपनिरूपण
 
॥ श्रीरामसमर्थ ॥ आतां सकळांचे ज्नमस्थान । सकळ जीवांचे जीवन । जयास आपोनारायेण । ऐसें बोलिजे ॥ १ ॥ पृथ्वीस आधार आवर्णोदक । सप्तसिंधूचें सिंधोदक । नाना मेघीचें मेघोदक । भूमंडळीं चालिलें ॥ २ ॥ नाना नद्या नाना देसीं । वाहात मिळाल्या सागरासी । लाहानथोर पुण्यरासी । अगाध महिमे ॥ ३ ॥ नद्या पर्वतींहून कोंसळल्या । नाना सांकडीमधें रिचविल्या । धबाबां खळाळां चालिल्या । असंभाव्य ॥ ४ ॥ कूप बावी सरोवरें । उदंड तळीं थोरथोरें । निर्मळें उचंबळती नीरें । नाना देसीं ॥ ५ ॥ गायेमुखें पाट जाती । नाना कालवे वाहती । नाना झर्या झिरपती । झरती नीरें ॥ ६ ॥ डुरें विहीरें पाझर । पर्वत फुटोन वाहे नीर । ऐसे उदकाचे प्रकर । भूमंडळीं ॥ ७ ॥ जितुके गिरी तितुक्या धारा । कोंसळती भयंकरा । पाभळ वाहाळा अपारा । उकळ्या सांडिती ॥ ८ ॥ भूमंडळीचें जळ आघवें। किती म्हणोनी सांगावें । नाना कारंजीं आणावें । बांधोनी पाणी ॥ ९ ॥ डोहो डवंके खबाडीं टांकीं । नाना गिरिकंदरीं अनेकीं । नाना जळें नाना लोकीं । वेगळालीं ॥ १० ॥ तीर्थें येकाहून येक । माहां पवित्र पुण्यदायक । अगाध महिमा शास्त्रकारक । बोलोनि गेले ॥ ११ ॥ नाना तीर्थांची पुण्योदकें । नाना स्थळोस्थळीं सीतळोदकें । तैसींच नाना उष्णोदकें । ठाईं ठाईं ॥ १२ ॥ नाना वल्लीमधें जीवन । नाना फळीं फुलीं जीवन । नाना कंदीं मुळीं जीवन । गुणकारकें ॥ १३ ॥ क्षीरोदकें सिंधोदकें । विषोदकें पीयूषोदकें । नाना स्थळांतरीं उदकें । नाना गुणाचीं ॥ १४ ॥ नाना युक्षदंडाचे रस । नाना फळांचे नाना रस । नाना प्रकारीचे गोरस। मद पारा गुळत्र ॥ १५ ॥ नाना मुक्तफळांचें पाणी । नाना रत्नी तळपें पाणी । नाना शस्त्रामधें पाणी । नाना गुणाचें ॥ १६ ॥ शुक्लीत श्रोणीत लाळ मूत्र स्वेद । नाना उदकाचे नाना भेद । विवरोन पाहातां विशद । होत जातें ॥ १७ ॥ उदकाचे देह केवळ । उदकाचेंचि भूमंडळ । चंद्रमंडळ सूर्यमंडळ । उदकाकरितां ॥ १८ ॥ क्षारसिंधु क्षीरसिंधु । सुरासिंधु आज्यसिंधु । दधिसिंधु युक्षरससिंधु । शुद्ध सिंधु उदकाचा ॥ १९ ॥ ऐसें उदक विस्तारलें । मुळापासून सेवटा आलें । मधेहि ठाईं ठाईं उमटलें । ठाईं ठाईं गुप्त ॥ २० ॥ जे जे बीजीं मिश्रीत जालें । तो तो स्वाद घेऊन उठिलें । उसामधें गोडीस आलें । परम सुंदर ॥ २१ ॥ उदकाचें बांधा हें शरीर । उदक चि पाहिजे तदनंतर । उदकचि उत्पत्तिविस्तार । किती म्हणोनी सांगावा ॥ २२ ॥ उदक तारक उदक मारक । उदक नाना सौख्यदायेक । पाहातं उदकाचा विवेक । अलोलिक आहे ॥ २३ ॥ भूमंडळीं धांवे नीर । नाना ध्वनी त्या सुंदर । धबाबां धबाबां थोर । रिचवती धारा ॥ २४ ॥ ठाईं ठाईं डोहो तुंबती । विशाळ तळीं डबाबिती । चबाबिती थबाबिती । कालवे पाट ॥ २५ ॥ येकी पालथ्या गंगा वाहाती । उदकें सन्निधचि असती । खळाळां झरे वाहाती । भूमीचे पोटीं ॥ २६ ॥ भूगर्भीं डोहो भरलें । कोण्ही देखिले ना ऐकिले । ठाईं ठाईं झोवीरे जाले । विदुल्यतांचे ॥ २७ ॥ पृथ्वीतळीं पाणी भरलें । पृथ्वीमधें पाणी खेळे । पृथ्वी प्रग्टलें । उदंड पाणी ॥ २८ ॥ स्वर्गमृत्यपाताळीं । येक नदी तीन ताळीं । मेघोदक अंतराळीं । वृष्टी करी ॥ २९ ॥ पृथ्वीचें मूळ जीवन । जीवनाचें मूळ दहन । दहनाचें मूळ पवन । थोराहून थोर ॥ ३० ॥ त्याहून थोर परमेश्वर । महद्भूतांचा विचार । त्याहून थोर परात्पर । परब्रह्म जाणावें ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आपनिरूपणनाम समास चौथा ॥
 
 
समास पांचवा : अग्निनिरूपण
 
॥ श्रीरामसमर्थ ॥ धन्य धन्य हा वैश्वानरु । होये रघुनाथाचा श्वशुरु । विश्वव्यापक विश्वंभरु । पिता जानकीचा ॥ १ ॥ ज्याच्या मुखें भगवंत भोक्ता । जो ऋषीचा फळदाता । तमहिमरोगहर्ता । भर्ता विश्वजनाचा ॥ २ ॥ नाना वर्ण नाना भेद । जीवमात्रास अभेद । अभेद आणी परम शुध । ब्रम्हादिकासी ॥ ३ ॥ अग्नीकरितां सृष्टी चाले । अग्नीकरितां लोक धाले । अग्नीकरितां सकळ ज्याले । लाहानथोर ॥ ४ ॥ अग्नीनें आळलें भूमंडळ । लोकांस राहव्या जालें स्थळ । दीप दीपिका नाना ज्वाळ । जेथें तेथें ॥ ५ ॥ पोटामधें जठराग्नी । तेणें क्षुधा लागे जनीं । अग्नीकरितां भोजनीं । रुची येते ॥ ६ ॥ अग्नी सर्वांगीं व्यापक । उष्णें राहे कूणी येक । उष्ण नस्तां सकळ लोक । मरोन जाती ॥ ७ ॥ आधीं अग्नी मंद होतो । पुढें प्राणी तो नासतो । ऐसा हा अनुभव येतो । प्राणीमात्रासी ॥ ८ ॥ असतां अग्नीचें बळ । शत्रु जिंके तात्काळ । अग्नी आहे तावत्काळ । जिणें आहे ॥ ९ ॥ नाना रस निर्माण जाले । अग्नीकरितां निपजले । माहांरोगी आरोग्य जाले । निमिषमात्रें ॥ १० ॥ सूर्य सकळांहून विशेष । सूर्याउपरी अग्नीप्रवेश । रात्रभागीं लोक अग्नीस । साहें करिती ॥ ११ ॥ अंत्यजगृहींचा अग्नी आणिला । त्यास दोष नाहीं बोलिला । सकळां गृहीं पवित्र जाला । वैश्वानरु ॥ १२ ॥ अग्नीहोत्र नाना याग । अग्नीकरितां होती सांग । अग्नी त्रुप्त होतां मग । सुप्रसन्न होतो ॥ १३ ॥ देव दानव मानव । अग्नीकरितां चाले सर्व । सकळ जनासी उपाव । अग्नी आहे ॥ १४ ॥ लग्नें करिती थोर थोर । नाना दारूचा प्रकार । भूमंडळीं यात्रा थोर । दारूनें शोभती ॥ १५ ॥ नाना लोक रोगी होती । उष्ण औशधें सेविती । तेणे लोक आरोग्य होती । वन्हीकरितां ॥ १६ ॥ ब्रह्मणास तनुमनु । सूर्यदेव हुताशनु । येतद्विषईं अनुमानु । कांहींच नाहीं ॥ १७ ॥ लोकामध्यें जठरानळु । सागरीं आहे वडवनाळु । भूगोळाबाहेर आवर्णानळु । शिवनेत्रीं विदुल्यता ॥ १८ ॥ कुपीपासून अग्नी होतो । उंचदर्पणीं अग्नी निघतो । काष्ठमंथनी प्रगटतो । चकमकेनें ॥ १९ ॥ अग्नी सकळां ठाईं आहे । कठीण घिसणीं प्रगट होये । आग्यासर्पें दग्ध होये । गिरिकंदरें ॥ २० ॥ अग्नीकरितां नाना उपाये । अग्नीकरितां नाना अपाय । विवेकेंविण सकल होये । निरार्थक ॥ २१ ॥ भूमंडळीं लाहानथोर । सकळांस वन्हीचा आधार । अग्निमुखें परमेश्वर । संतुष्ट होये ॥ २२ ॥ ऐसा अग्नीचा महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा । उत्तरोत्तर अगाध महिमा । अग्नीपुरुषाचा ॥ २३ ॥ जीत असतां सुखी करी । मेल्यां प्रेत भस्म करी । सर्वभक्षकु त्याची थोरी । काये म्हणोनी सांगावी ॥ २४ ॥ सकळ सृष्टीचा संव्हार । प्रळय करी वैश्वानर । वैश्वानरें पदार्थमात्र । कांहींच उरेना ॥ २५ ॥ नाना होम उदंड करिती । घरोघरीं वैशदेव चालती । नाना क्षेत्रीं दीप जळती । देवापासीं ॥ २६ ॥ दीपाराधनें निलांजनें । देव वोवाळिजे जनें । खरें खोटें निवडणें । दिव्य होतां ॥ २७ ॥ अष्टधा प्रकुर्ती लोक तिन्ही । सकळ व्यापून राहिला वन्ही । अगाध महिमा वदनीं । किती म्हणोनी बोलावा ॥ २८ ॥ च्यारी श्रृंगें त्रिपदीं जात । दोनी शिरें सप्त हात । ऐसा बोलिला शास्त्रार्थ । प्रचितीविण ॥ २९ ॥ ऐसा वन्ही उष्णमूर्ती । तो मी बोलिलों येथामती । न्यून्यपूर्ण क्षमा श्रोतीं । केलें पाहिजे ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अग्निनिरूपणनाम समास पांचवा ॥

समास सहावा : वायुस्तवन
 
॥ श्रीरामसमर्थ ॥ धन्य धन्य हा वायुदेव । याचा विचित्र स्वभाव । वायोकरितां सकळ जीव । वर्तती जनीं ॥ १ ॥ वायोकरितां श्वासोश्वास । नाना विद्यांचा अभ्यास । वायोकरितां शरीरास । चळण घडे ॥ २ ॥ चळण वळण प्रासारण । निरोधन आणी आकोचन । प्राण अपान व्यान उदान । समान वायु ॥ ३ ॥ नाग कूर्म कर्कश वायो । देवदत्त धनंजयो। ऐसे हे वायोचे स्वभावो । उदंड असती ॥ ४ ॥ वायो ब्रह्मांडीं प्रगटला । ब्रह्मांडदेवतांस पुरवला । तेथुनी पिंडी प्रगटला । नाना गुणें ॥ ५ ॥ स्वर्गलोकीं सकळ देव । तैसेचि पुरुषार्थी दानव । मृत्यलोकींचे मानव । विख्यात राजे ॥ ६ ॥ नरदेहीं नाना भेदे । अनंत भेदाचीं श्वापदें । वनचरें जळचरें आनंदें । क्रीडा करिती॥ ७॥ त्या समस्तांमधें वायु खेळे । खेचरकुळ अवघें चळे । उठती वन्हीचे उबाळे । वायोकरितां ॥ ८॥ वायो मेघाचें भरण भरी। सवेंच पिटून परतें सारी । वायो ऐसा कारबरी । दुसरा नाहीं ॥ ९ ॥ परी ते आत्मयाची सत्ता । वर्ते शरीरीं तत्वता । परी व्यापकपणें या समर्था । तुळणा नाहीं ॥ १० ॥ गिरीहून दाट फौजा । मेघ उठिले लोककाजा । गर्जगर्जों तडक विजा । वायोबळें ॥ ११ ॥ चंद्रसूर्य नक्षत्रमाळा । ग्रहमंडळें मेघमाळा । यें ब्रह्मांडीं नाना कळा । वायोकरितां ॥ १२ ॥ येकवटलें तें निवडेना । कालवलें तें वेगळें होयेना । तैसें हे बेंचाड नाना । केवी कळे ॥ १३ ॥ वायो सुटे सरारां । असंभाव्य पडतीगारा । तैसे जीव हे नीरा- । सरिसे पडती ॥ १४ ॥ वायुरूपें कमळकळा । तोचि आधार जळा । तया जळाच्या आधारें भूगोळा । शेषें धरिलें ॥१५ ॥ शेषास पवनाचा आहार । आहारें फुगे शरीर । तरी मग घेतला भार । भूमंडळाचा ॥१६॥ माहांकूर्माचें शरीर भलें । नेणों ब्रह्मांड पालथें घातलें । येवढें शरीर तें राहिलें । वायोचेनी ॥ १७॥ वाराहें आपुलें दंतीं । पृथ्वी धरिली होती । तयाची येवढी शक्ती । वायुबळें ॥ १८ ॥ ब्रह्म विष्णु महेश्वर । चौथा आपण जगदेश्वर । वायोस्वरूप विचार । विवेकी जाणती ॥ १९ ॥ तेतिस कोटी सुरवर । अठ्यासी सहस्र ऋषेश्वर । सिध योगी भारेंभार । वायोकरितां ॥ २० ॥ नव कोटी कात्यायणी । छेपन कोटी च्यामुंडिणी । औट कोटी भूतखाणी । वायोरूपें ॥ २१॥ भूतें देवतें नाना शक्ती । वायोरूप त्यांच्या वेक्ती । नाना जीव नेणो किती । भूमंडळीं ॥ २२ ॥ पिंडीं ब्रह्मांडीं पुरवला । बाहेर कंचुकास गेला । सकळां ठाईं पुरवला । समर्थ वायु ॥ २३ ॥ ऐसा हा समर्थ पवन । हनुमंत जयाचा नंदन । रघुनाथस्मरणीं तनमन । हनुमंताचें ॥ २४ ॥ हनुमंत वायोचा प्रसीध । पित्यापुत्रांस नाहीं भेद । म्हणोनि दोघेहि अभेद । पुरुषार्थविषीं ॥ २५ ॥ हनुमंतास बोलिजे प्राणनाथ । येणें गुणें हा समर्थ । प्राणेंविण सकळ वेर्थ । होत जातें ॥ २६ ॥ मागें मृत्य आला हनुमंता । तेव्हां वायो रोधला होता । सकळ देवांस आवस्ता । प्राणांत मांडलें ॥ २७ ॥ देव सकळ मिळोन । केलें वायुचें स्तवन । वायो प्रसन्न होऊन । मोकळें केलें ॥ २८ ॥ म्हणोनि प्रतपी थोर । हनुमंत ईश्वरी अवतार । यचा पुरुषार्थ सुरवर । पाहातचि राहिले ॥ २९ ॥ देव कारागृहीं होते । हनुमंतें देखिलें अवचितें । संव्हार करूनी लंकेभोंवतें । विटंबून पाडिलें ॥ ३० ॥ उसिणें घेतलें देवांचें । मूळ शोधिलें राक्षसांचें । मोठें कौतुक पुछ्यकेताचें । आश्चर्य वाटे ॥ ३१ ॥ रावण होता सिंह्यासनावरी । तेथें जाऊन ठोंसरे मारी । लंकेमधें निरोध करी । उदक कैचें ॥ ३२ ॥ देवास आधार वाटला । मोठा पुरुषार्थ देखिला । मनामधें रघुनाथाला । करुणा करिती ॥ ३३ ॥ दैत्य आवघे संव्हारिले । देव तत्काळ सोडिले । प्राणीमात्र सुखी जाले । त्रयलोक्यवासी ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वायोस्तवननिरूपणनाम समास सहावा ॥
 
 
समास सातवा : महद्भूतनिरूपण
 
॥ श्रीरामसमर्थ ॥ पृथ्वीचें मूळ जीवन । जीवनाचें मूळ अग्न । अग्नीचें मूळ पवन । मागां निरोपिलें ॥ १ ॥ आतां ऐका पवनाचें मूळ । तो हा अंतरात्माचि केवळ । अत्यंतचि चंचळ । सकळांमधें ॥ २ ॥ तो येतो जातो दिसेना । स्थिर होऊन बैसेना । ज्याचें रूप अनुमानेना । वेदश्रुतीसी ॥ ३ ॥ मुळीं मुळींचें स्फुर्ण । तेंचि अंतरात्म्याचें लक्षण । जगदेश्वरापासून त्रिगुण । पुढें जालें ॥ ४ ॥ त्रिगुणापासून जालीं भूतें। पावलीं पष्ट दशेतें । त्या भूतांचें स्वरूप तें । विवेकें वोळखावें ॥ ५ ॥ त्यामधें मुख्य आकाश । चौ भूतांमधें विशेष । याच्या प्रकाशें प्रकाश । सकळ कांहीं ॥ ६ ॥ येक विष्णु महद्भूत । ऐसा भूतांचा संकेत । परंतु याची प्रचीत । पाहिली पाहिजे ॥ ७ ॥ विस्तारें बोलिलीं भूतें । त्या भूतामधें व्यापक तें । विवरोन पाहातां येतें । प्रत्ययासी ॥ ८ ॥ आत्मयाच्या चपळपणापुढें । वायो तें किती बापुडें । आत्म्याचें चपळपण रोकडें । समजोन पाहावें ॥ ९ ॥ आत्म्यावेगळें काम चालेना । आत्मा दिसेना ना आडळेना । गुप्तरूपें विचार नाना । पाहोन सोडी ॥ १० ॥ पिंड ब्रह्मांड व्यापून धरिलें । नाना शरीरीं विळासलें । विवेकी जनासी भासलें । जगदांतरी ॥ ११ ॥ आत्म्याविण देहे चालती । हें तों न घडे कल्पांतीं । अष्टधा प्रकृर्तीच्या वेक्ती । रूपासी आल्या ॥ १२ ॥ मूळापासून सेवटवरी । सकळ कांहीं आत्माच करी । आत्म्यापैलीकडे निर्विकारी । परब्रह्म तें ॥ १३ ॥ आत्मा शरीरीं वर्ततो । इंद्रियेंग्राम चेष्टवितो । नाना सुखदुःखें भोगितो । देह्यात्मयोगें ॥ १४ ॥ सप्तकंचुक हें ब्रह्मांड । त्यामधें सप्तकंचुक पिंड । त्या पिंडामधें आत्मा जाड । विवेकें वोळखा ॥ १५ ॥ शब्द ऐकोन समजतो । समजोन प्रत्योत्तर देतो । कठीण मृद सीतोष्ण जाणतो । त्वचेमधें ॥ १६ ॥ नेत्रीं भरोनी पदार्थ पाहाणें । नाना पदार्थ परीक्षणें । उंच नीच समजणें । मनामधें ॥ १७॥ क्रूरदृष्टी सौम्यदृष्टी । कपटदृष्टी कृपादृष्टी । नाना प्रकारींच्या दृष्टी । भेद जाणे॥ १८ ॥ जिव्हेमधें नाना स्वाद । निवडून जाणे भेदाभेद । जें जें जाणें तें तें विशद । करुनी बोले ॥ १९॥ उत्तम अन्नाचे परिमळ । नाना सुगंध परिमळ । नाना फळांचे परिमळ । घ्राणैंद्रियें जाणे ॥ २० ॥ जिव्हेनें स्वाद घेणें बोलणें । पाणीईइंद्रियें घेणें देणें । पादैंद्रियें येणें जाणें । सर्वकाळ ॥२१ ॥ शिस्नैंद्रियें सुरतभोग । गुदैंद्रियें मळोत्सर्ग । मनेंकरूनी सकळ सांग । कल्पून पाहे ॥ २२॥ ऐसें व्यापार परोपरी । त्रिभुवनीं येकलाचि करी । त्याची वर्णावया थोरी । दुसरा नाहीं ॥ २३ ॥ त्याविण दुसरा कैचा । जे महिमा सांगावा तयाचा । व्याप आटोप आत्मयाचा । न भूतो न भविष्यति ॥ २४ ॥ चौदा विद्या चौसष्टी कळा । धूर्तपणाच्या नाना कळा । वेद शास्त्र पुराण जिव्हाळा । तेणेंविण कैचा ॥ २५ ॥ येहलोकींचा आचार । परलोकीं सारासारविचार । उभय लोकींचा निर्धार । आत्माच करी ॥ २६ ॥ नाना मतें नाना भेद । नाना संवाद वेवाद । नाना निश्चय भेदाभेद । आत्माच करी ॥ २७ ॥ मुख्यतत्व विस्तारलें । तेणें तयास रूप आणिलें । येणेंकरितां सार्थक जालें । सकळ कांहीं ॥ २८ ॥ लिहिणें वाचणें पाठांतर करणें । पुसणें सांगणें अर्थ करणें । गाणें बाजवणें नाचणें । आत्म्याचकरितां ॥ २९ ॥ नाना सुखें आनंदतो । नाना दुःखें कष्टी होतो । देहे धरितो आणी सोडितो । नानाप्रकारें ॥ ३० ॥ येकलाचि नाना देहे धरी । येकलाचि नटे परोपरी । नट नाट्यकळा कुसरी । त्याविण नाहीं ॥ ३१ ॥ येकलाचि जाला बहुरूपी । बहुरूपी बहुसाक्षपी । बहुरूपें बहुप्रतापी । आणी लंडी ॥ ३२ ॥ येकलाचि विस्तारला कैसा । पाहे बहुविध तमासा । दंपत्येंविण कैसा । विस्तारला ॥ ३३ ॥ स्त्रियांस पाहिजे पुरुष । पुरुषासी पाहिजे स्त्रीवेष । ऐसा आवडीचा संतोष । परस्परें ॥ ३४ ॥ स्थूळाचें मूळ तें लिंग । लिंगामधें हें प्रसंग । येणें प्रकारें जग । प्रत्यक्ष चाले ॥ ३५ ॥ पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी । ऐसी होते उठाठेवी । परी या सूक्ष्माची गोवी । समजली पाहिजे ॥ ३६ ॥ स्थूळांकरितां वाटे भेद । सूक्षमीं आवघेंचि अभेद । ऐसें बोलणें निरुध । प्रत्यया आलें ॥ ३७ ॥ बायकोनें बायकोस भोगिलें । ऐसें नाहीं कीं घडलें । बायकोस अंतरी लागलें । ध्यान पुरुषाचें ॥३८ ॥ स्त्रीसी पुरुष पुरुषास वधु । ऐसा आहे हा समंधु । याकारणें सूक्ष्म संवादु । सुक्ष्मीं च आहे ॥ ३९ ॥ पुरुषैछेमधें प्रकृती । प्रकृतीमधें पुरुषवेक्ती । प्रकृतीपुरुष बोलती । येणें न्यायें ॥ ४० ॥ पिंडावरून ब्रह्मांड पाहावें । प्रचीतीनें प्रचीतीस घ्यावें । उमजेना तरी उमजावें । विवराविवरों ॥ ४१ ॥ द्वैतैछा होते मुळीं । तरी ते आली भूमंडळीं । भूमंडळीं आणी मुळीं । रुजु पाहावें ॥ ४२ ॥ येथें मोठा जाला साक्षेप । फिटला श्रोतयांचा आक्षेप । जे प्रकृतीपुरुषाचें रूप । निवडोन गेलें ॥ ४३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे महद्भूतनिरूपणनाम समास सातवा ॥
 
 
समास आठवा : आत्मारामनिरूपण ॥ श्रीरामसमर्थ ॥ नमूं गणपती मंगळमूर्ती । जयाचेनि मतिस्फूर्ती । लोक भजनी स्तवन करिती । आत्मयाचें ॥ १ ॥ नमूं वैखरी वागेश्वरी । अभ्यांतरीं प्रकाश करी । नाना भरोवरी विवरी । नाना विद्या ॥ २ ॥ सकळ जनांमधें नाम । रामनाम उत्तमोत्तम । श्रम जाउनी विश्राम । चंद्रमौळी पावला ॥ ३ ॥ नामाचा महिमा थोर । रूप कैसें उत्तरोत्तर । परात्पर परमेश्वर । त्रयलोक्यधर्ता ॥ ४ ॥ आत्माराम चहुंकडे । लोक वावडे जिकडे तिकडे । देहे पडे मृत्य घडे । आत्मयाविण ॥ ५ ॥ जीवात्मा शिवात्मा परमात्मा । जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा । आत्मा अंतरत्मा सूक्ष्मात्मा । देवदानवमानवीं ॥ ६ ॥ सकळ मार्ग चालती बोलती । अवतारपंगतीची गती । आत्म्याकरितां होत जाती । ब्रह्मादिक ॥ ७ ॥ नादरूप जोतीरूप । साक्षरूप सत्तारूप । चैतन्यरूप सस्वरूप । द्रष्टारूप जाणिजे ॥ ८ ॥ नरोत्तमु विरोत्तमु । पुरुषोत्तमु रघोत्तमु । सर्वोत्तमु उत्तमोत्तमु । त्रयलोक्यवासी ॥ ९ ॥ नाना खतपट आणी चटपट । नाना लटपट आणि झटपट । आत्मा नसतां सर्व सपाट । चहुंकडे ॥ १० ॥ आत्म्याविण वेडें कुडें । अत्म्याविण मडें बापुडें । आत्म्याविण थडें रोकडें । शरीराचें ॥ ११ ॥ आत्मज्ञानी समजे मनीं । पाहे जनी आत्मयालागुनी । भुवनी अथवा त्रिभुवनीं । अत्म्याविणें वोस ॥ १२ ॥ परम सुंदर आणि चतुर । जाणे सकळ सारासार । आत्म्याविण अंधकार । उभय लोकीं ॥ १३ ॥ सर्वांगीं सिध सावध । नाना भेद नाना वेध । नाना खेद आणी आनंद । तेणेंचिकरितां ॥ १४ ॥ रंक अथवा ब्रह्मादिक । येकचि चालवी अनेक । पाहावा नित्यानित्यविवेक । कोण्हियेकें ॥ १५ ॥ ज्याचे घरी पद्मिणी नारी । आत्मा तंवरी आवडी धरी । आत्मा गेलियां शरीरीं । तेज कैचें ॥ १६ ॥ आत्मा दिसेना ना भासेना । बाह्याकारें अनुमानेना । नाना मनाच्या कल्पना । आत्मयाचेनी ॥ १७ ॥ आत्मा शरीरीं वास्तव्य करी । अवघें ब्रह्मांड विवरी भरी । वासना भावना परोपरीं । किती म्हणोनी सांगाव्या ॥ १८ ॥ मनाच्या अनंत वृत्ती । अनंत कल्पना धरिती । अनंत प्राणी सांगो किती । अंतर त्यांचें ॥ १९ ॥ अनंत राजकारणें धरणें । कुबुधी सुबुधी विवरणें । कळों नेदणें चुकावणें । प्राणीमात्रासी ॥ २० ॥ येकास येक जपती टपती । येकास येक खपती लपती । शत्रुपणाची स्थिती गती । चहुंकडे ॥ २१ ॥ पृथ्वीमधें परोपरीं । येकास येक सिंतरी । कित्तेक भक्त परोपरीं । परोपकार करिती ॥ २२ ॥ येक आत्मा अनंत भेद । देहेपरत्वें घेती स्वाद । आत्मा ठाईंचा अभेद । भेद हि धरी ॥ २३ ॥ पुरुषास स्त्री पाहिजे । स्त्रीस पुरुष पाहिजे । नवरीस नवरी पाहिजे । हें तों घडेना ॥ २४ ॥ पुरुषाचा जीव स्त्रीयांची जीवी । ऐसी नाहीं उठाठेवी । विषयसुखाची गोवी । तेथें भेद आहे ॥ २५ ॥ ज्या प्राण्यास जो आहार । तेथेंचि होती तत्पर । पशूचे आहारीं नर । अनादरें वर्तती ॥ २६ ॥ आहारभेद देहेभेद । गुप्त प्रगट उदंड भेद । तैसाचि जाणावा आनंद । वेगळाला ॥ २७ ॥ सिंधु भूगर्भींचीं नीरें । त्या नीरामधील शरीरें । आवर्णोदकाचीं जळचरें । अत्यंत मोठी ॥ २८ ॥ सूक्ष्म दृष्टीं आणितां मना । शरीराचा अंत लागेना । मा तो अंतरात्मा अनुमाना । कैसा येतो ॥ २९ ॥ देह्यात्मयोग शोधून पाहिला । तेणें कांहीं अनुमानला । स्थूळसूक्ष्माचा गलबला । गथागोवी ॥ ३० ॥ गथागोवी उगवाव्याकारणें । केलीं नाना निरूपणें । अंतरात्मा कृपाळुपणें । बहुतां मुखें बोलिला ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मारामनिरूपणनाम समास आठवा ॥
 
 
समास नववा : नाना उपासनानिरूपण
 
॥ श्रीरामसमर्थ ॥ पृथ्वीमधें लोक नाना । त्यास नाना उपासना । भावार्थें प्रवर्तले भजना । ठाईं ठाईं ॥ १ ॥ अपुल्या देवास भजती । नाना स्तुती स्तवनें करिती । जे जे निर्गुण म्हणिती । उपासनेसी ॥ २ ॥ याचा कैसा आहे भाव । मज सांगिजे अभिप्राव । अरे हा स्तुतीचा स्वभाव । ऐसा आहे ॥ ३ ॥ निर्गुण म्हणिजे बहुगुण । बहुगुणी अंतरात्मा जाण । सकळ त्याचे अंश हें प्रमाण । प्रचित पाहा ॥ ४ ॥ सकळ जनासी मानावें तें । येका अंतरात्म्यास पावतें । अधिकारपरत्वें तें । मान्य कीजे ॥ ५ ॥ श्रोता म्हणे हा अनुमान । मुळीं घालावें जीवन । तें पावे पानोपान । हे सध्या प्रचिती ॥ ६ ॥ वक्ता म्हणे तुळसीवरी । उदक घालावें पात्रभरी । परी न थिरे निमिषभरी । भूमीस भेदे ॥ ७ ॥ थोरा वृक्षास कैसें करावें । सेंड्या पात्र कैसें न्यावें । याचा अभिप्राव देवें । मज निरोपावा ॥ ८ ॥
 
प्रजन्याचें उदक पडतें । तें तों मुळाकडे येतें । हात चि पावेना तेथें । काये करिती ॥ ९ ॥ सकळास मूळ सांपडे । ऐसें पुण्य कैचें घडे । साधुजनाचें पवाडे । विवेकीं मन ॥ १० ॥ तथापी वृक्षांचेनि पडिपाडें । जीवन घालितां कोठें पडे । ये गोष्टीचें सांकडें । कांहींच नाहीं ॥ ११ ॥ मागील आशंकेचें निर्शन । होतां जालें समाधान । आतां गुणास निर्गुण । कैसें म्हणती ॥ १२ ॥ चंचळपणें विकारलें । सगुण ऐसें बोलिलें । येर तें निर्गुण उरलें । गुणातीत ॥ १३ ॥ वक्ता म्हणे हा विचार । शोधून पाहावें सारासार । अंतरीं राहातां निर्धार । नांव नाहीं ॥ १४ ॥ विवेकेंचि तो मुख्य राजा । आणि सेवकाचें नांव राजा । याचा विचार समजा । वेवाद खोटा ॥ १५ ॥ कल्पांतप्रळईं जें उरलें । तें निर्गुण ऐसें बोलिलें । येर तें अवघेंचि जालें । मायेमधें ॥ १६ ॥ सेना शाहार बाजार । नाना यात्रा लाहानथोर । शब्द उठती अपार । कैसे निवडावे ॥ १७ ॥ काळामधें प्रज्यन्यकाळ । मध्यरात्रीं होतां निवळ । नाना जीव बोलती सकळ । कैसे निवडावे ॥ १८ ॥ नाना देश भाषा मतें । भूमंडळीं असंख्यातें । बहु ऋषी बहु मतें । कैसीं निवडावीं ॥ १९ ॥ वृष्टी होतां च अंकुर । सृष्टीवरी निघती अपार । नाना तरु लाहानथोर । कैसे निवडावे ॥ २० ॥ खेचरें भूचरें जळचरें । नाना प्रकारींचीं शरीरें । नान रंग चित्रविचित्रें । कैसी निवडावीं ॥ २१ ॥ कैसें दृश्य आकारलें । नानापरीं विकारलें । उदंडचि पैसावलें । कैसें निवडावें ॥ २२ ॥ पोकळीमधें गंधर्वनगरें । नाना रंग लाहनथोरें । बहु वेक्ति बहु प्रकारें । कैसीं निवडावीं ॥ २३ ॥ दिवसरजनीचे प्रकार । चांदिणें आणी अंधकार । विचार आणी अविचार । कैसा निवडावा ॥ २४ ॥ विसर आणी आठवण । नेमस्त आणी बाष्कळपण । प्रचित आणी अनुमान । येणें रितीं ॥ २५ ॥ न्याय आणी अन्याय । होय आणी न होये । विवेकेंविण काये । उमजों जाणे ॥ २६ ॥ कार्यकर्ता आणी निकामी । शूर आणी कुकर्मी । धर्मी आणी अधर्मी । कळला पाहिजे ॥ २७ ॥ धनाढ्य आणि दिवाळखोर । साव आणि तश्कर । खरें खोटें हा विचार । कळला पाहिजे ॥ २८ ॥ वरिष्ठ आणि कनिष्ठ । भ्रष्ट आणी अंतरनिष्ठ । सारासार विचार पष्ट । कळला पाहिजे ॥ २९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाना उपासनानिरूपणनाम समास नववा ॥
 
 
समास दहावा : गुणभूतनिरूपण ॥ श्रीरामसमर्थ ॥ पंचभूतें चाले जग । पंचभूतांची लगबग । पंचभूतें गेलियां मग । काये आहे ॥ १ ॥ श्रोता वक्तयास बोले । भूतांचे महिमे वाढविले । आणि त्रिगुण कोठें गेले । सांगा स्वामी ॥ २ ॥ अंतरात्मा पांचवे भूत । त्रिगुण त्याचें अंगभूत । सावध करूनियां चित्त । बरें पाहें ॥ ३ ॥ भूत म्हणिजे जितुकें जालें । त्रिगुण जाल्यांत आले । इतुकेन मूळ खंडलें । आशंकेचें ॥ ४ ॥ भूतांवेगळें कांहीं नाहीं । भूतजात हें सर्व हि । येकावेगळें येक कांहीं । घडेचिना ॥ ५ ॥ आत्म्याचेनी जाला पवन । पवनाचेन प्रगटे अग्न । अग्नीपासून जीवन । ऐसें बोलती ॥ ६ ॥ जीवन आवघें डबाबिलें । तें रविमंडळें आळलें । वन्हीवायोचेन जालें । भूमंडळ ॥ ७ ॥ वन्ही वायो रवी नस्तां । तरी होते उदंड सीतळता । ते सीतळतेमधें उष्णता । येणें न्यायें ॥ ८ ॥ आवघें वर्मासी वर्म केलें । तरीच येवढें फांपावलें । देहेमात्र तितुकें जालें । वर्माकरितां ॥ ९ ॥ आवघें सीतळचि असतें । तरी प्राणीमात्र मरोनी जातें । आवघ्या उष्णेंचि करपते । सकळ कांहीं ॥ १० ॥ भूमंडळ आळोन गोठलें । तें रविकिर्णें वाळोन गेलें । मग सहज चि देवें रचिलें । उपायासी ॥ ११ ॥ म्हणोनी केला प्रज्यन्यकाळ । थंड जालें भूमंडळ । पुढेंउष्ण कांहीं सीतळ । सीतकाळ जाणावा ॥ १२ ॥ सीतकाळें कष्टले लोक । कर्पोन गेलें वृक्षादिक । म्हणोन पुढें कौतुक । उष्णकाळाचें ॥ १३ ॥ त्याहिमधें प्रातःकाळ । माध्यानकाळ सायंकाळ । सीतकाळ उष्णकाळ । निर्माण केले ॥ १४ ॥ ऐसें येकामागें येक केलें । विलेनें नेमस्त लाविलें । येणेंकरितां जगले । प्राणीमात्र ॥ १५ ॥ नाना रसें रोग कठिण । म्हणोनी औषधी केल्या निर्माण । परंतु सृष्टीचें विवरण । कळलें पाहिजे ॥ १६॥ देहेमूळ रक्त रेत । त्या आपाचे होती दात । ऐसीच भूमंडळीं प्रचित । नाना रत्नांची ॥ १७ ॥ सकळांसी मूळ जीवन बांधा । जीवनें चाले सकळ धंदा । जीवनेंविण हरिगोविंदा । प्राणी कैचे ॥ १८ ॥ जीवनाचें मुक्ताफळ । शुक्रासारिखें सुढाळ । हिरे माणिके इंद्रनीळ । ते जळें जाले ॥ १९ ॥ महिमा कोणाचा सांगावा । जाला कर्दमुचि आघवा । वेगळवेगळु निवडावा । कोण्या प्रकारें ॥ २० ॥ परंतु बोलिलें कांहींयेक । मनास कळावया विवेक । जनामधें तार्किक लोक । समजती आघवें ॥ २१ ॥ आवघें समजलें हें घडेना । शास्त्रांशास्त्रांसीं पडेना । अनुमानें निश्चय होयेना । कांहींयेक ॥ २२ ॥ अगाध गुण भगवंताचे । शेष वर्णूं न शके वाचें । वेदविधी तेहि काचे । देवेंविण ॥ २३ ॥ आत्माराम सकळां पाळी । आवघें त्रयलोक्य सांभाळी । तया येकेंविण धुळी । होये सर्वत्रांची ॥ २४ ॥ जेथें आत्माराम नाहीं । तेथें उरों न शके कांहीं । त्रयलोकीचे प्राणी सर्व हि । प्रेतरूपी ॥ २५ ॥ आत्मा नस्तां येती मरणें । आत्म्याविण कैचें जिणें । बरा विवेक समजणें । अंतर्यामीं ॥ २६ ॥ समजणें जें विवेकाचें । तेंहि आत्म्याविण कैचें । कोणीयेकें जगदीशाचें । भजन करावें ॥ २७ ॥ उपासना प्रगट जाली । तरी हे विचारणा कळली । याकारणें पाहिजे केली । विचारणा देवाची ॥ २८ ॥ उपासनेचा मोठा आश्रयो । उपासनेविण निराश्रयो । उदंड केलें तरी तो जयो । प्राप्त नाहीं ॥ २९ ॥ समर्थाची नाहीं पाठी । तयास भलताच कुटी । याकारणें उठाउठी । भजन करावें ॥ ३० ॥ भजन साधन अभ्यास। येणें पाविजे परलोकास । दास म्हणे हा विश्वास । धरिला पाहिजे ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुणभूतनिरूपणनाम समास दहावा ॥ ॥ दशक सोळावा समाप्त ॥