गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : सोमवार, 6 डिसेंबर 2021 (13:26 IST)

गुरूचरित्र – अध्याय सातवा

॥ श्रीगणेशाय नमः ॥
 
नामधारक म्हणे सिद्धासी । गोकर्णमहिमा आम्हांसी ।
निरोपिजे स्वामी कृपेसी । पूर्वी कवणा साक्ष झाली ॥१॥
 
समस्त तीर्थ सांडुनी । श्रीपाद गेले किंकारणी ।
पूर्वी आधार केला कवणी । पुराण कथा सांगा मज ॥२॥
 
ज्यावरी असेल गुरूची प्रीति । तीर्थमहिमा ऐकणे चित्ती ।
वांछा होतसे ज्ञानज्योती । कृपासिंधु गुरुराया ॥३॥
 
सिद्ध म्हणे नामधारकासी । गोकर्णमहिमा मज पुससी ।
सांगेन तुज विस्तारेसी । एकचित्ते परियेसा ॥४॥
 
पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी । मित्रसह राजा परियेसी ।
प्रतापवंत क्षत्रियराशी । सर्वधर्मरत देखा ॥५॥
 
राजा सकळशास्त्रज्ञ । विवेकी असे श्रुतिनिपुण ।
बलाढ्य शूर महाभीम । विद्योद्योगी दयानिधि ॥६॥
 
असता राजा एके दिवशी । विनोदे निघाला पारधीसी ।
प्रवेशला महावनासी । वसती शार्दूल सिंह जेथे ॥७॥
 
निर्मनुष्य अरण्यात । राजा पारधि खेळत ।
भेटला तेथे अद्‌भुत । दैत्य ज्वाळाकार भयानक ॥८॥
 
राजा देखोनि तयासी । वर्षता शर झाला कोपेसी ।
मूर्छना येऊनि धरणीसी । पडला दैत्य तया वेळी ॥९॥
 
होता तयाचा बंधु जवळी । आक्रंदतसे प्रबळी ।
पाषाण हाणी कपाळी । बंधुशोके करोनिया ॥१०॥
 
प्राण त्यजिता निशाचर । बंधूसी म्हणतसे येर ।
जरी तू होसी माझा सहोदर । सूड घेई माझा तू ॥११॥
 
ऐसे बोलोनि बंधूसी । दैत्य पावला पंचत्वासी ।
अनेक मायापाशी । नररूप धरिले तया वेळी ॥१२॥
 
रूप धरोनि मानवाचे । सौम्य वाणी बोले वाचे ।
सेवकत्व करी राजयाचे । अतिनम्रत्वे बोलोनिया ॥१३॥
 
सेवा करी नानापरी । सेवकाचे सारखे मन धरी ।
कितीक दिवसांवरी । वनांतरी राजा होता देखा ॥१४॥
 
समस्त मृग जिंकूनि । दुष्ट जीवाते वधोनि ।
राजा आला परतोनि । आपुल्या नगरा परियेसा ॥१५॥
 
ऐसे असता एके दिवशी । पितृश्राद्ध आले परियेसी ।
आमंत्रण सांगे ऋषींसी । वसिष्ठादिका परियेसा ॥१६॥
 
ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक । करवीतसे सविवेक ।
कापट्ये होता तो सेवक । तया स्थानी ठेविला ॥१७॥
 
राजा म्हणे तयासी । पाकस्थानी तू वससी ।
जे जे मागेल भाणवसी । सर्व आणूनि त्वा द्यावे ॥१८॥
 
अंगिकारोनि तो सेवक । नरमांस आणोनि देख ।
कापट्यभावे करवी पाक । केली शाक तया वेळी ॥१९॥
 
ठाय घालिता ऋषेश्वरांसी । पहिलेच वाढिले नरमांसासी ।
पाहता कोप आला वसिष्ठासी । दिधला शाप तये वेळी ॥२०॥
 
वसिष्ठ म्हणे रायासी । नरमांस वाढिले आम्हांसी ।
त्वरित ब्रह्मराक्षस होसी । म्हणोनि शाप दिधला ॥२१॥
 
शाप देता तये काळी । राजा कोपला तात्काळी ।
अपराध नसता प्रबळी । वाया मज का शापिले ॥२२॥
 
नेणे मांसपाक कोणी केला । माझा निरोप नाही झाला ।
वृथा आमुते शाप दिधला । आपण शापीन म्हणतसे ॥२३॥
 
उदक घेऊनि अंजुळी । शापावया सिद्ध झाला तये काळी ।
तव राजपत्‍नी येऊनि जवळी । वर्जी आपुले पतीते ॥२४॥
 
पतीसी म्हणे ते नारी । गुरूसी शापिता दोष भारी ।
वंदुनी तयाचे चरण धरी । तेणे भवसागर तरशील ॥२५॥
 
मदयंती सतीचे वचन । मानिता झाला राजा आपण ।
अंजुळीचे उदक जाण । टाकी आपुले चरणावरी ॥२६॥
 
शाप देता कल्मषपाणी । पडले राजाचे चरणी ।
कल्मषपाद नाम म्हणोनि । ब्रह्मराक्षस झाला तो राव ॥२७॥
 
राजपत्‍नी येऊनि परियेसी । लागली वसिष्ठचरणांसी ।
उद्धरी स्वामी बाळकासी । एवढा कोप काय काज ॥२८॥
 
करुणावचन ऐकोनि । शांत झाला वसिष्ठ मुनि ।
वर्षे बारा क्रमोनि । पुनरपि राजा होशील ॥२९॥
 
उःशाप देऊनि वसिष्ठ ऋषि । गेला आपुले स्थानासी ।
ब्रह्मराक्षस राजा परियेसी । होऊनी गेला वनांतरा ॥३०॥
 
निर्मनुष्य अरण्यात । राजा राहिला प्रख्यात ।
भक्षीतसे अनेक जंत । पशुमनुष्य आदिकरूनि ॥३१॥
 
ऐसे क्रमिता तये वनी । मार्गस्थ दंपत्ये दोनी ।
ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी । देखिला राक्षस भयासुर ॥३२॥
 
येऊनि धरी ब्राह्मणासी । व्याघ्र जैसा पशूसी ।
घेऊनि गेला भक्षावयासी । विप्रस्त्री समागमे ॥३३॥
 
अतिशोक करी ब्राह्मणी । जाऊनि लागे राक्षसचरणी ।
राखे मजला अहेवपणी । प्राणेश्वराते सोडी पितया ॥३४॥
 
न भक्षी गा माझा पति ।माझी तयावरी अतिप्रीति ।
मज भक्षी गा म्हणे सुमति । वल्लभाते सोडोनिया ॥३५॥
 
पतीविण राहता नारी । जन्म वृथाचि दगडापरी ।
पहिले माते स्वीकारी । प्राण राखे पतीचे ॥३६॥
 
पति लावण्य पूर्ववयेसी । वेदशास्त्रपारंगेसी ।
याचा प्राण जरी तू रक्षिसी । जगी होईल तुज पुण्य ॥३७॥
 
कृपा करी गा आम्हावरी । होईन तुझी कन्या कुमारी ।
मज पुत्र होतील जरी । नाम वाढवीन तुझे मी ॥३८॥
 
ऐसे नानापरी देखा । विप्रस्त्री करी महादुःखा ।
बोल न मानोनि राक्षसे ऐका । त्या ब्राह्मणाते भक्षिले ॥३९॥
 
पतीते भक्षिले देखोनि । शाप वदली ते ब्राह्मणी ।
म्हणे राक्षसा ऐक कानी । शाप माझा निर्धारे ॥४०॥
 
तू राजा सूर्यवंशी । शापास्तव राक्षस झालासी ।
पुढे मागुती राजा होसी द्वादश वर्षे क्रमोनि ॥४१॥
 
परि रमता स्त्रियेसवे । प्राण जाईल स्वभावे ।
अनाथा भक्षिले दुष्ट भावे । दुरात्म्या तू राक्षसा ॥४२॥
 
शाप देऊनि तया वेळी । पतीच्या अस्थि मिलवूनि जवळी ।
काष्ठे घालोनिया प्रबळी । अग्निप्रवेश केला तिने ॥४३॥
 
ऐसे असता राव देखा । क्रमी बारा वर्षे निका ।
पुनरपि राजा होऊन ऐका । आला आपुले नगरासी ॥४४॥
 
विप्रस्त्रियेचे शापवचन । स्त्रियेसी सांगितली खूण ।
म्हणे संग करिता तत्क्ष्ण । मृत्यु असे आपणासी ॥४५॥
 
ऐकोनि पतीचे वचन । मदयंती दुःख करी आपण ।
मन करूनि निर्वाण । त्यजावया प्राण पहातसे ॥४६॥
 
मदयंती म्हणे रायासी । संतान नाही तुमचे वंशासी ।
वनी कष्टला बारा वर्षी । आपुले कर्म न चुकेची ॥४७॥
 
ऐकोनि सतीचे वचन । शोके दाटला अतिगहन ।
अश्रु आले नेत्रांतून । काय करू म्हणतसे ॥४८॥
 
मंत्रीवृद्धपुरोहितांसी । बोलाविले परियेसी ।
ब्रह्महत्या घडली आम्हांसी । विमोचन होय कवणेपरी ॥४९॥
 
मंत्रीवृद्धपुरोहित । तयासी म्हणती ऐका मात ।
तीथे आचरावी समस्त । तेणे पुनीत व्हाल तुम्ही ॥५०॥
 
करोनि ऐसा विचार । राजा निघे तीर्था साचार ।
सर्व तीर्थपरिकर । विधिपूर्वक करीतसे ॥५१॥
 
ज्या ज्या तीर्था जाय आपण । अनेक पुण्य करी जाण ।
यज्ञादिक कर्म अन्नदान । ब्राह्मणादिका देतसे ॥५२॥
 
ऐसी नाना तीर्थे करीत । परी ब्रह्महत्या सवेचि येत ।
अघोररूपी असे दिसत । कवणेपरी न जायची ॥५३॥
 
कष्टोनि राजा बहुतांपरी । निर्वाण होऊनि मनाभीतरी ।
हिंडत पातला मिथिलापुरी । चिंताग्रस्त होवोनिया ॥५४॥
 
नगरा-बाह्यप्रदेशी । श्रमोनि राजा परियेसी ।
चिंता करी मानसी । वृक्षच्छाये बैसलासे ॥५५॥
 
ऋषेश्वरासमवेत । जैसा रुद्र प्रकाशित ।
गौतम ऋषि अवचित । तया स्थानासि पातला ॥५६॥
 
राजा देखोनि गौतमासी । चरणी लोळे संतोषी ।
नमन करी साष्टांगेसी । भक्तिभावे करोनिया ॥५७॥
 
आश्वासूनि तये वेळी । गौतम पुसे करुणाबहाळी ।
क्षेमसमाधान सकळी । पुसता झाला वृत्तान्त ॥५८॥
 
काय झाले तुझे राज्य । अरण्यवासाचे काय काज ।
चिंताकुलित मुखांबुज । कवण कार्य घडले असे ॥५९॥
 
ऐकोनि ऋषीचे वचन । राजा सांगे विस्तारोन ।
शाप जाहला ब्रह्मवचन । ब्रह्महत्या घडली मज ॥६०॥
 
प्रायश्चित्ते सकळिक । यज्ञादि कर्मे धर्मादिक ।
सुक्षेत्रे अपार तीर्थे देख । आपण सकळ आचरली ॥६१॥
 
शमन न होय महादोष । सवेचि येत अघोर वेष ।
व्रते आचरलो कोटीश । न जाय दोष सर्वथा ॥६२॥
 
आजिचेनि माझे सफळ जनन । दर्शन झाले जी तुमचे चरण ।
होतील माझे कष्ट निवारण । म्हणोनि चरणा लागलो ॥६३॥
 
ऐकोनि रायाचे वचन । करुणासागर गौतम आपण ।
म्हणे भय सांडी गा निर्वाण वचन । तारील शंकर मृत्युंजय ॥६४॥
 
तुझे पापनिवारणासी । सांगेन तीर्थविशेषी ।
महापातक संहारावयासी । गोकर्ण क्षेत्र असे भले ॥६५॥
 
स्मरण करितां गोकर्णासी । ब्रह्महत्यादि पाप नाशी ।
तेथे ईश्वर सदा निवासी । मृत्युंजय सदाशिव ॥६६॥
 
जैसे कैलासाचे शिखर । अथवा स्वर्धुनीमंदिर ।
निश्चय वास कर्पूरगौर । गोकर्णक्षेत्री परियेसा ॥६७॥
 
जैसी अंधकाररजनी । प्रकाशावया जेवी अग्नि ।
चंद्रोदय जरि होय निर्वाणी । तरी सूर्यप्रकाशावीण गति नव्हे ॥६८॥
 
तैसे समस्त तीर्थाने । पाप नच जाय याचि कारणे ।
सूर्योदयी तमहरणे । तैसे गोकर्णदर्शने होय ॥६९॥
 
सहस्त्र ब्रह्महत्या जरी । घडल्या असती या शरीरी ।
प्रवेश होता गोकर्णक्षेत्री । शुद्धात्मा होय परियेसा ॥७०॥
 
रुद्रोपेंद्रविरिंचि देखा । जाऊनि तया स्थानी ऐका ।
तप केले हो सकळिका । कार्यसिद्धि होय त्यांप्रती ॥७१॥
 
भक्तिपूर्वक तया स्थानी । जप व्रत करिती जाणोनि ।
फळ होय त्या लक्षगुणी । असे पुण्यक्षेत्र असे ॥७२॥
 
जैसे ब्रह्मा विष्णु देखा । इंद्रादि देवा सकळिका ।
साध्य झाले तप ऐका । यावेगळे काय सांगू ॥७३॥
 
जाणा तो साक्षात्‌ ईश्वर । गोकर्णक्षेत्र कैलासपुर ।
प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर । विष्णुनिरोपे विनयार्थ ॥७४॥
 
समस्त देव तेथे येती । पुण्यक्षेत्री वास करिती ।
ब्रह्मा विष्णु इंद्रासहिती । विश्वेदेवे मरुद्‍गण ॥७५॥
 
चंद्र सूर्य वस्वादिक । पूर्वद्वारी राहिले ऐक ।
प्रीति करी भक्तिपूर्वक । बैसले असती तये स्थाना ॥७६॥
 
अग्नि यम चित्रगुप्त । एकादश रुद्र पितृदैवत ।
दक्षिणद्वारी वास करीत । संतोषे राहिले असती ॥७७॥
 
वरुणासहित गंगा सकळी । राहती पश्चिमद्वारस्थळी ।
प्रीति करी चंद्रमौळी । तया सकळां परियेसा ॥७८॥
 
कुबेर वायु भद्रकाळी । मातृदेवता चंडी सकळी ।
उत्तरवास त्रिकाळी । पूजा करिती महाबळेश्वराची ॥७९॥
 
चित्ररथादि विश्वावसु परियेसी । चित्रसेन गंधर्व सुरसी ।
पूजा करिती सदाशिवासी । सदा वसोनि तया ठायी ॥८०॥
 
घृताची रंभा मेनका । तिलोत्तमा उर्वशी ऐका ।
नित्य नृत्य करिती देखा । महाबळेश्वराचे सन्मुख ॥८१॥
 
वसिष्ठ कश्यप कण्व ऋषि । विश्वामित्र महातापसी ।
भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषि । पूजा करिती सदा तेथे ॥८२॥
 
कृतयुगी ब्रह्म-ऋषि । आचार करिती महातापसी ।
महाबळेश्वराचे भक्तीसी । राहिले गोकर्णक्षेत्रांत ॥८३॥
 
मरीचि नारद अत्रि ऋषि । दक्षादि ब्रह्म-ऋषि परियेसी ।
सनकादिक महातापसी । उपनिषदार्थ उपासिती ॥८४॥
 
अनेक सिद्ध साध्य जाण । मुनीश्वर अजिनधारण ।
दंडधारी संन्यासी निर्गुण । ब्रह्मचारी तेथे वसती ॥८५॥
 
त्वगस्थिमात्रशरीरेसी । अनुष्ठिती महातापसी ।
पूजा करिती भक्तीसी । चंद्रमौळीची परियेसा ॥८६॥
 
गंधर्वादि समस्त देव । पितर सिद्ध अष्टवसव ।
विद्याधर किंपुरुष सर्व । सेवेसी जाती निरंतर ॥८७॥
 
गुह्यक किन्नर स्वर्गलोक । शेषादि नाग तक्षक ।
पिशाच वेताळ सकळिक । जाती पूजेसी तया स्थाना ॥८८॥
 
नाना श्रृंगार करूनि । अनेक भूषणे विराजमानी ।
सूर्यशशी विमानी । वहनी येती वळंघोनिया ॥८९॥
 
स्तोत्रे गायन करिती देखा । नमिती नृत्य करिती अनेका ।
पूजेकारणे येती सकळिका । महाबळेश्वरलिंगासी ॥९०॥
 
जे जे इच्छिती मनकामना । पावती त्वरित निर्धारे जाणा ।
समान नाही क्षेत्र गोकर्ण । या ब्रह्मांडगोलकांत ॥९१॥
 
अगस्त्यादि सनत्कुमार । प्रियव्रतादि राजकुमार ।
अग्निदेवदानवादि येर । वर लाधले सर्व तया ठायी ॥९२॥
 
शिशुमारी भद्रकाळी । पूजा करिती त्रिकाळी ।
नागाते गरुड न गिळी । महाबळेश्वरदर्शने ॥९३॥
 
रावणादि राक्षसकुळी । कुंभकर्ण येर सकळी ।
वर लाधले ये स्थळी । बिभीषण पूजीतसे ॥९४॥
 
ऐसे समस्त देवकुळ । सिद्धदानवादि सकळ ।
गोकर्णक्षेत्रा जाऊनि प्रबळ । आराधिती नानापरी ॥९५॥
 
लिंग स्थापिती आपुले नामी । असे ख्याति तया नामी ।
वर लाधले अनेक कामी । चतुर्विध पुरुषार्थ ॥९६॥
 
ब्रह्मा विष्णु आपण देखा । कार्तवीर्य विनायका ।
आपुले नामी लिंग देखा । प्रतिष्ठा केली तये ठायी ॥९७॥
 
धर्मक्षेत्रपाळादी । दुर्गादेवीशक्तिवृंदी ।
लिंग स्थापिले आपुले नामी । ज्या गोकर्णक्षेत्रात ॥९८॥
 
गोकर्णक्षेत्र असे गहन । लिंग तीर्थे असंख्य जाण ।
पदोपदी असे निर्गुण । ऐसे क्षेत्र अनुपम असे ॥९९॥
 
सांगो किती विस्तारोन । असंख्यात तीर्थे जाण ।
पाषाण समस्त लिंग खूण । समस्त उदके जाणावी तीर्थे ॥१००॥
 
कृतयुगी महाबलेश्वर श्वेत । त्रेतायुगी लोहित ।
द्वापारी सुवर्णपित । कलियुगी कृष्णवर्ण जाहला ॥१॥
 
सप्त पाताळ खोलावोन । उभे असे लिंग आपण ।
कलियुगी मृदु होऊन । दिसे सूक्ष्ममरूपाने ॥२॥
 
पश्चिम समुद्रतीरासी । गोकर्णक्षेत्रविशेषी ।
ब्रह्महत्यादि पातके नाशी । काय आश्चर्य परियेसा ॥३॥
 
ब्रह्महत्यादि महापापे । परदारादि षट्‍ पापे ।
दुःशील दुराचारी पापे । जाती गोकर्णदर्शने ॥५॥
 
दर्शनमात्रे पुनीत होती । समस्त काम्यार्थ साधती ।
अंती होय तयांसी गति । गोकर्णलिंगदर्शने ॥५॥
 
तये स्थानी पुण्यदिवशी । जे जे अर्चिती भक्तीसी ।
तेचि जाणा रुद्रवंशी । रायासी म्हणे गौतम ॥६॥
 
एखादे समयी गोकर्णासी । जाय भक्तीने मानुषी ।
पूजा करिता सदाशिवासी । शिवपद निश्चये पावे जाणा ॥७॥
 
आदित्य सोम बुधवारी । अमावास्यादि पर्वाभितरी ।
स्नान करूनि समुद्रतीरी । दानधर्म करावा ॥८॥
 
शिवपूजा व्रत हवन । जप ब्राह्मणसंतर्पण ।
किंचित्‍ करिता अनंत पुण्य । गौतम म्हणे रायासी ॥९॥
 
व्यतिपातादि पर्वणीसी । सूर्य-संक्रांतीचे दिवशी ।
महाप्रदोष त्रयोदशी । पूजितां पुण्य अगण्य ॥११०॥
 
काय सांगो त्याचा महिमा । निवाडा होय अखिल कर्मा ।
ईश्वर भोळा अनंतमहिमा । पूजनमात्रे तुष्टतसे ॥११॥
 
असित पक्ष माघमासी । शिवरात्री चतुर्दशीसी ।
बिल्वपत्र वाहिले यासी । दुर्लभ असे त्रिभुवनांत ॥१२॥
 
ऐसे अनुपम स्थान असता । न जाती मूर्ख लोक ऐकता ।
शिवतीर्थ असे दुर्लभता । नेणती मूढ बधिर जाणा ॥१३॥
 
उपोषणादि जागरण । लिंग सन्निध गोकर्ण ।
स्वर्गासि जावया सोपान । पद्धति असे परियेसा ॥१४॥
 
ऐसे या गोकर्णस्थानासी । जे जाती जन यात्रेसी ।
चतुर्विध पुरुषार्थांसी । लाधती लोक अवधारा ॥१५॥
 
स्नान करूनि समस्त तीर्थी । महाबळेश्वरलिंगार्थी ।
पूजा करावी भक्त्यर्थी । पातकाव्यतिरिक्त होय जाणा ॥१६॥
 
ऐशापरी गोकर्णमहिमा । प्रकाश केला ऋषी गौतमा ।
राजा ऐकोनि अतिप्रेमा । पुसता झाला ते वेळी ॥१७॥
 
राजा म्हणे गौतमासी । गोकर्णस्थान निरोपिलेसी ।
पूर्वी पावला कोण यापासी । साक्ष झाली असेल ॥१८॥
 
विस्तारोनि ते आम्हांसी । सांगावे स्वामी करुणेसी ।
म्हणोनि लागला चरणांसी । अतिभक्ति करोनिया ॥१९॥
 
म्हणे गौतम तये वेळी । गोकर्णक्षेत्र महाबळी ।
जाणो आम्ही बहुकाळी । अपार साक्षी देखिली असे ॥१२०॥
 
गेलो होतो आम्ही यात्रे । देखिला दृष्टान्त विचित्र ।
आले होते तेथे जनमात्र । यात्रारूपे करोनिया ॥२१॥
 
माध्याह्नकाळी आम्ही तेथे । बैसलो होतो वृक्षच्छायेते ।
दुरोनि देखिले चांडाळीते । वृद्ध अंध महारोगी ॥२२॥
 
शुष्कमुखी निराहारी । कुष्ठ सर्वांगशरीरी ।
कृमि पडले अघोरी । पूय शोणित दुर्गंधी ॥२३॥
 
कुक्षिरोगी गंडमाळा । कफे दाटला असे गळा ।
दंतहीन अति विव्हळा । वस्त्र नाही परिधाना ॥२४॥
 
चंद्रसूर्यकिरण पडता । प्राण जाय कंठगता ।
शौचव्याधी असे बहुता । सर्वांगशूळ महादुःखी ॥२५॥
 
विधवा आपण केशवपनी । दिसे जैसी मुखरमणी ।
क्षणक्षणा पडे धरणी । प्राणत्याग करू पाहे ॥२६॥
 
ऐशी अवस्था चांडाळीसी । आली वृक्षच्छायेसी ।
देह टाकिला धरणीसी । त्यजू पाहे प्राण आपुला ॥२७॥
 
प्राण त्यजिता तये वेळी । विमान उतरे तत्काळी ।
शिवदूत अतिबळी । त्रिशूळ खट्‍वांग धरूनिया ॥२८॥
 
टंकायुधे चंद्र भाळी । दिव्यकांति चंद्रासारखी केवळी ।
किरीटकुंडले मिरवली । चतुर्वर्ग येणेपरी ॥२९॥
 
विमानी सूर्यासारिखे तेज । अतिविचित्र दिसे विराज ।
आले चांडाळियेकाज । अपूर्व वर्तले तये वेळी ॥३०॥
 
आम्ही पुशिले शिवदूतांसी । आलेति कवण्या कार्यासी ।
दूत म्हणती आम्हांसी । न्यावया आलो चांडाळिते ॥३१॥
 
ऐकोनि दूताचे वचन । विस्मित झाले आमुचे मन ।
पुनरपि केला त्यासी प्रश्न । ऐक राया तू एकचित्ते ॥३२॥
 
ऐशिया चांडाळी पापिणीसी । कैसी योग्य विमानेसी ।
नेऊनिया श्वानासी । सिंहासनी कैसे योग्य ॥३३॥
 
या जन्मादारभ्य इसी । पापे पापसंग्रहासी ।
ऐशी पापीण दुर्वृत्त इसी । केवी न्याल कैलासा ॥३४॥
 
नाही इसी शिवज्ञान । न करीच हे तपसाधन ।
दया सत्य कदा नेणे । इसी कैसे न्याल तुम्ही ॥३५॥
 
पशुमांस आहार इसी । सदा करी जीवहिंसी ।
ऐशिया दुष्ट कुष्ठी पापिणीसी । केवी नेता स्वर्गभुवना ॥३६॥
 
अथवा कधी शिवपूजन । न करी पंचाक्षरीजपन ।
नाही केले शिवस्मरण । इसी कैसे न्याल तुम्ही ॥३७॥
 
शिवरात्री उपोषण । नाही केले पुण्यदान ।
यज्ञयागादि साधन । नाही केले इणे कधी ॥३८॥
 
न करी स्नान पर्वकाळी । नेणे तीर्थ कवणे वेळी ।
अथवा व्रतादि सकळी । केले नाही इणे कधी ॥३९॥
 
या सर्वांगी पूय शोणित । दुर्गंधी असे बहुत ।
ऐशी चांडाळी दुर्वृत्त । कैसी विमानी बैसवाल ॥१४०॥
 
अर्चन जन्मांतरीचे म्हणा । कुष्ठ सर्वांग तेचि खुणा ।
कृमि निघती मुखांतून । पूर्वाजित काय केले ॥४१॥
 
ऐशी पापिणी दुराचारी । केवी नेता कैलासपुरी ।
योग्य नव्हे चराचरी । तुम्ही केवी न्याल इसी ॥४२॥
 
गौतम म्हणे रायासी । ऐसे पुशिले दूतांसी ।
त्यांनी सांगितला आम्हांसी । आद्यंत तये चांडाळीचा ॥४३॥
 
म्हणे गौतम ऋषेश्वर । चांडाळीचे पूर्वापार ।
सांगेन तुम्हांस सविस्तर । असे आश्चर्य परियेसा ॥४४॥
 
पूर्वी इचे जन्मस्थान । ब्राह्मणकन्या असे जाण ।
सौदामिनी नाम असे पूर्ण । सोमबिंबासारखे मुख ॥४५॥
 
अतिसुंदर रूप इसी । उपवर जाहली पितृगृहासी ।
न मिळे वर तियेसी । चिंता करिती मातापिता ॥४६॥
 
न मिळे वर सुंदर तिसी । उन्मत्त जाहली दहा वरुषी ।
मिळवूनि एका द्विजासी । गृह्योक्तेंसी लग्न केले ॥४७॥
 
विवाह झालियावरी । होती तया पतीचे घरी ।
क्वचित्काळ येणेपरी । होती नारी परियेसा ॥४८॥
 
वर्तता असे पुढे देख । तिचे पतीस झाले दुःख ।
पंचत्व पावला तात्काळिक । विधिलेख करूनिया ॥४९॥
 
ऐकोनि तिचे मातापिता । कन्या आपुले घरा आणिती तत्त्वता ।
पतीचे दुःखे दुःखिता । खेद करी ते नारी ॥१५०॥
 
अतिसुंदर पूर्ववयासी । मदे व्याप्त प्रतिदिवसी ।
चंचळ होय मानसी । परपुरुषाते देखोनिया ॥५१॥
 
गुप्तरुपे क्वचित्काळी । जारकर्म करी ते बाळी ।
प्रगट जाहले तत्काळी । गौप्य नोहे पातक ॥५२॥
 
आपण विधवा असे नारी । पूर्ववयासी अतिसुंदरी ।
विषयी प्रीति असे भारी । स्थिर नोहे तिचे मन ॥५३॥
 
ऐसे तिचिया पातकासी । विदित जाहले सर्वांसी ।
वाळीत केले तियेसी । मातापिताबंधुवर्गी ॥५४॥
 
शंका होती पहिली तिसी । निःशंक झाली व्यभिचारासी ।
प्रकटरूप अहर्निशी । रमो लागली नगरांत ॥५६॥
 
तिये नगरी एक वाणी । रूपे होता अतिलावण्यगुणी ।
त्यासी तिणे पूर्ववयस देखोनि । झाली त्याची कुलस्त्री ॥५७॥
 
तया शूद्राचिया घरी । वर्ततसे ते नारी ।
ऐसी पापिणी दुराचारी । कुळवैरीण बेचाळीस ॥५८॥
 
श्लोक ॥ स्त्रियः कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हीनसेवया ।
राजानो ब्रह्मदंदेन यतयो भोगसंग्रहात ॥५९॥
 
टीका ॥ स्त्रिया नासती कामवेगे । ब्राह्मण नासती हीनसेवे ।
राज्य जाय द्विजक्षोभे । यति नासे विषयसेवने ॥१६०॥
 
शूद्रासवे अहर्निशी । रमत होती अतिहर्षी । पु
त्र जाहला तियेसी । शूद्रगृही असता ॥६१॥
 
नित्य मांस आहार तिसी । मद्यपान उन्मत्तेसी ।
होऊनि तया शूद्रमहिषी । होती पापिणी दुराचारी ॥६२॥
 
वर्तता एके दिवसी । उन्मत्त होवोनि परियेसी ।
छेदिले वासरू आहारासी । मेष म्हणोनि पापिणीने ॥६३॥
 
छेदोनि वत्स परियेसी । पाक केला विनयेसी ।
शिर ठेविले शिंकियासी । दुसरे दिवशी भक्षावया ॥६४॥
 
आपण भ्रमित मद्यपानी । जागृत जाहली अस्तमानी ।
वासरू पाहे जावोनि । धेनु दोहावयालागी ॥६५॥
 
वत्सस्थानी असे मेष । भ्रमित जाहली अतिक्लेश ।
घरी पाहातसे शिरास । स्पष्ट दिसे वासरू ॥६६॥
 
अनुतप्त होवोनि तये वेळी । शिव शिव म्हणे चंद्रमौळी ।
अज्ञानाने ऐशी पापे घडली । म्हणोनि चिंती दुरात्मिणी ॥६७॥
 
तया वत्सशिरासी । निक्षेप केला भूमीसी ।
पति कोपेल म्हणोनि परियेसी । अस्थिचर्म निक्षेपिले ॥६८॥
 
जाऊनि सांगे शेजार लोका । व्याघ्रे वत्स नेले ऐका ।
भक्षिले म्हणोनि रडे देखा । पतीपुढे येणेपरी ॥६९॥
 
ऐसी कितीक दिवसांवरी । नांदत होती शूद्राघरी ।
पंचत्व पावली ते नारी । नेली दूती यमपुरा ॥१७०॥
 
घातली तियेसी नरकात । भोग भोगी अतिदुःखित ।
पुनरपि जन्मा चांडाळी जात । उपजली नारी परियेसा ॥७१॥
 
उपजतांचि जाहलि अंधळी । विद्रूपवर्ण जैशी काजळी ।
माता पिता क्वचित्काळी । प्रतिपाळिती मायामोहे ॥७२॥
 
उच्छिष्ट अन्न घालिती तोंडा । स्वजन तियेचे अखंडा ।
बाळपणी तयेसि विघडा । पोसिताती येणेपरी ॥७३॥
 
ऐसे असता वर्तमानी । सर्वांग झाले कुष्ठवर्णी ।
पंचत्व पावली पिताजननी । दरिद्री झाली निराश्रय ॥७४॥
 
सर्वांग कुष्ठवर्णपीडित । त्यजिती तियेसि स्वजन भ्रात ।
भिक्षा मागोनि उदर भरित । रक्षण करी शरीर आपुले ॥७५॥
 
येणेपरी चांडाळी । वर्तत असे बहुतकाळी ।
क्षुधेने पीडित सर्वकाळी । आपण अंध कुष्ठ देही ॥७६॥
 
न मिळे तिसी वस्त्र अन्न ।
दुःख करीत अतिगहन ऐसे तिचे पूर्वकर्म । झाली वृद्ध अतिकष्टे ॥७७॥
 
भिक्षा मागे जनांसी । मार्गी पडोनि अहर्निशी ।
कधी न भरे उदर तिसी । दुःखे विलापे अपार ॥७८॥
 
व्याधि असे शरीरासी । शोणित पूय परियेसी ।
दुर्गंधि येत असे महादोषी । सर्वांग कुष्ठे गळतसे ॥७९॥
 
ऐसे वर्ततांम माघमासी । लोक निघाले यात्रेसी ।
महास्थान गोकर्णासी । कलत्रपुत्रसहित देख ॥१८०॥
 
शिवरात्रीचे यात्रेसी । येती लोक देशोदेशी ।
चतुर्वर्ण आसपासी । हरुषे येती परियेसा ॥८१॥
 
देशोदेशीचे राजे देखा । हस्तीरथादिसहित ऐका ।
येती समस्त भूमांडलिका । महाबळेश्वरदर्शनासी ॥८२॥
 
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । येती यात्रेसी विनोद ।
समारंभ वाद्यनाद । अमित लोक परियेसा व८३॥
 
किती हासती गायन करिती । धावती नृत्य करीत येती ।
शिवस्मरणे गर्जना करिती । यात्राप्रसंगी जन देखा ॥८४॥
 
ऐसी महाजनांसमवेत । चांडाळी गेली तेथे त्वरित ।
सवे भिक्षुक असती बहुत । तयांसवे जात असे ॥८५॥
 
येणेपरी गोकर्णासी । चांडाळी पातली सायासी ।
करावलंबे महाजनांसी । भिक्षा मागे करुणावचने ॥८६॥
 
लोक जाती मार्गात । शयन करी आक्रंदत ।
कर वोढूनि मागत । महाजन लोकांसी ॥८७॥
 
पूर्वीची पापी आपण । पीडत असे याची कारण ।
भिक्षा घाला क्षुधानिवारण । म्हणोनि मागे सकळिका ॥८८॥
 
नेणे कधीच वस्त्र प्रावरण । धुळीत लोळे आपण ।
क्षुधाक्रांत होतसे मरण । धर्म करा सकळांसी म्हणे ॥८९॥
 
सर्वांगी रोगग्रस्त । वस्त्रावीण बाघे शीत ।
अक्ष नाही क्षुधाक्रांत । धर्म करा सकळिक हो ॥१९०॥
 
पूर्वी जन्मशतांतरी । नाही केले पुण्य येरी ।
याचि कारणे पीडित भारी । धर्म करा सकळिक ॥९१॥
 
येणेपरी मार्गांत । चांडाळी असे याचित ।
ते दिवशी असे शिवरात्रीव्रत । कोणी न घाली भिक्षा तिसी ॥९२॥
 
येरी विव्हळे क्षुधाक्रांत । जठराग्नि प्रदीप्त असे बहुत ।
धर्म करा ऐसे म्हणत । पडली मार्गात तेधवा ॥९३॥
 
पूजेसि जाती सकळजन । त्याते मागे आक्रंदोन ।
एक म्हणती हांसोन । उपवास आजि अन्न कैचे ॥९४॥
 
हाती होती बिल्वमंजरी । घाली ती तियेच्या करी ।
आघ्राणोनि पाहे येरी । भक्षणवस्तु नव्हे म्हणे ॥९५॥
 
कोपोनि टाकी ते अवसरी । जाऊनि पडली लिंगावरी ।
रात्री असती अंधारी । अलभ्य पूजा घडली देखा ॥९६॥
 
कोणी न घालिती भिक्षा तिसी । उपास घडला ते दिवशी ।
पूजा पावली त्या शिवासी । बिल्वमंजरी शिवमस्तकी ॥९७॥
 
इतुके पुण्य घडले तिसी । प्रयत६न न करिता परियेसी ।
तुष्टला ईश्वर हर्षी । भवार्णवाकडे केले ॥९८॥
 
येणेपरी चांडाळीसी । उपवास घडला अनायासी ।
तेथूनि उठली दुसरे दिवसी । भिक्षा मागावयाकारणे ॥९९॥
 
पहिलीच कुष्ठरोगी असे । अशक्त झाली उपवासे ।
चक्षुहीन मार्ग न दिसे । जात असे मंदमंद ॥२००॥
 
सूर्यरश्मीकरूनि तिसी । दुःख होय असमसहसी ।
पूर्वार्जित कर्मे ऐसी । म्हणती दूत गौतमाते ॥१॥
 
ऐसी चांडाळी कष्टत । आली वृक्षच्छायेसमीप ।
त्यजूं पाहे प्राण त्वरित । म्हणोनिया आलो धावोनि ॥२॥
 
पुण्य घडले इसी आजी । उपवास शिवतिथीकाजी ।
बिल्वपत्रे ईश्वर पूजी । घडले रात्री जागरण ॥३॥
 
तया पुण्येकरूनि इचे । पाप गेले शतजन्मीचे ।
हे प्रीतिपात्र ईश्वराचे । म्हणोनि पाठविले आम्हांसी ॥४॥
 
ऐसे म्हणती शिवदूत । तियेवरी शिंपूनिया अमृत ।
दिव्यदेह पावूनि त्वरित । गेली ऐका शिवलोका ॥५॥
 
ऐसे गोकर्ण असे स्थान । गौतम सांगे विस्तारोन ।
रायासि म्हणे तू निघोन । त्वरित जाई गोकर्णासी ॥६॥
 
जातांचि तुझी पापे जाती । इह सौख्य परत्र उत्तम गति ।
संशय न धरी गा चित्ती । म्हणोनि निरोपी रायासी ॥७॥
 
परिसोनि गौतमाचे वचन । राजा मनी दृढ संतोषोन ।
त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण । पापावेगळा जाहला तो ॥८॥
 
ऐसे पुण्यपावन स्थान । म्हणोनि राहिले श्रीपाद आपण ।
सिद्ध म्हणे ऐक कथन । नामधारका एकचित्ते ॥९॥
 
म्हणोनि सरस्वतीगंगाधरू । सांगे गुरुचरित्र विस्तारू ।
श्रोते करूनि निर्धारू । एकचित्ते परियेसा ॥२१०॥
 
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ । श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे गोकर्णमहिमावर्णन नाम सप्तमोऽध्यायः ॥७॥
 
॥ ओवीसंख्या ॥२१०॥
 
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

गुरुचरित्रअध्यायआठवा