Daily Horoscope
✕

गुरूचरित्र – अध्याय पन्नासावा भाग 2

Updated: शनिवार, 11 डिसेंबर 2021 (19:18 IST)
मागुती मनीं विचारी । पुढें जातों म्हणोनि येरी । पापविनाशी तीर्थातीरीं । भेटी देतों म्हणितलें ॥२२॥
न कळे महिमान श्रीगुरुचें । कोण जाणें मनोगत त्यांचें । दैव बरवें होतें आमुचें । म्हणोनि चरणांचें दर्शन झालें ॥२३॥
राजस्फोटक होता मज । आलों होतों याचि काज । कृपानिधि श्रीगुरुराज । भेटी झाली पुण्य माझें ॥२४॥
पुढें गेले निश्चित । म्हणोनि मनीं विचार करित । दिव्य अश्वावरी आरुढोनि त्वरित । निघाला राजा परियेसा ॥२५॥
चतुश्चत्वारिंशत्‌ क्रोश देखा । राजा पातला दिवसें एका । पापविनाशी तीर्थीं देखा । अवलोकितसे श्रीगुरुसी ॥२६॥
विस्मय करी अति मानसीं । येऊनि लागला चरणांसीं । विनवीतसे भक्तींसी । गृहाप्रति यावें म्हणतसे ॥२७॥
नगर सर्व श्रृगांरिलें । प्रवाळ-मोतियां तोरण केलें । गुडिया मखर उभारविलें । समारंभ थोर नगरांत ॥२८॥
बैसवोनिया पालखींत । आपण चरणचालीं येत । नवरत्‍न असे ओवाळित । नगर लोक आरत्या आणिती ॥२९॥
ऐशा समारंभें राजा देखा । घेऊनि गेला गुरुनायका । विस्मय झाला सकळ लोकां । महदाश्चर्य म्हणताती ॥२३०॥
लोक म्हणती म्लेंच्छजाती । पहा हो विप्रपूजा करिती । राजा अनाचारी म्हणती । जातिधर्म सांडिला आजी ॥३१॥
ज्याचें पाहूं नये मुख । त्याची सेवा करी देख । राजा नष्‍ट म्हणोनि सकळिक । म्लेंच्छजाती बोलती ॥३२॥
विप्रकुळ समस्त देख । संतोष करिती अतिकौतुक । राजा झाला विप्रसेवक । आतां बरवें राज्यासी ॥३३॥
ऐसा राव असतां । महाराष्‍ट्रधर्मीं वर्ततां । आपुला द्वेष तत्त्वतां । न करील जाण पां ॥३४॥
ऐसा राजा असतां बरवें । ज्ञानवंत असे स्वभावें । ब्रह्मद्वेषी नव्हे पहावें । पुण्यश्लोक म्हणती ऐसा ॥३५॥
नगरलोक पहावया येती । नमस्कारिती अतिप्रीतीं । राजे चरणचालीं येती । लोक म्हणती आश्चर्य ॥३६॥
एक म्हणती हा होय देव । म्हणोनि भजतो म्लेंच्छराव । या कलियुगीं अभिनव । देखिलें म्हणताती सकळिक ॥३७॥
सवें वाजंत्र्यांचे गजर । बंदीजन वाखाणिती अपार । राजा हर्षें निर्भर । घेऊनि जातो गुरुसी ॥३८॥
नानापरीचीं दिव्य वस्त्रें । वांटीतसे राजा पवित्रें । द्रव्य ओवाळुनि टाकी पात्रें । भिक्षुक तुष्‍टले बहुत देखा ॥३९॥
ऐशा समारंभें देखा । घेऊनि गेला राजा ऐका । महाद्वारीं पातलें सुखा । पायघडया अंथरती ॥२४०॥
नानापरीचीं दिव्यांबरें । मार्गीं अंथरती अपारें । वाजती भेरी वाजंत्रें । राजगृहा पातले ॥४१॥
मरासिंहासनस्थानीं । श्रृंगार केला अतिगहनीं । जगद्‌गुरुतें नेऊनि । सिंहासनीं बैसविलें ॥४२॥
राजमंदिरींच्या नारी । आरत्या घेऊनिया करीं । ओवाळिती हर्षनिर्भरीं । अनन्यभावें करोनियां ॥४३॥
समस्त लोक बाहेर ठेवोन । श्रीगुरु होते एकले आपण । सवें शिष्य चवघेजण । जवळी होते परियेसा ॥४४॥
अंतःपुरींचे कुलस्त्रियांसी । पुत्रपौत्रीं सहोदरासी । भेटविलें राजें परियेसीं । साष्‍टांगीं नमन करिती ते ॥४५॥
राजा विनवी स्वामियासी । पुण्यें देखिलें चरणांसी । न्याहाळावें कृपादृष्‍टीसी । म्हणोनि चरणीं लागला ॥४६॥
संतोषले श्रीगुरुमूर्ति । तयांसी आशीर्वाद देती । राजयातें बोलाविती । पुसताती गृहवार्ता ॥४७॥
श्रीगुरु म्हणती तयासी । संतुष्‍ट झालास कीं मानसीं । अजूनि व्हावें कांहीं भावेंसी । विस्तारोनि सांग म्हणती ॥४८॥
राजा विनवी स्वामियांसी । अंतर पडतें चरणासी । राज्य केलें बहुवसीं । आतां द्यावी चरणसेवा ॥४९॥
ऐसें ऐकोनि श्रीगुरु म्हणती । आमुची भेटी श्रीपार्वतीं । तुझे पुत्र राज्य करिती । तुवां यावें भेटीसी ॥२५०॥
ऐसा निरोप देऊनि । श्रीगुरु निघाले तेथोनि । राजा विनवी चरण धरोनि । ज्ञान मजला असावें ॥५१॥
कृपासिंधु गुरुनाथ । ज्ञान होईल ऐसें म्हणत । आपण निघाले त्वरित । गेले गौतमी- तीरासी ॥५२॥
स्नान करोनि गौतमीसी । आले गाणगापुरासी । आनंद झाला समस्तांसी । श्रीगुरुचरणदर्शनें ॥५३॥
संतुष्‍ट झाले समस्त लोक । पहावया येती कौतुक । वंदिताती सकळिक । आरती करिती मनोभावें ॥५४॥
समस्त शिष्यांतें बोलाविती । श्रीगुरु त्यांसी निरोपिती । प्रगट झाली बहु ख्याति । आतां रहावें गुप्तरुपें ॥५५॥
यात्रारुपें श्रीपर्वतासी । निघावें आतां परियेसीं । प्रगट बोले हेचि स्वभावेंसी । गुप्तरुपें राहूं तेथें ॥५६॥
स्थान आपुलें गाणगापुरीं । येथूनि न वचे निर्धारीं । लौकिकमतें अवधारीं । बोल करितों श्रीशैलयात्रा ॥५७॥
प्रगट करोनिया यात्रेसी । वास निरंतर गाणगाभुवनासी । भक्तजन तारावयासी । राहूं येथें निर्धार ॥५८॥
कठिण दिवस युगधर्म । म्लेंच्छराजा क्रूरकर्म । प्रगटरुपें असतां धर्म । समस्त म्लेंच्छ येती ॥५९॥
राजा आला म्हणोनि । समस्त यवन ऐकोनि । सकळ येती मनकामनी । म्हणोनि गुप्त असावें ॥२६०॥
ऐसें म्हणोनि शिष्यांतें । सांगितलें श्रीगुरुनाथें । सिद्ध सांगे नामधारकातें । चरित्र ऐसें श्रीगुरुचें ॥६१॥
पुढें येतील दुर्दिन । कारण राज्य यवन । समस्त येती करावया भजन । म्हणोनि गुप्त राहिले ॥६२॥
लौकिकार्थ दाखवावयासी । निघाले आपण श्रीशैल्यासी । कथा असे विशेषी । सिद्ध म्हणे नामधारका ॥६३॥
गंगाधराचा सुत । सरस्वती असे विनवीत । प्रत्यक्ष असे श्रीगुरुनाथ । देखिलें असे गाणगापुरीं ॥६४॥
सद्भावें भजती भक्तजन । त्यांची कामना होईल पूर्ण । संदेह न धरीं अनुमान । त्वरित सिद्धि असे जाणा ॥६५॥
न लागतां कष्‍ट सायास । कामना पुरती गाणगापुरास । भक्तिभावें विशेष । कल्पवृक्ष तेथें असे ॥६६॥
जें जें कल्पिलें फळ । त्वरित पावती सकळ । धनधान्यादि विपुळ । पुत्रपौत्रादि शीघ्र होती ॥६७॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । हें गुरुचरित्र दिनीं निशीं । मनोभावें वाचनेंसी । सकळ कामना पुरतील ॥६८॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । सिद्ध नामधारका सांगत । यवनाचा उद्धार येथ । तुम्हांकारणें सांगितला ॥२६९॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे सार्वभौमस्फोटकशमने ऐश्वर्यावलोकने वैदुरीप्रवेशो नाम पंचाशत्तमोऽध्यायः ॥५०॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॥ ओवीसंख्या ॥२६९॥

गुरूचरित्रअध्यायएकावन्नावा

सर्व पहा

श्री योगेश्वरी देवी आणि परळी वैजनाथ यांच्या विवाहाची पौराणिक कथा माहिती आहे का?

Papankusha Ekadashi 2026 आज या वस्तूंचे दान करा, संपत्ती- समृद्धीत वाढ होईल

दिवाळीच्या सुट्टीत महाराष्ट्रातील ही ७ ठिकाणे कुटुंबासोबत फिरण्यासाठी ठरू शकतात उत्तम

Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments