शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रहण
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जून 2021 (10:11 IST)

Solar Eclipse 2021 : आज होणारं सूर्यग्रहण कधी आणि कुठून पाहता येईल?

2021 वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 10 जून रोजी होणार आहे. हे एक कंकणाकृती सूर्यग्रहण आहे.
 
आज (10 जून) होणारं सूर्यग्रहण भारतातील बहुतांश भागातून दिसणार नाही. नासानं प्रसिद्ध केलेल्या इंटरअॅक्टिव्ह मॅपनुसार भारतात हे सूर्यग्रहण केवळ लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागातूनच दिसेल. या भागांमध्ये सूर्यास्ताच्यावेळी थोड्यावेळासाठी ग्रहण दिसेल असं सांगितलं जातंय.
 
नासा या सूर्यग्रहणाचं लाइव्ह स्ट्रीमिंगही करणार आहे, जेणेकरून जगभरातील लोक हे सूर्यग्रहण पाहू शकतील.
 
मात्र, कॅनडाचा काही भाग, ग्रीनलंड आणि रशिया आणि परिसरातून हे ग्रहण दिसेल. कॅनडाच्या उत्तर आँटोरियो आणि लेक सुपिरियरच्या उत्तरेला असणाऱ्या नागरिकांना तब्बल 3 मिनिटं हे ग्रहण पाहता येईल.
 
ग्रीनलँडमधल्या लोकांना कंकणाकृती ग्रहण स्थिती - रिंग ऑफ फायर पाहता येईल. त्यानंतर सर्बिया आणि उत्तर ध्रुवावरूनही नागरिकांना कंकणाकृती ग्रहणाचा आनंद डोळ्यात सामावून घेता येईल.
 
यानंतर 4 डिसेंबर 2021लाही सूर्यग्रहण आहे. पण ते देखील भारतातून दिसणार नाही.
 
सूर्यग्रहण का होतं?
अमावस्येला सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो. म्हणजे सूर्याला ग्रहण लागतं.
 
ही ग्रहणं तीन प्रकारची असतात आणि शाळेत याविषयी आपण शिकलो आहोत. खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती.
 
ग्रहणाच्या स्थितीत सूर्य, चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर किती आहे? ते नेमके सरळ रेषेत आहेत का? आणि तुम्ही पृथ्वीवर नेमके कुठे आहात? या तीन गोष्टींवर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो.
 
खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय?
पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्याला 'खग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात. सूर्याचा केवळ काही भाग झाकलेला दिसतो, त्याला 'खंडग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात.
 
एरवी चंद्र सूर्यापेक्षा, अगदी पृथ्वीपेक्षाही खूपच लहान आहे. पण तो पृथ्वीपासून जवळ आहे. त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकारानं एकसारखे दिसतात. आणि म्हणूनच खग्रास स्थितीत चंद्राचं बिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकतं.
 
पण पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षा काहीशा लंबगोलाकार आहेत. चंद्र या कक्षेत पृथ्वीपासून दूरच्या बिंदूजवळ असतो, अशा वेळी पृथ्वीवरून चंद्रबिंबाचा आकार सूर्यबिंबापेक्षा लहान दिसतो.
 
याचदरम्यान जेव्हा सूर्यग्रहण होतं, तेव्हा चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो; पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही, तर एखाद्या कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी सूर्याची कडा दिसून येते. त्यालाच 'कंकणाकृती सूर्यग्रहण' म्हणतात.
 
सूर्याच्या या स्थितीला खगोलप्रेमींनी 'Ring of Fire', अग्निवलय, अग्निकंकण अशीही नावं दिली आहेत.
 
कंकणाकृती ग्रहणात चंद्राच्या थेट छायेखाली असलेल्या प्रदेशातच 'ring of fire' दिसून येते. तर त्याच्या आसपासच्या प्रदेशात खंडग्रास ग्रहण पाहायला मिळतं.
 
भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा पुढचा योग 21 मे 2031 रोजी येणार आहे.
 
ग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी?
ग्रहण पाहताना कधीही सूर्याकडे थेट पाहू नका. कारण सूर्याच्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.
 
ग्रहण पाहण्यासाठीचे खास फिल्टर लावलेले चष्मे घालूनच ग्रहण पाहावे. पिनहोल कॅमेरा, घरातली चाळणी किंवा सौर दुर्बिणीच्या माध्यमातून सूर्याचं प्रतिबिंब एखाद्या पडद्यावर पाडून ग्रहणाची स्थिती पाहता येते.
 
तुमच्या शहरात किंवा शाळेत एखादं विज्ञानकेंद्र असेल किंवा विज्ञानप्रेमींची संस्था असेल, तर तिथे अनेकदा ग्रहण पाहण्यासाठी विशेष सोय केलेली असेल. त्याविषयीची माहितीही तुम्ही घेऊ शकता.
 
ग्रहणाविषयीचे समज-गैरसमज
 
जगभरात असे अनेक जण आहेत ज्यांच्या मनात ग्रहणाविषयी अनेक समज-गैरसमज असतात. काहींना वाटतं ग्रहण हे जगबुडीचं प्रतीक आहे. त्याबाबातचा एक इशारा आहे.
 
ग्रहणाविषयी सामान्यांना जितकी उत्सुकता वाटत आली आहे, तितकीच भीतीही वाटत आली आहे.
 
खरं तर माणसाला ग्रहणाच्या उगमाविषयी काहीएक माहिती नव्हती, तेव्हा त्याने याविषयीच्या कथा रचायला सुरुवात केली.
 
17 व्या शतकातले यूनानी कवी आर्कीलकस यांनी म्हटलं की, भर दुपारी अंधार झाला आहे आणि आता या अनुभवानंतर त्यांना कोणत्याच गोष्टीचं आश्चर्य वाटणार नाही.
 
विशेष म्हणजे आज आपल्याला ग्रहणाबाबतचे वैज्ञानिक कारणं माहिती असूनही त्यासंदर्भातल्या कथा आणि अंधश्रद्धा आजही कायम आहेत.