सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Video : कसे होते गजानन महाराज?

शरीरयष्टी- सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती गजानन महरांची देहचर्या. लांब लांब पावले टाकीत सदनकाकडे घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती. पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व त्यास छापी अर्थाक कपडा गुंडाळलेली.
खाण्याची आवड- महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमार्यदपणे चित्रविचत्र खावे तर कधी तीन- चार दिवस उपाशी राहावे. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सिकपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्नभावाने त्याचेही सेवन करावे.
 
काहींच्या मते महाराज हे 1857 च्या ऐतिहासिक बंडातील स्वातंत्र्य सेनानी होते. काहींच्या मते ते सुप्रसिद्ध क्रांतिकारक तात्या टोपे होते. मात्र त्यास पुरावा नाही. काहींच्या मते समर्थ रामदास स्वामी पुन्हा एकदा महाराजांच्या रूपाने जन्म घेत झाले असे सांगितले जाते.
 
याविषयी महाराजांनी मौन बाळगणे हे सूचक लक्षण समजावे. वास्तविक पाहता महराजांचे राहणीमान वर्‍हाडी थाटाचे होते. तरीही काही प्रसंगी त्यांचे बोलणे अत्यंत स्पष्ट उच्चार व शास्त्रशुद्ध भाषा अशा पद्धतीचे असे. त्यांना चारही वेद मुखोदगत होते. खेडवळ भाषेसोबत क्वचित प्रसंगी उत्कृष्ट हिंदी व स्पष्ट इंग्रजीमध्ये त्यांनी संवाद साधल्याचे वर्णनही काही भक्तांच्या आठवणींमधून स्पष्ट झाले आहे. महाराजांना गायनकला अवगत होती.
 
सर्व धर्मग्रंथाचे त्यांना आकलन झाले होते. कोणत्याही घटनेविषयी सांगताना ते अचूकपणे ओव्या व ऋचा सांगून त्यांचे स्पष्टीकरण करीत असत. महाराज अंतर्ज्ञानी होते. मात्र त्यांनी कोणत्याही भक्ताशी थेटपणे फारसा संवाद साधला नाही. त्यांचे बोलणे भरभर, परंतु त्रोटक असे. बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वत:मध्ये मग्न राहून ते बोलत असत. ते कुणासही उद्देशून बोलत नसत. त्यामुळे त्यांचे बोलणे आपल्याशी किंवा आपल्याविषयी आहे याचे भान व तारतम्य त्यांच्या भक्तांना बाळगावे लागे.