बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री भक्तविजय अध्याय ५४

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीराधारमणाय नमः ॥    
जय जय विश्वव्यापका रुक्मिणीपती ॥ तूंचि माझी धनसंपत्ती ॥ माता पिता बंधु निश्चितीं ॥ तुजविण विश्रांति असेना ॥१॥
तूंचि माझें अध्यात्मज्ञान ॥ तूंचि माझें श्रवणमनन ॥ तूंचि माझें गीर्वाणभाषण ॥ प्राकृत बोलणें तूंचि माझें ॥२॥
तूंचि माझी चातुर्यकळा ॥ वक्ता वदविता घनसांवळा ॥ तूंचि माझा प्रेमजिव्हाळा ॥ दीनदयाळा श्रीपते ॥३॥
तूंचि माझा अचुक लेखक ॥ विशाळबुद्धी वैकुंठनायक ॥ तूंचि माझें अक्षय्य सुख ॥ सद्गुरु तारक तूं माझा ॥४॥
तूंचि माझा प्रेमळ श्रोता ॥ समयीं वचन आठव देता ॥ तुझी कृपा असतां अनंता ॥ लोभ ममता बाधेना ॥५॥
तुवां कृपा केलिया श्रीपती ॥ अज्ञान तेचि ज्ञानी होती ॥ जैसी तमें दाटलियां राती ॥ उगवे गभस्ति अवचित ॥६॥
मग अंधारचि होय प्रकाश ॥ तेथें संशय कोणता असे ॥ तुझी कृपा होतां तैसें ॥ अज्ञान निरसे मुळींहूनि ॥७॥
नातरी लोहास परीस झगटे ॥ मग त्याची काळिमा राहील कोठें ॥ कीं ओहळावरी गंगा लोटे ॥ मग तो पवित्र होय जैसा ॥८॥
तेवीं तूं कृपादृष्टीं जयातें ॥ अवलोकिसील आपुलें मतें ॥ तरी त्याची कीर्ति त्रिभुवनांत ॥ होईल निश्चित निरुपम ॥९॥
जें प्रेमळ भक्त अति विरक्त ॥ क्षणमात्र तुज न विसरत ॥ त्या संतांचीं चरित्रें अघटित ॥ लिहवीं निश्चित मम हस्तें ॥१०॥
मागील अध्यायाचे शेवटीं जाण ॥ कौतुक दाखवी जगज्जीवन ॥ पेवांत धान्य घालून ॥ ठेविलीं भरून क्षणमात्रें ॥११॥
आणि शेत वांटिलें यात्रेकर्‍यांस ॥ मग थोट्या ताटांसी आलीं कणसें ॥ हें कौतुक देखोनि विशेष ॥ आश्चर्य सर्वांस वाटलें ॥१२॥
म्हणती बोधला ईश्वरअवतार ॥ यास न म्हणावें प्राकृत नर ॥ आम्ही अज्ञान अति पामर ॥ छळिलें साचार तयासी ॥१३॥
रितीं पेवें भरली होतीं ॥ बोधल्यानें लुटविलीं विप्रांहातीं ॥ जैसीं मोगर्‍यासी पुष्पें येती ॥ तो विलासियांप्रति देतसे ॥१४॥
कां कमळिणींत मकरंद आला जाण ॥ तो वांटोनि देती मिलिंदांकारण ॥ कीं मेघामाजी सांचलें जीवन ॥ तो देत रिचवोन पृथ्वीवरी ॥१५॥
तेवीं प्रसन्न होऊनि हृषीकेशी ॥ धान्य दिधलें बोधल्यासीं ॥ तेणें उदास होऊनि मानसीं ॥ वांटिलें विप्रांसी तत्काळ ॥१६॥
थोट्या ताटांस आलीं जीं कणसें ॥ तीं पाहावयास येती माणसें ॥ कीर्ति प्रकटली देशोदेशें ॥ म्हणती महिमा विशेष संतांचा ॥१७॥
एके दिवसीं प्रेमळ भक्त ॥ बैसला होता शेत राखित ॥ तों हांसी कुणबीण अकस्मात ॥ चरणीं लागत येऊनि ॥१८॥
म्हणाल हांसी कवणाची कवण ॥ तरी सविस्तर ऐका अनुसंधान ॥ दोन कोश धामणगांवाहून ॥ राळेरास ग्राम असे ॥१९॥
तेथील पाटील मोकदम खरा ॥ जो बोधल्याचा सखा सासरा ॥ तो निमोनि गेलिया मोक्षघरा ॥ ममतायी माहेरा अंतरली ॥२०॥
बंधु दोघे होते दुर्बद्धी ॥ ते समाचार न घेती कधीं ॥ जयांसी अहंकाराची व्याधी ॥ जोडली त्रिशुद्धी निजकर्में ॥२१॥
हांसी कुणबीण त्यांचें घरीं ॥ परम भाविक अंतरीं ॥ प्रपंच धंदा सारितां करीं ॥ भजन हरीचें सर्वदा ॥२२॥
राळेरास आणि धामणगांव ॥ दोहींची एकवट आहे शींव ॥ मेरेसी शेत भक्तवैष्णवें ॥ धरिलें होतें एकदां ॥२३॥
राळेरासकर जे अभक्त ॥ त्यांचें यांचें शेजारीं शेत ॥ त्यांनीं हांसी कुणबीण स्वतंत्र ॥ शेतीं राखण ठेविली ॥२४॥
माळावरी बैसोनि नित्य ॥ बोधला हरीचे गुण वर्णीत ॥ हांसी कुणबीण येऊनि तेथ ॥ श्रवण करीत निजप्रीतीं ॥२५॥
तिनें एकदां दृढ धरूनि पाय ॥ प्रेमळ भक्तासी बोले काय ॥ जेणें माझें संसारीं सार्थक होय ॥ तैसा उपाय सांगावा ॥२६॥
ऐकोनि बोधला मानसीं म्हणे ॥ इचें तंव शरीर पराधीन ॥ जप तप ध्यान तीर्थाटन ॥ नये घडोन सर्वथा ॥२७॥
दासे दास कांता जाण ॥ पराधीन सर्वदा यांचें जिणें ॥ गाई वृषभ अश्ववहन ॥ तयांसी समान म्हणावीं ॥२८॥
दुष्कृताचा वांटा परम ॥ म्हणूनि होतो यांचा जन्म ॥ कांहींएक नित्यनेम ॥ यांजकारणें घडेना ॥२९॥
आतां उगेंचि धरितां मौन ॥ तरी इच्या प्रेमाचें होईल खंडन ॥ ऐसें म्हणोनि वैष्णवजन ॥ काय बोलत तेधवां ॥३०॥
ऐक हांसे माझें वचन ॥ तुवां आम्हांसी पुसिलें साधन ॥ तरी संसारधंदा राहाटतां जाण ॥ करावें चिंतन श्रीहरीचें ॥३१॥
आणि पंदह्रा दिवसीं एकादशी ॥ तुवां राहावें उपवासी ॥ निशाकाळीं कीर्तनासी ॥ धामणगांवासी येइंजे ॥३२॥
चार प्रहर जाहलिया श्रवण ॥ प्रातःकाळीं करावें गमन ॥ आपुल्या धन्यासी पुसोन ॥ चालवीं नेम आपुला ॥३३॥
तरी तुझें सार्थक होईल पाहें ॥ पांडुरंगाचे जोडतील पाय ॥ सगुणस्वरूपाची भेट होय ॥ येथें संशय न धरावा ॥३४॥
वचन ऐकोनि ते समयीं ॥ हांसीनें मिठी घातली पायीं ॥ म्हणे एकादशीस धामणगांवीं ॥ येत जाईन निश्चित ॥३५॥
ज्यासी जो अधिकार निश्चित ॥ तैसेंचि साधन सांगती संत ॥ जैसा सद्वैद्य ध्यानासी रोग आणीत ॥ मग औषध देत त्या रीतीं ॥३६॥
कीं नृपवर भद्रीं बैसोनि जाणा ॥ अधिकार सांगत प्रधाना ॥ कीं गृहचारिणी धरूनि शाहाणपणा ॥ वागवीत सुना आपुल्या ॥३७॥
नातरी विवेकी सावकार जाण ॥ उदीम पाहोनि देतसे ऋण ॥ कीं चतुर वक्ता सभा देखोन ॥ करीत कीर्तन तैसेंचि ॥३८॥
कां मृदु कठिण पाषाण जाणती ॥ मग पाथरवट तैशाचि टांक्या हाणिती ॥ तेवीं आधीं योग्यतां संत पाहाती ॥ मग साधन सांगती तैसेंचि ॥३९॥
असो बोधल्याची वचनोक्ती ॥ हांसीनें दृढ धरिली चित्तीं ॥ मग संसारधंदा करितां प्रीतीं ॥ नामस्मरण करीतसे ॥४०॥
हरिदिनीचे दिवसीं उठोनि पाहीं ॥ कार्य करावें लवलाहीं ॥ मग धन्यासी पुसोनि धामणगांवीं ॥ कीर्तनसमयीं जातसे ॥४१॥
बोधल्याची कथा प्रेमळ बहुत ॥ अज्ञान्यासी कळे अन्वयार्थ ॥ भोंवरगांवींचे लोक समस्त ॥ श्रवणासी येत निजप्रीतीं ॥४२॥
नातरी येती बहुत जन ॥ वाड्यांत होतसे अडचण ॥ मग चोहाटी उभा राहून ॥ सप्रेम कीर्तन करीतसे ॥४३॥
दोन रांजण पाणी भरून ॥ हांसी ठेवीत लोकांकारण ॥ आपुले हातें खराटा घेऊन ॥ जागा निर्मळ करीतसे ॥४४॥
आकाश तेंचि मंडपाकार ॥ पृथ्वी हेंचि आसन थोर ॥ बोधल्याचा कीर्तनगजर ॥ ऐकोनि सुरवर आनंदती ॥४५॥
तंव एके दिनीं हरिदिनीसीं ॥ राळेरासकर कीर्तनासी ॥ येत असतां ग्रामापासीं ॥ तंव डसला एकासी महासर्प ॥४६॥
तत्काळचि झेंडू येऊन ॥ तेथेंच त्याचा गेला प्राण ॥ समागमें होते त्यांनीं उचलून ॥ कीर्तनांत आणून बैसविला ॥४७॥
एकमेकांशीं विचार करिती ॥ कळों न द्यावें कवणाप्रती ॥ श्रीरामनामाची बहुत ख्याती ॥ बोधला लोकांसी सांगतसे ॥४८॥
म्हणती रामनामें प्रर्‍हादभक्त ॥ टाकितां न जळे अग्निआंत ॥ विष तेंहीं होतें अमृत ॥ ऐसी प्रचित नामाची ॥४९॥
तरी त्याजवरी निमित्त ठेवूं आपण ॥ कीर्तनांत गेले याचे प्रान ॥ हें उठविसील तरी सत्य जाण ॥ यथार्थ महिमान नामाचें ॥५०॥
ऐसें बोलोनि ते दुर्मती ॥ उगेच निवांत श्रवण करिती ॥ तंव बोधराज सांगे लोकांप्रती ॥ अनुपम ख्याती नामाची ॥५१॥
ऐका ऐका सकळ जन ॥ नाम फुकाचें अति पावन ॥ गोड तरी अमृताहून ॥ मी प्रचीत पाहून बोलतों ॥५२॥
तरी सकळीं पिटोनि टाळी ॥ विठ्ठलनामें द्या आरोळी ॥ वचन ऐकोनि ते वेळीं ॥ श्रोते गर्जती निजप्रेमें ॥५३॥
ज्यांनीं कीर्तनांत बसविलें प्रेत ॥ ते बोधल्यासी काय बोलत ॥ आम्हांपुढें बैसला हा गृहस्थ ॥ नाहीं उच्चारित हरिनाम ॥५४॥
सर्प डसोनि पावला मृत्य ॥ हें बोधल्यास नाहीं श्रुत ॥ मग मृत प्रेतास प्रेमळ भक्त ॥ काय बोलत तें ऐका ॥५५॥
बापा येऊनि नरदेहास ॥ हरिभजनाचा न करीं आळस ॥ आतां टाळिया पिटोन उल्हास ॥ मुखें नामघोष उच्चारीं ॥५६॥
बोधल्याचिया कीर्तनांत ॥ लीलानाटकी पंढरीनाथ ॥ ऐकोनि निजभक्ताची मात ॥ विचार करीत मानसीं ॥५७॥
म्हणे याचे तंव गेले आहेत प्राण ॥ हें श्रुत नाहीं बोधल्याकारण ॥ नामउच्चार न करितां येणें ॥ विक्षेप मन पावेल कीं ॥५८॥
मी सन्निध असतां पांडुरंग ॥ वितळोन जाईल कीर्तनरंग ॥ मग यमघर्मासी रुक्मिणीरंग ॥ निजमुखें सांगे तेधवां ॥५९॥
कीर्तनांत प्रेत बैसलें जाण ॥ याचे सत्वर परतवीं प्राण ॥ ऐकोनि कृपासिंधूचें वचन ॥ अवश्य म्हणे श्राद्धदेव ॥६०॥
तों प्रेत उठोनि त्या वेळीं ॥ नामघोषें पिटिली टाळी ॥ बोधल्याचे चरणकमळीं ॥ मिठी घातली तयानें ॥६१॥
मग त्याचे सांगाती उठोनि त्वरित ॥ बोधल्यास सांगती वृत्तांत ॥ ऐसी श्रोतयांनीं ऐकतां मात ॥ वाटलें आश्चर्य सकळांसी ॥६२॥
जयजयकारें पिटोनि टाळी ॥ आनंदली भक्तमंडळी ॥ बोधल्याचें नेत्रकमळीं ॥ अश्रुपात लोटले ॥६३॥
म्हणे देवाधिदेवा भक्तवत्सला ॥ मज अनाथासी पाळिसी लीला ॥ मज वृत्तांत असता कळला ॥ तरी विक्षेप वाटला असता कीं ॥६४॥
जैसी मक्षिका अन्नांत पडतां ॥ ती बालकासी न सांगतां काढी माता ॥ तेवीं आमुचा आघात रुक्मिणीकांता ॥ तूं न सांगतां निवारिसी ॥६५॥
यापरी आळवून कमळापती ॥ मग उजळिली मंगळारती ॥ ओंवाळूनि श्रीरुक्मिणीपती ॥ नमस्कार प्रीतीं घातला ॥६६॥
धामणगांवींचे नारीनर ॥ म्हणती बोधला ईश्वरी अवतार ॥ करावया जनांचा उद्धार ॥ आला मृत्युलोकीं ॥६७॥
प्रेत उठविलें कीर्तनांत ॥ हें दृष्टीसी देखोनियां चरित ॥ हांसीचा प्रेमभावार्थ ॥ दिवसेंदिवस वाढला ॥६८॥
पंधरा दिवसीं धामणगांवांत ॥ येऊनि कीर्तन श्रवण करीत ॥ ऐसें तीन वर्षेपर्यंत ॥ लोटतां अरिष्ट ओढवलें ॥६९॥
साधकीं करितां ईश्वरभजन ॥ त्यांजवळी येतसे महाविघ्न ॥ जेवीं दुग्धें भरूनि ठेवितां भाजन ॥ मार्जार लवंडूं पाहातसे ॥७०॥
कुपथ्यापासीं रोग सकळ ॥ कीं देहासी अखंड जपतो काळ ॥ कीं योगियासी सिद्धी निश्चळ ॥ गोवूं पाहाती एकांतीं ॥७१॥
नातरीं द्रव्यापासीं जपतो तस्कर ॥ कीं श्वापदासी धरूं पाहे व्याघ्र ॥ कीं निशापतीसी समग्र ॥ राहु आडवा येऊं पाहे ॥७२॥
तेवीं ईश्वरभक्ति करितां जाण ॥ संचरूं पाहे अवचित विघ्न ॥ असो मागील अनुसंधान ॥ परिसा सज्जन निजप्रीतीं ॥७३॥
बोधल्याचा अनुग्रह घेतां जाण ॥ दासीस जाहलें पूर्ण ज्ञान ॥ एकादशीसी ऐकोनि कीर्तन ॥ करी गमन एकांतीं ॥७४॥
नामीं बैसला विश्वास ॥ तो निरंतर लागला निदिध्यास ॥ ऐसीं लोटलीं तीन वर्षें सावकाश ॥ तों पातलें भक्तीस महाविघ्न ॥७५॥
ममताईचे बंधु दोघे जण ॥ विभक्त राहूं पाहाती जाण ॥ म्हणोनि हांसी कुणबीण ॥ विकरीं घातली तयांनीं ॥७६॥
परस्परें गांवांत जाहलें श्रुत ॥ तिचे कर्णीं प्रकटली मात ॥ मग मानसीं झाली चिंताक्रांत ॥ म्हणे कर्म बळवंत माझें कीं ॥७७॥
मग धंदा सारूनि लवलाहीं ॥ सत्वर आली धामणगांवीं ॥ बोधल्याचे एकांतसमयीं ॥ चरण दोन्ही धरियेले ॥७८॥
कंठ जाहला सद्गदित ॥ नेत्रीं वाहाती अश्रुपात ॥ हे अवस्था देखोनि प्रेमळ भक्त ॥ काय बोलत तियेसी ॥७९॥
हांसे नवल वाटतें चित्ता ॥ विपरीत देखोनि तुझी अवस्था ॥ काय उद्भवली चित्तीं चिंता ॥ ते तत्त्वतां मज सांगें ॥८०॥
हांसी म्हणे गा बोधराया ॥ मायबापा जिवलगा सखया ॥ आजपासोनि तुझिया पायां ॥ मी अंतरलें निश्चित ॥८१॥
धन्यांनीं विकरीं घातलें जाण ॥ गिर्‍हाईकही आलें दुरून ॥ आतां माझे श्रवणीं तुमचें कीर्तन ॥ पडेल कोठून स्वामिया ॥८२॥
बोधला म्हणे ऐक माते ॥ देहाचें प्रारब्ध असेल जेथें ॥ जाणें लागेल निश्चयें तेथें ॥ तूं कासया खंती करितेसी ॥८३॥
तरंग सागरा आंतौते ॥ ते वाहात फिरती सभोंवते ॥ परी जीवनाविण नाहींत ते ॥ दृष्टीस दिसतें सकळांच्या ॥८४॥
तेवीं आनंदसागर श्रीपांडुरंग ॥ आपण जीव त्याचे तरंग ॥ ऐसें जाण तूं अंतरंग ॥ मग चित्तीं वियोग बाधेना ॥८५॥
यावरी हांसी उत्तर देत ॥ मी याजसाठीं नाहीं रडत ॥ शिंवेशेजारीं तुमची संगत ॥ ते मज निश्चित अंतरली ॥८६॥
इतुकें बोलोनियां जाण ॥ तेथेंचि पडली मूर्च्छा येऊन ॥ मागुती देहासी सांवरून ॥ गृहांत जाऊन बोलत ॥८७॥
ममताईसी म्हणे ते अवसरा ॥ तुमचे बंधूंनीं मज घातले विकरां ॥ म्हणोनि आजि दुःखसागरा ॥ मी पडिलें जननीये ॥८८॥
तरी तुम्ही ठेवूनि आपुलें घरीं ॥ द्रव्य घाला त्याचे पदरीं ॥ ऐसें म्हणोनि ते अवसरीं ॥ पायांवरी लोटली ॥८९॥
दासीची अवस्था देखोनि नयनीं ॥ करुणा उपजली ममताईचें मनीं ॥ म्हणे कांहींतरी उपाय करूनी ॥ इजलागोनि सोडवणें ॥९०॥
आपुल्यासी द्रव्य न मिळे जाण ॥ तरी धामणगांवींचें विकावें वतन ॥ परी अनाथासी सोडवणें ॥ विचार मनीं दृढ केला ॥९१॥
बोधराज येऊनि मंदिरीं ॥ हांसीस अभय दिधलें करीं ॥ म्हणे तूं गृहास जाईं पुढारी ॥ मागूनि सत्वरीं मी येतों ॥९२॥
वचन ऐकूनियां ऐसें ॥ तिजला समाधान झालें कैसें ॥ जेवीं मृत प्रेतावरी सायासें ॥ अमृत वर्षे ज्यापरी ॥९३॥
कीं वणवा लागतां वर्षला घन ॥ तेणें विझोनि जाय कृशान ॥ मग तरुवरांसी शीतळपण ॥ नवे पल्लव फुटती ॥९४॥
तेवीं बोधल्याचें अभयवचन ॥ ऐकूनि दासीस वाटलें समाधान ॥ मग राळेरासी उठोन ॥ गेली असे सत्वर ॥९५॥
मग बोधराज मागूनि जाऊनि तेथ ॥ आपुल्या मेहुण्यांसी काय बोलत ॥ तुम्ही दासीस विकितां निश्चित ॥ ऐकिली मात परस्परें ॥९६॥
ऐसें चित्तीं असेल जरी ॥ तरी हे द्यावी आमुचें घरीं ॥ मोल सांगाल जें निर्धारीं ॥ तें देऊं सत्वरी पाठवूनि ॥९७॥
बोधल्याचें वचन पडतां कानीं ॥ दुर्बुद्धी संतप्त जाहले मनीं ॥ म्हणती आमुचें मनुष्य तुमचें सदनीं ॥ न देऊंच आम्ही सर्वथा ॥९८॥
शिंवेशेजारीं वतनदार ॥ पुरातन सोयरे निर्धार ॥ आणिका फुकट देऊं पर ॥ न देऊं साचार तुम्हांसी ॥९९॥
ऐकूनि अभिमानाची मात ॥ निवांत राहिला विष्णुभक्त ॥ हांसी आक्रंदत मंदिरांत ॥ म्हणे कर्म विचित्र पैं माझें ॥१००॥
मग बोधराज म्हणे हांसीकारण ॥ सोयर्‍यांदेखतां बोले वचन ॥ मी विठोबाची विनंति करून ॥ तुजकारण आणवितो ॥१॥
ऐसें म्हणूनि ते समयीं ॥ परतूनि आले धामणगांवीं ॥ कांतेपासीं वृत्तांत सर्वही ॥ सांगितला तेधवां ॥२॥
इकडे राळेरासी पिशुनांसी ॥ परम भय उपजलें मानसीं ॥ म्हणे बोधला सांगोनि विठोबासी ॥ मारवील हांसीस निश्चयें ॥३॥
येथें बोलोनि गेला पण ॥ तें कदापि नव्हे असत्य वचन ॥ तरी आतां ग्राहिक सत्वर आणोन ॥ इजकारण ओपावें ॥४॥
तों परग्रामींचें घेणार ॥ तेचि दिवसीं आले सत्वर ॥ हांसी आणि तिची कुमर ॥ विकत घेतली तयांनीं ॥५॥
पंचवीस होन देऊनि त्वरित ॥ लिहून घेतलें खरेदीखत ॥ हांसी कुणबीण आक्रंदत ॥ म्हणे पंढरीनाथ न ये कीं ॥६॥
दीनदयाळा पंढरीनाथा ॥ माझ्या धांवण्या धांव आतां ॥ सांडोनियां देहममता ॥ प्राण तत्त्वतां देईन मी ॥७॥
बोधला सांगोनि गेला मज ॥ कीं विठोबा येऊनि नेईल तुज ॥ तरी त्याचें वचन असत्य आज ॥ होईल ऐसें वाटतें ॥८॥
जाणोनि दासांचें मनोगत ॥ तत्काळ पंढरीनाथ आले तेथ ॥ विप्रवेष घेऊनि त्वरित ॥ प्रकटला अनंत त्या ठायीं ॥९॥
पिशुनाचें अंगणीं सहज ॥ उभे ठाकले अधोक्षज ॥ हांसीस म्हणती तुज ॥ बोधराजें बोलाविलें ॥११०॥
ऐसी ऐकोनि विप्रवाणी ॥ दासीस हर्ष वाटला मनीं ॥ तिणें ब्राह्मणाचे चरणीं ॥ मिठी घातली निजप्रेमें ॥११॥
कौतुक वर्तलें अति अद्भुत ॥ तें सादर ऐका भाविक भक्त ॥ हांसीसहित पंढरीनाथ ॥ झाले गुप्त ते ठायीं ॥१२॥
हांसीची कन्या होती धाकुटी ॥ तेही पाठविली वैकुंठीं ॥ सोयरे कौतुक देखोनि दृष्टीं ॥ आश्चर्य करिती तेधवां ॥१३॥
म्हणती आश्चर्य जाहलें मोठें ॥ कुडीसहित गेली कोठें ॥ गिर्‍हाईक म्हणती प्राक्तन खोटें ॥ आमुचें दिसोन आलें कीं ॥१४॥
आम्हीं ग्रामीं नेली नसतां कुणबीण ॥ येथेंचि अदृश्य जाहली जाण ॥ तरी परतूनि द्यावे जी आमुचे होन ॥ ऐसें वचन बोलिले ॥१५॥
पिशुन म्हणती ते अवसरीं ॥ खरेदीखत दिधलें करीं ॥ आतां लांझा आमुचे पदरीं ॥ राहिला नाहीं सर्वथा ॥१६॥
मूळ आला होता जो ब्राह्मण ॥ बोधल्याचें नाम सांगितलें त्यानें ॥ तरी तुम्हीं धामणगांवासी जाऊन ॥ वxxद सांगणें तयासी ॥१७॥
यावरी गिर्‍हाईक काय बोलत ॥ परस्परें आम्हीं ऐकिली मात ॥ कीं बोधला तुम्हांपासीं विकत ॥ कुणबीण मागत होता कीं ॥१८॥
तुम्हीं दिधली नाहीं त्याजला ॥ मग तो जातेसमयीं काय बोलिला ॥ कीं विठोबा येऊनि इजला ॥ घेऊनि जाईल निश्चयें ॥१९॥
तरी तैसेंचि घडोनि आलें पाहीं ॥ त्याजकडे आमुचा वाद नाहीं ॥ तुम्हीं होन लवलाहीं ॥ टाकूनि द्यावे आमुचे ॥१२०॥
ऐसा परस्परें जाणा ॥ वाद लागला तिघां जणां ॥ भक्तकैवारी पंढरीराणा ॥ चरित्र वाढवी दासांचें ॥२१॥
आणिक चरित्र अद्भुत देख ॥ सादर परिसा भक्त भाविक ॥ धामणगांवांत अंत्यज एक ॥ असे चाळक बहुभाषी ॥२२॥
तो बोधल्यासी म्हणे एकांतीं ॥ उपदेश द्या जी मजप्रती ॥ तुमचे चरणीं लागली प्रीती ॥ म्हणोनि विनंती करीतसें ॥२३॥
ऐकोनि बोले प्रेमळ भक्त ॥मी अनुग्रह कोणासी नाहीं देत ॥ जरी आज्ञा करील पंढरीनाथ ॥ तरी पुसेन त्यातें एकांतीं ॥२४॥
मग ध्यानीं आणूनि वैकुंठनायक ॥ म्हणे देवा विनंति ऐक एक ॥ आपुले ग्रामींचा अनामिक ॥ दिसतो भाविक मजलागीं ॥२५॥
तो बहुत दिवस मज विनवीत ॥ म्हणे माझें मस्तकीं ठेवीं हात ॥ जरी आज्ञा देशील मज निश्चित ॥ तरी अंगीकार त्याचा करीन मी ॥२६॥
ऐकूनि बोधल्याचें वचन ॥ काय बोलती जगज्जीवन ॥ नीच यातीसी उपदेश जाण ॥ सर्वथा आपण न द्यावा ॥२७॥
जो अखंड अविश्वासी मनीं ॥ आणि अनास्था धरी शास्त्रश्रवणीं ॥ तरी सद्गुरूनें ॥ उपदेश सर्वथा न द्यावा ॥२८॥
पुस्तकाची फळश्रुती पाहून ॥ कामनिक करी आवर्तन ॥ ऐशा शिष्यासी सद्गुरूनें ॥ उपदेश सर्वथा न द्यावा ॥२९॥
जो मनीं धरूनि चावटी ॥ वाचकांसी खोदूनि पुसे गोष्टी ॥ त्यासी सद्गुरूनें कृपादृष्टीं ॥ पाहों नयेचि सर्वथा ॥१३०॥
शिष्य असावा सज्ञान विरक्त ॥ नातरी भाविक प्रेमळ भक्त ॥ ऐसें बोधल्यासी रुक्मिणीकांत ॥ असे सांगत एकांतीं ॥३१॥
हा तों अनामिक हीनयाती ॥ परम नष्ट चांडाळ कुमती ॥ हें तुज सत्य न वाटे चित्तीं ॥ तरी पाहें प्रचीती सत्वर ॥३२॥
तुझे खळ्यांतील रासपूजा ॥ उदयीक आहे भक्तराजा ॥ अनामिकासी बोलावूनि तुझा ॥ वृषभ मारवीं त्या हातीं ॥३३॥
तयासी दाखवीं ऐशी प्रीती ॥ हें वृत्त न सांगें कोणाप्रती ॥ जरी ही गोष्ट लोपली तयाहातीं ॥ तरी उपदेश तयाप्रति देइंजे ॥३४॥
बोधला म्हणे पंढरीनाथा ॥ मी हिंसाकर्म न करवीं सर्वथा ॥ कासया बैल मारवावा वृथा ॥ हें माझिया चित्ता नये कीं ॥३५॥
ऐकोनि म्हणे रुक्मिणीरमण ॥ माझी आज्ञा तुज प्रमाण ॥ हिंसाकर्माचें दूषण ॥ तुजकारण घडों नेदीं ॥३६॥
दुसरे दिवसीं अनामिक येऊन ॥ बोधल्याचे एकांतीं धरी चरण ॥ म्हणे अनुग्रह द्यावा मजलागून ॥ कृपा करून ये समयीं ॥३७॥
माणकोजी म्हणे ऐक महारा ॥ राशीवर कापीं आमुचा गोर्‍हा ॥ कोणासी कळों नेदींच विचारा ॥ तरी सच्छिष्य खरा तूं माझा ॥३८॥
अवश्य म्हणोनि ते अवसरीं ॥ अनामिकें बैल वधिला करीं ॥ मांस रांधोनि आणिके घरीं ॥ भात भाकरी करविल्या ॥३९॥
रास पूजावया बोधराजें ॥ मेळविले सोयरे गोत्रज ॥ मांस भाकरी देतां सहज ॥ अद्भुत चोज वाटलें त्यां ॥१४०॥
म्हणती बोधल्याची ढांसळली वृत्ती ॥ हिंसाकर्म करितो पुढती ॥ अजापुत्र मारूनि आजिचे रातीं ॥ मायवतां प्रीतीं जेववित ॥४१॥
परी वृषभ मारविला ऐसें जाणा ॥ हा विचार ठावा नाहीं कोणा ॥ जेवूनि आपुलालें सदना ॥ गेले सत्वर तेधवां ॥४२॥
तों अनामिकाचें फुगलें पोट ॥ म्हणे केव्हां होईल आतां पहांट ॥ सांगेन लोकांसी हे गोष्ट ॥ म्हणोनि वटवट करीतसे ॥४४॥
इतक्यांत उगवला दिनकर ॥ गांवांत गेला दुराचार ॥ फेरी करी एकसर ॥ मागे भाकर घरोघरीं ॥४५॥
रिघोनि कुणब्यांचें घरीं ॥ बैसे जाऊनि त्यांशेजारीं ॥ तंव ते म्हणती होईं दुरी ॥ कैसा भीतरीं आलासी ॥४६॥
तंव तो तयांसीं घाली वाद ॥ तुम्हां आम्हांत काय भेद ॥ बोधराजें काल प्रसिद्ध ॥ वृषभ मारिला राशीवरी ॥४७॥
आणि तुम्हीं मांस भक्षिलें साचार ॥ आतां मज कां धरितां दूर ॥ ऐसेच रीतीं घरोघर ॥ सांगे साचार लोकांसी ॥४८॥
गुणगुण उठली गांवांत ॥ म्हणती बोधल्यानें केलें अनुचित ॥ तो म्हणवीतसे हरिभक्त ॥ बाटविलें गोत आपुलें ॥४९॥
एक म्हणती हे सत्य मात ॥ एक म्हणती हें यथार्थ ॥ बोधल्याचा गोर्‍हा निश्चित ॥ नाहीं दिसत गोठणीं ॥१५०॥
गोत्रज सोयरे होऊनि गोळा ॥ एकांतीं बैसोनि विचार केला ॥ म्हणती पुरावें बोधल्याला ॥ कीं कैसें आम्हांसी बाटविलें ॥५१॥
अनामिकास म्हणती सकळ जन ॥ मुद्दा दाखविस्सी आम्हांकारण ॥ तो म्हणे वृषभाचें शिर कापून ॥ ठेविलें लपवून राशींत ॥५२॥
चर्म लपविलें भुसाआंत ॥ चला तुम्हांसी दाखवितों त्वरित ॥ ऐकोनि दुर्जनाची मात ॥ झाले संतप्त सकळिक ॥५३॥
म्हणती जाऊनि सकळ जन ॥ बोधल्याचा जिंवेंचि घ्यावा प्राण ॥ मग राजा पुसेल आपणांकारण ॥ तरी पडेल नागवण ते देऊं ॥५४॥
ऐसें बोलोनि दुराचारी ॥ डांगा घेतल्या आपुले करीं ॥ बोधल्यापासीं सत्वरी ॥ येऊन उभे राहिले ॥५५॥
तंव त्यानें लावूनि नेत्रपातीं ॥ हृदयीं चिंतिली श्रीविठ्ठलमूर्ती ॥ नामस्मरण एकांतीं ॥ करीत बैसला निजप्रेमें ॥५६॥
लोक म्हणती होईं सावध ॥ करावयासी आलों तुझा वध ॥ ऐसा कैसा रे तूं मैंद ॥ बाटविलें प्रसिद्ध सकळांसी ॥५७॥
बोधला म्हणे पंढरीनाथा ॥ ऐसिया संकटीं पावें आतां ॥ तुजवांचूनि कृपावंता ॥ कोण रक्षिता दीनासी ॥५८॥
तंव ते म्हणती दुराचार । तुज आतां न पावे रुक्मिणीवर ॥ आम्हांसी कापूनि घातलें ढोर ॥ भ्रष्टाकार केला कीं ॥५९॥
अनामिकासी म्हणती ते अवसरीं ॥ मुद्दा आणूनि दावीं सत्वरीं ॥ अवश्य म्हणोनि दुराचारी ॥ राशीभीतरीं पाहातसे ॥१६०॥
वृषभाचें शिर होतें त्यांत ॥ तें बोकडाचें करी पंढरींनाथ ॥ तयाऐसेंचि चर्म करीत ॥ देखिलें अकस्मात काढितां ॥६१॥
अनामिकें तें घेऊनि हातीं ॥ अधोमुख पाहे तो दुर्मती ॥ म्हणे म्यां वृषभ मारिला निश्चितीं ॥ विपरीत गति हे जाहली ॥६२॥
गांवकरी बोधल्यासी म्हणती पाहें ॥ तुझा गोर्‍हा जाहला काये ॥ तों कौतुक करी पंढरीराये ॥ जें न होये कोणासी ॥६३॥
वृषभ कापिला होता देखा ॥ तो सावध केला पहिल्यासारिखा ॥ तेव्हां आश्चर्य वाटलें लोकां ॥ म्हणती अनामिक लटिकाचि ॥६४॥
अंत्यजासी म्हणती ग्रामवासी जन ॥ तुझाचि आम्हीं घेऊं प्राण ॥ तुवां असत्य घेऊनि तुफान ॥ करविलें छळण बोधल्याचें ॥६५॥
ऐकोनि सकळांची सक्रोध उक्ती ॥ थरथरां कांपे तो दुर्मती ॥ मग विष्णुभक्तासी लोटांगण प्रीतीं ॥ अंत्यज घाली तेधवां ॥६६॥
म्हणे मी अनंत अपराधी जाण ॥ हीनयाति चांडाळ दुर्जन ॥ आतां अपराध क्षमा करून ॥ माझे प्राण वांचवीं ॥६७॥
ऐकूनि दुर्जनाची वाणी ॥ करुणा उपजली तयाचें मनीं ॥ मग ग्रामवासियांसी सांगे वचनीं ॥ यासी कोणीं न मारावें ॥६८॥
मग अहंता टाकूनि समस्त ॥ बोधल्यासी घाली दंडवत ॥ चित्तीं जाहला अति लज्जित ॥ अनुचित घडलें सकळांसी ॥६९॥
तों इकडे बोधल्यासी रुक्मिणीकांत ॥ ध्यानांत येऊनि काय बोलत ॥ तुज सांगितला म्यां गुह्यार्थ ॥ अनुभवें प्रचीत आली कीं ॥१७०॥
बोधला म्हणे जगज्जीवना ॥ तुझा पार न कळे कवणा ॥ म्हणोनि मिठी घातली चरणा ॥ वैकुंठराणा हांसतसे ॥७१॥
आणिक चरित्र अमोलिक ॥ सादर ऐका भक्त भाविक ॥ धामणगांवींचे सकळ लोक ॥ देखती कौतुक नानापरी ॥७२॥
म्हणती बोधला नव्हे मानवी नर ॥ परम ज्ञानी अति उदार ॥ केवळ ईश्वरी अवतार ॥ केला भव पार सकळांचा ॥७३॥
एके वर्षी अवर्षणीं ॥ पर्जन्य न पडेचि मेदिनीं ॥ म्हणून धामणगांवींची पेरणी ॥ अग्रधान्याची राहिली ॥७४॥
आश्विनमासपर्यंत जाण ॥ पडलें होतें अवर्षण ॥ मग कार्तिकांत स्वातीचा पर्जन्य ॥ अपार धन वर्षला ॥७५॥
बोधल्यानें काढोनि कर्ज ॥ पेरावयासी घेतलें बीज ॥ गांवकरी करूनि विरज ॥ चालिले काज करावया ॥७६॥
तों दिंड्या पताका घेऊनि करीं ॥ यात्रा चालिली पंढरपुरीं ॥ दृष्टीस देखोनि ते अवसरीं ॥ बोधराज अंतरीं संतोषला ॥७७॥
यात्रेकरियांस दंडवत ॥ सद्भावें साष्टांग घालित ॥ म्हणे आजि आमुचे भाग्य ऊर्जित ॥ म्हणोनि संत भेटले ॥७८॥
त्या समारंभांत होते ब्राह्मण ॥ ते बोधल्यासी बोलती वाचन ॥ तूं दुष्काळीं करितोसी अन्नदान ॥ आलों म्हणून या ठाया ॥७९॥
ऐकूनि द्विजवरांचें वचन ॥ म्हणे आपुलें गृहीं तों नाहीं धान्य ॥ आणि विमुख गेलिया संतसज्जन ॥ तरी सत्त्वासी हान होय कीं ॥१८०॥
मग बोलावूनि निजपुत्रासी ॥ एकांतीं विचार सांगे त्यासी ॥ कीं हें बीज नेऊनि घरासी ॥ भोजन संतांसी घालावें ॥८१॥
भूमी पीक देतसे निर्जीव ॥ मग संत तों आहेत सजीव ॥ यांचें उदरीं बीज पेरितां सर्व॥ काय एक नव्हें सांग पां ॥८२॥
ऐसी पित्याची वचनोक्ती ॥ ऐकोनि यमाजी संतोषे चित्तीं ॥ विराजे मिळाले होते शेतीं ॥ ते ग्रामांत मागुती परतविले ॥८३॥
बीज होतें सवामण ॥ तें दळोनि  यात्रेकर्‍यांस घ्यातलें अन्न ॥ कडू भोंपळ्य़ाचें बीज नेऊन ॥ आपुल्या शेतीं पेरिलें ॥८४॥
ईश्वरकरणी अघटित ॥ तुंबिनीसी फळें आलीं बहुत ॥ ग्रामवासी लोक हांसत ॥ म्हणती विपरीत हें केलें ॥८५॥
यात्रेकर्‍यांस बीज घालोनियां ॥ कडू भोंपळे पेरिले कासया ॥ तंव एक कुटिळ येऊनियां ॥ काय बोलिला तें ऐका ॥८६॥
बोधला पाटील गांवचा राजा ॥ आम्ही सकळ तयाची प्रजा ॥ आपुल्या सांडावया लौकिक लाजा ॥ ऐसें तयासी वाटतसे ॥८७॥
एक एक द्यावा सकळां हातीं ॥ म्हणोनि पेरिले आहेत शेतीं ॥ ऐकूनि दुर्जनाची वचनोक्ती ॥ गदगदां हांसती सजळ जन ॥८८॥
म्हणती बोधल्याचें शेतीं जाऊन ॥ कौतुक पाहूं अवघे जण ॥ कैसें पीक आलें सघन ॥ ऐसें म्हणोन ऊठिले ॥८९॥
क्षेत्रांत पाहतां ते वेळ ॥ तंव तुंबिनीसी बहुत आलीं फळें ॥ एक भोपळा तोडूनि तत्काळ ॥ फोडोनियां पाहाती ॥१९०॥
तेथें नवल देखिलें अद्भुत ॥ उत्तम गहूं निघाले त्यांत ॥ म्हणती ईश्वरकरणी अघटित ॥ साश्चर्य चित्त सकळांचें ॥९१॥
ग्रामींचा हवालदार होता तेथ ॥ म्हणे राजासी सांगणें लागेल हे मात ॥ तेणें अविंधराजासी त्वरित ॥ लिहून वृत्तांत पाठविला ॥९२॥
पत्र वाचितांचि यवन ॥ म्हणे कृत्रिमविद्या केली जाण ॥ मग ढालाईत पांच जाण ॥ धामणगांवास पाठविले ॥९३॥
त्यांनीं बोधल्यासी पुढें घालून ॥ राजद्वारीं नेलें जाण ॥ अविंधें पुसतां वर्तमान ॥ केलें निवेदन सकळिक ॥९४॥
सक्रोध होऊनि राजा पुसे ॥ भोंपळ्यांत गहूं आले कैसे ॥ येरू म्हणे मज ठाउकें नसे ॥ पंढरीनिवासें हें केलें ॥९५॥
ऐकोनि निजभक्ताची वाणी ॥ विश्वास न वाटे त्यालागूनी ॥ जैसें श्रीरामचरित्र ऐकोनी ॥ पिशाचें मनीं जळती कां ॥९६॥
गीताशास्त्र वाचितां संजयास ॥ त्याचा धृतराष्ट्रासी नाहीं विश्वास ॥ तेवीं बोधल्याचे शब्द अविंध्यास ॥ असत्य वातले तेधवां ॥९७॥
राजा बोले क्रोधायमान ॥ मानकोजी बोधल्यासी करावें यवन ॥ मग भक्षावया मांसबोन ॥ तत्काळ जाण आणविलें ॥९८॥
बोधल्यासी बैसविला भोजनासी ॥ तों त्याच्या झाल्या फुलें तुळसी ॥ राजा उठोनि वेगेंसीं ॥ नमन बोधल्यासी करीतसे ॥९९॥
म्हणे जें इच्छील तुझें मन ॥ तें मज मागें संपत्ति धन ॥ बोधल्याचें कंटाळलें मन ॥ चालिला उठोन सत्वर ॥२००॥
राजयासी म्हणे ते अवसरीं ॥ कांहींचि इच्छा नाहीं अंतरीं ॥ कामधेनु बांधिली असतां घरीं ॥ मग दारोदारीं कां जावें ॥१॥
कल्पतरु अंगणीं असतां जाण ॥ मग कासया लावावें सिंदीवन ॥ सांडोनि ऐरावत वहन ॥ खरावरी बैसणें अनुचित ॥२॥
आम्रवृक्षाची सांडोनि छाया ॥ हिंवरतळीं बैसावें कासया ॥ कीं नरदेहासी विटोनियां ॥ पशुजन्म वायां कां घ्यावा ॥३॥
सांडूनि बकुळ सेवंती ॥ पुंगळवेल कां धरावी हातीं ॥ कीं दुरावूनि संतसंगती ॥ निंदकासी प्रीती करूं नये ॥४॥
कीं हरिकीतन टाकोनियां ॥ डफगाणें ऐकावें कासया ॥ दहीं दूध गृहीं असोनियां ॥ तक्रासी वायां कां धुंडावें ॥५॥
जे परमहंसदीक्षा पावले परम ॥ ते सर्वथा न करिती गृहस्थाश्रम ॥ तेवीं श्रीरामभजनीं जडलिया प्रेम ॥ ते राजसन्मान न घेती ॥६॥
ऐसें म्हणोनि ते समयीं ॥ परतोनि आले धामणगांवीं ॥ प्रेमळ भक्ती असोनि देहीं ॥ अहंता नाहीं तयासी ॥७॥
नामरूपीं जडलिया चित्त ॥ दासांसी नाठवे आम्ही भक्त ॥ तैशाचि रीतीं रुक्मिणीकांत ॥ देवपण त्यातें कळेना ॥८॥
कनकाचा मुकुट आणि पैंजण ॥ एके मुशींत आटलिया जाण ॥ मग त्या दोहींचेम नामाभिधान ॥ गेलें हरपोन तत्काळ ॥९॥
तेवीं पांडुरंगाचें करितां भजन ॥ बोधल्याचें हारपोनि गेलें मीपण ॥ मग हृदयीं धरूनि जगज्जीवन ॥ अद्वयभजन करीतसे ॥२१०॥
एक सद्भाव धरूनि अंतरीं ॥ धामणगांवींची केली पंढरी ॥ चरित्र दाखवूनि नानापरी ॥ जडमूढ उद्धरी निजप्रेमें ॥११॥
पुढिले अध्यायीं कथा अद्भुत ॥ प्रेमळ भक्त गणेशनाथ ॥ त्याचें चरित्र रसाळ बहुत ॥ तें प्रेमळ परिसोत निजप्रेमें ॥१२॥
जो दीनदयाळ रुक्मिणीकांत ॥ तो निजकृपें वदवी ग्रंथार्थ ॥ महीपति तयाचा शरणागत ॥ भजन करीत निजप्रेमें ॥१३॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ चतुःपंचाशत्तमाध्याय रसाळ ॥२१४॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरुक्मीनीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ श्रीभक्तविजय चतुःपंचाशत्तमाध्याय समाप्त ॥