Marathi Biodata Maker

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय ३५

Updated: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (14:57 IST)
 
रेवणनाथाचा गुरु कोण हें मच्छिंद्रनाथाच्या लक्षांत नव्हतें त्याच्या गुरुनें अर्धवट शिष्य कां तयार केला म्हणुन मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटत होतें. त्यानें रेवणनाथाबद्दल चौकशीं केली. पण त्याचा गुरु कोण ही माहीती लोकांस नव्हती; ते फक्त त्याची बरीच प्रशंसा करीत. उपकार करण्यात, अन्न्‌उदक व द्रव्य देण्यास रेवणनाथ मागेंपुढें पाहत नसे, यावरुन कोणत्या तरी गुरुच्या कृपेनें, ह्यास सिद्धि प्राप्त झाली असावी, असें मनांत येऊन मच्छिंद्रनाथानें तो शोध काढण्यासाठीं अणिमा, नरिमा, लघिमा, महिमा इत्यादि आठहि सिद्धिस बोलाविलें. त्या येतांच त्याच्या पायां पडल्या. त्या वेळेस नाथानं त्यास विचारलें कीं, रेवणसिद्धाच्या सेवेस कोणत्या सिद्धिची कोणी योजना केली आहे हें मला सांगा.त्यावर महिमासिद्धीनें उत्तर दिलें कीं, त्याच्या सेवेस राहण्यासाठीं श्रीदत्तात्रेयाची मला आज्ञा झाली आहे.
 
मग हा रेवणनाथ आपला गुरुबंधु होतो असें जाणुन त्यास साह्य करावें, असें मच्छिंद्रनाथाच्या मनांत आलें त्यानें लगेच तेथून निघुण गिरीनापर्वती येऊन श्रीदत्तत्रेयाची भेट घेतली व रेवणसिद्धिचा सर्व मजकूर कळविला आणि त्याच्या हितासाठीं पुष्कळ रदबदली केली. मच्छिंद्रनाथ म्हणाला, महाराज ! रेवणसिद्ध हा प्रत्यक्ष चमसनारायणाचा अवतार होय. तो तुमच्यासाठीं दुःसह क्लेश भोगीत आहे. तर आपण आतां त्यावर कृपा करावी. ज्या ठिकाणीं तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे.
 
तें ऐकून मच्छिंद्रनाथास समागमें घेऊन दत्तात्रेय यानास्त्राच्या साह्यानें रेवणनाथापाशीं आले. तेथें तो काष्ठाप्रमाणें कृश झालेला पाहिल्यावर दत्तात्रेयास कळवळा आला व त्यांनी त्यास पोटाशीं धरिलें रेवणनाथानें दत्तात्रेयास पायांवर मस्तक ठेविलें. तेव्हां दत्तानें त्याच्या कानांत मंत्रोपदेश केला. तेणेकरून त्याच्या अज्ञान व द्वैत यांचा नाश झाला. मग वज्रशक्ति आराधून दत्तानें रेवणनाथाच्या कपाळीं भस्म लाविले; त्यामुळें तो शक्तिवान् झाला. नंतर त्यास बरोबर घेऊन दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ गिरीनारपर्वतीं गेले. तेथें त्यास पुष्कळ दिवस ठेवुन घेऊन शास्त्रास्त्रासुद्धां सर्व विद्यांत निपुण केलें. तेव्हां, आतां आपण एकरूप झालों, असें रेवणनथास भासूं लागलें. त्याचा द्वैतभाव नाहिंसा होतांच सर्व पशुपक्षी निवैर होऊन रेवणनाथाजवळ येत व त्याच्या पायां पडत. दत्तानें रेवणनाथास नाथपंथाची दीक्षा देऊन मच्छिंद्रनाथाप्रमाणेंच शस्त्रास्त्रादिसर्व विद्यांत निपूण करून त्यास त्याच्या स्वाधीन केलें. मग ते उभयतां मार्तंडपर्वतीं गेलें. तेथें त्यांनी नागेंश्र्वर स्थान पाहून देवदर्शन घेतलें व वर मिळवून साबरींमंत्र सिद्ध केले.
 
सर्व विद्येंत परिपूर्ण झाल्यानंतर गिरीनारपर्वती येऊन तेथें मावंदें घालण्याचा रेवणनाथानें बेत केला. त्या समारंभास विष्णु, शंकर आदिकरून सर्व देवगण येऊन पोंचले. चार दिवस समारंभ उत्तम झाला. मग सर्व देव रेवणनाथास वर देऊन आपापल्या स्थानीं गेले. रेवणनाथहि दत्तात्रेयाच्या आज्ञेनें तीर्थयात्रा करावयास निघाला.
 
त्या कालीं माणदेशांत विटे तीर्थयात्रा गांवांत सरस्वती या नावांचा एक ब्राह्मण राहात असे. त्याच्या स्त्रीचें नांव जान्हविका. त्यांची एकमेकांवर अत्यंत प्रीति. त्यांस मुलें होत, पण तीं वांचत नसत; आठ दहा दिवसांतच तीं मुलें मरत. ह्याप्रमाणें त्याचें सहा पुत्र मरण पावले. सातवा पुत्र मात्र दहा वर्षेपर्यंत वांचला होता व आतां यास भय नाहीं असें जाणुन सरस्वती ब्राह्मणानें अतिहर्षानें ब्राह्मणभोजन घेतलें. त्यासमयीं पंचपक्कान्ने केलीं होतीं व प्रयोजनाचा बेत उत्तम ठेविला होता. त्याच दिवशीं त्या गांवात रेवणनाथ आला. तो भिक्षा मागवयास फिरत असतां त्या ब्राह्मणाकडे गेला. त्यास पाहतांच हा कोणी सत्पुरुष आहे, अशी ब्राह्मणाची समजुत झाली. तेव्हां ब्राह्मणानें त्यास जेवून जाण्याचा आग्रह केला व त्याच्या पायां पडून माझी इच्छा मोडूं नये असें सांगितलें. त्यास रेवणनाथानें सांगितलें कीं, आम्हीं कनिष्ठ वर्णाचें व तूं ब्राह्मण आहेस, म्हणुन आमच्या पायां पडणें तुला योग्य नाहीं, हें ऐकून तो म्हणाला, ह्या कामीं जातीचा विचार करणें योग्य नाहीं. मग त्याचा शुद्ध भाव पाहून रेवणनाथानें त्यांचें म्हणणें मान्य केलें.
 
मग रेवणनाथ त्याच्याबरोबर घरांत गेल्यावर सरस्वती ब्राह्मणानें त्यास पात्रावर बसविलें व त्याचें भोजन होईपर्यंत आपण जवळच बसून राहिला. जेवतांना त्यानें करून त्यास भोजनास वाढिलें व नाथाची प्रार्थना केली कीं, महाराज ! आजचा दिवस येथें राहून उदईक जावें. त्याची श्रद्धा पाहून रेवणनाथानें त्याच्या म्हणण्यास रुकार दिला व तो दिवस त्यानें तेथें काढिला. रात्रीस पुनः भोजनासाठीं सरस्वती ब्राह्मणानें नाथास आग्रह केला, परंतु दोनप्रहरीं भोजन यथेच्छ झाल्यानें रात्रीं क्षुधा लागली नव्हती; यास्तव नित्यनेम उरल्यानंतर नाथानें तसेंच शयन केलें. त्या वेळीं तो ब्राह्मण नाथाचे चरण चुरीत बसला. मध्यरात्र झाली असतां अशी गोष्ट घडली कीं, आईजवळ असलेल्या त्याच्या मुलाचे प्राण सटवीनें झडप घालून कासावीस केले. त्या वेळेस मोठा आकांत झाला. बायको नवर्‍यास हाका मारूं लागली, तेव्हां तो तिला म्हणाला, आपण पूर्वजन्म केलेल्या पापाचें फळ भोगीत आहों, यास्तव आपणांस सुख लाभणार कोठून ? आतां जसें होईल तसें होवो. तूं स्वस्थ राहा. मी उठून आलों तर नाथाची झोंप मोडेल, यास्तव माझ्यानें येववत नाहीं. जर झेंप मोडली तर गोष्ट बरी नाहीं. इतकें ब्राह्मण बोलत आहे तो यमाच्या दूतांनीं पाश टाकून मुलाच्या प्राणाचें आकर्षण केलें व मुलाचें शरीर तसेंच तेथें पडून राहिलें.
 
मुलगा मरण पावला असें पाहून जान्हवी मंद मंद रडूं लागली. तिनें ती रात्र रडून रडून काढिली. प्रातःकाळ झाला तेव्हा नाथास रडका शब्द ऐकूं येऊं लागला. तो ऐकून त्यानें कोण रडतें म्हणुन सरस्वती ब्राह्मणास विचारिलें. त्यानें उत्तर दिलें कीं, मुलाचे प्राण कासावीस होत आहेत म्हणुन घरांत माझी बायको अज्ञपणनें रडत आहे. तें ऐकुन मुलास घेऊन ये, असं नाथानें विप्रास सांगितलें. त्यावरुन तो स्त्रीजवळ जाऊन पाहतो तों पुत्राचें प्रेत दृष्टीस पडलें. मग त्यानें नाथास घडलेलें वर्तमान निवेदन केलें. ही दुःखदायक वार्ता ऐकून नाथास यमाचा राग आला. तो म्हणाला, मी या स्थळी असतां यमानें हा डाव साधून कसा घेतला ? आतां यमाचा समाचार घेऊन त्यास जमीनदोस्त करून टाकितों, असें बोलून मुलास घेऊन येण्यास सांगितलें. मग सरस्वती ब्राह्मणानें तो मुलगा नाथापुढें ठेविला. त्या प्रेताकडे पाहून नाथास परम खेद झाला. मग तुला एवढास मुलगा कीं काय, असें नाथानें त्यास विचारल्यावर, हें सातवें बालक म्हणुन ब्राह्मणानें सांगितलें व म्हटलें, माझीं मागची सर्व मुलें जन्मल्यानंतर पांचसात दिवसांतच मेली; हाच फक्त दहा वर्ष वांचला होता. आम्ही प्रारब्धहीन ! आमचा संसार सुफळ कोठून होणार ! जें नशिबीं होतें तें घडलें. याप्रमाणें ऐकून रेवणनाथानें सरस्वतीस सांगितलें कीं, तूं तीन दिवस या प्रेताचें नीट जतन करून ठेव. हें असेंच्या असेंच राहील, नासणार नाहीं. आतां मी स्वतः यमपुरीस जाऊन तुझीं सातहि बाळें घेऊन येतो. असें सांगुन नाथानें अमरमंत्रानें भस्म मंत्रुन मुलाच्या अंगास लाविलें व यानास्त्राच्या योगानें तो ताबडतोब यमपुरीस गेला.
 
रेवणनाथास पाहतांच यमधर्म सिंहासनावरून उतरला व त्यास आपल्या आसनावर बसवून त्यानें त्याची षोडशोपचारांनीं पूजा केली आणि अति नम्रपणानें येण्याचें कारण विचारलें. तेव्हा रेवणनाथानें म्हटलें, यमधर्मा ! मी सरस्वती ब्राह्मणाच्या घरीं असतां तूं तेथें येऊन त्याच्या मुलास कसा घेऊन आलास ? आतां न घडावी ती गोष्ट घडली तरी चिंता नाहीं. परंतु तूं त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे सहा पुत्र कोठें ठेविलें आहेस. तेहि आणुन दे. हें न करशील तर माझा राग मोठा कठीण आहे; तुझा फडशा उडून जाईल. तेव्हा यमधर्मानें विचार केला कीं, ही जोखीमदारी आपण आपल्या अंगावर घेऊं नये. शंकराकडे मुखत्यारी आहे, असें सांगून त्यास कैलासास धाडावें; मग तिकडे पाहिजे तें होवो. असें मनांत आणुन तो म्हणाला, महाराज ! माझें म्हणणें नीट लक्ष देऊन ऐकून घ्यावें. विष्णु, शंकर व ब्रह्मदेव हे तिघे या गोष्टीचे अधिकारी आहेत आणी हा सर्व कारभार त्यांच्याच आज्ञेनें चालतों. या कामाचा मुख्य शंकर असून आम्ही सारे त्याचे सेवक आहों. यास्तव मारण्याचें वा तारण्याचें काम आमच्याकडे नाहीं, सबब आपण कैलासास जावें व शंकरापासून ब्राह्मणाचे सात पुत्र मागुन न्यावे. ते तेथेंच त्यांच्याजवळ आहेत. त्याचें मन वळवून आपला कार्यभाग साधून घ्यावा. ते ऐकून रेवणनाथ म्हणाल, तूं म्हणतोस, हें काम शंकराचें आहे, तर मी आतां कैलासास जातो. असें म्हणुन रेवणनाथ तेथून उठून कैलासास शंकराकडे जावयास निघाला.

सर्व पहा

भगवान पांडुरंग विटेवर का उभे आहेत? जाणून घ्या भक्त पुंडलिकाची अद्भुत कथा

शुक्रवार व्रत विधी: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग आज वैभव लक्ष्मीची पूजा करताना या '६' चुका टाळा

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

देशातील एक असे अद्वितीय शिवमंदिर, जिथे शिवलिंगाला पाणी अर्पण केले जात नाही

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments