शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय ३१

कृष्णागर राजपुत्राची कथा, त्याची तपश्चर्या.
कामविकारवश होऊन कृष्णागरास सापत्‍न मातेनें बोलावून नेलें पण तो तिला झिडकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चात्ताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली. परंतु तिच्या दासीनें तिला सांगितलें कीं, तुला जिवाचा घात करण्याचें कांहीं कारण नाहीं; ज्याप्रमाणें ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणें घडून येईल, तें कधीं चुकावयाचे नाहीं. आतां तूं झाल्या गोष्टीची खंत करूं नको. स्वस्थ जाऊन नीज. राजा शिकारीहून आल्यानंतर तुझ्या महालांत येईल, तेव्हां तू उठूंच नको. मग तो तुला जागी करून निजण्याचें कारण विचारील. तेव्हां तूं रडून आकांत कर व मी आतां आपला जीव ठेवूं इच्छीत नाहीं म्हणून सांग. जर अब्रू जाऊं लागली, तर जगून काय कारायाचें आहे ? असें तुं राजास सांगून रडूं लागलीस म्हणजे तो तुला काय झालें आहे तें सांगण्यासाठीं आग्रह करील. तेव्हां तूं त्यास सांग कीं, तुमचा मुलगा कृष्णागर यानें माझ्या मंदिरांत येऊन मजवर बलात्कार करावयाचा घाट घाटला होता; पण मी त्यास बळी पडलें नाहीं. यास्तव आपणांस हेंच सांगावयाचें कीं, आपल्यामागें असें अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय करावयाचें आहे ? असें भाषण ऐकून राजास क्रोध आला, म्हणजे तो सहजच मुलगा-बिलगा मनांत न आणितां ताबडतोब त्यास ठार मारून टाकील. मग तूं निर्भय होऊन आनंदानें खुशाल राहा. अशी युक्ती सांगून दासी निघून गेली.
 
त्याप्रमाणें भुजांवती सुवर्णामंचकावर निजली. तिनें अन्न, उदक, स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाणा केला. अंगावरील दागदागिने सर्व टाकून दिले. थोड्या वेळानें शशांगर राजा शिकारीहून आला. नेहमीप्रमाणें भुजांवती पंचारती घेऊन कां आली नाहीं म्हणुन राजानें दासीस विचारलें . तेव्हां ती म्हणाली, राणीला काय दुःख झालें आहे तें तिनें सांगितलें नाहीं; पण ती मंचकावर स्वस्थ निजली आहे.
 
याप्रमाणें दासीनें सांगताच राजा भुजावंतीच्या महालांत गेला. तेथें पूर्वी संकेत ठरल्याप्रमाणें ती पलंगावर निजली होती. राजानें तिला निजण्याचें कारण विचारिलें असतां ती कांहींच उत्तर न देतां ढळढळां रडूं लागली. त्या वेळीं राजास तिचा कळवळा येऊन त्यानें तिला पोटाशी धरीलें व तोंडावरून हात फिरवून तो पुन्हां विचारूं लागला. राजा म्हणाला. तूं माझी प्रिय पत्‍नी असतां, इतकें दुःख होण्याजोगा तुला कोणी त्रास दिला काय ? तसें असल्यास मला सांग मात्र, मग तो कोण कां असेना, पाहा त्याची मी काय अवस्था करून टाकितों ती ! अगे, तूं माझी पट्टराणी ! असें असतां तुजकडे वाकडी नजर करण्याला. कोणाची छाती झाली ? तुं मला नांव सांग कीं, याच वेळेस त्यास मारून टाकतो.
 
राजानें असें क्रोधायुक्त भाषण ऐकल्यानंतर भुजांवंतीस किंचित् संतोष झाला. मग तिनें सांगितलें कीं, तुमच्या मुलाची बुद्धि भ्रष्ट झाली आहे. तो खचित माजला आहे. तुम्ही शिकारिस गेल्यानंतर कोणी नाहीं असें पाहून तो माझ्या महालांत आला व माझा हात धरुन मजवर बलात्कार करावयास पाहात होता. माझी कामशांति कर, असें तो मनांत कांहीं एक अंदेशा न आणतां मला म्हणाला व माझा हात धरून एकीकडे घेऊन जाऊं लागला. त्या वेळीं तो कामातुन झाला आहे असें मी ओळखून त्याच्या हातांतून निसटलें व पळत पळत दुसर्‍या महालांत गेलें. तेव्हां माझी जी अवस्था झाली ती सांगतां पुरवत नाही ! चालतांना पडलें देखील, पण तशीच लगबगीनें पळालें. एकदांची जेमतेम महालांत आलें आणि घेतलें दार लावून ! तेव्हां त्याचा इलाज चालेनासा होऊन तो निघून गेला. आपण नसलेत म्हणजे मजवर असले प्रसंग गुदरणार, ह्यास्तव आतां मी आपला जीव देतें, म्हणजे सुटेन एकदांची या असल्या जाचांतून. आपला एकदां शेवटचा मुखचंद्र पहावा म्हणून हा वेळपर्यंत तशीच तें दुःख सहन करून राहिलें. मोठमोठाल्या हिंसक जनावरांच्या तावडींतून पार पडून आपण सुखरूप घरीं केव्हां याल ह्याच धास्तीत मी राहिलें होते; म्हणून अजूनपर्यंत वाचलें तरी; नाहीं तर केव्हांच आत्महत्या करून घेतली असती.
 
भुजांवंतीचें तें भाषण ऐकून राजाची नखशिखांत आग झाली. जणूं काय वडवानळच पेटला कीं काय, असें भासूं लागलें. मग राजानें बाहेर येऊन राजपुत्र कृष्णागरास मारून, जळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून त्यास दूर टाकून देण्याविषयीं सेवकांस आज्ञा केली. ती आज्ञा होतांच सेवक मुलास स्मशांनांत घेऊन गेले व तेथें नेल्याची बातमी त्या सेवकांनीं परत येऊन राजास सांगितली.
 
ते सेवक चतुर होते. राजानें आपल्या मुलास मारून टाकण्याची आज्ञा रागामध्यें दिली आहे व त्यास मारिलें असतां राजाचा कोप शांत झाल्यावर काय अनर्थ होईल, कोण जाणे, असे तर्क त्यांच्या मनांत येऊं लागले. त्यांनीं पुनःपुनः राजास जाऊन विनविलें. पण राजानें जो एकदां हुकूम दिला तो कायम. मग दूतांनीं निष्ठूर होऊन त्यास चव्हाट्यावर नेऊन सुवर्णाच्या चौरंगावर बसविलें व त्याचें हातपाय बांधून टाकिले. ही बातमी थोडक्याच वेळांत गांवांत सर्वत्र पसरली. त्यासमयीं शेकडों लोक त्यास पाहावयास आले. कित्येक रदबदली करून राजाचा हुकूम फिरविण्यासाठीं राजवाड्यांत गेले. पण राजाची ती भयंकर क्रोधयुक्त मुद्रा पाहुन कोणासहि ही गोष्ट त्याच्यापाशीं काढवेना. इकडे आज्ञेप्रमाणें सेवकांनीं कृष्णागराचे हातपाय तोडले आणि त्यास तसेंच तेथें टाकलें. तेव्हां कृष्णागर बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या घशास कोरड पडली. डोळे पांढरे झाले व प्राण कासावीस होऊन तोंडातून फेंस निघू लागला. असा तो अव्यवस्थित पडलेला पाहून लोक शोकसागरांत बुडून गेले.
 
त्या समयीं कित्येकांनी शशांगर राजास दूषण दिलें.
 
त्या वेळीं गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षेकरितां गांवांत आले होतें, ते सहज त्या ठिकाणीं आले. येथें कसली गडबड आहे. हें पहावें म्हणून ते चव्हाट्यावर जमलेल्या लोकांत मिसळले. तेथें गोरक्षनाथानें कृष्णागरास विकल अवस्थेत पडलेला पाहून ती हकीकत लोकांस विचारून माहिती करून घेतली व अंतर्दृष्टीनें पाहतां सर्व बोलण्यावर भरंवसा ठेवून निर्दोषी मुलाचा घात केल्यामुळें त्यानें ते दोघेहि तेथून निघाले. तेव्हां गोरक्षनाथानेंहि अंतर्दृष्टीनें कृष्णागराचा समूळ वृत्तांत ध्यानांत आणिल्यानंतर त्यास नांवारूपास आणावें, म्हणून त्यानें मच्छिंद्रनाथास सांगितलें. त्यांनीं कृष्णागरास त्या परिस्थितींत चौरंगावर पाहिल्यामुळें त्याचें कृष्णागर हें नांव बदलून चौरंगीनाथ असें ठेविलें. राजवाड्यांत जाऊन राजापासून ह्यास मागून घेऊन नाथपंथांत सामील करण्याची गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथासं सूचना केली. परंतु राजाराणीस आपलें सामर्थ दाखवून मगच हा कृष्णागर शिवपुत्र घेऊन जाऊं, असें मच्छिंद्रनाथाचें मत पडलें. पण हें गोरक्षनाथाच्या मनांत येईना. तो म्हणाला, प्रथम चौरंगीस घेऊन जाऊन त्यास नाथपंथाची दीक्षा द्यावी व सर्व विद्येंत तयार केल्यानंतर त्याच्याच हातून राजास प्रताप दाखवून त्या व्यभिचारी राणीची जी दशा करावयाची असेल ती करावी. तूर्त युक्तिप्रयुक्तीनें राजाचें मन वळवून त्याजपासून ह्याला मागून घेऊन जावें. ह्या गोरक्षनाथाच्या विचारास मच्छिंद्रनाथानें रुकार दिला.
 
मग ते उभयता राजवाड्यात गेले.त्यांनी द्वारपाळास आपली नांवें सांगून आपण भेट घेण्यासाठी आलों आहों, असा राजाला निरोप सांगावयास पाठविला. राजास निरोप कळतांच परमानंद झाला व जे हरिहरास वंद्य ते योगी आज अनायासें भेटीस आले आहेत, असें पाहून तो लागलीच पुढें जाऊन त्यांच्या पायां पडला. त्यांची राजानें स्तुति केली व त्यांस राजवाड्यांत नेऊन सुवर्णाच्या आसनावर बसविलें. नंतर त्यानें षोडशोपचारांनीं यथाविधि पूजा केली आणि हात जोडून त्यांच्यासमोर तो उभा राहिला व काय आज्ञा आहे ती कळविण्याची विनंती केली. तेव्हां मच्छिंद्रनाथानें सांगितलें कीं तुम्ही अवकृपेमुळें आज एका मुलाचें हातपाय तोडून टाकिले आहेत. तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा. इतकाच आमचा हेतू आहे.
 
मच्छिंद्रनाथाचें हें मागणें ऐकून राजास मोठें नवल वाटलें, तो हंसून म्हणाला, महाराज ! त्यास हातपाय नाहींत, मग त्याचा तुम्हांला काय उपयोग होणार आहे ? उलट तो धनी व तुम्ही त्याचे सेवक असें होऊन तुम्हांस त्याला खांद्यावरून घेऊन फिरावें लागेल. हें ऐकून मच्छिंद्रनाथानें त्यास सांगितलें कीं, तूं त्यास आमच्या स्वाधीन करितोस किंवा नाहीं, एवढें सांग म्हणजे झालें. तो आमच्या कामास उपयोगी पडेल कीं नाहीं ही चौकशी तुला कशाला पाहिजे ? मच्छिंद्रनाथानें असें स्पष्ट म्हटल्यावर त्यास घेऊन जाण्याची राजानें परवानगी दिली. मग ते त्यास चौरंगासुद्धां आपल्या शिबिरांत घेऊन गेले व तेथें त्याचे हातपाय तळविले. येथें अशी शंका येते कीं, हे जती निर्जीवास सजीव करतात, असें असतां याची अशी अवस्था कां झाली ? निर्जीव पुतळ्याचा गहिनीनाथ निर्माण केला, मग कृष्णागराचे हातपाय पुनः निर्माण करणें अशक्य होते काय ? परंतु त्यास त्याच स्थितींत ठेवून कार्यभाग करून घ्यावयाचा होता. गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ तेथें एक रात्र राहून पुढें चालते झाले.
 
मग ते फिरत फिरत बदरिकाश्रमात गेले व शिवालयांत जाऊंन त्यांनी शंकराचें दर्शन घेतलें, तेथें चौरंगीस ठेवून आपण अरण्यांत गेलें. तेथें त्यांनीं एक गुहा पाहिली व दोघेहि तींत शिरले. त्यांनीं चौरंगीस तेथें ठेवून त्याची परिक्षा पाहण्याचा बेत केला. मग गोरक्षनाथानें एक मोठी शिळा आणिली. अस्त्राच्या योगानें गुहेंत अंधार पाडिला आणि चौरंगीस देवळांतून तेथें घेऊन गेले. त्या गुहेच्या तोंडाशींच एक मोठें झाड होतें, त्याच्या सावलींत तें तिघेहि बसले. तेथें चौरंगीस नाथदीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथानें गोरक्षनाथास आज्ञा केली.
 
त्या वेळी गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथास सांगितलें कीं, चौरंगीनाथचें तप पाहून मग मी त्यास अनुग्रह करीन. त्याच्या या म्हणण्यास मच्छिंद्रथानें रुकार दिला व चौरंगीस विचारलें कीं, तूं या ठिकाणीं तप करण्यास बसशील काय ? तेव्हां चौरंगीनें उत्तर दिलें कीं, तुम्हीं सांगाल तें करीन व ठेवील तेथें राहीन , नंतर त्यानें त्या दोघांस विनंती केली की, तुम्ही जेथें असाल तेथून माझा नित्य समाचार घेत जा. इतकें मला दान दिलें म्हणजे माझें कल्याण होईल. ती विनंती मच्छिंद्रनाथानें कबूल केली.
 
मग त्यांनी त्यास आनंदानें गुहेंत नेऊन ठेविलें व त्यास सांगितलें कीं, तुझी दृष्टि निरंतर या वरच्या दगडाकडे असूं दे. जर नजर दुसरीकडे गेली तर दगड अंगावर पडून नाहक मरून जाशील व आपणांस पुढें जीं कामें करावयाचीं आहेत तीं जशींच्या तशीं राहून जातील. यास्तव फार सावधागिरीनें राहून आपलें हित साधून घे. इतके सांगुन त्यास मंत्रोपदेश केला व त्याचाच जप करावयास सांगितला. त्या वेळीं गोरक्षनाथानें त्यास एक फळ आणुन खावयास दिलें आणि सांगितलें कीं, हीं फळें भक्षून क्षुधा हरण कर. मंत्राचा जप करून तप कर. नजर वर ठेवुन जिवांचें रक्षण कर. आम्ही तीर्थयात्रा करून तुजकडे लवकरच येऊं असें चौरंगीस सांगुन गोरक्ष गुहेबाहेर निघाला व तिच्या तोंडाशीं एक शिळा ठेविली. गोरक्षनाथानें चामुंडेंचें स्मरण करतांच ती पृथ्वीवर उतरून त्यास भेटली आणि कोणत्या कार्यासाठीं स्मरण केलें म्हणुन तिनें विचारले. तेव्हां तो म्हणाला, येथें एक प्राण आहे त्याच्यासाठीं तुं नित्य फळें आणून देत जा म्हणजे तो ती खाऊन राहात जाईल. परंतु तेथें फळें नेऊन ठेवशील तीं गुप्तपणें ठेवीत जा; त्याच्या समजण्यांत मुळींच येऊं देऊं नको. अशी चामुडेस आज्ञा करून ते गिरिनापर्वतीं आले. त्या आज्ञेप्रमाणें चामुंडा गुप्तपणानें त्यास फळें नेऊन देत असे.
 
शिळा अंगावर पडून प्राण जाईल ही चौरंगीनाथास मोठी भीति होती व गोरक्षनाथानें शिळेविषयीं फार सावध राहावयास बजावून सांगितलें होतें. म्हणुन एकसारखी तिकडे नजर लाविल्यानें त्याचें फळें खाण्याचें राहून गेलें. तो फक्त वायू भक्षण करून राहूं लागला. नजर चुकूं नये म्हणुन अंगसुद्धां हालवीत नसे. त्याचें लक्ष योगसाधनेकडे लागल्यानें शरीर कृश होऊन त्याचा हाडाचा सांगाडा मात्र उरला. अशा रीतीनें चौरंगीनाथ तपश्चर्या करीत होता.