सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय २७

विक्रम राजाचा सुमेधावतीबरोबर विवाह, भर्तरीचा पिंगलेबरोबर विवाह व दत्तात्रेयाची भेट.
अवंतीनगरात शुभविक्रम या नांवाचा एक राजा राज्य करीत होता. त्यास सुमेधावती या नांवाची एकच कन्या होती. ती अति रूपवति होती. एके दिवशीं ती आपल्या बापाच्या मांडीवर बसली असतां तिचें लग्न करावें, असें त्याच्या मनांत आलें. नंतर त्यानें प्रधानापाशीं गोष्ट काढिली कीं, सुमेधावती उपवर झाली आहे,याकरितां तिच्या रूपास योग्य असा वर शोधून पाहावा. त्या बोलण्यावर सुमंतीक प्रधानानें सांगितलें कीं , माझ्या मनांत एक विनंति करावयाची आहे, ती अशी कीं, आपला आतां वृद्धापकाळ झाला आहे; पुत्र होण्याची आशा मुळींच नाहीं; कन्येच्या मुखाकडे पाहून, काय तें सुख मानावयाचें ! यास्तव कन्येस मी जो उत्तम वर पाहिन त्यास राज्यावर बसवून कन्या अर्पण करावी. जांवई तुम्हांस पुत्राच्या ठिकाणींच आहे. त्यास गादीवर बसविल्यानें राज्यव्यवस्था चालू पद्धतीस अनुसरून उत्तम रीतीनें चालेल व तुम्ही काळजींतून दूर व्हाल.
 
सुमंतीक प्रधानानें ही काढलेली युक्ति राजाच्या मनास पटली व त्यानें त्याच्या म्हणण्यास रुकार दिला. तो म्हणाला, प्रधानजी तुम्हीं ह्या प्रसंगीं ही फार चांगली युक्ति मला सुचविली. यास्तव अतां असे करा कीं, हत्तीच्या सोंडेंत माळ देऊन ईश्वरी इच्छेनें तो ज्याच्या गळ्यांत ती माळ घालील त्यास राज्यावर बसवून नंतर कन्येचा त्याशीं विवाह करावा, हा विचार मला चांगला वाटतो. शुभविक्रम राजनें काढलेली ही तोड प्रधानास रुचली. मग त्यानें राजाज्ञेनें सुमुहूर्तावर एक मोठा मंडप घालून दरबार भरविला गुढ्यातोरणें उभारून आनंदानें नगरांत धामधूम चालली. नंतर हत्तीस श्रुंगारून त्याच्या सोंडेंत माळ देऊन त्यास सोडलें. राजा, प्रधान, सरदार, मानकरी व नागरिक लोक अशी पुष्कळ मंडळी त्याच्यामागून जात होती.
 
हत्तीनें प्रथम सभामंडपातलें लोक अवलोकन केले; पण तेथें कोण्याच्याहि गळ्यांत माळ न घालिता तो शहरांत चालला. तो सर्व नगर फिरत फिरत किल्ल्याजवळ जाऊन उभा राहिला. त्यावेळीं किल्ल्यावर विक्रमासह आठजण पाहारेकरी होते. त्यांस राजानें खालीं बोलाविलें. ते आल्यानंतर त्यांपैकीं विक्रमाच्या गळ्यांत हत्तीनें मोठ्या हर्षानें माळ घातली. ती घालतांच वाद्यें वाजूं लागली व सर्वास मोठा आनंद झाला. मग विक्रामास मोठ्या सन्मानानें हत्तीवर बसवून वाजतगाजत मोठ्या वैभवानें सभामंडपांत आणलें. तेव्हां हा कुंभार आहे असें लोक आपापसांत बोलूं लागले. ही गोष्ट राज्याच्याहि कानीं आली. मग त्यानें प्रधानास एकीकडे नेऊन सांगितलें कीं, हा कुंभार आहे अशी लोकांत चर्चा होत आहे. ही गोष्ट खरी असेल तर आपली मुलगी त्यास देणें अनुचित होय.
 
राजानें असें सांगितल्यावर प्रधानहि फिकिरींत पडला. परंतु दूरवर नजर पोंचवून त्यानें विक्रमाच्या साथीदारांस बोलावून आणिलें व एकीकडे नेऊन तो विक्रमाच्या जातीची त्यांच्यापाशीं विचारपूस करुं लागला. तेव्हां ते म्हणाले, विक्रम जातीचा कोण आहे ह्याविषयीं आम्हांला नक्की माहिती नाही; पण त्यास कुंभार म्हणतात. तर त्या जातीच्या लोकांत चौकशीं केली असतां, ह्याची जात कोणती आहे ह्याचा पक्का शोध लागेल. मग प्रधानानें कमट कुंभारास बोलावून आणलें व त्यास विचारिलें. तेव्हां तो म्हणाला कीं, मिथिलानगरीच्या सत्यवर्मा राजाची कन्या सत्यवती ही याची माता व स्वर्गीत राहाणारा गंधर्व सुरोचन हा याचा पिता होय. तें कमटाचें भाषण ऐकतांच प्रधानास परमानंद झाला. मग कमटास घेऊन प्रधान राजापाशीं गेला व खरें वर्तमान त्याच्याकडून राजास कळविलें. तेव्हां राजासहि परम संतोष वाटला. शेवटीं खुद्द सत्यवर्मा राजास घेऊन येण्याबद्दल प्रधानानें राजास सुचविलें व त्या गोष्टीस राजाची संमति घेतली.
 
राजाज्ञा मिळाल्यावर प्रधान कमटास समागमें घेऊन सत्यवर्मा राजास आणावयाकरितां मिथिलानगरीस गेला. तेथे गेल्यावर त्यानें राजाची भेट घेतली. त्याचा सत्यवर्मा राजानें चांगला आदरसत्कार केला. मग कमटानें राजास अवंतीनगरांतील विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर, सुरोचनगंधर्व विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर, सुरोचनगंधर्व स्वर्गास गेला हेंहि सांगितलें शेवटीं, तो कमट कुंभार राजास म्हणाला, विक्रमाच्या जातीविषयीं तेथील लोकांस संशय आहे. यास्तव आपण आमच्याबरोबर तेथें येऊन त्यांच्या संशयाची निवृत्ति करावी.
 
सत्यवर्मा राजाने तें सर्व ऐकून घेतल्यानंतर त्यास परमानंद झाला. त्यानें स्वतः अवंतीस जाऊन आपली कन्या सत्यवती हिची भेट घेतली. तेव्हां सर्वांच्या संशयाची निवृत्ति झाली. मग विक्रमास राज्याभिषेक झाला. दानधर्म पुष्कळ करून याचक जनांस संतुष्ट केलें. नंतर शुभविक्रमराजानें आपली मुलगी सुमेधावती विक्रम राजास दिली. तो लग्नसमारंभहि मोठ्या थाटाचा झाला. शेवटीं सत्यवर्मा राजानेंहि आपलें राज्य विक्रमास अर्पण केलें.
 
याप्रमाणें विक्रम दोन्ही राज्यांचा राजा झाल्यानंतर भर्तरी युवराज झाला. ते दोघे एकविचारानें राज्यकारभार करीत असतां सुमंतीक प्रधानानें आपली मुलगी पिंगला ही भर्तरीस द्यावी असें मनांत आणून ती गोष्ट त्यानें विक्रमराजाजवळ काढिली. त्याचें म्हणणें विक्रमानें कबूल करून लग्न नक्की केलें. तेव्हां त्याच्या जातीचा प्रथम शोध करण्यासाठी एक परिटानें प्रधानास सूचना केली. त्यावरून त्यानें कुंभारास विचारिलें असतां त्या कमटाने आपणास याची जात माहित नाही म्हणून सांगितलें. मग ही गोष्ट त्यानें सत्यवतीस विचारली. परंतु तिनें तो माझ्या पोटचा मुलगा नाहीं म्हणून कळविल्यावर प्रधानानें विक्रमास विचारलें. त्यानेंहि सांगितलें कीं, आपल्या जातीची मला माहिती नाहीं, मी त्याला आपला भाऊ मानिला आहे. याप्रमाणे तिघांनी सांगितल्यानंतर प्रधानानें ही गोष्ट खुद्द भर्तरीस विचारली. तेव्हां त्यानें आपला जन्मवृत्तांत त्यास निवेदन केला. मग प्रधानानें त्यास सांगितले कीं, जर सूर्यापासून तुम्ही झालां आहां, तर त्यास लग्नासाठी येथें बोलवा. तो तुमचा पिता असल्यानें अगत्यानें येईल. तें ऐकून भर्तरी म्हणाला, ही गोष्ट कांहीं अवघड नाहीं.
 
नंतर भर्तरीनें अंगणांत उभें राहून वर तोंड केलें आणी सूर्याची प्रार्थना केली कीं, जर मी तुझा मुलगा असेन तर माझ्या लग्ना करितां येथवर येऊन सर्वाच्या संशयाची निवृत्ति करावी, ती पुत्राची प्रार्थना ऐकून सुर्य मृत्युलोकीं अवंतीनगरास आला. त्यानें सुमंतीक प्रधानाची भेट घेतली व त्यास सांगितलें कीं, मनांत कांहीएक संशय न आणतां माझ्या भर्तरीस तूं आपली मुलगी पिंगला दे. नंतर सूर्य त्यास म्हणाला, लग्नाच्या मंगल कार्यास नवर्‍यामुलाचा बाप जवळ असावा असें तुं म्हणशील, तर तूं त्याची काळजी बाळगूं नकोस. प्रत्यक्ष देव जयजयकार करून पुष्पवृष्टि करतील. विक्रमराजाचा बाप जो सुरोचर गंधर्व, त्याससुद्धां या लग्नाकरितां येथें धाडून देईन. मात्र मी जर या ठिकांनीं लग्नाकरितां राहिलों तर माझा ताप लोकांस सहन होणार नाहीं. इतकें सांगितल्यानंतर प्रधानाचा संशय गेला व त्यानें लग्नसमारंमास आरंभ केला.
 
भर्तरीच्या लग्नाच्या दिवशी सीमंतपुजनाच्या वेळी राजाचा पिता सुरोचन गंधर्व स्वर्गाहून खाली आला. तो सत्यवतीस व विक्रमात भेटला. त्या वेळी विक्रमराजा पित्याच्या पायां पडला. मग राजानें सुमंतीक प्रधानास बोलावून आणलें व सुरोचनास भेटविलें त्यां गंधर्वानें प्रधानास म्हटलें, तुझें थोर भाग्य म्हणून धृमीननारायणाचा अवतार जो भर्तरी तो तुझा जांवई झाला. हा प्रत्यक्ष मित्रावरूणीचा ( सूर्याचा ) पुत्र होय. अशी त्याची समग्र मूळकथा सांगितल्यानंतर प्रधान पुन्हां सुरोचनाच्या पायां पडला व त्यास आग्रह करून सन्मानानें सीमंतपूजनासाठीं मंडपांत घेऊन गेला. तेव्हां त्या गंधर्वानें मनुष्याचा वेष घेतला होता. सीमंतपूजन झाल्यावर वधुवरांस आशीर्वाद देतेस मयीं स्वर्गीतून देवांनी पुष्पवृष्टि केली व लग्नमंडपांत असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून जयघोष केला.नंतर पांच दिवसपर्यंत लग्नसमांरभ मोठ्या थाटानें करून सर्वांस उत्तम वस्त्रें, भूषण दिलीं व वर्‍हाडी मंडळी मोठ्या गौरवानें रवाना केली. त्या लग्नासमयीं गोरगरिबांस राजानें पुष्कळ द्रव्य देऊन संतुष्ट केलें.सुरोचन गंधर्व आणि सत्यवती मुलाच्या लग्नसमारंभांत व्याही व विहीण म्हणून मिरवत होती. सुरोचन तेथें एक महिनाभर राहिला होता. नंतर सर्वांस भेटून व त्यांची परवानगी घेऊन तो आपल्या स्थानी गेला.
 
भर्तरीचें पिंगलेशीं मोठ्या थाटाने विवाह लागल्यानंतर पुढें कांहीं दिवसांनीं त्यानें दुसर्‍याहि स्त्रिया केल्या. त्यास एकंदर बाराशें स्त्रिया होत्या. त्यांत मुख्य पट्टराणी पिंगलाच होती, ही उमयतां अत्यंत प्रीतीनें वागत. त्यांना एकमेकांचा वियोग घटकाभर सुद्धां सहन होत नसे. तो मोठा विषयी होता. यास्तव त्यास रात्रदिवस स्त्रियांचे ध्यान असे. अश रीतीनें भर्तरीराजा सर्व सुखांचा यथेच्छ उपभोग घेत असतां बरीच वर्षे लोटली.
 
एके दिवशीं भर्तरी अरण्यांत शिकारीकरितां जात असतां, मित्रावरूणीनें ( सूर्यानें ) त्यास पाहिलें व मनांत विचार केला कीं, माझे पुत्र दोन; एक अगस्ती व दुसरा भर्तरीनाथ, त्यापैकीं पहिल्यानें तर ईश्वरप्राप्ति करून घेऊन आपलें हित साधून घेतलें, पण दुसरा भर्तरीनाथ मात्र विषयविलासांत निमग्र होऊन आपले कर्तव्यकर्म विसरला. यास्तव हा आपलें स्वहित साधून घेईल, असा कांही तरी उपाय योजिला पाहिजे.
 
मग भर्तृहरी ( भर्तरी ) चा भ्रम उडावा आणि त्यानें आपल्या हिताचा मार्ग पाहावा म्हणून मित्रावरूणीनें पृथ्वीवर येऊन दत्तात्रयाची भेट घेतली व समग्र वर्तमान निवेदन करून आपला हेतु कळविला. तेव्हा दत्तात्रेयानें सूर्यास सांगितल्यें कीं, भर्तरीविषयी तूं कांहीं काळजी न करितां आपल्या स्थानास जा; मी त्यास नाथपंथी म्हणुन मिरवून त्रैलोक्यांत नांवाजण्याजोगा करीन, तुझा पुत्र भर्तरी हा माझ्या आशीर्वादानें चिरंजीव होईल. ह्यापूर्वीच जें भविष्य करून ठेविलिलें आहे तदनुसार घडून आल्यावांचून राहावयाचें नाहीं, परंतु तूं मला आठवण केलीस हें फार चांगलें झालें आतां तूं पुत्राविषयीं कांही एक काळजी न वाहतां खुशाल जा: मला जसें योग्य दिसेल तसें मी करीन. इतकें सांगुन सूर्यास रवाना केलें व दत्तात्रेय भर्तृहरीसमगमें गुप्तपणें जाऊं लागला.
 
भर्तृहरी अरण्यांत शिकारीला गेला, त्या वेळी त्यानें अपार सेना समागमें घेतली होती. चौत्राचा महिना असल्यानें प्रखर उन्हाचे दिवस होते त्या दिवशी तिसरा प्रहर होऊन गेला. तरी त्यास कोठें पाणी मिळेना. तहानेनें ते लोक कासावीस होऊं लागले. त्यानीं बराच शोध केला, पण उदकाचा पत्ता लागेना, सर्वजण व्याकुल होऊन चौफेर पडून राहिले. राजाहि पाणी पाणी करीत होता व त्याच्या घशास कोरड पडली. बोलण्याचें अवसानहि राहिलें नाही. अशी सर्वांची अवस्था होऊन गेलीं. तें पाहूण दत्तात्रेयानें एक मायावी सरोवर निर्माण केलें. त्याच्या आजूबाजूस मोठेमोठे वृक्ष असून ते फलपुष्पांनी लादलेले व थंडगार वारा सुटलेला व तेथें पक्ष्यांचा किलकिलाट चालला होता. अशा सुंदर व रमणीय स्थानीं दत्तात्रेय आश्रम बांधून राहिलेले दिसत होते.
 
भर्तहरी स्वतः अरण्यामध्यें पाण्याचा शोध करीत फिरत होताच त्याच्या दृष्टीस हें सरोवर पडलें. तेव्हां तो एकटाच उदक पिण्यासाठी त्या सरोवराच्या कांठीं गेला व आतां पाणी पिणार इतक्यांत पलीकडे दत्तात्रेयानें ओरडून म्हटलें, थांब थांब ! उदकास स्पर्श करूं नकोस. तूं कोण आहेस ? तुझें नांव काय ? तें मला प्रथम सांग. दत्तात्रेयस्वामीस पाहतांच राजा चकित झाला आणि त्यास भीतीहि उत्पन्न झाली. तो तोंडांतून ब्रहि न काढितां, टकमक पाहूं लागला. तेव्हां दत्तात्रेयानें त्यास म्हटलें कीं तूं बोलत कां नाहींस ? तूं कोण आहेस ? तुझे आईबाप कोण ? गुरु कोण ? हें मला सांग व मग पाणी पी. तें भाषण ऐकून भर्तहूरी दत्तात्रेयाच्या पायां पडला. नंतर त्यानें आपली सविस्तर हकीगत त्यास सांगितलीं व अजूनपर्यंत गुरु केला नाहीं असें सांगितलें. तेव्हां दत्तात्रेयानें त्यास सांगितलें की, ज्याअर्थीं अद्यापपावेतों तूं गुरु केला नाहींस, त्या अर्थी तूं अपवित्र आहेस म्हणुनच तुला अजून कोणी गुरु मिळाला नाहीं, याकरितां तूं उदकास शिवूं नको. शिवशील तर तें सर्व पाणी आटून तळें कोरडें पडेल व मग मला राग येईल. तेणेंकरून तूं नाहक भस्म होऊन जाशील.
 
अशा प्रकरें दत्तात्रेयानें भर्तृहरीचा धिक्कार केल्यानंतर तो स्वामीच्या पायां पडून प्रार्थना करूं लागला की, महाराज ! माझा प्राण तृषेनें जाऊं पाहात आहे; आपन अनुग्रह करून मला उदक पाजावें. त्यावर दत्तात्रेयानें सांगितलें कीं, माझ्या अनुग्रहास तूं योग्य नाहींस, शंकर, ब्रह्मदेव माझ्या अनुग्रहासाठीं खेपा घालितात; असें असतां, तूं मला अनुग्रह करावयास सांगतोस ही गोष्ट घडेल तरी कशी ? हें ऐकून भर्तृहरी म्हणाला, तें कसेंहि असो, तुम्हीं कृपाळू आहां; दया क्षमा तुमच्या अंगीं आहे, तर कृपा करून मला उदक पाजावें व माझे प्राण वांचवावें. तेव्हां दत्तात्रेयानें त्यांस सांगितलें कीं, तुं म्हणतोस तर मी तुला अनुग्रह देतों; पण तूं बारा वर्षेपर्यंत तपश्चर्या करून अनुग्रह घेण्यास योग्य हो. त्यावर राजा म्हणाला, सध्यांच माझा प्राण जात आहे; मग बारा वर्षे कोणीं पाहिलीं आहेत ? दत्तात्रेयानें त्यास समजावून सांगितलें कीं, तूं मनाचा निग्रह करून संकल्प सोड, म्हणजे मी तुला उदक पाजतों, पण पुनः संसाराची आशा धरतां कामा नये व अगदीं विरक्त होऊन राहिलें पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तुला पत्करत असल्या तर पाहा. तें भाषण ऐकून राजा कुंठित होऊन विचार करीत बसला. त्यानें शेवटीं पोक्त विचार करून दत्तात्रेयास सांगितलें कीं मी अजून प्रपंचांतून मुक्त झालों नाहीं गयावर्जन करून पितुऋणांतून मुक्त होईन. तसेंच कांतेस पुत्र झाल्यावर तिच्या ऋणांतून मुक्त होईन. पुत्राचें लग्न झाल्यावर त्याच्या ऋणांतून मुक्त होईन. हीं सर्व ऋणें अद्यापर्यंत जशीच्या तशींच कायम आहेस: यास्तव आणखीं बारा वर्षें मला संसार करण्याची मोकळीक द्यावी.
 
मग दत्तात्रेयानें भर्तृहरीचें म्हणणें कबूल केलें व त्यास पिण्यास पाणी देऊन अनुग्रह दिला. त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून कानांत मंत्र सांगितला आणि आपण दत्तात्रेय आहों असें सांगून त्यांस ओळख दिली. नंतर तें मायिक सरोवर अदृश्‍य करून आपणहि गुप्त झाला. पाण्यावांचून सर्व तळमळत असल्यामुळें इतकी खटपट करून व्यर्थ असें भर्तृहरीस वाटून त्यानें श्रीदत्तात्रेयाची प्रार्थना केली. मग दत्तात्रेयानें भोगावतीचें उदक आणून सर्वांस पाजिलें. कामधेनूपासून अन्न निर्माण करविलें; शेवटीं राजा सैन्यासह भोजन करून व पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दर्शन घेऊन आपल्या नगरास गेला. इतक्यांत दत्तात्रेय भोगावतीस व कामधेनूस रवाना करून आपणहि निघून गेले.