सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय २५

भर्तरीनाथाचें व्यापार्‍याबरोबर गमन; सुरोचन गंधर्वाची कथा.
मागल्या अध्यायांत सांगितल्याप्रमाणें भर्तरीनाथ व्यापार्‍यांच्या समागमें अवंतीनगरास आल्यानंतर ते एका गांवाजवळ उतरले. तेथें माल नीट रचून ठेवून सारे एके ठिकाणीं अग्नि पेटवून शेकत बसले. इतक्यांत तेथें कांहीं कोल्हे आले आणि कोल्हाळ करून त्यांनीं असें सुचविलें कीं, व्यवसायी हो ! या अशा निर्धास्त स्थितींत बसून न राहतां सावध असा, तुह्मांवर चोरटे येऊन धाड घालण्याच्या विचारांत आहेत व ते तुम्हांस हाणमार करून सर्व द्रव्य घेऊन जातील. अशी सूचना देऊन कोल्हे निघून गेले.
 
पूर्वी भर्तरी श्वापदांमध्यें राहिला असल्यामुळें त्यास जनावरांची भाषा चांगली येत होती. हा कोल्हांनीं सांगितलेला संदेश आपण व्यापार्‍यांस सांगून सावध करावें, असा भर्तरीनें विचार करून चोर लुटावयास येणार आहेत, ही गोष्ट त्यांस सांगितली. कोल्हांची भाषा मला समजते व ते भोंकत असतां जें सांगत होते. तें सर्व मी लक्षपूर्वक ऐकून तुम्हांला सांगून अगोदरच सूचना केली आहे, असें तो व्यापार्‍यास म्हणाला. ह्या भर्तरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, त्यांनीं आपल्या मालांची नीट लपवालपवी केली व हातांत शस्त्रें घेऊन व चांगला उजेड करून सर्वजण पाहारा करूं लागले. इतकेंच केवळ नव्हें, तर ते मोठ्या सावधगिरीनें व शौर्यानें आपलें संरक्षण करण्यास तयार झाले. इतक्यांत त्यांच्यावर चोरांची धाड येऊन पडली; परंतु व्यापार्‍यांनी शस्त्रांचा मारा चालविल्यामुळें चोरांचें कांहीएक न चालतां ते जर्जर होऊन पळून गेले. तरीसुद्धां ते व्यापारी गाफील न राहतां मोठ्या सावधगिरीनें रात्रभर जागत राहिले होते.
 
पुढें दीड प्रहर रात्र राहिली असतां, पुन्हां कोल्हांनीं येऊन कुही केली, तेव्हां कोल्हे आतां काय बोलले म्हणुन व्यापार्‍यांनी भर्तरीस विचारलें. तेव्हां तो म्हणाला, शंकरानें ज्यास वर दिलेला आहे. असा एक राक्षस उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे जाण्याकरितां येत आहे. तो महाबलाढ्य आहे. त्याच्यापाशीं तेजस्वी अमोल अशीं चार रत्‍नें आहेत. त्यास जो मारील त्यास हा अलभ्य लाभ होईल आणि त्यास मारल्यानंतर त्याच्या रक्ताचा टिळा गांवच्या दरवाजास व आपल्या कपाळास जो लावील तो अवंती ( उज्जेनी ) नगरीचा सार्वभौम राजा होईल. व्यापार्‍यांस भर्तरी ही माहिती देत होता त्यांच वेळेस कर्मधर्मसंयोगानें विक्रम तेथून जात होता. त्यानें हें भर्तरीचें सर्व भाषण ऐकून घेतलें व लागलाच तो हातांत शस्त्र घेऊन राक्षसास मारवयास निघाला. त्या राक्षसाचा मूळ वृतांत असा कीं, पूर्वी हा चित्रमा या नांवाचा एक गंधर्व होता. एके दिवशीं तो शंकराच्या दर्शनाकरितां कैलासास गेला, त्या वेळेस शंकर व पार्वती सोंगट्यांनीं खेळत बसली होतीं. तो त्यांच्या पायां पडला व शंकराच्या आज्ञेनें त्यांच्याजवळ बसला. कांहीं वेळानें एक डाव शंकरावर आला व दानाविषयी शंकर व पार्वती ह्यांच्या म्हणण्यांत फरक पडला. तेव्हां दोघांत बराच वाद होऊन दान काय पडलें, हें त्यांनीं त्या गंधर्वास विचारलें, त्यानें शिवाचा पक्ष धरून अठरा पडले म्हणुन सांगितलें. परंतु त्या वेळेस खरोखर बारा पडले होते. पण शंकराची मर्जी मिळविण्याकरितां गंधर्वानें खोटें सांगितले, त्यामुळें भवानीस राग आला. ती त्यास म्हणाली, गंधर्वा ! तूं खोडसाळ आहेस. असत्याचा अंगीकार करून सांबाकडचें बोलतोस, तस्मात् तूं मृत्युलोकीं राक्षस होऊन राहा. असा पार्वतीचा शाप मिळतांच तो थराथरां कापूं लागला. त्यानें शंकराच्या पायां पडून विनंति केली कीं, देवा ! आपला पक्ष स्वीकारल्यानें मी शापबद्ध झालों; आतां माझी वाट काय ? असें म्हणुन तो ढळढळां रडूं लागला. तेव्हां शंकरास दया येऊन तो म्हणाला, गंधर्वनाथ ! पार्वतीनें शाप दिला हें खरें; पण तूं कांहीं चिंत्ता करूं नको. सुरोचन गंधर्वास इन्द्रानें शाप दिलेला आहे, त्यास जो पुत्र होईल तो शस्त्रप्रहार करून तुझा प्राण घेऊन राक्षसदेहापासून तुला सोडवील. तेव्हां मला मारल्यानें त्यास लाभ कोणता व माझें वृत्त त्यास कसें व कोणत्या रीतीनें लागेल, हें कळल्यास बरें पडेल म्हणुन गंधर्वानें म्हटल्यानंतर शंकरानें सांगितलें कीं, तुला मारुन तुझ्या रक्ताचा टिळा कपाळीं लाविल्यानंतर त्यास सार्वभौमपद प्राप्त होऊन तो सदासर्वदा विजय मिळवीत जाईल. तुझी माहिती त्यास भर्तरीनाथाच्या मुखानें लागेल ! तो भर्तरी धृमीणनारायणाचा अवतार होय. हें ऐकून गंधर्वास समाधान वाटलें. मग तो राक्षसाचा देह धरून मृत्युलोकीं आलां.
 
सुरोचन गंधर्वाला इन्द्रानें कोणत्या अन्यायास्तव शाप दिला, यांविषयी मूळ कथा अशी आहे कीं, एके दिवशीं अमरावतीस इन्द्र सभेंत असतां तेथें गंधर्व आदिकरून मंडळी आपापल्या स्थानीं बसली होती. अप्सरांचें नृत्यगायन चाललें होतें. त्या सभेंत बसलेल्या मेनका, तिलोत्तमा इत्यादि अत्यंत स्वरूपवान् अप्सर पाहून सुरोचन मोहित होऊन भरसभेमधून एकदम उठला व मेनकेचा हात धरून तिचे स्तन मर्दन करूं लागला. अशी अमर्यादा होतांच इंद्रास राग आला. त्यानें त्याची पुष्कळ निर्भर्त्सना केली व त्यास शाप दिला कीं, तूं यत्किचितही शरम न बाळगतां एकदम हें दुष्कर्म करावयास प्रवृत्त झालास; असा तूं दुष्ट असल्यानें स्वर्गापासून पतन पावून मृत्युलोकीं गाढव होऊन राहा. असा शाप मिळतांच तो पतन पावला. परंतु या वेळीं त्यानें इंद्राची प्रार्थना केली कीं महाराज अमरनाथ, मला आतां उःशांप द्यावा. मजकडून होऊं नये असा अपराध घडला खरा; पण मला माझ्या अपराधाची कृपा करून क्षमा करावी. अशी त्यानें स्तुति करून इंद्रास मोठेपणा दिला. तेणेंकरून त्याचें अंतःकरण द्रवून त्यानें त्यास उःशाप दिला कीं, तूं बारा वर्षांनीं पुनः परत आपल्या स्थानास येशील. परंतु तुला सांगतों तें ऐक, मिथिला नगरीच्या सत्यवर्मा नामक राजाच्या कन्येशीं युक्तिप्रयुक्तीनें तूं विवाह कर. पुढें विष्णूसारखा तेजःपुंज मुलगा विक्रम तुझ्या पोटीं येतांच तूं मुक्त होशील व पूर्ववत् गंधर्व होऊन स्वर्गास येशील. याप्रमाणे इंद्रानें उःशाप देतांच तो स्वर्गाहून पतन पावून मिथिलेच्या रानांत गाढव होऊन राहिला. त्या गांवात कमट म्हणुन एक कुंभार होता. तो गाढवांच्या शोधासाठीं अरण्यांत गेला असतां तेथें मिळालेली सर्व गाढवें त्यानें हांकून आपल्या घरीं नेलीं. त्यांतच हें शाप मिळालेलें गाढव होतें. पुढें कांहीं दिवसानीं तो दरिद्री झाला; तेव्हां शाप मिळालेलें गाढव ठेवून बाकींची सर्व गाढवें त्यानें विकून टाकिली.
 
तो गाढव तेथें एकटाच राहिला असतां दोन प्रहर रात्रीस कुंभारास उद्देशून म्हणूं लागला कीं, सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे. गोठ्यांतुन असा मनुष्यासारखा आवाज त्यास नित्य ऐकूं येई. पण कुंभारानें घराबाहेर येऊन पाहिल्यावर त्यास तेथें मनुष्य दिसत नसे. असा तो अनेक वेळां फसला. गाढव बोलत असल्याची कल्पना त्याच्या मनांतच येईना.. एकदां तो ह्याच संशयांत पडून कांहीं वेळ उभा राहिला. मग आपण याची आतां भ्रांति फेडावी, असा गाढवानें विचार करून कमटास आपल्याजवळ बोलाविलें आणी म्हणाला कीं, सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे. हेंच मी तुला नित्य सांगत असतो. ह्यांत संशयाचें कांहींच कारण नाहीं. कसेंहि करून माझें इतकें काम कर. हें ऐकून तो कुंभार खोल विचारांत पडला व त्याच्या मनांत भीति उप्तन्न झाली. कारण, ही अघटित गोष्ट कोणापाशीं बोलता येईना. जर ही गोष्ट बाहेर फुटली तर राजा मला शिक्षा करील. हा गाढव असतां राजाचा जांवई होऊं पाहतो ही गोष्ट घडेल तरी कशी ? ह्याचा परिणाम चांगला होणार नाहीं. यास्तव आतां येथून निघून दुसर्‍या राज्यांत राहावयास जावें हें चांगलें , असा विचार त्या कुंभारानें करून निघण्याची तयारी केली. दुसरे दिवशी सकाळीं हा सर्व प्रकार त्यानें आपल्या स्त्रीस कळविला व तिचाहि रुकार मिळविला. परंतु त्या उभयतांहि नवराबाकोच्या मनांत अशी कल्पना आली नाही कीं, गाढवास मुळीं वाचा नसते. असें असतां हा मनुष्यांप्रमाणें बोलतो आहे, यास्तव हा गंधर्व, यक्ष, किन्नर यांपैकींच कोणी तरी शापग्रस्त असावा.
 
मग त्यांनीं त्याच गाढवावर सामानसरंजाम भरला व पळून जात असतां सीमेवर रक्षकांनीं त्यास प्रतिबंध केला आणि हें नगर सोडून कां जातां म्हणुन विचारूं लागले. पळून जाण्याचें कारण सांगावें म्हणुन राजसेवकांनीं पुष्कळ प्रयत्‍न केला, परंतु तो व स्त्री कांहींच न बोलतां उभीं राहिली. कारण ही गोष्ट सांगावी तर राजा प्राण घेतल्यावांचून सोडणार नाहीं, ही त्यांस मोठी भीति होती. ह्यामुळें रक्षकांनीं जरी मनस्वी आग्रह केला तरी कांहीं न बोलतां स्वस्थ राहण्याखेरीज दुसरा मार्गच त्यांस दिसेना.
 
इतक्यांत कमट कुंभार पळून जात असतां त्यांस आम्हीं पकडुन ठेविलें आहे, अशी बातमी रक्षकांनी सत्यवर्मा राजास सांगितली. ती ऐकून त्यास दरबारांत आणण्याचा हूकूम झाला. दूतांनी त्यास राजसभेंत नेऊन उभें केलें. त्यास सत्यवर्मा राजा म्हणाला, माझ्या राज्यांत मी कोणास दुःख होऊं देत नाहीं, असें असतां तूं कां पळून जात आहेस ? तुला कोणतें दुःख झालें आहे तें मला सांग मी बंदोबस्त करितों. तें राजाचें भाषण ऐकून कुंभार म्हणाला, महाराज ! प्रजेच्या सुखाकडे आपलें पूर्ण लक्ष आहे, हें मी जाणतों, परंतु मला जें दुःख आहें तें माझ्यानें सांगवत नाही. तें सांगितलें असतां माझ्या जिवास मला धोका दिसतो. मग राजानें त्यास आश्वासन दिलें कीं, एखाद्या अन्यायामुळें मजकडून शासन होइल अशी तुला धास्ती असेल तर मी तो अन्याय तुला माफ करून तुझ्या प्राणाचें रक्षण करीन. तूं कांहीं संशय आणूं नको. मी तुला वचनहि देतों. असें बोलून लागलेंच राजानें त्यास वचन दिलें मग त्यानें राजास एके बाजूस नेलें आणी तो त्यास म्हणाला, राजा ! तुझी कन्या सत्यवती आपल्यास स्त्री करून देण्याचा हट्ट माझ्या गाढवानें धरला आहे व हें तो नित्य मजपाशीं मनुष्यवाणीनें बोलत असतो. ही गोष्ट तुला समजल्यानंतर तूं रागावशील, ही कल्पना मनांत येऊन मी येथून पळून जात होतो.
 
कमटाचें तें भाषण ऐकून राजास फार आश्चर्य वाटलें व त्यानें विचार केला कीं, ज्या अर्थी हा गाढव बोलतो आहे, त्याअर्थी हें जनावर नसुन कोणी तरी दैवत असलें पाहिजे व कारणपरत्वें त्यास पशूचा देह प्राप्त झाला असावा. असा विचार करून त्यानें कमट कुंभारास सांगितलें कीं, या कारणाकरितां तूं भय धरून गांव सोडून जाऊं नकोस; खुशाल आपल्या घरीं जाऊन आनंदानें राहा. मी या गोष्टीचा विचार करून व त्या गाढवाची परिक्षा घेऊन त्यास माझी कन्या अर्पण करीन. आतां तूं घरी जाऊन गाढवास सांग कीं, तूं म्हणतोस ही गोष्ट मी राजाजवळ काढिली होती, परंतु त्याचा अभिप्राय असा आहे कीं, हे सर्व मिथिलानगर तूं तांब्याचें करून दाखव म्हणजे तो आपली कन्या सत्यवती तुला देईल. इतके बोलून राजानें कमटास घरीं जावयास सांगितलें.
 
नंतर तो कमट स्त्रीसह आपल्या घरीं गेला. त्या रात्री पुनः गाढवानें कमटास हाक मारून लग्नाची गोष्ट पूर्ववत् निवेदन केली. तेव्हां कमटानें त्यास राजच्या संकेताप्रमाणें सर्व मजकूर सांगितला नंतर कमट म्हणाला कीं, राजाचा हेतू पूर्ण करावयाचें तुझ्या अंगी सामर्थ्य असेल तर सर्व नगर तांब्याचें कर. म्हणजे सत्यवती तुला प्राप्त होईल. तें कमटाचें भाषण ऐकून तो गाढवरूपी गंधर्व म्हणाला, राजा मोठा बुद्धिवान् असें दिसत नाहीं . कारण या कामी त्यानें अगदीं पोक्त विचार केला नाहीं. अरे रत्‍नखचित सुवर्णाची नगरी त्यानें मला करावयास सांगितली असती तरी मी ती करून हुबेहुब दुसरी अमरावती त्यास बनवून दिली असती किंवा इंद्राची सर्व संपत्ति त्यास आणून दिली असती. त्यानें कल्पतरूचें आरामवन मागावयाचें होतें किंवा कामधेनू मागावयाची होती. असली अलभ्य मागणी मागावयाची सोडून त्यानें ताभ्रमय नगर करून मागितले ! असो ! मी तुझ्या म्हणण्याप्रमाणें आज रात्रीं तांब्याचें नगर करून देतों, असें त्या गंधर्वानें कबूल केलें, तो निरोप कुंभारानें राजास कळविला. तेव्हां राजानें गर्दभाचें म्हणणें आपणास कबूल असल्याबद्दल त्याच कुंभाराबारोबर उत्तर पाठविलें. तें ऐकून त्या गर्दभरूपी गंधर्वानें विश्वकर्म्याची प्रार्थना करतांच तो प्रत्यक्ष येऊन काय आज्ञा आहे म्हणुन विचारूं लागला. त्यास गंधर्वानें सांगितलें कीं, ही सर्व मिथिलानगरी एका रात्रींत तांब्याची करून दे, तें कबुल करून विश्वकर्मानें तें सर्व नगर रात्रींत तांब्याचें करून टाकिलें व राजापासून अंत्यजापर्यंत सर्वांचीं एकसारखीं तांब्याची घरें केलीं असें सांगून व गर्दभरूपी गंधर्वाची आज्ञा घेऊन विश्वकर्मा निघून गेला.
 
दुसरे दिवशीं प्रातःकाळीं सर्व लोक उठून पाहातात तो, सारें नगर तांब्याचें झालेलें ! तें पाहून सारे आश्वर्यचकित झाले. तो चमत्कार पाहून त्यांच्या मनांत अनेक प्रकारचे तर्क येऊं लागले. राजास मात्र खूण पटली; परंतु ह्यास आतां कन्या दिल्यावांचुन चालावयाचें नाहींच. जर दिली लोक हसतील, असे विचार मनांत येऊं लागले. मग कन्या कमटाचे स्वाधीन करून त्यास गांवातून दुसरीकडे पाठविण्याचा विचार करून त्यानें कुंभारास बोलावून आणिलें व लोकनिंदेचा सर्व प्रकार त्यांस ऐकविला. आणि कन्या घेऊन देशीं जाण्याकरितां प्रार्थना केली. त्यानें राजाचें म्हणणें कबूल केलें व सामानसुमान बांधून जाण्याची तयारी केली. रात्रीस जाऊन राजास तसें सांगितलें.
 
मग राजानें कन्येस बोलावून तिला सांगितले कीं, मुली, तुला मी देवास अर्पण केलें आहे, तर त्याचा आनंदानें अंगीकार कर. त्यानें सर्व नगर तांब्याचें करून टाकिल हा प्रत्यक्ष अनुभव पहा. यावरून तो गाढव नसून प्रत्यक्ष देव असल्याविषयीं माझी खात्री आहे. आतां तो कोण आहे वगैरे सर्व विचारपुस तूं करून घे. माझ्या सांगण्याचा अपमान करूं नकोस. नाहीतर माझ्या कुळास डाग लागेल व तो रागावला तर शाप देईल. तूं युक्तिप्रयुक्त्तीनें या गाढवाच्या देहापासून त्याची मुक्तता करून घे. त्यानें पूर्वदेह धारण केल्यावर त्या योगानें उभय कुळांचा उद्धार होईल. आतां प्रफुल्लित अंतःकरणानें कमटाच्या घरीं जा. तें बापाचें म्हणणें सत्यवतीनें आनंदानें कबुल केलें.
 
नंतर रात्रीं कन्येस घेऊन राजा कुंभाराच्या घरीं गेला. कमटानें बोटाच्या खुणानें जांवई ( गाढव ) दाखविल्यानंतर राजानें त्याचे पाय धरून विनंति केली कीं, महाराज ! ही माझी कन्या तुम्हांस अर्पण केली आहे, हिचें आतां आपण पालन करावें. हें राजाचें भाषण ऐकून गाढवानें सांगितलें, राजा, तूं महाभाग्यवान् आहेस म्हणून मी तुझा जांवई झालों. पण तूं माझ्या देहाकडे पाहा ! यामुळें लोक काय म्हणतील ? जो तो निंदाच करील. तरी तूं भाग्यवान् असें मी समजतो. नंतर त्यानें आपल्याला कोणत्या कारणानें इन्द्रानें शाप दिला वगैरे सर्व प्रकार सांगितला. तो ऐकून हा सुरोचन गंधर्व आहे असें समल्यावर राजास परमानंद झाला आणि आपली मुलगी त्याच्या स्वाधीन करून राजा घरीं गेला. कुंभारहि तो गांव सोडून रातोरात अवंतीनगराकडे जावयास निघाला.