सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय २१

गोरक्षनाथास मोहविण्याचे मैनाकिनीचे सर्व प्रयत्‍न निष्फळ
मच्छिंद्रनाथानें गोरक्षास तेथें राहवून घेतल्यावर त्याचें मन रमून त्यानें तेथें राहावें म्हणून मैनाकिनीनें अनेक प्रयत्‍न केले. ती तर आपल्या पुत्राहून त्याच्यावर विशेष प्रेम ठेवूं लागली. तिनें त्याच्या खाण्यापिण्याची, निजण्याबसण्याची वेळच्या वेळेस योग्य तरतूद ठेविली व त्यास कपडालत्ता व दागदागिना हवा तसा उंची वापरावयास देऊं लागली. गोरक्षनाथास अशीं सर्व सुखें मिळत असतांहि त्यास तें गोड लागेना. तो नित्य मच्छिंद्रनाथास म्हणे कीं, तिन्ही लोकांत आपण मान्य, अशीं आपली योग्यता असतां ह्या विषयसुखाच्या खाडयांत कां पडत आहां ? तशांत तुम्ही मूळचे कोण आहां, आतां कार्य कोणतें करीत आहां व अवतार घेऊन कोणतें कर्म करावयाचें आहे ह्याचा थोडासा विचार केला पाहिजे; यास्तव सर्वसंगपरित्याग करुन ह्या काळजींतून मोकळें व्हावें.
 
अशा प्रकारें गोरक्षानें मच्छिंद्रनाथ गुरुस बरेच वेळां सांगितलें तेणेंकरुन त्यास विरक्तता उत्पन्न झाली. मग मायापाशांत गुंतून न राहतां आपल्या मुलुखास जाण्याबद्दल त्यानें गोरक्षास वचन दिलें; तेव्हां त्यास आनंद झाला. पुढें गोरक्षासमागमें गेल्यावांचून आतां मला सुटका नाहीं, असा आपला विचार मच्छिंद्रनाथानें तिलोत्तमेस कळविला पण तुला सोडून जाण्यास हिंमत होत नाहीं, असेंहि सुचविलें. तेव्हां ती म्हणाली, तुम्ही जर गेला नाहीं तर तो तुम्हांस कसा नेईल ? तें ऐकून, आपण त्यास दिलेलें वचन आणि गोरक्षाबरोबर झालेलें भाषण त्यानें तिला कळविलें आणि म्हटलें, त्याच्याबरोबर गेल्यावांचून सुटका नाहीं व तुझा मोहपाश मला जाऊं देत नाहीं, अशा दुहेई संकटांत मी सांपडलों आहें, आतां ह्यास एकच उपाय दिसतो. तो हा कीं, तूं त्यास आपल्या कुशलतेनें मोहवून टाक. हें ऐकून ती म्हणाली, मीं पूर्वीच उपाय करुन पाहिले. त्यांत कोणतीहि कसर ठेविली नाही, परंतु व्यर्थ ! माझ्या बोधानें व करामतीनें कांहीं एक निष्पन्न झाले नाहीं. असें तिचें निराशेचें भाषण ऐकूनहि आणखी एकदां प्रयत्‍न करुन पाहावयासाठीं मच्छिंद्रनाथानें तिला सुचविलें.
 
एके दिवशीं गोरक्षनाथानें पद्मिनीपाशीं गोष्ट काढिली कीं, आज मी मच्छिंद्रनाथास घेऊन तीर्थयात्रेस जातों. तेव्हां तिनें त्यास बोध केला कीं, बाळा, मी तुला माझा वडील मुलगा म्हणून समजतें. भावाचें तुला पाठबळ आहेच, आतां आम्ही अन्नवस्त्र घेऊन स्वस्थ बसून राहणार. गोरक्षनाथाला दया यावी म्हणून ती दीन मुद्रेनें असें बोलत असतांहि त्याच्या मनांत दया उत्पन्न झाली नाहीं. उलट तिला त्यानें त्यावेळीं स्पष्ट सांगितलें कीं, आम्हांस त्रैलोक्याच्या राज्याची देखील पर्वा नाहीं; मग तुझ्या या स्त्रीगज्याच्या राज्याची देखील पर्वा नाहीं; मग तुझ्या या स्त्रीगज्याचा हिशेब काय ? तें तुझें खुशाल भोग. आम्ही योगी. आम्हांस या भूषणामध्यें मोठेसें महत्त्व वाटत नाहीं; यास्तव आम्ही तीर्थाटनास जातों. तेथें सुकृतक्रिया आचरण करुन सुखसंपत्ति भोगूं. असें म्हणून तिच्यापाशीं जाण्याकरितां आज्ञा मागूं लागला. तिनें त्यास पुष्कळ समजावून सांगितलें, परंतु तो ऐकेना. सरतेशेवटीं एक वर्षभर तरी, राहावें म्हणून तिनें अतिशय आग्रह केला असतां तो तिला म्हणाला, मला येथें येऊन सहा महिने झाले, यास्तव आतां मी येथें जास्त रहाणार नाहीं. तेव्हां पद्मिणी आणखी सहा महिने राहाण्यासाठीं आग्रह करुं लागली व आतां थोडयासाठीं उतावळी करुं नकोस; मग मी मोठया आनंदानें मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रा करावयाची आज्ञा देईन, अशा प्रकारच्या भाषणानें ती त्याची पायधरणी करुं लागली. तिनें इतकी गळ घातल्यामुळें त्याच्यानें तिचें म्हणणे अमान्य करवेना. त्यानें तिला सांगितलें कीं, तुझ्या म्हणण्याप्रमाणें मी आणखी सहा महिने तुझ्याकरितां राहातो. पण त्या मुदतीनंतर तरी आम्हांस जाण्याची तूं कधीं परवानगी देणार तो दिवस आज नक्की मला कळव, म्हणजे ठीक पडेल. मग चैत्र शुद्ध प्रतिपदेस भोजन झाल्यानंतर मी राजीखुषीनें तुमची रवानगी करुन देईन, म्हणून तिनें गोरक्षनाथास कबूल केलें. ते सहा महिने हां हां म्हणतां निघून जातील असें मनांत आणून तो तेथें स्वस्थ राहिला.
 
 
या गोष्टी कांहीं दिवस लोटल्यानंतर एके दिवशीं मैनाकिनीनें गोरक्षनाथास हांक मारुन जवळ बसविलें. तोंडावरुन हात फिरविला आणि म्हटलें, बाळा, माझ्या मनांत तुझें एकदांचें लग्न करुन द्यावें असें आहे ! मग त्या माझ्या सुनेबरोबर हंसून खेळून माझी कालक्रमणा तरी होईल. जी फारच स्वरुपवता स्त्री असेल तिच्याशीं मी तुझा विवाह करीन. लग्नसमारंभहि तुझ्या खुशीप्रमाणें मोठया डामडौलानें करीन. तुम्ही तीर्थयात्रा करुन लौकरच परत या. फार दिवस राहूं नका. येथें आल्यावर सर्व राज्यकारभार तूं आपल्या ताब्यांत घे, बाळा, इतकी तूं माझी हौस पुरवलीस म्हणजे झालें. असें बोलून त्यानें मोहजालांत गुंतावें म्हणून ती पुष्कळ प्रकरच्या युक्‍त्या योजून पाहात होती, परंतु तिच्या भाषणांपासून बिलकुल फायदा झाला नाहीं. त्यानें तिला निक्षून सांगितलें कीं, मला कर्णमुद्रिका या दोन बायका आहेत, आणखी तिसरी करण्याची माझी इच्छा नाहीं व आतां लग्न करणें मला शोभतहि नाही. असा जेव्हां त्यानें तिला खडखडीत जबाब दिला, तेव्हां ती निराश होऊन स्वस्थ बसून राहिली.
 
नंतर एके दिवशीं गोरखनाथास मोहविण्यासाठीं पद्मिणीनें एक सुंदर स्त्री खेळण्याच्या मिषानें रात्रीस त्याच्याकडे पाठविली. तिनें सोंगटयाचा पट बरोबर घेतला होता. ती गोरक्षनाथाच्या खोलींत जाऊन त्यास म्हणाली, तुमच्या समागमें आज दोन सोंगटयाचे डाव खेळावे असें माझ्या मनांत आलें आहे. हें ऐकून तोहि तिचा हेतु पुरविण्यास्तव तिजबरोबर खेळावयास बसला. त्या वेळीं तिनें नेत्रकटाक्षांनीं पुष्कळ बाण मारुन त्यास विंधून टाकण्याविषयीं प्रयत्‍न केले. पण तो तिच्या नेत्रकटाक्षांस, तिच्या भाषणास व हावभावांस कांहीं एक जुमानीना. शेवटीं तिनें आपल्या मांडया उघडया ठेवून गुह्यभागहि त्याच्या नजरेस पाडला. इतक्या निर्लज्जपणानें ती त्याशीं वागत असतांहि त्याच्या मनांत मुळींच कामवासना उत्पन्न होईना; असें पाहून ती अखेरीस खिन्न झाली व राणीस सर्व वृत्तांत सांगून विन्मुख होऊन परत घरीं गेली. सारांश, मैनाकिनीनें गोरखनाथास राहविण्याकरितां केलेले सर्व प्रयत्‍न फुकट गेले.
 
पुढें पुढें, मच्छिंद्रनाथाचा वियोग होणार म्हणून मैनाकिनी मीननाथास पोटाशीं धरुन रडत बसूं लागली. त्या वेळीं दुसर्‍या स्त्रिया तिची वारंवार समजूत करीत व गोरक्षनाथास आपण वश करुं असा तिला धीर देत; तरी त्यांच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसेना. अशा रीतीनें ती चिंतेमध्यें दिवस काढीत असतां, पूर्वी ठरलेला वर्षप्रतिपदेचा दिवस येऊन ठेपला. त्या दिवशीं जिकडे तिकडे लोक आनंदांत मौजा मारण्यांत गुंतावयाचे; परंतु त्या दिवशीं सर्व नगरी हळहळूं लागली.
 
इकडे गोरक्षनाथ शिंगी, फावडी इत्यादि घेऊन मच्छिंद्रनाथास बोलावूं आला. तो त्याच्या पायां पडून निघण्यासाठीं उतावळी करुं लागला. तेव्हां तर मैनाकिनी मोठमोठयानें रडूं लागली. तिनें म्हटलें कीं बाळा, तुम्ही दोघेहि जेवून जा; उपाशीं जाऊं नका. मग स्वयंपाक झाल्यावर गुरुशिष्यांनीं एके पंक्तीस भोजन केलें.
 
नंतर तिलोत्तमा राणीनें मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढिली कीं, तुम्ही तर आतां जावयास निघालांत तरी मीननाथास घेऊन जाण्याचा विचार आहे कीं नाहीं, हें मला सांगावें. हें ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले कीं, त्याच्याविषयीं जसें तुझ्या विचारास येईल तसें आम्ही करुं. त्याच्याबद्दल तुझें मन आम्ही दुखविणार नाहीं, तेव्हां ती म्हणाली, तुम्हीं मीननाथास आपल्या समागमें घेऊन जावें. आजपर्यंत तुम्ही येथें होतां म्हणून मारुतीच्या भुभुःकारापासून त्याचे संरक्षण झालें. तुम्ही गेल्यानंतर त्याचे येथें रक्षण करणारा कोणी नाहीं. दुसरीहि ह्यांत एक अशी गोष्ट आहे कीं, मला उपरिक्षवसूचा (तुमच्या पित्याचा) शाप आहे. त्याच्या शापास्तव मीं सिंहलद्वीप सोडून येथें आले आहे. शापाचि मुदतहि भरत आली आहे; यास्तव तुम्ही जातांच उःशापाचें फळ मला प्राप्त होईल व तो येऊन मला येथून घेऊन जाईल; मग मीननाथाचें येथें संरक्षण कोण करील ? जर त्यास स्वर्गास घेऊन जावे तर मनुष्यदेह तेथें जात नाहीं, अशा या सर्व अडचणीं लक्षांत आणून माझें मत असें आहे कीं, मीननाथास तुम्ही आपल्याबरोबर घेऊन जावें. मग तिच्या मर्जीनुरुप मीननाथास घेऊन जाण्याचा विचार ठरला.
 
मग भोजन झाल्यानंतर गोरक्षनाथानें निघण्याची घाई मांडिली. मीननाथाकडे पाहून तिलोत्तमेच्या मुखांतून शब्द निघेनासा झाला. तिला गहिंवर येऊन ती एकसारखी रडत होती. तेव्हां तेथील स्त्रियांनीं गोरक्षनाथास वेढून टाकिलें. त्यानें जाऊं नये म्हणून त्या राजवैभवाचें वर्णन करुं लागल्या. निरनिराळ्या दागदागिन्यांचा व कपडयालत्त्यांचा त्याचेपुढें ढीग करुन रत्‍नखचित अलंकार व भरजरीचे शेलेदुपेटे त्यांनीं त्याचेपुढें आणून ठेविले. तसेंच, आम्ही अवघ्या जणी तुझ्या बटीक होऊं, तुझ्या मर्जीप्रमाणें नटून श्रृंगारुन तुला यथेच्छ रतिसुख देऊं, असा पुष्कळ प्रकारांनीं त्यांनीं त्याला मोहविण्याचा प्रयत्‍न केला; पण गोरक्षनाथ त्या सर्वांचा धिःकार करुन म्हणाला, आम्हांला सुखसंपत्तीशीं काय करावयाचें आहे ? जमिनीचें आथंरुण आम्हांस फार सुखदायक होतें. अशा प्रकारें बोलून तो लागलाच निघाला. जातांना त्यानें मैनाकिनीस नमस्कार केला, मीननाथास खांद्यावर घेतलें व मच्छिंद्रनाथास बरोबर घेऊन तो गांवाबाहेर गेलां.
 
ते निघण्यापूर्वी गोरक्षनाथाच्या नकळत आपल्या भांडारातील सोन्याची एक वीट मैनाकिनीनें मच्छिंद्रनाथास दिली होती; ती त्यानें त्यास न कळूं देतां झोळींत ठेविली. वेशीपर्यंत मंडळी त्यांस पोंचवावयास गेली होती तेथें मैनाकिनी मच्छिंद्रनाथाच्या पायां पडली. तिनें गोरक्षनाथास पोटाशीं धरिलें व त्यास नाथाची बरदास्त ठेवून त्याच्या जिवास जपण्याविषयीं पुष्कळ सांगितलें, तरी पण तिचा मायामोह सुटेना. तिनें गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी घातली आणि मोठमोठयानें रडूं लागली. मग त्या प्रसंगांतून निसटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा हात धरुन सपाटयानें चालूं लागला.
 
इकडे तिलोत्तमा (मैनाकिनी) ऊर बडवून व डोकें आपटून घेऊं लागली व गायीसारखा हंबरडा फोडून शोक करुं लागली. तो शोक उपरिक्षवसूनें आकाशांतून ऐकतांच विमान घेऊन तो तिच्याजवळ आला व तिला तिच्या घरीं घेऊन गेला. तो म्हणाला, तुला वेड तर लागलें नाहीं ना ? तूं हें मांडिलें आहेस काय ? तूं स्वर्गांतील राहणारी असून शाप मिळाल्यामुळें येथें आलीस. आतां शापमोचन होऊन तूं सुखी होणार ! असें बोलून त्यानें तिच्या अंगावर हात फिरवून तिला पोटाशीं धरिलें व तिचे डोळे पुसून तिला घरीं नेल्यानंतर युक्तिप्रयुक्तीनें बोध केला.