मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय १६

कानिफनाथ व गोरक्षनाथांची भेट, कानिफनाथांचे गोपीचंद राजाकडे आगमन
स्त्रीराज्याच्या राजधानीत मच्छिंद्रनाथाने कानिफनाथास मोठ्या आदरसत्काराने राहवून घेतल्यानंतर त्याची उत्तम बर्दास्त ठेविली. असे करण्यात मच्छिंद्रनाथाचा हेतु असा होता की, कानिफा येथून गेल्यानंतर गोरक्षनाथास भेटेल व तो मजविषयी त्यास बातमी देईल. मग तो मला नेण्यासाठी येथे येईल व मला घेऊन जाईल. असे झाल्यास मी ह्या सर्व सुखास मुकेन; इतक्या पल्ल्यास गोष्ट येऊ नये व त्याचेहि मन रमून त्याने निरंतर येथेच राहावे म्हणून सुम्दर रूपवान देवांना देखील भ्लविणार्‍या अशा स्त्रिया, विषयात गोवून टाकण्याकरिता त्याच्या शिबिरास पाठवू लागला. पण कानिफाने त्या स्त्रियांकडे ढुंकूनसुद्धा पाहिले नाही. कानिफापुढे स्त्रियांचे तेज पडत नाही. त्यांचा हिरमोड होऊन त्या रडत परत येतात, असे वर्तमान मच्छिंद्रनाथास समजल्यावर त्याच्या शिष्यांना विषयात गोवून टाकण्याला सांगितले; पण शिष्यांजवळहि स्त्रियांचे काही चालले नाही. त्या इलाज करून थकल्या, पण त्यांचा हेतु सफळ झाला नाही. महिनाभर राहून कानिफाने मच्छिंद्रनाथापाशी जावयास आज्ञा मागितली; ती त्याने बिनतक्रार दिली. तेव्हा हत्ती, घोडे, पालख्या, उंची वस्त्रे, तंबू राहुट्यादि पुष्कळ देऊन हिरे, माणके, सुवर्ण व पैसा विपुल दिला. अशा मोठ्या लवाजम्यानिशी मच्छिंद्रनाथाने कानिफाची रवानगी करून दिली.
 
कानिफा तेथून निघून तीर्थयात्रा करीत चालला. तो जेथे जेथे जाई तेथे तेथे त्याचा उत्तम प्रकारे आदरसत्कार होई. पुष्कळ लोक त्याचे शिष्य झाले. जो तो त्याची वाखाणणी करी व मोठ्या हौसेने दूरदूरचे लोक येऊन आपआपल्या गावास मोठ्या सन्मानाने त्यास घेऊन जात. त्याजविषयी लोकांच्या मनात पूज्यबुद्धि उत्पन्न होऊ लागली. अशी त्याची कीर्ति पसरत हेलापट्टणातहि त्याच्या नावाचा डंका बराच गाजला. तेव्हा गोपीचंद राजाने दूत पाठवून नाथाचा समाचार आणविला त्याच्या ऐश्वर्याची दूतांनी राजापाशी फारच स्तुति केली.
 
इकडे गोरक्षनाथ जगन्नाथहून तीर्थयात्रा करीत फिरत असता त्याची व कानिफाची एका अरण्यात भेट झाली. उभयतांनी आदेश केला. मग कानिफाने गोरक्षास भरजरी गालिच्यावर बसविले. त्या वेळी गोरक्षनाथाची विद्या कशी काय हे पाहावे असे कानिफाच्या मनात येऊन त्याने गोष्ट काढिली की, त्या पलीकडील आम्रवृक्षावर जी मधुर फळे पक्व झालेली दिसत आहेत, त्यातून थोडीशी आणविण्याचे माझ्या मनात आहे. ते ऐकून गोरक्ष म्हणाला, कशाला इतका खटाटोप ! आपल्याला काही गरज नाही. तेव्हा कानिफा म्हणाला, खटपट कशाची आली आहे त्यात? आता शिष्य पाठवून ते आंबे तोडून आणवितो. हे ऐकून गोरक्ष म्हणाला, इतका यत्न करण्याचे काय कारण आहे? आता शिष्य जवळ आहेत म्हणून त्यांच्यापासून आणवाल; पण कोणे वेळेस शिष्य जवळ नसेल तर आपण कसे करावे? आपल्या विद्येच्या प्रभावाने फळे तोडून विद्येचा प्रताप व गुरूचा प्रसाद उजेडास आणावा व फळे खाऊन आत्मा संतुष्ट करावा. तेव्हा कानिफाने सांगितले की, जर अशी तुमची मर्जी आहे, तर मी गुरूच्या कृपेने आता फळे आणितो. असे म्हणून त्याने विभक्तास्त्रमंत्र म्हणून भस्म मंत्रून त्यावर आकर्षणास्त्राची योजना केली व भस्म फेकले; त्यामुळे पिकलेले सर्व आंबे झाडावरून त्याचे जवळ येऊन पडले. मग सर्वांनी ते आंबे खाल्ले व हात धुतल्यानंतर गोरक्षनाथाने मनात विचार केला की, कानिफाने आपले कर्तृत्व तर मला दाखविले. तेव्हा आपणहि ह्यास थोडासा चमत्कार दाखवावा. असा विचार करून कानिफास तो म्हणाला की, तुम्ही माझा पाहूणचार केलात ! आता मी काही फळे आणितो तर ती खाऊन आपण तृप्त व्हावे. कानिफाने त्याचे हे बोलणे मान्य केले. मग गोरक्षनाथाने आकर्षणशक्ति व विभक्तास्त्र जपून भस्म फेकताच एका लवंगवनातील तर्‍हेतर्‍हेची फळे येऊन जवळ पडली. ती मधुर फळे खाऊन सर्व तृप्त झाले.
 
मग गोरक्षनाथाने मुद्दाम गोष्ट काढिली की, हि शिल्लक राहिलेली फळे पुन्हा परत झाडावर नेऊन डहाळीस चिकटवावी. तेव्हा कानिफा म्हणाला, ही गोष्ट अशक्य होय. त्यावर गोरक्ष म्हणाला, निःसीम गुरुभक्तास काही अवघड नाही. तो दुसरा ब्रह्मदेवहि उत्पन्न करील. अशा प्रकारचे पुष्कळ दृष्टांत देऊन म्हणाला, मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने पाहिजे ते करीन. हे ऐकून कानिफास राग आला. तो म्हणाला मी तुला व तुझ्या गुरूला जाणतो, तो नरकात पिचत पडला आहे ! स्वतःला योगी असे म्हणवून तो स्त्रीराज्यात रतिविलासात निमग्न होऊन गेला आहे. ब्रह्मदेवाला शक्तिहीन समजून मोठमोठाल्या चढाचढीच्या गोष्टी तू करीत आहेस पण ही सर्व प्रौढी सोडून देऊन मार्गस्थ हो. अशा प्रकारचे उपमर्दाचे पुष्कळ भाषण ऐकून घेतल्यावर गोरक्षनाथ म्हणाला, तू भ्रमिष्टासारखा भाषण करतोस ! तुझा गुरू जालंदरनाथ दीनासारखा आज दहा वर्षे घोड्याच्या लीदीत पडला आहे. सुटुन जाण्याचे त्याच्या अंगी सामर्थ्य नाही म्हणून कुजतो आहे. गौडबंगाल देशात हेलापट्टणच्या गोपीचंद राजाने वस्तादगिरी करून त्यास खाचेत पुरून वर घोड्याची लीद टाकून अगदी बेमालूम करून टाकिले. शाबास त्या राजाची ! माझा गुरु अशा प्रतीचा नव्हे. हे ब्रह्मांड हालवून टाकील असा त्याचा प्रताप आहे. त्याच्या कृपेने तुला आताच चमत्कार दाखवितो पहा. असे म्हणून संजीवनी म्म्त्र म्हणून भस्म फेकताच ती उरलेली फळे जागच्या जागी जाऊन लटकू लागली. ते पाहून कानिफा चकितच झाला. त्याने निराभिमानाने गोरक्षाजवळ जाऊन त्याचि वाहवा केली व प्रेमाने त्यास आलिंगन दिले आणि म्हटले की, आपल्या भाषणाने मला आज एक मोठा फायदा झाला. तो हा क, माझ्या जालंदर गुरूचा शोध लागला. मग गोरक्षनाथ म्हणाला, गोष्ट खरी आहे. माझ्या योगाने जसा तुला तुझ्या गुरूचा शोध लागला, तसा तुझ्या योगाने माझ्या मच्छिद्रनाथ गुरूचाहि मला शोध लागला. आजचा योग फारच उत्तम आला; असे बोलून त्यानी एकमेकास नमस्कार केला. मग गोरक्षनाथ स्त्रीराज्याकडे व कानिफनाथ हेलापट्टणास चालला.
 
आपला गुरु जालंदरनाथ ह्यास गोपीचंद राजाने पुरून टाकल्याचि बातमी कळताक्षणीच कानिफाच्या मनात क्रोधाग्नि उत्पन्न झाला व केव्हा सूड उगवीन असे त्यास झाले होते. तो आपल्या सातशे शिष्यांसह हेलापट्टणच्या अरण्यात येऊन राहिला. कानिफा आल्याचि बातमी लागताच गोपीचंद राजाने त्यास सामोरे जाण्याचा निश्चय केला. त्याने कानिफाचा लौकिक ऐकलेला होताच, त्यामुळे अंतःकरणापासून त्यास गुरु करण्याचे राजाच्या मनात भरले होते. स्वतःबरोबर हत्ती, घोडे, उंट, पालख्या, गाड्या, तंबू, डेरे, राहुट्या वगैरे घेऊन मोठ्या वैभवाने सातशे शिष्यांसहवर्तमान कानिफानाथ देशपर्यटन करीत होता. कानिफास नगरात आणावयास राजा आपले सातशे सरदान व असंख्य फौजेनिशी मोठ्या दिमाखाने जात असता वाटेमध्ये तो प्रधानास म्हणाला की, प्रारब्धयोगेकरून या नगरास आज महान सिद्धपुरुषाचे पाय लागले आहेत, त्या अर्थी ह्यास गुरु करावा असे माझ्या मनात आले आहे. हा गुरू मला योग्य असाच आहे व माझ्या वैभवाप्रमाणे याचेहि वैभव आहे. नाही तर आमच्या मातोश्रींनी जो गुरु केला तो अगदी कंगाल, घाणेरडा असा होता. मी राजा आहे; माझ्या पंक्तीस बसण्यास राजे लोकच योग्य होत. तो जालंदर पिशाच्च्यासमान भटकणारा घाणेरड्या जागेत राहणारा व दरिद्री असा माझ्या आईने गुरु केला, परंतु कोणतीहि गोष्ट करावयाची ती सारासार विचार करूनच केली पाहिजे. मजसारख्या राजाला गुरु करावयाचा म्हणजे तो असाच ऐश्वर्यवान असला पाहिजे. हा कानिफा मला योग्य गुरु आढळला आहे. असे बोलून राजा मोठ्या समारंभाने कानिफास आणावयास गेला.
 
कानिफनाथाने गोपीचंद राजास पाहिले मात्र, तोच त्याचा क्रोधरूपी अग्नि भडकून गेला. परंतु विवेक करून त्याने क्रोध आवरून धरिला. त्याने त्या वेळेस असा विचार केला की, जर आपण ह्यास आताच शाप देऊन भस्म करावे, तर आपणास ह्याच्यापासून मोठा कार्यभाग साधून घ्यावयाचा आहे, तो तसाच राहून जाईल. तशात गुरूची कोणत्या ठिकाणी कशी काय अवस्था केली आहे तीहि आपणास पुरी माहीत नाही. यास्तव ह्याच्याकडून गुरूची माहिती करून घेऊन नंतरच ह्यास शिक्षा करावी अशा विचाराने राग आवरून धरून तो अगदी शांत झाला. इतक्यात गोपीचंद राजा अगदी जवळ जाऊन कानिफाच्या पाया पडला नंतर उभा राहून हात जोडून दीनवाणीने विनंती करू लागला की, महाराज ! दैवयोगाने मला अनाथास सनाथ करावयासाठी आपल्या कृपारूपी गंगेचा ओघ आज मजकडे वळला आहे. राजा याप्रमाने बहुत प्रकारे बोलत असता, तिकडे कानिफांचे पूर्ण लक्ष होते. राजाशी सलगी ठेवण्याचा विचार त्याने प्रथम मनात आणलेलाच होता. तशात राजाच्या लीन भाषणाने कानिफास आनंद होऊन त्याने राजाचा हात धरून त्यास आपल्या शेजारी बसविले. मग क्षेमकुशल विचारल्यानंतर त्याने राजास म्हटले की, राजा ! तुझ्या हातून एक मोठे अनुचित कर्म घडले आहे. परंतु तुझे सबळ भाग्य फळास आले म्हणून माझे चित्त शांत झाले; नाही तर ह्या वेळेस मोठा अनर्थ होऊन तुझ्या प्राणावर प्रसंग येऊन ठेपला होता. आता गावात चल, तेथे सर्व वृत्तांत निवेदन करीन.
 
मग राजा त्यास पालखीत बसवून राजवाड्यास घेऊन गेला. त्याने आज सुवर्णाच्या आसनावर बसविले षोडशोपचारांनी त्याचि यथाविधी पूजा केली. वस्त्रेभूषणे दिली व अनुग्रह करण्यासाठी त्याची विनवणी करू लागला. राजाचे मन वळवून त्यास सर्वस्वी अनुकूल करून घेण्याची खटपट कानिफा करीत होताच. तशात राजा तर अनुग्रह घेऊन उत्सुकतेने चेला होण्यास तयार झालेला पाहून त्यास अतिशय आनंद झाला. तेव्हा कानिफाने राजास म्हटले की, तू माझा अनुग्रह घ्यावया पाहतो आहेस. पण दुधात मीठ घातल्याप्रमाणे तुझ्या हातून एक कर्म घडले आहे, ज्याच्यापासून मी अनुग्रह घेतला आहे, त्या जालंदरनाथास तू घोड्याच्या लीदीत पुरून टाकिले आहेस; परंतु तुझे आयुष्य पुष्कळ व तुझ्या पुण्याईचा जोर बळकट म्हणून माझा कोप शांत झाला. नाही तर जालंदरनाथाने तुला तुझ्या वैभवासुद्धा एका क्षणात भस्म करून टाकिला असता. तेव्हा राजा भयभीत होऊन थरथरा कापू लागला व कानिफाच्या पायांवर मस्तक ठेवून विनंति करू लागला की, महाराज ! मजकडून घडलेल्या अन्यायाची आता मला क्षमा व्हावी आणि या शरण आलेल्या दासावर कृपा करावी. मग तो राजास घेऊन आपल्या शिबिराप्रत गेला.
 
हा सर्व प्रकार दासींनी मैनावतीस जाऊन कळविला व राजाच्या इतर स्त्रियासहि ती बातमी समजली. हा सर्व मजकूर आम्ही राजदरबारात ऐकिला, म्हणुन मैनावतीच्या दासी म्हणाल्या व त्यांनी दुसरे असेहि मैनावतीस कळविले की, कानिफा या नावाचा जालंदरनाथाचा शिष्य आला असून त्याच्या समागमे गोपीचंद राजा त्याच्या शिबिरात गेला आहे. तेथे कसा काय प्रकार घडेल तो मागाहून कळवू. गोपीचंद राजाने जालंदरास लिदीत पुरल्याचा वृत्तांत ऐकून मैनावतीस राग आला व अतिशय वाईट वाटले. पण पुत्राच्या ममतेस्तव त्यास शासन होऊ नये. असे तिला वाटले.
 
राजा गोपीचंद तर कानिफाच्या सेवेस हात जोडून हजर राहिला व गुलामासारखा खपू लागला. कानिफाने मागितलेला पदार्थ पाहिजे तेव्हा व लागेल तितका तयार ठेविला; न्यूनता बिलकूल पडू दिली नाही. त्या दिवशी सायंकाळ झाल्यावर नाथाने राजास राजवाड्यात जाण्याची आज्ञा दिली. राजाने राजवाड्यात आल्यावर प्रथम मैनावतीकडे जाऊन तिच्या पाया पडून झालेला साद्यंत वृत्तांत तिला कळविला व आपल्या अपराधाची कानिफाने आपणास क्षमा करावी, म्हणून त्याला युक्तिप्रयुक्तिने सांगून व स्वकार्य साधून घेण्यासाठी मध्यस्थी करण्याची तो मातेला विनंती करू लागला. तिने ते त्याचे म्हणणे ऐकून घेऊन नाथाने जाऊन खटपट करून पाहाण्याचे कबूल केले.
 
नंतर मैनावती कानिफाच्या शिबिरात गेली व त्याच्या पाया पडून जवळ बसली. मग विचारपूस झाल्यावर मी जालंदरास गुरु केले आहे व आपणास नाथपंथी म्हणवीत आहे, असे तिने त्यास सांगितले. ते ऐकून, आपणहि तोच गुरु केलेला आहे असे कानिफाने सांगून आपल्या गुरूची अशी कशी अवस्था होऊ दिलीस, असे तिला विचारिले. तेव्हा तिने सांगितले की गुरूची पुत्राने अशा रीतीने वाट लाविल्याची बातमी मला आताच कळली. मग तिने आपली मुळारंभापासून सर्व हकीगत त्यास कळविली. शेवटी गोपीचंदाचे अपराध पोटात घालून त्याला पदरात घ्यावे आणि जालंदरनाथाच्या कोपाग्नीत न होरपळू देता, आपल्या पुत्रास निर्भय करावे आणि गुरूस कूपातून काढून या ब्रह्मांडभुवनात आपला कीर्तिध्वज फडकेल असे करावे म्हणून मैनावतीने कानिफास सांगितले. तेव्हा जालंदरनाथाने अनुग्रह करविण्याचे व त्यास निर्भय ठेवण्याचे कानिफाने तिला वचन दिले, मग तिने घरी येऊन पुत्रास झालेला मजकूर सांगितला आणि त्याच्या मनातील भीति समूळ उडविली.