गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (14:04 IST)

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय २६

सुरोचन गंधर्वाची कथा, त्याचा पुत्र विक्रम, त्याच्याकडे भर्तरीनाथाचें आगमन.
तो कमट कुंभार मजल दरमजल करीत, सहकुटुंब सहपरिवार अवंतीनगरीस येऊन पोंचला. तेथें एका कुंभाराकडे जागा पाहून बिर्‍हाडास राहिला. तो सत्यवतीस आपल्या मुलीप्रमाणें पाळी. एके दिवशीं सत्यवतीनें आपल्या पतीस पहावयाचें आहे असें त्या कमट कुंभारास सांगितलें व तिच्या म्हणण्याप्रमाणे त्यानें भेट करून देण्याचें कबूल केलें. मग रात्रीं तो गाढवापाशी गेला व त्यास म्हणाला, गंधर्व महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणें राजानें आपली कन्या तुम्हांस अर्पण कीले ती सत्यवती तुमची वाट पाहत आहे व माझ्याहि मनांत तुम्हीं उभयतांनी आतां आनंदानें वागावें असे आहे. हें कमटाचें भाषण ऐकून गंधर्व म्हणाला, लग्नाचा मंगल सोहाळा अद्यापपावेतों कोणत्याहि प्रकारानें झाला नाहीं, तरी पण असुरी गांधर्वविवाह करून सत्यवतीचा मी स्वीकार करीन, हें ऐकून कमट म्हणाला, महाराज ! आपण म्हणतां ही गोष्ट खरी आहें ; परंतु आपण पशूच्या देहानें वागत आहां. अशा अवस्थेंत मनुष्याचा संग होईल कसा ? हा माझा संशय फेडून आपल्या स्त्रीचा अंगीकार करावा. तें भाषण ऐकून गंधर्वानें उत्तर दिलें कीं तिला ऋतुकाळ प्राप्त झाला म्हणजे चौथ्या दिवशीं मी माझें मूळ स्वरूप प्रकट करून स्त्रीची मनकामना पूर्ण करीन; यास्तव तिचा चौथा दिवस मला कळवावा. हें भाषण ऐकून त्यास परमानंद झाला. त्यानें ही गोष्ट सत्यवतीस सांगितली, तेव्हां तिलाहि आनंद झाला.
 
पुढें काहीं दिवस लोटल्यानंतर सत्यवती ऋतुस्नान होऊन चौथा दिवस प्राप्त झाला. त्या दिवशीं कमटानें जाऊन गंधर्वास सांगितलें. तें ऐकतांच त्यानें गाढवाचा वेष टाकून सुरोचन गंधर्वीचें स्वरूप प्रकट केलें. नंतर त्यानें जडावाचे दागिने घातले व भरजरी पोषाख केला. त्यामुळें सूर्याप्रमाणें लखलखीत तेज पडूं लागलें तें तेजस्वीं रूप पाहून कमटाचा आनंद पोटांत मावेनासा झाला. स्वर्गीच्या रत्‍नाचें आज प्रत्यक्ष आपल्या घरीं दर्शन झाल्यानें आपण धन्य झालों असें त्यास वाटलें. सत्यवती दैववान म्हणून हें पुरुषरत्‍न तिला प्राप्त झालें, असे अनेक दृष्टांत योजून तो आनंदानें सुरोचनाच्या पायां पडला व विनंति करूं लागला, महाराज ! मी अज्ञानी आहें. मी दुष्टानें तुमची योग्यता न जाणतां तुम्हांस बहुत कष्ट दिले; तुमच्या पाठीवर ओझीं घातलीं, वाहनासारखा उपयोग केला व निर्दयपणानें मारलेंहि, तरी मजकडून अज्ञानपणें झालेले अपराध पोटांत घालून त्यांची क्षमा करून मला पदरांत घ्यावें, असें म्हणून त्यानें पायांवर मस्तक ठेविलें.
 
 
मग कमटानें सुरोचन गंधर्वास हातीं धरून घरांत नेलें व सत्यवती त्याच्या स्वाधीन करून तिचा प्रतिपाळ करण्यासाठी विनंती केली. मग ती उभयतां एकांतांत गेलीं. तिनें त्याची षोडशोपचारें पूजा केली. मग गांधर्वविवाह करून उभयतां अत्यंत प्रीतीनें रममाण झाली. त्याच रात्रीस सत्यवतीस गर्भसंभव झाला. गंधर्वानें तिला आपणास शाप दिल्याबद्दलचा सविस्तर मजकूर निवेदन केला. शेवटीं तो म्हणाला, हे सत्यवती ! तुला पुत्र झाला म्हणजे मी स्वर्गी गमन करीन. तुझा तो पुत्र मोठा योग्यतेस चढेल व विक्रम या नांवानें सार्वभौम राजा होईल. धैर्य, उदारपणा हेहि गुण त्याच्या अंगीं पूर्ण असतील व तो शककर्ता होईल असं पुत्ररत्‍न तूं प्रसवलीस म्हणजे मी तुझ्या ऋणांतून मुक्त झालों असें समज. मी शापमुक्त होऊन तुला टाकून स्वर्गास गेल्यानंतर तूं मजविषयीं बिलकूल दुःख मनांत आणूं नकोस. त्या पुत्रापासून तुला अनेक सुखें प्राप्त होतील. असा तिला बोध करून पुनः वेष पालटून सुरोचन गंधर्व गाढव होऊन राहिला.
 
सत्यवतीविषयीं लोकांच्या मनांत संशय येऊन ही मुलगी कोण आहे, असें जो तो कमटास विचारी. तेव्हां तो त्यास सांगे कीं, ही माझी मुलगी आहे. बाळंतपणासाठीं मी तिला माहेरीं आणिलें आहे. पुढें नऊ महिने भरल्यावर उत्तम वेळेवर ती प्रसुत होऊन पुत्ररत्‍न झालें. बारावे दिवशीं बारसें करून मुलास पाळण्यांत घालून त्याचें नांव विक्रम असें ठेविलें. अस्तमान झाल्यावर सुरोचन गंधर्वानें गाढवाचा वेष पालटून आपलें रूप प्रगट केलें व घरांत जाऊन स्त्रीपासून मुलास मागुन घेतलें आणी त्याचा मुखचंद्र पाहून तो शापमुक्त झाला. त्याच वेळीं त्यास आणावयासाठीं इंद्रानें मातलीस विमान देऊन पाठविलें. तो अवंतीस आल्यावर कमटाकडे गेला. त्या वेळेस सुरोचन परम स्नेहानें मुलाचे मुके घेत बसला होता. इतक्यांत मातली त्याच्याजवळ गेला त्यास म्हणाला 'गंधर्वनाथ ! तुम्हांस नेण्यासाठीं इंद्राच्या आज्ञेनें मी विमान घेऊन आलों आहें; तर आतां हा पुत्रमोह सोडून विलंब न लावतां विमानारुढ व्हावें. अमरनाथ वाट पाहात बसला आहे.
 
मातलीचें तें भाषण ऐकून सुरोचन गंधर्वानें मुलास सत्यवतीच्या हवाली केलें व सांगितलें कीं, मी आतां जातों तूं येथें मुलासह समाधानाने वास कर. तेव्हां ती म्हणाली, प्राणनाथ, मुलाला टाकून तुम्ही कसे जातां ? तुमच्यासाठीं मी आईबापास व त्यांच्याकडे मिळण्यार्‍या सर्व सुखांस सोडून या परदेशांत आलें. तुमच्यावांचून मला कोण आहे, असें म्हणून ती मोठमोठ्यानें रडू लागली. तिनें त्याच्या गळ्यास मिठी मारली. तेव्हां त्यानें तिला सांगितलें कीं तूं मुलासमागमें खुशाल आनंदानें राहा. ज्या वेळेस माझें तुला स्मरण होईल त्या वेळेस मी येऊन तुला भेट देईन. असें त्यानें तिलाज वचन देऊन तिचें समाधान केलें. मग मुलाला व सत्यवतीला कमटाच्या पदरांत घालून त्याची आज्ञा घेऊन गंधर्व विमानारुढ होऊन आपल्या स्थानीं गेला.
 
पुढें विक्रम दिवसेंदिवस वाढत चालला. त्यानें अल्पवयांत चांगली विद्या संपादन केली. पुढें सोळा वर्षाचा झाल्यावर त्यानें राजची भेट घेतली व दरबारी मंडळींत विक्रमात चांगला स्नेह झाला. राजानें त्यास गांवच्या रखवालीचें काम दिल्यामुळें पहारा करण्यासाठीं त्याला गांवात फिरावें लागे. त्याप्रमाणें तो कामगिरीवर असतां एकदां एके ठिकाणीं उतरलेले कांहीं व्यापारी आपली मालमत्ता राखण्यासाठी जागत बसलेले त्यास दिसले. त्यांत भर्तरीनाथ होता. त्यास पशुंची भाषा समजत होती. त्यानें प्रथम कोल्हे ओरडले तेव्हां चोर येणार आहेत, असें व्यापार्‍यांस सांगितलें. त्यावरून त्यांनीं सावध राहून चोरांचा मोड केला. दुसर्‍या वेळीं कोल्हे भुंकूं लागले तेव्हां भर्तरी व्यापार्‍यांस म्हणाला, उत्तरेकडून दक्षिणेकडे जावयास एक राक्षस मनुष्यावेषानें येत आहे, त्यास मारून त्याच्या रक्तांचा टिळा गांवच्या दरवाजास व आपल्या कपाळास जो लावील तो अवंतीमध्यें सार्वभौम राजा होईल. हें भर्तरी बोलावयास व विक्रम त्याच समयीं रस्त्यानें जावयास एकच गांठ पडली.
 
पूर्वी सांगितल्याप्रमाणें चित्रमा गंधर्व पार्वतीच्या शापानें राक्षस होऊन फिरत होता. त्यास शंकराने उःशाप दिला होता कीं, सुरोचन गंधर्व शापबद्ध होऊन पृथ्वीवर फिरेल; त्याच्या वीर्यापासून जो विक्रम नावांचा पुत्र होईल त्याच्या हातून तूं मारला जाशील व राक्षसयोनींतून मुक्त होशील; तोच हा राक्षस . राक्षस मारल्यावर तो राजा होईल म्हणुन जें भर्तरीनें सांगितलें, तें त्याच विक्रमाविषयीं व त्यानें तें ऐकलेंहि होतें.
 
तो चित्रमा गंधर्व राक्षस झाला होता तरी पण या वेळी मनुष्यवेष घेऊन तो उत्तरेकडून दक्षिणेस जात होता. इतक्यांत विक्रमानें त्यास शस्त्रप्रहार करून जमिनीवर पाडलें व त्याच्या रक्तानें वस्त्रें भिजविलीं आणि आपल्या कपाळीं एक टिळा रेखिला. त्याच वेळीं राक्षसरूपी गंधर्व शापमुक्त होऊन लागलेंच विमान आलें; त्यात बसुन तो जाऊं लागला, त्यास विक्रमानें विचारलें कीं, तूं राक्षस असतां स्वर्गास जातोस ही गोष्ट नीटशी माझ्या लक्षांत येत नाहीं. मग त्यानें त्यास शंकर-पार्वतीच्या खेळापासूनचा साद्यंत वृत्तांत निवेदन केला आणि मी चित्रमा गंधर्व आहें असें सांगून तो स्वर्गास गेला. विक्रमानें राक्षसाचें प्रेत चांचपून पाहिलें तों त्याच्या मुठींत चार रत्‍नें सांपडली. ही साक्ष पटतांच त्यानें मनांत भर्तरीची वाखाणणी करण्यास आरंभ केला व हा पुरुष आपल्याजवळ असावा असें त्याच्या मनांत आलें. नंतर राक्षसाच्या रक्ताचा टिळा गांवच्या दरवाजास त्यानें लावला.
 
मग विक्रम त्या व्यापार्‍याकडे पुनः गेला. त्या वेळेस ते सर्व भर्तरीस मध्यभागीं घेऊन जागत बसले होते. तुम्ही कोण वगैरे व्यापार्‍यांनीं विक्रमाला विचारिलें.तेव्हां विक्रमानें आपलें नांव सांगून तुमच्या गोष्टींत मन रमलें म्हणुन आंत आलों असें त्यांस सांगितलें. त्यावर तुम्हीं आमच्या कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकल्या म्हणून व्यापार्‍यांनीं विक्रमास विचारल्यावर तो म्हणाला, माझा पहारा जवळच आहे, त्यामुळें तुमच्या सर्व गोष्टी मला ऐकूं आल्या. पण तुमच्यावर जी चोरांची धाड आली तिचा सुगावा तुम्हांस पूर्वीच कसा लागला याचा शोध करण्यासाठीं मी आलों आहें चोरांचा सुगावा काढण्याची युक्ति तुमच्याकडून समजल्यास आम्हांस बंदोबस्त ठेवण्यास ठीक पडेल. ते म्हणाले, चोरांच्या टोळींत एकंदर किती मंडळी असतील ती नकळे; पण सुमारें शंभर असामी तर आम्हीं पाहिलें, ते चोर येण्याच्या पूर्वीं कांहीं वेळ अगोदर कोल्हे भुंकत होते, ती त्यांची भाषा आमच्याबरोबर जो भर्तरी नांवाचा मुलगा बसला आहे त्यास समजते. त्यानें चोर लुटावयास येणार आहेत हें आम्हांस सांगितल्यावरून आम्ही सावध राहिलों होतों. तेव्हां विक्रमानें त्यास ( भर्तरीस ) पुरें लक्षांत ठेवलें. मग कांहीं वेळानें तो तेथून निघून गेला.
 
सुमारे घटिका रात्र राहिल्यावर एक जकातदार शौचास जात होता. त्यास विक्रमानें एकांतीं सांगितलें कीं, गांवाबाहेर जे व्यापारी आले आहेत त्यांच्यापाशीं जकातीचा पैसा तुम्ही मागूं नका त्याच्याऐवजीं मी तुम्हांस तिप्पट रक्कम देईन. तुम्हीं त्यांना तो पैका माफ करून भर्तरी नांवाच्या मुलास माझ्याकडें घेऊन यावें. तो माझ भाऊ आहे. तो माझ्या हवाली कराल तर तुम्हांस अतोनात पुण्य लाभेल. अशा प्रकारें विक्रमानें जकातदाराची विनवणी केली व द्रव्यलोभस्तव जकातदारानें वचन देऊन विक्रमाचें म्हणणे कबुल केले.
 
पुढें कचेरींत आल्यावर जकातदारांनें शिपाई पाठवून त्या व्यापार्‍यांस बोलावून आणलें आणि मालाची टीप करून दस्तुरीच्या पैक्याचा आंकडा केला. मग तुम्हांमध्यें भर्तरी नांव कोणाचें आहे म्हणून त्यानें व्यापार्‍यांस विचारलें. तें ऐकून व्यापार्‍यांनीं भर्तरीस बोलावून जकातदारास दाखविलें. त्यास पाहतांच त्याच्या तेजावरून हा कोणी तरी अवतारी असावा, असें जकातदारास वाटलें. त्यानें व्यापार्‍याच्या मुख्यास एकीकडे नेऊन सांगितलें कीं, तुमच्याकडे जकातीचा जो आंकडा येणें आहे; त्याची मी तुम्हांस माफी करून देतो; पण तुमच्याकडे जो भर्तरी आह, त्यास कांहीं दिवस आमच्याकडे राहूं द्या. असे बोलून त्यानें त्यास पुष्कळ प्रकारें समजावून वळवून घेतलें.
 
मग व्यापार्‍यानीं भर्तरीस दोन गोष्टी सांगुन त्यास खूष केलें व ऐवज वसूल करून त्यांतून जकातीची रक्कम घेण्याबद्दल जकातदरास सांगितल्यावर भर्तरीस जकातदाराच्या स्वाधीन केलें. तसेंच माल विकून कोणाकडे काय येणें राहिलें आहे. हें जकातदारास माहीत आहे, यास्तव ह्यांच्या मार्फतीनें सारा वसूल कर, तुला जी मदत लागेल ती हे करतील, असे भर्तरीस बजावून व त्यास जकातदाराकडे ठेवून व्यापारी निघून गेले.
 
मग जकातदारानें विक्रमास बोलावून आणिलें व त्यास जकातीच्या रकमेच्या आंकडा दाखवून तो सर्व पैसा भरावयास सांगितलें तेव्हां विक्रमानें आपल्याजवळचें एक रत्‍न जकातीचा ऐवज पटेपर्यंत त्याच्याजवळ गहाण ठेविलें आणि सांगितल्यें कीं, तूर्त भर्तरीस माझ्याकडे नुसता भोजनास पाठवीत जा. पुढें हळूहळू ओळख पटेल. असें विक्रमाचें मत पाहून जकातदारानें भर्तरेच्या देखत विक्रमास सांगितलें कीं, आमचा हा गडी आहे; ह्याची भोजनाची सोय तुजकडे कर. तुझी आई स्वयंपाक करील व शिधा मी येथून धाडीत जाईन. याप्रमाणें ठरल्यावर त्याचीं बोलणें विक्रमानें मान्य केलें व भर्तरीस घेऊन तो आपल्या घरीं गेला. घरीं ओटीवर चार घटका उभयंतांचे बोलणें झालें. मग विक्रमानें रात्रीं झालेला हा सर्व प्रकार आईस सांगितला, तेव्हां तिला अति आनंद झाला.
 
मग पुत्राप्रमाणेंच भर्तरीचें संगोपन करण्यासाठीं विक्रमानें आईस सांगितलें . भोजन झाल्यावर भर्तरी तेथेंच राहिला. तो जकातदाराकडे गेला. तेव्हां त्यास सांगितलें कीं, तूं विक्रमाच्याच घरी राहा मला कारण पडेल तेव्हां मी तुला बोलावीन. मग भर्तरी विक्रमाकडे राहूं लागला, ती दोघें मायलेक भर्तरीवर अतिशय ममता करीत व तीं तिघें अगदीं आनंदानें वागत.