सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय २८

पिंगलेचें भर्तृहरीवरील प्रेम; त्याच्या कसोटीकरितां पाठविलेला निरोप; त्याचा दुष्परिणाम.
अरण्यामध्यें दत्तात्रेयानें अनुग्रह दिल्यानंतर भर्तृहरीनें संसार करण्यासाठीं त्याजपाशीं बारा वर्षांचीं मुदत मागितली. ती मिळाल्यानंतर तो उज्जैनीस गेला व रात्रीं भोजन झाल्यानंतर पिंगलेच्या महालांत गेला. महालांत जातांच पिंगलेनें त्यास सुवर्णाच्या मंचकावरील पुष्पशय्येवर बसवून त्याची पूजा केली व राजावरील आपलें प्रेम व्यक्त केलें. तीं उभयतां अगदीं जवळ बसून विनोदाचीं भाषणें करूं लागली. मग राजानें तिला आपल्या डाव्या मांडीवर बसवून तिचे मुके घेतले व सर्वांमध्यें तूं माझी आवडती आहेस; आपल्या दोघांच्या कुडी दोन, पण प्राण एकच आहे, अशा भावार्थाचीं व विनोदाचीं पुष्कळ भाषणें झालीं.
 
नंतर पिंगलेनें राजास तांबूल दिला आणि म्हटलें, महाराज, ब्रह्मदेवानें आपला जोडा निर्माण केला, त्याप्रमाणें योगहि घडून आला. आपली एकमेकावरची प्रीति म्हटली म्हणजे जसें मीठ पाण्यांत मिळून एकत्र होतें, त्याचप्रमाणें आपलें दोघांचें मन एक होऊन गेलें आहे; परंतु निर्दय कृतांत केव्हा धाड घालील ही भीति आहे. तुमच्यापूर्वी मी मरावें हा मार्ग उचित होय व ईश्वरकृपेनें जर असा योग घडून आला, तर मी मोठी भाग्यवती ठरेन. असें पिंगला राणी बोलत असतां भर्तृहरे तिला म्हणाला, प्रिये ! ह्या गोष्टी ईश्वराधीन आहेत, आपल्या कोणाच्या हातांतील नाहींत. त्याचा संकेत काय आहे हें आपणांस कसें समजणार ? माझ्यपूर्वीं तूं मरण इच्छीत आहेस ही गोष्ट कांहीं वाउगी नाहीं. परंतु सूर्यपुत्र ( यम ) अगदी निर्दय आहे. त्याच्यामध्यें विचाराचा लेशसुद्धां नाहीं. तेव्हां न जाणों, जर तुझ्याअगोदर मी मरण पावलों तर पुढें तूं आपले दिवस कसे काढशील ? तेव्हां पिंगला म्हणाली, ब्रह्मदेवानें कपाळीं काय लिहिलें आहे हें कळत नाही. पण जर तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून आली, तर मी जीव ठेवणार नाही. अग्नीत देहाची आहुति तुमच्या समागमें देईन.
 
पिंगला राणीचें हें भाषण ऐकून भर्तृहरि म्हणाला, मी जिवंत आहें तोंपर्यत तुझें हें बोलणें ठीक आहे. परंतु स्वतःच्या जिवासारखी प्रिय वस्तु दुसरी कोणतीच नाही. म्हणून जिवाचा घात कोणाच्यानं करवत नाहीं. मला खूष करण्यासाठी तुझें हें सारें बोलणें; पण प्रसंग पडल्यानंतर हें बोलणें असेंच राहून जाईल ! राजाच्या या भाषाणावर पिगंलेनें उत्तम दिलें कीं, मी मनःपूर्वक बोललें तरी तुम्ही तें खरें मानीत नाहीं. परंतु इतकी पक्की खात्री असूं द्या कीं, वैधव्याचा डाग मी माझ्या देहास कदापि लागूं देणार नाही. कशावरून म्हणाला तर काया, वाचा, मन हीं मी तुम्हांस अर्पण केलीं आहेत. ह्यास साक्ष ईश्वर आहे. तो ईश्वर सत्यवादी असल्याचें सर्व जग म्हणून सांगतें. म्हणून मी विधवा राहाणार नाहीं हें खचित, अशा रीतीनें त्याची समजुत करून ती उगीच राहिली व राजानहि ह्या भाषणाचा अनुभव पाहण्याचा निश्चय केला.
 
पुढें एके दिवशीं राजा अरण्यांत शिकारीस गेला असतां त्यास राणीच्या ह्या भाषणाची आठवण झाली. तेव्हां त्यानें असा प्रकार केला कीं, एक मृग जिवंत धरिला आणि त्याचा वध करून आपला मुकुट व वस्त्रें त्याच्या रक्तानें भिजविलीं. नंतर तीं एक सेवकाजवळ देऊन त्यास सांगितलें कीं, हीं वस्त्रें घेऊन तूं पिंगलेकडे जा व तिला सांग कीं, राजा शिकार करीत असतां वाघानें त्याच्यावर झडप घालून त्याचा घात केला. हा निरोप तिला कळविल्यासाठी राजानें त्या सेवकास अंवतीस पाठविलें व आपण अरण्यांत स्वस्थ बसून राहिला.
 
राजाच्या सेवकानें अवंतीस जाऊन पिंगलेची भेट घेतली व ती रक्तानें भरलेलीं वस्त्रें पुढें ठेवून हात जोडून उभा राहिला. राजानें शिकवून ठेविल्याप्रमाणें त्यानें पिंगलाराणीस निरोप सांगितला व राजाच्या कलेवराचें दहन करून त्याच्याबरोबर गेलेलें उष्कर लौकरच परत येईल, असें म्हटलें. सेवकाचे हे शब्द पिंगलेच्या कानीं पडले मात्र, तोंच तिची जी अवस्था झाली ती वर्णन करतां येत नाहीं. ती कपाळ बडवून घेऊं लागली. केस तोडूं लागली, हेल काढून मोठमोठ्यानें रडूं लागली. इतक्यांत राजवाड्यांत हे दुःखकारक बातमी पसरली. ती ऐकून राजाच्या बाराशें स्त्रिया रडत ओरडत धांवत आल्या व त्यांनीहि अतिशय शोक केला. पिंगलेस मात्र सर्वापैक्षां विशेष दुःख झालें
 
शेवटी पिंगलेनें सती जाण्याचा निश्चय करून सर्व तयारी केली. राजाचें वस्त्र परिधान केलें, वाणें घेतलीं व समारंभानें स्मशनांत जाऊन अग्नि तयार केला. सर्वांनी तिला आशीर्वाद दिले. नंतर तिनें अग्निकुंडांत उडी टाकून आपलें स्वहित साधून घेतलें. त्या वेळीं संपूर्ण नगरवासी लोक शोक करीत आपपल्या घरीं गेलें.
 
इकडे अस्तमान होऊन रात्र झाल्यावर राजा नगरांत जावयास निघाला. त्यावेळीं आपल्या मरणाची बातमी सांगण्यासाठी राजवाड्यांत जो सेवक पाठविला होता त्याची राजास आठवण होऊन त्याच्या मनांत नानाप्रकारच्या वाईट कल्पना येऊं लागल्या.
 
असा मोठा प्रसंग गुदरला असतांहि भर्तृहरीचा बंधु विक्रमराजा स्वस्थ कसा राहिला, ही कल्पना साहजिकच मनांत येते. तसेंच ज्या नोकरानें राजवस्त्रें नेऊन पिंगलेस दिलीं होतीं, तो तरी या पल्ल्यास गोष्ट येऊन ठेपेपर्यंत स्वस्थ कसा बसला, अशीहि शंका येते. परंतु या गोष्टीविषयींचा विचार करून पाहतां असें दिसतें कीं, तो सेवक वस्त्रें नेऊन दिल्यानंतर फार वेळ तेथें न राहतां तसाच परत भर्तृहरीकडे अरण्यांत गेला; परंतु राजा दुसर्‍या रस्त्यानें परतल्यामुळें त्यांची चुकामुक झाली. तो सेवक मागाहून त्यांस जाऊन मिळाला. तसेंच त्या समयीं विक्रमराजा मिथुलनगरास आपल्या आजोळी गेला होता. सुमंतीक प्रधान, शुभविक्रम राजा वगैरे मंडळीही राजासमागमें गेलीं होती. राजवाड्यांत फक्त स्त्रियाच होत्या. गांवकरी लोकांनी पिंगलेस सती जाण्याविषयीं हरकत केली होती, पण तिच्यापुढें कोणाचें कांही चाललें नाहीं अज्ञानामुळें पिंगला मात्र प्राणास मुकली.
 
भर्तृहरी राजा गांवाच्या शिवेशीं येतांच द्वाररक्षकांनीं पिंगला सती गेलाचा वृत्तांत कळविला. तेव्हां राजास अत्यंत दुःख झालें. तो तसाच रडत, ओरडत स्मशानांत गेला व आपणहि पिंगलेप्रमाणें जळून जावें, अशा उद्देशानें तो तिच्यासाठीं केलेल्या अग्नींत उडी टाकू लागला. पण बरोबरच्या लोकांनीं त्यास धरून ठेवल्यामुळें राजाचा कांहीं इलाज चालला नाहीं. पिंगलेची ही अवस्था झाल्यानें राजास अतिशय दुःख झालें. तो तिचे एक एक गुण आठवून रडत होता.
 
पिंगला सती गेली म्हणून भर्तृहरी स्मशानांत शोक करीत आहे, ही बातमी ऐकून गांवचे लोकहि धांवत धांवत स्मशानांत आले. तेहि राजाबरोबर मोठमोठ्यानें रडूं लागले. परंतु त्यांचें तें रडणें वरवर दाखविल्यापुरतेंचि होतें.
 
राजा शोकसागरांत पडला असतां लोक त्याची समजूत करूं लागलें कीं, राजन् ! अशाश्वताचा शोक करून काय उपयोग ! ईश्वरावर भरंवसा ठेवून स्वस्थ असावें. अशा रीतीचा लोकांनी राजास पुष्कळ बोध केला. परंतु राजाचें तिकडे लक्ष जाईना. शेवटीं लोक आपापल्या घरोघर गेले. राजा मात्र स्मशांनांत पिंगलेच्या चितेशींच बसून राहिला. राख भरून टाकण्यासाठीं दुसर्‍या दिवशीं लोक स्मशानांत गेले. परंतु भर्तृहरी चित्तेस हात लावूं देईना व आपणहि तेथून उठेना. या पल्ल्यास गोष्ट आल्यानंतर लोक निघून गेले. भर्तृहरी मात्र अन्नपाण्यावांचून तसाच तेथें रात्रंदिवस बसून राहिला.
 
याप्रमाणें अवंतीमध्यें घडलेला प्रकार दूतांनीं मिथूलेस जाऊन विक्रमराजास सांगितला. तो ऐकून सत्यवर्मा, शुभविक्रम, सुमंतीक प्रधान आदिकरून सर्व मंडळींस अत्यंत दुःख झालें. ते सर्व ताबडतोब उज्जैनीस आले व स्मशानामध्यें जाऊन पाहतात तों त्यांना पिंगलेचें दुःख करीत भर्तृहरी रडत बसलेला दिसला. तेव्हां विक्रमराजा भर्तृहरीची समजूत करूं लागला. परंतु त्याला वेड लागल्यासारखें झालें तो पिंगला ! पिंगला ! असें म्हणून रडत होता. त्यास बोध करितां करितां दहा दिवस गेल्यावर विक्रमानें पिंगलेची उत्तरक्रिया केली. नंतर तो राज्यकारभार पाहूं लागला. विक्रमराजा त्यास नित्य जाऊन बोध करीत असे. याप्रमाणें बारा वर्षें झाली. पण बोध केल्यानें कांहीं फायदा झाला नाहीं. पिंगलेच्या दुःखाने भर्तृहरीनें अन्न सोडलें होतें व तो फक्त झाडांची पानें खाऊन व उदक प्राशन करून राहिला होता. त्यायोगानें त्याचें शरीर कृश झालें.
 
भर्तृहरीची अशी अवस्था पाहून मित्रावरूणीस ( सूर्यास ) त्याची दया आली. नंतर तो दत्तात्रेयाकडे गेला. दत्तात्रेयानें त्यास येण्याचें कारण विचारलें असतां मित्रावरूणी म्हणाला, आपणांस सर्व ठाऊक आहे. मीच सांगितलें पाहिजे असें नाहीं. परंतु सुचवायचें इतकेंच कीं भर्तृहरीवर आपली कृपा असूं द्या म्हणजे झालें. मग मित्रावरुणीस दत्तात्रेयानें धीर देऊन भर्तृहरीबद्दल काळजी न वाहतां स्वस्थ मनानें जावयास सांगितिलें व मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ यास मी भर्तृहरीकडे पाठवून त्यास बोध करून ताळ्यावर आणतो, अशा रीतीनें मित्रावरूणीची समजूत करून त्याची रवानगी केली.