शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (21:04 IST)

खोदायला गेले विहीर, सापडला 7 अब्जांहून अधिक किमतीचा नीलम!

अंबरासन एतिराजन
श्रीलंकेमध्ये एका व्यक्तीच्या अंगणात विहीर खोदताना जगातला सर्वात मोठा नीलम खडक म्हणजेच Sapphire Cluster सापडला आहे. श्रीलंकन अधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली. नीलम जगातल्या मौल्यवान रत्नांपैकी एक आहे.
रत्नांचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्यानं हा मोठ्या आकाराचा नीलम काही मजुरांना त्यांच्या अंगणात विहीर खोदताना सापडल्याचं सांगितलं.
ही घटना श्रीलंकेच्या रत्नपुरा परिसरातील आहे. श्रीलंकेच्या या भागात रत्नं आणि मौल्यवान दगड मोठ्या प्रमाणात मिळतात. या जागेच्या नावावरूनच त्याठिकाणचं वैशिष्ट्यं लक्षात येतं.
 
तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात या फिकट निळ्या रंगाच्या नीलमचं मूल्य जवळपास 100 मिलियन डॉलर (सुमारे साडे सात अब्ज रुपये) असू शकतं.
या नीलमचं वजन 510 किलो एवढं आहे. त्याला 'सेरेंडिपिटी सफायर' असं नाव देण्यात आलं आहे. याचा अर्थ नशिबानं मिळालेला नीलम असं आहे.
 
'रत्नांचं शहर' रत्नपुरा मधून मिळाला नीलम
"खोदकाम करणाऱ्या व्यक्तीनं आम्हाला काही दुर्मिळ रत्नं मिळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यानं आम्हाला हा मोठ्या आकाराचा नीलम मिळाल्याचं सांगितलं," अशी माहिती ज्यांच्या घरी हा नीलम मिळाला त्यांनी बीबीसीबरोबर बोलताना दिली.
सुरक्षेच्या कारणांमुळं त्यांनी त्यांचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगितला नाही.
ज्यांच्या घरी हा नीलम रत्न आढळला आहे, त्या घरातली रत्नांच्या व्यवसायातली ही तिसरी पिढी आहे. नीलम मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच अधिकाऱ्यांना याबाबत सांगितलं. पण त्यावरील माती स्वच्छ करण्यासाठी आणि त्याला शुद्ध करण्यासाठी एका वर्षापेक्षा जास्त काळ लागला.
त्यानंतरच या नीलमच्या योग्य किमतीचा अंदाज लावण्यात आला आणि त्यानंतर याच्या दर्जाबाबत स्पष्ट माहिती मिळू शकली. स्वच्छता करताना यामधले काही रत्न पडले आणि त्यावेळी काही अत्यंत उच्च दर्जाचे नीलम असल्याचं लक्षात आलं.
रत्नपुरा भागाला श्रीलंकेत रत्नांची राजधानी म्हणून ओळखलं जातं. सिंहली भाषेत याचा अर्थ रत्नांचं शहर असा होतो. यापूर्वीही या शहरात अनेकदा मौल्यवान रत्नं मिळाली आहेत.
जगभरात पन्ना, नीलम आणि इतर मौल्यवान रत्नांचा श्रीलंका हा प्रमुख निर्यातदार आहे. श्रीलंकेनं गेल्यावर्षी मौल्यवान रत्नं, हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीमधून कोटयवधींची कमाई केली होती.
श्रीलंकेसाठी आशेचा किरण
"मी एवढा मोठा नीलम यापूर्वी कधीही पाहिला नाही. कदाचित हा 40 कोटी वर्षांपूर्वी तयार झाला असावा," असं प्रसिद्ध रत्नतज्ज्ञ डॉक्टर जॅमिनी झोयसा यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
मात्र या नीलमची कॅरेट व्हॅल्यू किंवा मूल्य खूप जास्त असलं तरीही, क्लस्टरच्या आतील रत्न एवढे मौल्य असतीलच असं नाही, याकडंही तज्ज्ञांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
श्रीलंकेमध्ये कोरोना व्हायरसमुळं रत्न उद्योगाला मोठा फटका मिळाला आहे. अशा परिस्थितीत हा विशाल आकाराचा नीलम सापडला आहे.
'नशिबानं मिळालेला नीलम' आंतरराष्ट्रीय ग्राहक आणि तज्ज्ञांचं लक्ष पुन्हा एकदा वेधण्यासाठी फायदेशीर ठरेल असं रत्नाचा व्यापार करणाऱ्यांचं मत आहे.
"हा नीलम अगदी खास आहे. कदाचित हा जगातील सर्वात मोठा नीलम असू शकतो. याचा आकार आणि किंमत पाहता तज्ज्ञ आणि संग्रहालयांचं लक्ष याकडं वेधलं जाईल," असं नॅशनल जेम अँड ज्वेलरी अथॉरिटी ऑफ श्रीलंकेचे प्रमुख तिलक वीरसिंहे यांनी म्हटलं.