बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Updated : शुक्रवार, 12 जुलै 2024 (08:25 IST)

Monsoon Tourism पावसाळी पर्यटनासाठी दूरशेत

doorshet
Doorshet for monsoon tourism  वर्षा ऋतु आला म्हणजे निसर्गप्रेमींची मज्जाच. जसे रात्री चांदण्या व चंद्र आपल्या प्रकाशाने आकाशाची सुंदरता वाढवतात तसेच वर्षा ऋतु निसर्गाची सुंदरता वाढवतो. अशा या वर्षा ऋतुचा आनंद घेण्यासाठी निसर्गाचे एक सुंदर उदाहरण म्हणजे आंबा नदीच्या काठावर आणि सह्याद्री पर्वताच्या अंतर्गत असलेले रायगड जिल्ह्यातील दूरशेत (ता.खालापूर) हे गाव. हे गाव मोठ मोठ्या डोंगर व दऱ्यांमुळे पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते. तसेच महाराष्ट्रातील अनेक ट्रेकिंग ठिकाणांमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैली पासून दूर जाऊन निसर्गाला जवळून पाहण्याचे हे एक सुंदर ठिकाण आहे.
 
दूरशेत हे गाव पाली आणि महाडच्या दोन गणेश मंदिरांदरम्यान आहे. सन १६०० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्तलाब खान यांच्यामध्ये उंबरखिंडसाठी लढाई झाली होती. त्यामुळे हे एक ऐतिहासिक स्थळ म्हणूनही ओळखले जाते. 
 
जाण्याचा मार्ग : दूरशेत मुंबई व पुण्यापासून जवळ असल्यामुळे तेथे पोहोचण्याचा मार्ग सोपा आहे. मुंबई/पुणेकडून खोपोली येथे जावे. खोपोलीहून टॅक्सी वा रिक्षा करून दूरशेतला पोहचता येते. तेथे जाण्यासाठी सहज वाहतुकीची सोय उपलब्ध आहे. खोपोली रेल्वे स्टेशन हे दूरशेतहून १५ किमीच्या अंतरावर आहे. मुंबईहून खोपोलीसाठी दररोज लोकलही जाते. 
 
पाहण्याची ठिकाणे : दूरशेतमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पाली गणेश मंदिर आणि महड गणेश मंदिर दूरशेतच्या जवळपास आहे. येथे भाविकांची गर्दी असते. तसेच तेथून थोड्या अंतरावर पाली किल्लाही पाहता येतो. हा किल्ला शिवकालीन आहे. या ऐतिहासिक महत्त्वाशिवाय हा किल्ला ट्रेकर्स आणि साहसी, उत्साही लोकांमध्येही लोकप्रिय आहे. दूरशेत जवळ कुंडलिका नदी आहे, रॅपलिंग, रिवर राफ्टींग, रिवर क्रॉसिंग, इत्यादीचा आनंद घेता येतो. या सोबतच वन्य जीव प्राण्यांचं दर्शन घेण्यासाठी तेथे रात्रीची सफारी करणे गरजेचेच आहे. 
 
राहण्याची सोय : जवळचे पर्यटन स्थळ म्हणून येथे शनिवार आणि रविवारी मुंबई/पुणे हून पर्यटक येत असतात. त्यामुळे त्यांच्या राहण्यासाठी येथे सोय उपलब्ध आहे. येथे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ लोकप्रिय आहेत. मसालेदार करी आणि फ्राईस तर विशेष लोकप्रिय आहे. बटाटा, मटार आणि इतर कडधान्यांपासून बनवलेला मसालेदार मिसळचा रस्सा हा तोंडाला पाणी आणणारा असतो. असे विविध प्रकारचे चवदार पदार्थ येथे खायला मिळतील. 
 
तर, चला, एकदा तरी दूरशेतला अवश्य भेट द्या !
 
- जस्मीन तांबोळी