बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (08:45 IST)

रायगडचे समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले

करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे सरकारने निर्बंध हळूहळू सल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले आता रायगडच्या किनाऱ्यांकडे वळू लागली आहेत. रायगडमधील अलिबागसह नागाव, किहीम, काशीद, मुरुड इथल्या किनाऱ्यांवर पर्यटक दिसू लागले आहेत. शनिवार, रविवार, सोमवार अशा सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे पर्यटक मोठय़ा संख्येने रायगडमध्ये दाखल झाले आहेत. देशभरात मार्च महिन्यापासून करोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आणि सारेच व्यवहार ठप्प झाले. सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे रायगडमधील पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला. सर्व पर्यटनस्थळांवर फिरण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे पर्यटक इकडे फिरकेनासे झाले. या व्यवसायावर अवलंबून असलेले टपरीधारक , हॉटेल लॉजिंग मालक, घोडागाडी, उंटसवारी, वॉटरस्पोर्टस सर्वावरच याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.
 
गेले ५ महिने हे निर्बंध होते. आता करोनाचा प्रादुर्भाव खूपच कमी झाला आहे. रुग्णसंख्यादेखील आटोक्यात आली आहे. त्याबरोबरच पर्यटन व्यवसायावरील निर्बंधदेखील सल करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांची पावले आता रायगडच्या किनाऱ्यांकडे वळली आहेत. सध्या रायगडात येणाऱ्या पर्यटकांमध्ये मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांची संख्या अधिक आहे. ५ महिन्यानंतर मोकळा श्वास घ्यायला मिळाल्याने पर्यटक खूश आहेत. बच्चे कंपनीदेखील आनंदली आहे. समुद्रात डुंबण्याबरोबरच वेगवेगळ्या खेळांचा आस्वाद घेत आहेत. अनेक कर्मचारी अजूनही वर्क फ्रॉम होम करीत आहेत. त्यामुळे कामानिमित्त का होईना घराबाहेर पडणे होत नव्हते. त्यांनादेखील यामुळे दिलासा मिळाला आहे. रोजच्या कामातून दोन दिवस विरंगुळा मिळतो आहे. पर्यटकांच्या आगमनाने व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेले ५ महिने पर्यटनावर आधारित सर्व व्यवसाय ठप्प होते. हॉटेल, लॉजेसबरोबरच छोटे व्यावसायिक यांनादेखील याचा मोठा फटका बसला होता. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आता हे व्यवसाय हळूहळू सुरू होत आहेत.