1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Updated : मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (16:14 IST)

श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर Trimbakeshwar Jyotirling

Trimbakeshwar Shiva Temple Jyotirling
श्री त्रयंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असणारे तीर्थक्षेत्र नाशिक पासुन 28 कि.मी.अंतरावर स्थित आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर वसलेले आहे.
 
हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या लिंगाच्या शीर्षामधे सुपारीएवढया आकाराची तीन लिंगे आहेत. ही लिंगे, ब्रह्मा, विष्णु आणि शिव, म्हणजे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या शक्तींची प्रतिके आहेत. ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते. 
 
हे श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ च्या दरम्यान बांधले. त्याकाळी हे मंदीर बांधण्यासाठी १६ लाख रूपये खर्च आला, आणि साधारणत: ३१ वर्षे मंदिराचे बांधकाम सुरू होते. गोदावरी नदीकाठी वसलेले त्र्यंबकेश्वर मंदिर काळ्या दगडांनी बनलेले आहे. मंदिराची वास्तुकला आश्चर्यकारक आहे. कालसर्प शांती, त्रिपिंडी विधी आणि नारायण नागबली यांची पूजा या मंदिराच्या पंचक्रोशीत केली जाते. जे भक्तांनी वेगवेगळ्या इच्छांच्या पूर्ततेसाठी केली जाते.
 
कथा
प्राचीन काळी त्र्यंबक ही गौतम ऋषींची तपोभूमि होती. त्यांच्यावर झालेल्या गोहत्याबंदीच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी ऋषी गौतमांनी कठोर तपश्चर्या केली आणि शिव यांना गंगेला येथे अवतरित होण्याचे वरदान मागितले. याचा परिणाम म्हणून दक्षिणेच्या गंगा म्हणजेच गोदावरी नदीचा उगम झाला.
 
गोदावरीच्या उत्पत्तीनंतर शिवाने या मंदिरात विराजमान होण्यास स्वीकारले. तीन डोळ्याच्या शिव शंभूच्या उपस्थितीमुळे हे स्थान त्र्यंबक (तीन डोळे) म्हणून ओळखले जाऊ लागले. उज्जैन आणि ओंकारेश्वर प्रमाणेच, त्र्यंबकेश्वर महाराजांना या गावचा राजा मानला जातो, म्हणून दर सोमवारी त्र्यंबकेश्वरचा राजा आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी शहर दौर्‍यासाठी बाहेर पडतात.
 
या दौर्‍याच्या वेळी, त्र्यंबकेश्वर महाराजांचा पंचमुखी सोन्याचा मुखवटा पालखीमध्ये बसून गावात फिरवला जातो. त्यानंतर कुशावर्त तीर्थ येथे घाटावर स्नान केले जाते. त्यानंतर मुखवटा परत मंदिरात आणून त्याला हिर्‍याने भरलेल्या सोन्याचा मुकुट घातला जातो. संपूर्ण दृश्य त्र्यंबक महाराजांच्या राज्याभिषेकासारखे वाटतं. हा प्रवास पाहणे हा एक अत्यंत अलौकिक अनुभव आहे.
 
कुशावर्ती तीर्थांची जन्मकथा अत्यंत रंजक आहे. असे म्हणतात की गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरुन वारंवार गायब व्हायची. गोदावरीचे पलायन थांबविण्यासाठी गौतम ऋषींनी कुशाची मदत घेतली आणि गोदावरीला बांधले. तेव्हापासून या तलावामध्ये नेहमीच भरपूर पाणी असतं. हा तलाव स्वतः कुशावर्त तीर्थ म्हणून ओळखला जातो. 
 
शिवरात्रि आणि श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिरात भक्तांची गर्दी असते. भाविक सकाळी आंघोळ करतात आणि मंदिरात जाऊन दर्शन घेतात. कालसर्प योग आणि नारायण नागबली नावाची एक विशेष पूजा येथे केले जाते, ज्यामुळे वर्षभर लोक येथे येत असतात.
 
कसे पोहचाल
सर्वात जवळचे विमानतळ ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ शहराच्या मध्यभागीपासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर आहे.
जवळचे रेल्वे स्टेशन नाशिकरोड आहे जे साधारण 40 किमी अंतरावर आहे.
नाशिक रस्तामार्गे चांगले जोडलेले आहे, नाशिक ते त्र्यंबकेश्वर जवळ जवळ 30 कि.मी. आहे.