अभिनेत्री माधुरी पवारच्या भावाचे निधन
अभिनेत्री आणि प्रसिद्ध नृत्यांगना माधुरी पवार हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच अभिनेत्री इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत भावाच्या निधनाचे वृत्त दिले आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या भावाचे निधन 12 दिवसांपूर्वी झाले असून तिने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. माधुरीच्या भावाचे अचानक निधन झाल्यामुळे माधुरी आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये, त्याने केलेल्या मदतीचा आणि स्वप्नांचा उल्लेख करत भावनिक पोस्ट शेअर केली.
दरम्यान पोस्टमध्ये माधुरी पवार सांगते, “प्रिय अक्षय, तुला जाऊन 12 दिवस झाले... हे शब्दात व्यक्त करायची वेळ आली यासारखं दुर्दैव नाही. नियतीच्या मनात नेमकं काय चालू आहे हे कुणी सांगू शकत नाही... उद्याचा दिवस कोणी पाहिलाय, असं आपण बऱ्याचदा म्हणतो... खरंय... उद्याचा दिवस पाहता आला असता तर मी माझ्या आयुष्यात माझ्या भावाच्या बाबतीत अचानकपणे घडलेली दुखःद घटना घडण्यापासून थांबवू शकले असते. तुझ्या असण्याची इतकी सवय झाली आहे ना की तू नाहीयेस ही कल्पनाच सहन होत नाहीये. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीत तुझी साथ होती, मग माझे इव्हेंट्स असो किंवा काही, तू माझ्याबरोबर असायचास, बऱ्याचवेळा माझ्या वतीने माझ्या अनुपस्थितीत आपलं घर सांभाळलंस, घरच्यांना सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस.”