शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (16:41 IST)

स्वप्नील करतोय 'सचिनचा' जल्लोष

'मी पण सचिन' हा चित्रपट १ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्नील जोशी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात स्वप्नील 'सचिन पाटील' नावाच्या एका ध्येयवादी माणसाची भूमिका साकारत आहे. अशा या प्रेरणादायी चित्रपटातील 'आयला आयला सचिन आयला' हे जोशपूर्ण गाणं नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘आयला आयला सचिन' हे गाणं गावातील बाजारात चित्रित करण्यात आले आहे. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात स्वप्नील आणि प्रियदर्शन या गाण्यात नाचताना आणि गाताना दिसत आहे. बाजारात असलेला गजबजाट आणि या गजबजाटात स्वप्नील 'आयला आयला सचिन' म्हणताना दिसतोय. या गाण्यात बाजारातील भाजीवाले, लहान,मोठे दुकानदार, बॅण्डवाले, वासुदेव,लहान मुले. असे एकंदरीत आनंददायी वातावरण आहे. सोबतच यांच्यासह सचिनचे पोस्टरही या गाण्यात झळकत आहेत. पताके, ढोल, ताशे अशा एकंदरच जल्लोषाच्या वातावरणात गाणं चित्रीत  झाले आहे.
 
'मी पण सचिन' चित्रपटाचे  दिग्दर्शक आणि लेखक श्रेयस जाधव यांनी सांगितले की, "गाण्याचे बोल सचिन, सचिन असल्यामुळे हे गाणं करताना एक वेगळीच ऊर्जा आम्हाला जाणवत होती. सचिन तेंडुलकर खूप मोठे आणि महान खेळाडू असून जगभरातील  लोक त्याचे फॅन्स आहेत आणि कायम राहातील  सचिन तेंडुलकरांवर असलेल्या प्रेमापोटी,आदरापोटी  त्यांना आमच्या या चित्रपटाकडून आणि  सर्व फॅन्स कडून एक छोटीशी मानवंदना आम्ही देत आहोत".
 
" हा चित्रपट फक्त क्रिकेट वरच आधारित नाहीये. ह्या चित्रपटात क्रिकेट आणि आयुष्य यांना एकाच एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून दाखवल्या आहेत. असे मत स्वप्नील ने मांडले. "
'आयला आयला सचिन' हे गाणं हर्षवर्धन वावरे, करण वावरे,आदित्य पाटेकर उर्फ त्रिनीती ब्रदर्स यांनी संगीतबद्ध केले असून आदित्य पाटेकर यांनी स्वरबद्ध केले आहे. तर सुजित कुमार यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. 
 
इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित 'मी पण सचिन' चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे या चित्रपटाचे निर्माता असून श्रेयस जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्याने श्रेयस जाधव हे दिग्दर्शनात देखील पाऊल टाकत आहे. श्रेयस जाधव यांनी या आधीही आपल्या चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले आहेत, त्यामुळे या चित्रपटातूनही प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळेल, यात शंका नाही. इरॉस इंटरनेशनलद्वारे 'मी पण सचिन' या चित्रपटाचे जागतिक स्तरावर देखील वितरण केले जाणार आहे.