बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (16:51 IST)

बायोपिक करणार नाही

एक हुरहुन्नरी कलाकार म्हणून ज्याची मराठी सिनेसृष्टीत ओळख आहे असे सुबोध भावे पुन्हा एकदा टेलिव्हिजन माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण यावेळी कोणतीही मालिका नाही तर एका रिअ‍ॅलिटी शोच्या मधून ते आपल्याला दिसणार आहेत. सुबोध यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या या नव्या प्रोजेक्टबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, हा शो महाराष्ट्रातील लोककलेवर आधारित असल्यामुळेच मी याचं सूत्रसंचालन करण्यास तयार झालो. टेलिव्हिजनवर पुन्हा एखादी मालिका करणार का, या प्रश्र्नावर सुबोध म्हणाले, इतक्यात तरी नाही. मी सध्या थोडा ब्रेक घेतला आहे.

'तुला पाहते रे' ही मालिका करताना अनेक प्रोजेक्टस्‌ मी पुढे ढकलले होते, ते आता पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे मात्र नक्की की मी पुन्हा मालिकेत दिसेन, फक्त त्याला थोडा अवकाश आहे. टेलिव्हिजन की सिनेमा, कोणत्या माध्यमात काम करायला जास्त आवडतं, यावर बोलताना ते म्हणाले, माझ्यासाठी सर्वच माध्यंम सारखी आहेत. त्यामुळे मी दोन्हीकडे काम करण्याला प्राधान्य देतो. माझे 2 चित्रपट सध्या बनण्याच्या प्रक्रियेत आहेत. तसेच मी एक चित्रपट प्रेझेन्ट देखील करत आहे. तो ही प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल. पण हे मात्र खरं की मी यापुढे बायोपिक मात्र करणार नाही. कारण आता मला थोडं वेगळं काम करायचं आहे. मला एखादा सिनेमा लहान मुलांसाठी बनवायचा आहे, त्यासाठी मी एखादी परीकथा घेईन.