शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

IND vs AUS दुसरा टी-20: ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने तब्बल पाच वर्षानंतर टी-20 मध्ये भारतावर विजय मिळवला आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात आठ विकेटनं भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियानं सलग आठ सामन्यात पराभवाची मालिकाही खंडीत केली. 28 सप्टेंबर 2012 नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने एकही टी-20 सामना गमावलेला नव्हता. या विजयाने ऑस्ट्रेलियाने तीन सामन्याच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.
 
पहिल्या सामन्यात कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चाहल या फिरकी गोलंदाजांसमोर ऑसी फलंदाजांची दाणादाण उडाली, तर यावेळी जेसन बेहरेन्डॉर्फ, नॅथन कूल्टर नाईल, अँड्रयू टाय आणि मार्कस स्टॉइनिस या वेगवान गोलंदाजांनी भारताची फलंदाजी कापून काढली. त्यांना साथ मिळाली ती लेगस्पिनर ऍडम झाम्पाची.
 
ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण करताना अजिबात वेळ गमावला नाही. सामन्याला जेमतेम तासभर बाकी असेपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे गोलंदाजांना खेळपट्टी आणि हवामानाची मदत मिळणार हे उघडच होते. परंतु प्रत्यक्षात घडले ते अपेक्षेपेक्षा सनसनाटी होते. डावखुरा वेगवान गोलंदाज बेहरेन्डॉर्फने आपल्या केवळ दुसऱ्या टी-20 सामन्यात खेळताना भारताच्या वरच्या फळीची दाणादाण उडविली.
 
बेहरेन्डॉर्फने पहिल्याच षटकात रोहित शर्मा (8) आणि विराट कोहली (0) यांना तंबूचा रस्ता दाखविला. त्याने आपल्या दुसऱ्या व डावातील तिसऱ्या षटकात मनीष पांडेचा (6) आणि आपल्या तिसऱ्या षटकात शिखर धवनचा (2) अडथळा दूर करीत भारताची 4.3 षटकांत 4 बाद 27 अशी अवस्था केली. धोनी (13) आणि केदार जाधव यांनी पाचव्या विकेटसाठी 33 धावांची भर घातल्यावर झाम्पाने धोनी आणि केदार यांचे अडथळे लागोपाठच्या षटकात दूर केले. तर कूल्टर नाईलने भुवनेश्‍वरला (1) बाद करीत भारताची 7 बाद 70 अशी घसरगुंडी घडवून आणली.
 
केदारने 27 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 27 धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पांड्याने 23 चेंडूंत 1 षटकारासह 25 धावा फटकावताना कुलदीप यादवच्या साथीत 33 धावांची भागीदारी करीत भारताला शंभरी ओलांडून दिली. स्टॉइनिसने पांड्याचा अडथळा दूर केल्यामुळे भारताला अखेरच्या षटकांत काही बहुमोल धावा जमा करता आल्या नाहीत. कुलदीपने 19 चेंडूंत 1 चौकारासह 16 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरेन्डॉर्फने 21 धावांत 4 बळी घेताना सर्वोत्तम कामगिरी केली. तर ऍडम झाम्पाने 19 धावांत 2 बळी घेत त्याला सुरेख साथ दिली. नॅथन कूल्टर नाईल, अँड्रयू टाय आणि स्टॉइनिस यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.