बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (14:53 IST)

रोहित शर्मा सर्वाधिक स्फोटक फलंदाज ठरेल

वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्‍या टी-20 सामन्यात दमदार शतक झळकावून रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करताना कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकले. रोहितच्या या कागिरीची भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
 
कसोटी क्रिकेटमध्ये भलेही रोहित शर्मा काहीसा अपयशी ठरला असेल, पण फलंदाजी आणि नेतृत्व या दोन्ही आघाड्यांवर एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये रोहितचे नाणे एकदम खणखणीत वाजले आहे.
 
गावसकर यांनी रोहितची तुलना थेट वीरेंदर सेहवागशी केली आहे. गावसकर म्हणतात, 'व्हिव्हियन रिचड्‌र्स आणि सेहवागनंतर रोहित हा जगातील सर्वात स्फोटक फलंदाज ठरला आहे. सेहवागप्रमाणेच रोहितलाही रोखणे गोलंदाजांना अवघड जाते. सेहवागसारखीच रोहितची धावांची आणि शतकांची भूक जास्त आहे. एक चेंडू बाहेर फेकल्यानंतर दुसरा चेंडू मैदानाबाहेर भिरकावण्याचा सेहवागसारखाच रोहितचाही प्रयत्न असतो. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहितने शानदार कामगिरी केली. आता टी-20 मालिकाही त्यानेच गाजवली.'
 
'मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर रोहितने ज्या प्रकारे अधिराज्य गाजवले आहे, त्या प्रकारे त्याने कसोटी क्रिकेटमध्येही हुकमत गाजवली तर तो रिचड्‌र्स आणि सेहवागनंतरचा जगातील सर्वात स्फोटक फलंदाज ठरेल,' असेही गावसकर यांनी म्हटले आहे. रोहितने या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 73.57च्या सरासरीने 1030 धावा केल्या असून टी-20मध्ये त्याने 556 धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
 
त्याचबरोबर कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने भारताला निदाहास करंडक आणि आशिया चषकाचे जेतेपद मिळवून दिले आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील भारताने जगजेत्या वेस्ट इंडीजविरुद्धची टी-20 मालिका 3-0 ने जिंकली आहे.