हुश्श, दुबळ्या हाँगकाँगला हरविले
आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारताने सलामीच्या लढतीत हाँगकाँगवर २६ धावांनी कसाबसा विजय मिळवला. सलामीवीर निझाकत खान (९२) आणि कर्णधार अंशुमन रथ (७३) यांनी १७४ धावांची सलामी भागीदारी करून भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. पण हे दोघे बाद झाल्यानंतर हाँगकाँगच्या डावाला उतरती कळा लागली आणि भारताने सामना जिंकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खलील अहमदने आणि युझवेंद्र चहलने सर्वाधिक प्रत्येकी ३-३ बळी टिपले.
भारताच्या तुलनेत दुबळ्या मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना रडवले. या दोघांनी १७४ धावांची सलामी भागीदारी केली. त्यामुळे एका क्षणी भारत हा सामना गमावतो की काय, अशी स्थिती होती. मात्र त्यानंतर हे दोघेही पाठोपाठ बाद झाले. निझाकत खानचे शतक ८ धावांनी हुकले. तो तिसऱ्यांदा नववंडीत बाद झाला. तर कर्णधार अंशुमन रथदेखील चुकीचा फटका खेळताना बाद झाला. त्यानंतर मात्र कोणत्याही फलंदाजाला डाव सावरणे जमले नाही. ठराविक अंतराने बळी टिपण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. भारताकडून खलील अहमद आणि युझवेन्द्र चहल यांनी प्रत्येकी ३ तर कुलदीप यादवने २ बळी टिपले.