रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 11 एप्रिल 2019 (10:35 IST)

चोर चोर चोर...

दुपारचं तापलेलं उन्ह... लोकांची वर्दळ... गाड्यांच्या हॉर्नचा कर्कश आवाज... आज नेहमीप्रमाणेच वातावरण होतं. तीच ती दिनचर्या... नवीन असं काही नव्हतं. ज्यांचं हातावर पोट आहे... त्यांच्यासाठी काम करणं किती अनिवार्य असतं हे काही वेगळं सांगायला नको. त्यात एक 15 वर्षांचं पोरगं वाट काढत, सर्वांकडे न्याहाळत चालत होतं. तो मुलगा कसलीतरी संधी शोधत होता. 
 
त्याची नजर एका बाईकडे गेली. त्याने आजूबाजूला पाहिलं. लोक आपल्याच कामात व्यग्र होते. त्या बाईने पर्समधून पैसे काढले आणि भाजीवाल्याला पैसे दिले. तसा तो मुलगा सावध झाला. त्याने संधीचा फायदा घेत त्या बाईच्या हातातली पर्स हिसकावली आणि तो पळू लागला... त्या बाईने लगेच चोर चोर चोर असं ओरडायला सुरुवात केली. मुलगा जोरात पळत असतानाच सतर्क असलेल्या नागरिकांनी त्याला पकडलं. त्या मुलाला मारू लागले. 
 
ती बाई जवळ आली, तिला पर्स मिळाली. तिनेही त्याच्या दोन मुस्कटात मारलं. लोक इतके भडकले होते की जणू आता ते त्या मुलाचा जीवच घेतील. तेवढ्यात गर्दीतून एक देखणा माणूस समोर आला आणि म्हणाला का मारताय या मुलाला? लोकांनी करण्याचं कारण सांगितलं, तो देखणा माणूस म्हणाला या मुलाचं चुकलंच. पण त्याने चोरी केली पोटासाठी. असे कितीसे पैसे होते तुमच्या पर्समध्ये. बाई म्हणाली हजार रुपये तरी असतील. 
 
तो माणूस म्हणाला या मुलाने हजार रुपये चोरले म्हणून तुम्ही याचा जीव घ्यायला निघालात. पण इतकी वर्षे ज्यांनी आपले इतके पैसे चोरले त्यांना तुम्ही साधा जाब तरी विचारला का? की तुम्ही भ्रष्टाचार का केला? तुम्ही त्यांच्यावर हात सोडा पण त्यांना एक साधं पत्र तरी धाडलंय का? कमलनाथ ह्यांच्या नीकटवर्तीयांकडे इतके पैसे सापडले, देशात लवासा, बोफोर्स, स्पेक्ट्रम, नॅशनल हेराल्ड, अगस्ता वेस्टलँड इतके घोटाळे झाले तुम्ही एकदा तरी यासाठी रस्त्यावर उतरलात का? नाही ना? मग या मुलावर हात उगारण्याची तुमची लायकी नाही. सर्व माणसे खजील झाली. सर्व जण मागे फिरू लागले. देखणा माणूस म्हणाला आजही असेच गप्प निघून जाणार का? तर ती बाई म्हणाली नाही... आम्ही मतदान करायला चाललोय. सुरक्षित, प्रगत, भ्रष्टाचारमुक्त भारत आणि विकासाला मतदान करणार... तो देखणा माणूस खुश झाला. 
 
माणसाने मुलाला विचारले शाळेत जाणार? मुलाने होकारार्थी मान हलवली. माणूस म्हणाला मोठं होऊ काय व्हायचंय तुला. मुलगा म्हणाला मला पोलीस व्हायचंय. देश लुटणाऱ्यांना आत टाकणार...
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री