गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (16:19 IST)

अंतराळवीर अंतराळात काय जेवतात? ते तिथं झोप कशी घेतात?

आजघडीला पृथ्वीवर सुमारे 700 कोटी माणसं राहतात. या सगळ्यांची दिनचर्या ही बहुतांशी सारखीच असते. म्हणजे जेवण, पाणी पिणे, काम करणे आणि झोपणे.
 
पण यात फक्त सहा जण असे आहेत, ज्यांची दिनचर्या अतिशय विचित्र आहे, असं म्हणावं लागेल. होय. आपण ज्यांच्याविषयी बोलत आहोत, ते 6 जण शास्त्रज्ञ असून पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटरवर स्थित इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये ते सध्या राहत आहेत.
 
या स्पेस स्टेशनमध्ये एकूण 6 शास्त्रज्ञ कार्यरत असून त्यांची जीवनशैली इतर सर्वसामान्य माणसापेक्षा प्रचंड वेगळी आहे.
 
अंतराळात या सहा जणांच्या जेवणाची पद्धत, पेयपदार्थांचं सेवन, झोप आणि एकूणच दिनचर्येबाबत आपण या लेखात जाणून घेऊ -
 
अंतराळात झोप कशी घेतात?
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये एक बॅग विशेषतः झोप घेण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या बॅगमध्ये अंतराळवीर जाऊन बसतात. यामध्ये बसून तरंगत्या अवस्थेतच ते आपली झोप घेतात.
 
सकाळी सहा वाजता लावलेला अलार्म या शास्त्रज्ञांना झोपेतून जागी करतो. यानंतर त्यांना आपल्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे करावी लागते.
सुरुवातीला शास्त्रज्ञ प्रातर्विधी उरकून घेतात. त्यानंतर ब्रश करून ते तयार होतात.
 
ब्रश केल्यानंतर त्यांना टूथपेस्ट आणि ब्रश वेगळ्या ठिकाणी नीट बांधून ठेवावं लागतं. अन्यथा ते हवेत तरंगत इकडे-तिकडे फिरत राहू शकतात.
 
नाश्ता केल्यानंतर सहा अंतराळवीर हे येथील नियंत्रण कक्षात एकत्र जमतात. इंटरनॅशनल स्पेस सेंटरच्या खालील भागात हे कक्ष उभारण्यात आलं आहे. यानंतर दिवसभरात कुणी काय करणार आहे, याचं नियोजन केलं जातं.
यानंतर दिवसातील बहुतांश वेळ हे शास्त्रज्ञ इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची डागडुजी आणि त्याच्या कामाचं निरीक्षण करण्यात घालवतात.
 
यादरम्यान, स्टेशनची साफसफाई, निगा राखणे आणि इतर कामे केली जातात. याशिवाय स्पेस स्टेशनमधील एअर प्युरिफायरच्या कामाचं निरीक्षणही रोजच्या रोज करण्यात येत असतं.
 
अंतराळवीर करत असलेली प्रत्येक प्रक्रिया करण्यासाठीचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेलं असतं. त्याच पद्धतीने ते ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडतात.
 
अंतराळात तरंगण्याचा अनुभव
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये गुरुत्वाकर्षण नसतं, तिथे आपण तरंगत्या अवस्थेत असतो. हे खूप मजेशीर आहे किंवा हे हवेत उडण्याचा अनुभव घेण्याप्रमाणे आहे, असं तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात.
 
स्पेस स्टेशनमध्ये राहणं हे आपल्यासाठी अतिशय आव्हानात्मक आहे. कारण तिथे तुमच्यासोबतच तुम्ही वापरत असलेली प्रत्येक गोष्ट तरंगत असल्याने तिथे राहणं अत्यंत कठीण आहे.
गंमतीने असं म्हटलं जातं की एखादा नवीन अंतराळवीर अंतराळ मोहिमेवर स्पेस स्टेशनमध्ये आला. तर सुरुवातीच्या काळात आपली वस्तू कुठे ठेवलीय, हे शोधण्यातच तो बराच वेळ घालवताना तुम्हाला दिसेल.
 
अंतराळात तरंगत्या स्थितीत राहिल्यामुळे शास्त्रज्ञांना विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांनाही तोंड द्यावं लागू शकतं.
 
खरं तर, इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये शास्त्रज्ञांना पाठवण्याचं एक कारण हे शून्य गुरुत्वाकर्षणात राहण्याचा मानवाचा अनुभव कसा असू शकतो, हे पाहणंही आहे.
 
सध्या शास्त्रज्ञांना येत असलेल्या अनुभवांची नोंद करून त्याचा वापर भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये करण्यासाठीही संशोधन करण्यात येत आहे.
 
अंतराळात शून्य गुरुत्वाकर्षण असल्यामुळे अंतराळवीरांची हाडे तिथे अतिशय नाजूक बनतात. तसंच यामुळे मानवाचे स्नायूही कमकुवत होऊ लागतात, असं दिसून आलं आहे.
 
त्यामुळे, अशा प्रकारच्या समस्या टाळण्यासाठी अंतराळवीर रोज किमान दोन तास व्यायाम करतात. व्यायामासाठी स्पेस स्टेशनमध्येच एका ठिकाणी छोटंसं जिमही बनवण्यात आलेलं आहे.
 
अंतराळवीर काय खातात?
पृथ्वीवर आपण आपल्या दिनचर्येची साधारणपणे आठवड्याचे दिवस आणि आठवड्याची अखेर (विकडे आणि विकेंड) अशी विभागणी केली आहे. अंतराळातही शास्त्रज्ञांनी अशाच प्रकारे आठवड्याचं विभाजन केलेलं आहे.
 
कामाच्या दिवसांमध्ये शास्त्रज्ञ हे आपापल्या टीमच्या जबाबदारीनुसार कामे करतात. कामाच्या दिवसांमध्ये अंतराळवीर आठवड्यातून एकदा दुपारच्या जेवणासाठी एकत्र येतात. तर, विकेंडमध्ये अंतराळवीर पूर्णवेळ एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात. सोबतच जेवणं, गप्पा मारणं आणि मजा करणं असा कार्यक्रम चालतो
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये विविध देशांचे अंतराळवीर एकत्रित राहत आहेत. त्यामुळे या अंतराळवीरांच्या आहारात काही प्रमाणात फरक आढळून येतो.
 
उदाहरणार्थ, रशियन अंतराळवीर हे पॅकेज्ड जेवण खाण्याआधी ते गरम करणं पसंत करतात.
 
अंतराळवीरांना खाण्यासाठी ठराविक कालावधीत पृथ्वीवरून खाण्या-पिण्याच्या गोष्टीही पाठवल्या जातात. यामध्ये फळांचा प्रामुख्याने समावेश असतो. अंतराळात खाण्यापिण्याच्या गोष्टी लवकर खराब होतात, असं आढळून आलं आहे. त्यामुळे फळे तातडीने खाण्यावर शास्त्रज्ञांचा भर असतो.
 
पूर्णपणे वेगळ्या वातावरणात हे अंतराळवीर काम करत असतात. त्यामुळे विविध प्रकारची फळे खाणे, एकत्रित जेवण करणे, तसंच एखाद्या विशेष दिवसाचं सेलिब्रेशन करणे अशा गोष्टी करून ते आपलं मन रमवतात. या माध्यमातून आपलं मानसिक आरोग्य उत्तम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
 
स्पेस स्टेशनवरची कामे
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची स्थापना ही शून्य गुरुत्वाकर्षण स्थितीचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आली आहे. एखाद्या शास्त्रज्ञाला स्पेस स्टेशनवर पाठवण्याआधी त्याला पृथ्वीवर त्यासाठीचं प्रशिक्षण देण्यात येतं.
 
स्पेस स्टेशनवर गेल्यानंतर करावयाची कामे, प्रयोग, उपकरणे हाताळण्याची पद्धत आदींचं प्रशिक्षण शास्त्रज्ञांना पृथ्वीवरच एकाच प्रयोगशाळेत दिलं जातं.
 
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर एकूण पाच प्रयोगशाळा आहेत. त्यामध्ये दोन प्रयोगशाळा रशियाच्या असून अमेरिका, युरोप आणि जपान यांच्या प्रत्येक एक प्रयोगशाळा आहेत.
 
स्पेस स्टेशनवर केल्या जाणाऱ्या कामांमध्ये विविध संशोधनांचा समावेश आहे. त्यामध्ये पृथ्वीचे फोटो घेणं, माहिती गोळा करणं, तसंच मुंगी, मासे किंवा कीटक यांच्यासारख्या एकपेशीय जीवांना अंतराळात नेऊन त्यांचं निरीक्षण करणं हे कामही तिथे केलं जात असतं.
 
भविष्यात मंगळावर मानव पाठवण्याचे प्रयत्न पृथ्वीवर विविध अंतराळ संशोधन केंद्रांमार्फत सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी माहिती जमा करणं, हे कामसुद्धा स्पेस स्टेशनवर केलं जातं.
 
स्पेस स्टेशनबाहेरील परिस्थिती
अंतराळवीर हे प्रामुख्याने बहुतांश काम इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या आतमध्ये बसूनच करतात. पण काही विशिष्ट परिस्थितीत त्यांना स्पेस स्टेशनच्या बाहेर पडून काही कामे करावी लागतात.
 
हा अनुभव मात्र अविस्मरणीय स्वरुपाचा असू शकतो. यामध्ये धोकाही तितका असतो आणि आव्हानही तेवढंच मोठं असल्याने बिनचूक काम करण्याची आवश्यकता असते. अशा स्थितीत या कामाचं नियोजन अतिशय काटेकोरपणे करण्यात येतं.
 
एखादा अंतराळवीर स्पेस स्टेशनच्या बाहेर पडून एखादं काम करणार असेल, तर त्याला विशिष्ट प्रकारचा स्पेस सूट (अंतराळात घातला जाणारा सुसज्ज पोशाख) परिधान करावा लागतो.
 
स्पेस स्टेशनबाहेर पडून अशा प्रकारे काम करण्यासाठी एक शंभर पानी सूचनापत्रक देण्यात आलेलं आहे. सुमारे चार तास त्याचा अभ्यास केल्यानंतरच अंतराळवीराला बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येते.
 
सुरक्षेच्या कारणास्तव एका वेळी दोन अंतराळवीर एकत्रितरित्या स्पेस स्टेशनच्या बाहेर पडतात. बाहेर गेल्यानंतर जास्तीत जास्त आठ तास ते बाहेर राहू शकतात.
 
स्पेस स्टेशनच्या बाहेर पडून अशा प्रकारे काम करण्याचं प्रशिक्षण अंतराळवीरांना पृथ्वीवरच देण्यात येतं. त्यासाठी पृथ्वीवर एका मोठ्या पाण्याच्या टाकीत एक मॉडेल स्पेस स्टेशन ठेवण्यात आलेलं आहे. तिथे अशा प्रकारे सुट घालून बाहेर पडून दुरुस्ती करण्याचं काम शिकवण्यात येत असतं.
 
अंतराळवीरांचा छंद
अंतराळवीरांना देण्यात आलेली दैनंदिन जबाबदारी त्यांनी पूर्ण केल्यानंतर उर्वरित वेळ ते आपल्या पद्धतीने घालवू शकतात. यादरम्यान ते आपला छंदही जोपासतात.
 
टाईमपास करण्यासाठी चित्रपट पाहणं, मित्र-नातेवाईकांशी बोलणं, ईमेल करणं यांसारख्या गोष्टी ते इंटरनॅशनल स्पेस सेंटरमधून करू शकतात.
पण अंतराळवीरांचा स्पेस स्टेशनमध्ये गेल्यानंतरचा सर्वात आवडीचा छंद म्हणजे पृथ्वीचं निरीक्षण करणं हाच असतो. ते वरून एका दुर्बिणीच्या साहाय्याने पृथ्वीचं निरीक्षण करतात.
 
पृथ्वीवरची शहरं, जंगलं, समुद्र किंवा पर्वतरांगा वरून कसे दिसतात, हे पाहण्यात त्यांचा बराच वेळ जातो. त्या नयनरम्य दृश्याचे फोटोही ते काढून ठेवतात.
 
अंतराळवीर ख्रिस हार्टफिल्ड हे इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये गिटार वाजवाजचे. तिथे त्यांनी बनवलेला एका म्युझिक व्हीडिओही खूप लोकप्रिय झाला होता.
 





















Published By- Priya Dixit